तुम्हाला तोंडात वारंवार कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामागची कारणे जाणून घेऊन त्याच्यावरचे घरगुती उपाय माहीत करून घेण्यासाठी हा लेख वाचा.
बऱ्याच वेळा पाणी कमी प्यायल्याने, खूप वेळ झोप घेतल्याने, बाहेर फिरून आल्यानंतर किंवा खूप वेळ बोलल्यानंतर आपले तोंड कोरडे पडते.
हा अनुभव कमी जास्त प्रमाणात आपल्यापैकी सगळ्यांनाच आला असेल.
अशा वेळेला आपण पटकन पाणी पिऊन ओठ आणि तोंड ओले करतो आणि तोंडाचा कोरडेपणा काही वेळासाठी दूर होतो.
पण तोंड कोरडे पडण्यासाठी यापेक्षा सुद्धा वेगळी अशी काही कारणे आहेत.
बऱ्याचदा अनेकांना हा त्रास जाणवतो आणि मग पाणी मिळेपर्यंत एकदम बैचैन व्हायला होते.
यासाठी जास्त करून डॉक्टरांची आवशक्यता भासत नाही, पण जर हा त्रास सारखा होत असेल आणि मुख्य म्हणजे घरगुती उपायांनी तो बरा होत नसेल तर मात्र वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.
आपण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहायला हवे.
या तक्रारी जरी लहान वाटत असल्या तरी त्यांच्या आपल्या जगण्यावर, वागण्यावर आणि एकंदरीत वावरण्यावर परिणाम होत असतो.
म्हणून अशा किरकोळ वाटणाऱ्या समस्यांकडे सुद्धा दुर्लक्ष न करता त्यापासून सुटका मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक लहान मोठ्या समस्यांची माहिती आणि त्यावरचे घरगुती उपाय अनेक लेखातून बघत असतो.
आज या लेखात सुद्धा हे तोंड कोरडे पडते म्हणजे नेमके काय होते?
कशामुळे होते आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत हे आपण बघणार आहोत.
तोंड कोरडे पडणे याला वैद्यकीय भाषेत झिरोस्टोमीया असे म्हणतात.
झिरोस्टोमीया ही स्वतः एक समस्या असली तरी ती इतर काही व्याधींमुळे उत्भवण्याची शक्यता असते.
आपल्या तोंडात नेहमी ओलसरपणा असतो तो तोंडात असलेल्या लाळेमुळे.
आपल्या तोंडात असलेल्या लाळेच्या ग्रंथी जेव्हा योग्य प्रमाणात लाळ तयार करत नाहीत तेव्हा तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास होतो.
हे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की पाणी कमी प्यायल्याने डीहायड्रेशन, स्ट्रेस, झोपेत तोंडाने श्वास घेतल्यामुळे, मधुमेह, काही औषधांचे दुष्परिणाम, तंबाखू किंवा सिगारेटचा अतिरेक.
आजारपणात, विशेषतः ताप आलेला असताना सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जाणवतो.
कारण काहीही असो या तोंडाच्या कोरडेपणामुळे आपल्याला प्रचंड अस्वस्थता वाटते.
पण त्यातल्यात्यात चांगली गोष्ट अशी आहे की ही समस्या काही सोप्या घरगुती उपायांने आणि काही सवयी बदलल्याने दूर होऊ शकते.
तोंडाचा कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.
१. दिवसभर घोट घोट पाणी पीत राहा
अनेक समस्यांवर भरपूर पाणी पिणे हा उपाय असतोच.
आपल्याला दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याची गरज असते.
डीहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असली की तोंड कोरडे पडते.
म्हणूनच आपले दिवसभराचे ८ ते १० ग्लास पाणी पिताना आपण ते हळूहळू एकेक घोट असे प्यायले तर तोंड ओलसर राहते, डीहायड्रेशन होत नाही.
यासाठी काम करताना आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगली आणि साधारण दर अर्धा तासाने त्यातून थोडे थोडे पाणी पीत राहता येते.
असे केल्याने आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पीत आहोत ना? हे देखील कळते.
२. चुईंग गम खा
चुईंग गम खाताना तोंडाच्या हालचालींमुळे आपल्या लाळेच्या ग्रंथी सक्रीय होतात.
यामुळे लाळेचे प्रमाण वाढते. चुईग गममध्ये असणाऱ्या झायलीटाॅल या रसायनामुळे सुद्धा लाळ निर्माण व्हायचे प्रमाण वाढते.
चुईंग गमची निवड करताना शुगर फ्री चुईंग गम निवडावे.
३. तोंडाची स्वच्छता ठेवा
तोंडाची म्हणजेच दातांची, जिभेची आणि हिरड्यांची नीट स्वच्छता ठेवली नाही तर त्याचा परिणाम म्हणजे तोंडाचा कोरडेपणा.
म्हणूनच रोज दोनदा दात घासणे, दात घासताना जीभ सुद्धा साफ करणे.
जेवणानंतर तसेच काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे या चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर त्याचा फायदा होतो.
४. अल्कोहोल फ्री माऊथ वाॅशची निवड करा
तोंडाची स्वच्छता ठेवताना माऊथ वाॅश वापरताना तो अल्कोहोल फ्री आहे ना याची खात्री करून घ्या कारण अशा माऊथ वाॅशमुळे तोंड कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते.
झायलीटाॅल असणाऱ्या माऊथ वाॅशची निवड केल्याने लाळेचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल.
५. तोंडाने श्वास घेणे टाळावे
तोंडाद्वारे श्वास घेतला तर तोंड जास्त प्रमाणात कोरडे पडायला लागते.
आपल्या नकळतपणे आपण कामात असताना बऱ्याचदा तोंडाने श्वास घेतो.
मात्र आपल्याला जर तोंड कोरडे पडण्याचा त्रास असेल तर हे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.
रात्री झोपेत असताना विशेषतः तोंडाने श्वास घेतला जातो.
तोंडाचा कोरडेपणा घालवायचा असेल तर ही सवय लक्ष देऊन बदलायला हवी.
वातावरण कोरडे असेल तर तोंडाचा कोरडेपणा वाढतो.
हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमीडीफायरचा वापर केला जाऊ शकतो.
आपल्या खोलीत रात्री ह्युमीडीफायर लावल्याने तोंडाने श्वास घ्यायचे प्रमाण कमी होते.
६. कोरफड
कोरफडीचे अनेक उपयोग आहेत. कोरफडीच्या गरात पाण्याचे प्रमाण जास्त असते.
कोरफडीचा ज्युस प्यायल्याने आपले तोंड ओलसर राहून कोरडेपणा दूर होतो.
७. आले/काळी मिरी
आले किंवा काळी मिरी चावून खाल्ल्याने आपल्या तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी सक्रीय होतात.
तोंडातील लाळेचे प्रमाण वाढल्याने तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर होतो.
८. डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या
केवळ पाणी योग्य प्रमाणात प्यायले तर डीहायड्रेशन होत नाही असे नसते.
डीहायड्रेशन होण्यामागे इतरही अनेक करणे आहेत.
चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेये, ज्यात कॅफीन जास्त प्रमाणात असतात यांच्या प्रमाणाबाहेर सेवनाने तोंडात कोरडेपणा जाणवू शकतो.
त्यामुळे या पेयांचा अतिरेक टाळावा.
तसेच अल्कोहोलमुळे सुद्धा तोंड कोरडे पडण्याचा धोका जास्त असतो.
तंबाखू किंवा सिगारेटमुळे सुद्धा डीहायड्रेशन होते.
तसेच खूप प्रमाणात साखर खाल्ल्याने सुद्धा तोंड कोरडे पडून त्रास होऊ शकतो. यासाठी गोड पदार्थ, साखर असलेली चुईंग गम, सरबते इत्यादी टाळली पाहिजेत.
म्हणून दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिण्यारोबरच ही काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर करायचा असेल तर या सवयी कटाक्षाने बदलल्या पाहिजेत.
सहसा या सोप्या घरगुती उपायांचा फायदा होतो.
पण हे उपाय करून सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जात नसल्यास त्याचे कारण काही वेगळे, जसे की मधुमेहाचे लक्षण असू शकते यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून त्या आजारावर उपचार घेऊन त्यामुळे तोंडाला येणारा कोरडेपणा कमी होईल.
तोंडाचा कोरडेपणा एखाद्या औषधांचा परिणाम सुद्धा असू शकतो.
त्यामुळे तुमची काही औषधे बदलली असतील आणि तुम्हाला हा त्रास सुरु झाला असेल तर त्याबद्दल सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
माझे लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी आले आहे, जेवताना, नाष्टा करताना प्रत्येक घासा बरोबर पाणी प्यावे लागत आहे म्हणजे ( पाण्याचा थोडासा घोट,सीप) घ्यावा लागतो. तसेच तिखट,गरम जिभेला सोसवत नाही.तिखट लागुन दाह होतो, तरी या वर उपाय सांगावा हि नम्र विनंती. अथवा मी कोल्हापूर चा रहिवासी असून कोणत्या डॉ. चा सल्ला घ्यावा हे कळवावे ही विनंती.