सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागची कारणे जाणून घ्या

मध्यरात्री जाग आल्यावर किंवा सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा .

आपल्या शरीराचे एक स्वतंत्र घड्याळ असते. यामुळेच आपल्या झोपेच्या, खाण्याच्या वेळा या ठरलेल्या असतात.

शरीराला तशी सवय सुद्धा याच बॉडी क्लॉकमुळे लागलेली असते.

म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला भूक लागत नाही पण सकाळी उठल्यावर भूक लागते, दिवसभर साधारण ४-५ तासांनी भुकेची जाणीव होत राहते.

संध्याकाळच्या (७-८ वेळ वेगवेळी असू शकते) वेळी प्रचंड भूक लागते. संध्याकाळी जेवल्यावर मात्र मग आपण रात्रभर आपण जवळजवळ १० किंवा १२ तास उपाशी असतो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करेपर्यंत. 

पण काहीवेळा मात्र रात्री जेवण झाल्यावर सुद्धा तीन चार तासांनी भूक लागते आणि जाग येते, किंवा सकाळी जाग  येते तीच पोटात भुकेच्या जाणीवेमुळे.

सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागची कारणे जाणून घ्या

तुम्हाला सुद्धा असा अनुभव असेलच ना? खरेतर हे होणे हे चांगले लक्षण नाही.

असे होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचे काहीतरी चुकते आहे.

तुमची जेवणाची पद्धत, आहार, जीवनशैली यामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा तुमच्या शरीराला कसलीतरी कमतरता आहे. 

तुम्हाला रात्री मधेच भूक लागून जाग येत असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागे काय करणे असू शकतात, तुम्ही ती टाळू कशी शकता याबद्दल आजचा हा लेख आहे. 

सकाळी उठल्यावर सहसा प्रत्येकाला भूक लागतेच कारण ७ ते ८ तासांच्या झोपेत जरी शरीराची हालचाल होत नसली तरीही आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होतच असतात.

पण जर रात्री मधेच प्रचंड भूक लागून जाग येत असेल तर त्याचा अर्थ काहीतरी चुकते आहे. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की.. 

१. झोपण्यापूर्वी जास्त खाणे 

झोपेतून भूक लागून जाग येऊ नये म्हणून रात्रीच्या जेवणात जर तुम्ही पोटभरीचे खात असाल तर खरेतर त्याचमुळे भूक लागून तुम्हाला मधेच जाग येण्याची शक्यता असते.

रात्रीच्या जेवणात जर फास्ट फूड, जास्त कॅलरी असणारे पदार्थ खाल्ले तर लवकर भूक लागते. 

जेव्हा तुम्ही फास्ट फूड खाता तेव्हा तुमच्या पोटात कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च हे जास्त प्रमाणात जातात.

यामुळे रक्तातील साखर एकदम वाढते.

रक्तातील साखर पेशींमध्ये शोषली जावी यासाठी इन्सुलिन हे हार्मोन स्त्रवले जाते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेची पातळी पटकन खाली उतरते ज्यामुळे भुकेची जाणीव होते. 

यावर उपाय काय?

असे होऊ नये यासाठी रात्रीचे जेवण शक्यतो हलके घ्यावे, जास्त कॅलरी त्यात नसाव्यात.

यामुळे रक्तातील साखर वाढून इन्सुलिन खूप प्रमाणात स्त्रवले जाणार नाही. 

२. झोप कमी होणे 

रात्रीची सलग झोप होत नसेल तर मध्ये जेव्हा जेव्हा जाग येते तेव्हा भूक लागल्यासारखे वाटते, तसेच सकाळी उठल्यावर सुद्धा भूक लागण्याचे प्रमाण वाढलेले असते.

यामागे ग्रेनेलीन नावाच्या हार्मोनचा हात आहे. जेव्हा झोप अपूर्ण राहते तेव्हा या हार्मोनचे प्रमाण वाढते. ग्रेनेलीन या हार्मोनचा संबंध भूक लागण्याशी आहे. याचे प्रमाण वाढले की जास्त प्रमाणात भूक लागते. 

यावरचा उपाय सोपा आहे, भुकेने बेजार होऊन जर सकाळी जाग येऊन नको असेल तर रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी. शक्यतो सात ते आठ तासांची सलग झोप ही गरजेची असते. 

३. प्री मेन्स्त्रुअल सिंड्रोम 

बायकांना पाळी सुरु होण्याआधी साधारण चार पाच दिवस हा त्रास होतो. शरीरात हार्मोन्समधील बदलणाऱ्या पातळीमुळे हे होते.

या दिवसात झोप कमी होणे, दमल्यासारखे वाटणे, जास्त भूक लागणे, विशिष्ट पदार्थ खावासा वाटणे यासारखे त्रास होऊ शकतात. 

हा त्रास तात्पुरताच असतो. पाळी संपल्यावर, पुढची पाळी सुरु व्हायच्या काही दिवस आधीपर्यंत ही लक्षणे दिसत नाहीत. 

४. औषधे 

काही औषधांनी भूक वाढते. डिप्रेशनसाठीची औषधे, स्टीरॉईड, मायग्रेनसाठीची औषधे, डायबेटीसची औषधे (इन्सुलिन) अशी काही औषधे तुम्हाला सुरु असतील तर तुम्हाला सकाळी उठल्यावर जास्त भुकेची जाणीव होण्याची शक्यता आहे.

तुमच्या तब्येतीच्या हितासाठी ही औषधे घेणे गरजेचे असते त्यामुळे भूक शमवण्यासाठी सकाळी उठल्यावर काहीतरी खाणे याशिवाय पर्याय नाही. 

५. तहान 

शरीराला दिवसभर पाणी कमी प्रमाणात मिळाले तर डीहायड्रेशन होऊ शकते. डीहायड्रेशन म्हणजे शरीरला होणारी पाण्याची कमतरता.

यामुळे थकवा येऊ शकतो.

रात्री अपरात्री या थकव्यामुळे तहान लागून जाग येण्याची शक्यता असते. पण जाग आल्यावर नक्की तहान आहे का भूक आहे असा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

अशावेळेला, रात्री अचानक भूक लागून जाग आली तर आधी एक ग्लास पाणी पिऊन बघावे. पाणी प्यायल्यावर भुकेची जाणीव गेली तर समजावे की हे डीहायड्रेशन, थकव्यामुळे झाले. 

असे होऊ नये, रात्री तहान लागून जाग येऊ नये यासाठी दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

६. स्ट्रेस 

स्ट्रेसमुळे भूक वाढते. तुम्हाला सुद्धा याचा अनुभव असेलच. जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस, टेन्शन येते तेव्हा तुमची भूक वाढते. अशावेळी रात्री सुद्धा भूक लागून जाग येते.

स्ट्रेसमुळे शरीरातील काॅरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले जाते आणि त्याचमुळे भूक लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. 

स्ट्रेस कमी व्हावा यासाठी योगासने, ध्यान, प्राणायाम यासारख्या व्यायामांचा उपयोग होतो. 

७. रात्रीच्या वेळी व्यायाम 

व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. याचसाठी व्यायामाचे महत्व अधोरेखित केले जाते. पण जर रात्रीच्या वेळी खूप प्रमाणात व्यायाम केला तर रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी होते ज्यामुळे रात्री अपरात्री भूक लागून जाग येण्याची शक्यता असते. 

यासाठी शक्यतो रात्रीच्या वेळी खूप व्यायाम करणे टाळावे.

काही  वेळा अगदीच पर्याय नसतो, दिवसभर इतर व्यापांमुळे वेळ होत नाही.

अशावेळेला रात्री जर व्यायाम करावा लागत असेल तरत्यानंतर पोटभरीचे खाल्ले पाहिजे. व्यायामानंतर आणि  झोपण्यापूर्वी जास्त प्रोटीन्स असलेले पदार्थ खावेत. डीहायड्रेशन आणि थकवा येऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. 

८. गरोदरपणा 

गरोदर बायकांना सहसा रात्रीच्या वेळी भूक अनावर होऊन जाग येते.

सहसा यात काही काळजी करण्यासारखे नसते, रात्रीच्या वेळी जास्त प्रोटीन असणारे पदार्थ खाल्ल्याने आणि झोपण्यापूर्वी कोमट दुध घेतल्याने रात्रभर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि हा त्रास कमी होतो. 

जर गरोदरपणात रात्रीच्या वेळी भूक लागण्याचे प्रमाण खूप जास्त असेल तर ते गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाचे लक्षण असू शकते. बाळाच्या जन्मानंतर हा मधुमेह बरा होतो आणि रात्रीच्या वेळी भूक लागण्याचा त्रास हळूहळू कमी होतो. 

याशिवाय जर तुमचे वजन खूप जास्त असेल, थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी भूक लागून जाग येण्याची शक्यता असते.

त्यामुळे जर वरील कारणे तुमच्या बाबतीत लागू नसतील तर यासाठी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. 

रात्री व्यवस्थित झोप लागावी, पोट भरलेले राहावे, मध्ये भुकेमुळे जाग येऊ नये यासाठी चौकस आहार घ्यावा. वर सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या जेवणात काहीतरी हलके खावे, भरपूर पाणी प्यावे, व्यायाम करावा.

रात्रीच्या वेळी भूक लागून जाग येण्याचे मुख्य कारण रक्तातील साखरेची पातळी कमी होणे हे आहे. तुमचे वजन जास्त असेल तर हा त्रास जास्त होतो त्यामुळे वजन कमी करणे हा एक महत्वाचा उपाय आहे.  

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment