वारंवार लघवी होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय 

आयुर्वेदात असे सांगितले आहे की जर वारंवार लघवी होत असेल तर शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाले आहे असे समजावे. वारंवार लघवी होणे हे त्रासदायक तर आहेच शिवाय काही आजारांमुळे देखील तसे होऊ शकते. आज आपण यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया.

वात, पित्त, कफ या दोषांच्या संतुलनाबद्दल अधिक माहिती हवी आल्यास लेखाच्या शेवटी त्याबद्दल माहिती वाचता येईल.

लघवीशी संबंधित कोणत्याही आजारांमध्ये लघवीचा रंग महत्त्वाचा ठरतो. लघवीचे काही विशिष्ट रंग गंभीर आजाराचे द्योतक असू शकतात. लघवीचा रंग हलका पिवळा असेल तर ती व्यक्ती निरोगी आहे असे समजावे. परंतु त्या व्यतिरिक्त इतर रंग आजाराचे द्योतक असतात. कसे ते आपण पाहूया.

१. गडद पिवळा 

लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल तर ते शरीरातील डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता याचे द्योतक आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

२. लाल

लघवीचा रंग लाल असणे हे लघवीमध्ये रक्ताचे अंश असण्याची शक्यता दर्शवतात. असे होत असेल तर तज्ञ डॉक्टरांना दाखवणे अतिशय आवश्यक आहे. कारण असा रक्ताचा अंश लघवीमध्ये असणे मूत्राशय, गर्भाशय किंवा प्रोस्टेट ग्रंथी यामधील बिघाडामुळे असू शकते.

३. गडद लाल किंवा काळा 

लघवीचा गडद लाल किंवा काळा रंग गंभीर आजाराचे लक्षण आहे. यकृताचा आजार, तेथे असू शकणारे इन्फेक्शन, हेपिटायटीस किंवा ट्यूमर असे गंभीर आजार यामागे असू शकतात.

४. पिवळसर केशरी रंग 

एखाद्या औषधाच्या नियमित सेवनामुळे लघवीचा रंग पिवळसर केशरी असू शकतो. तसेच सिट्रस फळे खाण्यामुळे देखील असा रंग येऊ शकतो. परंतु असे न करता देखील केशरी रंगाची लघवी होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.

किती प्रमाणात लघवी होते हेदेखील स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसाला दिवसाला एक ते दोन लिटर इतकी लघवी होते. उन्हाळ्यात घाम येण्यामुळे अर्थातच हे प्रमाण कमी असते आणि थंडी आणि पावसाळ्यात हे प्रमाण वाढते. युरिया सारखा घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम लघवीवाटे केले जाते. त्यामुळे योग्य प्रमाणात लघवी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

वारंवार लघवी होत आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे 

वारंवार लघवी होणे हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. त्याच आजाराची इतरही काही लक्षणे दिसू शकतात.

१. सुरुवातीला रात्री लघवी साठी उठावे लागणे हे लक्षण दिसते.

२. त्यानंतर दिवसादेखील वारंवार लघवीला जावे लागते.

३. हळूहळू रुग्णाचे लघवीवरचे नियंत्रण कमी होऊ लागते.

४. लघवीला जाण्याची खूप घाई होते परंतु त्यानंतर मात्र अगदी थेंब थेंब लघवी होते.

५. लघवी होत असताना वेदना होणे किंवा लघवी करणे त्रासदायक होणे असे होऊ शकते.

अशी लक्षणे दिसत असतील तर वारंवार लघवी होण्याची समस्या आहे असे लक्षात येते.

वारंवार लघवी होण्याची कारणे 

मूत्राशय अधिक सक्रिय असणे हे वारंवार लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे. अशावेळी ती व्यक्ती वारंवार लघवी करून अगदी त्रासून जाते. त्या व्यतिरिक्त खालील कारणांमुळे देखील वारंवार लघवी होऊ शकते.

१. मधुमेह 

मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीवाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवी होण्याचा त्रास होऊ शकतो.

२. व्यायाम 

अनेक व्यायामपटू व्यायामामुळे शरीरातील पाणी कमी होते ह्या कारणामुळे भरपूर प्रमाणात पाणी पितात. परंतु त्याच मुळे त्यांना वारंवार लघवीला जावे लागण्याचा त्रास होऊ शकतो.

३. औषधाचा साइड एफेक्ट 

काहीवेळा एखाद्या आजारावर घ्याव्या लागणाऱ्या औषधाचा साईड इफेक्ट म्हणून लघवीच्या मात्रेमध्ये वाढ होते. अशावेळी औषध बदलण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४. मूत्राशयाचा कॅन्सर 

मूत्राशयाच्या कॅन्सर झालेल्या रुग्णाला वारंवार लघवी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अशा रुग्णाला लघवीवाटे रक्त जाण्याच्या समस्येला देखील तोंड द्यावे लागते.

५. प्रोस्टेट ग्रंथी मध्ये वाढ 

पुरुषांमध्ये असणाऱ्या प्रोस्टेट नावाच्या ग्रंथी मध्ये वाढ झाली असता वारंवार लघवीला जाण्याची भावना होते. हा त्रास वयस्कर पुरुषांमध्ये जास्त आढळून येतो.

६. प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर 

प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झालेल्या रुग्णांमध्ये देखील वारंवार लघवी होण्याची समस्या आढळून येते.

७. गरोदरपणा 

वाढत्या गर्भामुळे गर्भाशयाचा दाब मूत्रपिंडावर पडू लागतो. त्यामुळे गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये वारंवार लघवीला जाण्याची समस्या आढळून येते.

८. उच्च रक्तदाब 

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा किडनीवर परिणाम होतो त्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या दिसून येते.

ह्या व्यतिरिक्त खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असणे, किडनीमध्ये इन्फेक्शन असणे, जास्त वेळ थंड वातावरणात राहणे, मद्यपान करणे, चहा कॉफीचे सेवन जास्त करणे या कारणांमुळे देखील वारंवार लघवीला जावे लागू शकते.

वारंवार लघवीला जाणे ही समस्या होऊ नये म्हणून काय करावे?

हा त्रास टाळण्यासाठी विशिष्ट प्रकारची जीवनशैली असणे आवश्यक आहे.

१. गोड पदार्थ आणि कॉफी टाळावे.

२. संतुलित भोजन घ्यावे.

३. तेलकट मसालेदार आहार घेऊ नये.

४. शरीराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

५. स्वच्छ, सुती अंतर्वस्त्रे वापरावी.

६. अस्वच्छ ठिकाणचे पदार्थ खाऊ नयेत.

७. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करताना काळजी घ्यावी.

वारंवार लघवीला जावे लागत असेल तर खालील घरगुती उपाय करावेत 

१. दही 

दह्या मध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया शरीरातील संसर्ग रोखतात. दररोज दह्याचे नियमित सेवन केले की वारंवार लघवीला जाण्याची समस्या आटोक्यात येऊ शकते.

२. आवळ्याचा रस 

वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येवर आवळ्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. दोन चमचे आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात मिसळून दररोज सेवन करावा. खूप फायदा होतो.

३. सफरचंद 

वारंवार लघवीला जावे लागणाऱ्या लोकांना सफरचंद खाणे फायद्याचे ठरते. विशेषतः रात्री उठावे लागण्याच्या समस्येवर हा उपाय प्रभावी आहे. दररोज झोपताना एक सफरचंद खावे. निश्चित लाभ होतो.

४. केळ 

दररोज एक किंवा दोन केळी खाणे ह्या समस्येवर गुणकारी आहे. परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणात केली खाल्ल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.

५. मेथीचे दाणे 

भाजलेले मेथीचे दाणे पाण्याबरोबर सलग सात दिवस घ्यावेत. वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येपासून सुटका होते.

६. डाळिंबाचा रस 

डाळिंबाचा रस पौष्टिक असल्यामुळे तो शरीराचे पोषण करतो. असा रस नियमित घेतल्यास वारंवार लघवीला जावे लागण्याच्या समस्येपासून सुटका होते.

७. पालक 

अशी समस्या असेल तर पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. रक्तातील साखर देखील आटोक्यात राहते आणि वारंवार लघवीला जावे लागणे कमी होते.

८. आले 

सकाळ संध्याकाळ दोन चमचे आल्याचा रस सेवन केला असता अडकलेली लघवी बाहेर पडते. त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागण्याची भावना होत नाही. मूत्राशय आणि मूत्रमार्ग साफ होतो.

९. फुटाणे 

चांगले भाजलेले फुटाणे गुळाबरोबर खाल्ले असता वारंवार लघवीला जावे लागण्याची समस्या कमी होते.

१०. आवळा हळद आणि मध 

वारंवार लघवीला जावे लागत असल्यास पाच ग्रॅम आवळ्याच्या रसात चिमुटभर हळद आणि पाच ग्रॅम मध मिसळावा. दररोज ह्या मिश्रणाचे सेवन करावे. वारंवार थोडी थोडी लघवी होण्याची समस्या होते.

तर हे आहेत वारंवार लघवीला जावे लागत असल्यास करण्याचे घरगुती उपाय. हे उपाय जरूर करून पहा. परंतु ह्या उपायांनी गुण येत नसेल तसेच लघवी वाटे रक्त पडणे अथवा तिचा रंग लाल असणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ह्या समस्येच्या बाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा.

टीप: या व्यतिरिक्त प्रवासात वारंवार लघवी होऊ नये, म्हणून तेवढ्या वेळेपुरते पाणी कमी प्यावे. परंतु पाणी कमी प्यायले तरी तोंडाला कोरड पडू नये म्हणून च्युईंगम चिघळण्याची पर्याय चांगला ठरतो, च्युईंगम चिघळत राहिल्याने लाळ ग्रंथींमधून लाळ स्त्रवत राहिल्याने तोंडाला कोर पडत नाही. हल्ली बाजारात शुगर फ्री च्युईंगम सुद्धा मिळतात.

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय, तो बॅलन्स करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे राखावे?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “वारंवार लघवी होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय ”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।