“असं म्हणतात की मातृत्व हे वरदान आहे. पण त्या समुदायात याला शाप मानतात. खरंतर तो भेदभाव मानव करतो नियती नाही… दुर्दैवाने मी त्याच समुदायाचा भाग होते. आणि मी एका मुलाला जन्म दिला….”
राणी सांगते
माझ्यासाठी बरोबर काय आणि चूक काय या मुद्द्यावर समाजाबरोबर खंबीरपणे लढणाऱ्यांपैकी ती होती.
३२ वर्षांची राणी, तरल स्वप्न बघण्याच्या वयात दुर्दैवाने वेश्या व्यवसायात ढकलली गेली, ती जवळच्या म्हंटल्या गेलेल्या लोकांकडूनच. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नकळत आलेलं गरोदरपण राणीला तिच्या हक्कांसाठी लढायची हिम्मत देऊन गेलं. आणि पुढे जे काही झालं ते स्वप्न की सत्य यावर कधी कधी राणीचाच विश्वास बसत नाही.
ती सांगते… “कुठल्याही मातृत्वाला समाज निकोप दृष्टीने का नाही बघू शकत. एकीकडे समाजात मातृत्वाला साजरं केलं जातं… पण दुसरीकडे तेच मातृत्व म्हणजे पाप का ठरतं?”
जेव्हा राणीला समजलं की ती गरोदर आहे. तेव्हा पुढे काय आणि कसं होणार याने ती घाबरून गेली. जन्माला आलेल्या बाळाला जग काय म्हणून ओळखले या एका विचाराने ती सुन्न झाली. तिच्या व्यवसायातल्या बायकांनी, अबॉर्शन करणं हा एकच मार्ग आपल्यासमोर असतो हे तिला सांगितलं.
राणीचं मन मात्र सांगत होतं, “मला आई व्हायचंय… जग का ठरवेल की मी आई व्हायचं की नाही…” पण बाळाचं भविष्य काय? या विचाराने ती हादरून सुद्धा जायची.
पण नियतीने ठरवलं होतं की राणीचं बाळ या जगात जन्म घेणार आणि सुन्दर आयुष्य सुद्धा जगणार.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा वाघमोडे या वळणावर राणीला भेटल्या. सिमाताईंचं NGO ‘कायाकल्प’ वेश्या व्यवसायात असलेल्या बायकांच्या मुलांचा सांभाळ करतं त्यांना शिक्षण देतं. सीमाताईंनी आतापर्यंत १०००० पेक्षा जास्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात ढकलल्या बायका आणि त्यांच्या मुलांना नवं आयुष्य दिलं.
राणीची गोष्ट मात्र जरा वेगळीच! सीमाताईंच्या मदतीने राणी बाळाच्या वडिलांपर्यंत पोहोचली. राणीचा एक नेहेमीचा ग्राहकच बाळाचा पिता होता. तो राणीच्या प्रेमात पडलेला होता. पण इथल्या प्रेमकहाण्या या रात्रभराच्याच असतात. समाजाच्या भीतीने त्या या वस्तीच्या बाहेर येत नाहीत.
पण सीमाताईंनी ग्राहक म्हणून येणाऱ्या माणसाचं मतपरिवर्तन केलं आणि राणीला आणि बाळाला सुंदर आयुष्य दिलं.
राणी सांगते… “कधी कधी माझाच विश्वास बसत नाही की हे सुंदर आयुष्य माझ्या वाट्याला आलेले आहे!!”
आता राणीचा सुखी संसार सुरू होऊन १० वर्षं झाली आहेत.
१६ वर्षांची असताना आसामच्या एका खेड्यातून राणीला तिच्या काही नातेवाईकांनीच पुण्यात आणलं. घरची गरिबी असल्याने आई वडिलांना मदत करता येईल म्हणून काम मिळवण्यासाठी राणी पुण्यात आली. आणि आपल्या समजलेल्या लोकांनीच तिचा घात केला.
या दुःस्वप्नाला आता राणीने मागे सोडले. ती सांगते, “आता मला एक गृहिणी आणि आई असल्याचा आनन्द आहे. मी जर समाजाचं ऐकून अबॉर्शन केलं असतं तर आज हे सोन्याचे दिवस मला दिसले नसते.”
हा फोटो केवळ दार्शनिक आहे घटनेतल्या राणीचा नाही फोटो Image Credit – Maxpixel
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
सलाम राणीच्या नव-याच्या प्रेमाला. शेवटी या दोघांचे प्रेम जिंकले. अश्या विपरित परिस्थितीने वेढलेल्या दलदलीतून आपल्या बाळाच्या बापाला शोधून काढणं आणि त्याच्या हृदयात अंकुरलेल्या प्रेमाला साद घालून त्याला सामाजिक विषमतेच्या, योनीशुचितेच्या अभेद्य भिंती तोडण्यास प्रवृत्त करणं, बळ देणं हे सती सावित्रीच्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही. तिच्या तपश्चर्येला प्रणाम. कुणी माझ्याशी संपर्क साधला असता तर मी आनंदाने राणीचे कन्यादान केले असते. आता फक्त राणी बाळाने समाजातील विखारी नजरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सदैव तत्पर राहावे.त्यासाठी वाटल्यास ज्युडो-कराटेचे प्रशिक्षण घ्यावे. तिच्या नव-यानेही तिचे प्राणपणाने संरक्षण करावे.
योनिशुचितेसारख्या भ्रामक कल्पनांना कवटाळून बसणारे विषारु साप कधी डंख मारतील याची भिती वाटते.
Great comments
👏