तुमच्या आवडत्या शोलेचा क्लायमॅक्स वाचा आणि पहा या लेखात

‘शोले’ ही एक रसरसलेली सूडकथा आहे पण तिला छोटी बहुच्या कारुण्याची जी शोकमग्न झालर लागलेली आहे, तिच्यामुळे ‘शोले’च्या ज्वाला अधिक धगधगत्या होतात…

असंच काहीसं ‘शोले’चं आहे. शोले जेंव्हा जेंव्हा पाहतो तेंव्हा तेंव्हा काही तरी नवीन गवसते. ‘शोले’च्या क्लायमॅक्सला गब्बरच्या गोळीबारात एकट्याने खिंड लढवत असलेला जय घायाळ होऊन पडतो तो सीन खूप काही शिकवून जातो. जखमांनी विद्ध झालेला जय रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत एका मोठ्या शिळेला टेकून बसलेला आहे. त्याचे श्वास वेगाने होताहेत, त्याला बोलण्यात प्राणांतिक कष्ट होताहेत, तो अगदी कासावीस होऊन गेलेला आहे जणू त्याचे प्राण अक्षरशः कंठाशी आलेले आहेत. त्याचा मित्र वीरू त्याच्या शेजारी बसून त्याला धीर देतोय, “तू मुझे छोड के नही जा सकता ..” असं सांगताना त्याचं उसनं अवसान स्पष्ट जाणवतं. आता काहीच क्षण उरलेले आहेत हे त्याने ताडलेले आहे पण आपला जिवलग दोस्त आपल्याला सोडून जाणार ही कल्पना त्याला सहन होत नाहीये. दरम्यान जयच्या गंभीर जखमी होण्याची खबर ठाकूर बलदेवसिंगच्या हवेलीपर्यंत गेलेली असते. तो सारा लवाजमा घेऊन गब्बरच्या अड्ड्याकडे जाणाऱ्या लाकडी पूलाच्या रस्त्याजवळ येतो. वीरूने आता आपल्या मित्राचा लहूलुहान देह आपल्या कुशीत घेतलेला आहे, त्याच्या समोरच ठाकूर दाखल होतो.

jai-veeru

ठाकूरसोबत आलेली पांढऱ्या शुभ्र वेशातली छोटी बहु राधा न राहवून सर्वांच्या पुढे धावत येते, नकळत अगदी आपल्या सासऱ्याच्याही पुढे ! जखमी जयच्या पुढ्यात येऊन ती थबकते आणि त्याच्या क्षतिग्रस्त देहाला पाहून तिचा शोक अनावर होतो. ती एकाग्र चित्ताने त्याला शक्य तितकं स्वतःच्या डोळ्यात साठवत राहते. या मोमेंटला जयने वाजवलेल्या माऊथ ऑर्गनचा अप्रतिम म्युझिकपीस बॅकग्राउंडला वाजतो काळजाचे पाणी पाणी होते. तिचा धपापणारा ऊर स्पष्ट जाणवतो. तिला पाहून श्वास जड झालेला जय मोठ्या कष्टाने म्हणतो, “देख वीरू … देख .. ये कहानी भी अधुरी रह गयी…. क्या सोचा था और क्या हो गया ..” … त्याच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात, त्याचे अश्रू रक्तात मिसळतात. तो शेवटचे आचके देऊ लागतो आणि वीरूची त्याला थांबवण्याची तडफड सुरु होते, जयच्या मनाची प्रचंड घालमेल होते, त्याची अखेरची अगतिक तगमग ती थिजल्यागत पाहत उभी राहते. तिच्यापासून काही फर्लांग अंतरावर तिचा सासरा ठाकूर बलदेवसिंग नियतीच्या समोर हतबद्ध होऊन उभा असतो. जयची तडफड वाढत जाते आणि काही क्षणात त्याचा देह शांत होतो. वीरू मोठ्याने हंबरडा फोडून शोकाचे बांध मोकळे करतो.

पण ती ? तिचे काय ? तिच्या म्लान चेहऱ्यावरती शोकाची झळाळी चढते. तिच्या डोळ्यातून हळुवारपणे अश्रू वाहू लागतात. एक क्षण सगळेच जण गोठून जातात. पडदादेखील निशब्द होतो, फक्त वीरूच्या हमसून रडण्याचा बारीक आवाज येत राहतो. निमिषार्धात ठाकूर पुढे सरसावतो. आपल्या लाडक्या छोट्या बहुकडे जातो. सासरा जवळ येताच तिचा दुःखाचा बांध फुटतो पण तोही विलक्षण संयत पद्धतीने ! ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडू लागते. तिला कवेत घेऊन तिचं दुःख हलकं करणंदेखील ठाकूरला शक्य नाही कारण त्याचे हात गब्बरने पूर्वीच छाटलेले आहेत. ती त्याच्या डोळ्यात पाहत मूसमूसून रडू लागते आणि ठाकूरला तर तेही शक्य नसते. तो अश्रुंचे कढ पित तिला मोकळं होऊ देतो. बॅकग्राउंडला अगदी हळुवारपणे ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे… ‘चे सूर व्हायोलीनवर वाजू लागतात.

दूर हवेलीच्या खिडकीत उभी राहून चितेची धग आपल्या डोळ्यात साठवणारी छोटी बहु विमनस्क चेहऱ्याने चितेकडे पाहत असते. आस्ते कदम ती मागे सरकते आणि खालच्या मानेने खिडकी लावून घेते. या खेपेस तर तिला जगापुढे व्यक्तही होता येत नाही.

तिचं रडणं अनुभवत ठाकूर त्याच्या मस्तकातला सूडाचा लाव्हा आणखी दाहक करत राहतो… त्या क्षणाला राधाच्या मनातली भावना, तिचं नकळत जयवर बसलेलं प्रेम, तिचं त्याच्यासाठी शोकविव्हळ होणं या सर्व जाणीवांना ठाकूर समजून घेतो. तिच्या मनात साठलेलं मळभ रितं होऊ देतो. मात्र तिचा गहिवर काही केल्या शांत होत नाही…

त्यापुढच्या सीनमध्ये गब्बरला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर जयच्या चितेला यथासांग अग्नी दिला जातो. त्या चितेच्या ज्वालात ठाकूरला आपल्या राधाबहुची स्वप्ने पुन्हा एकदा खाक झाल्याचं जाणवतं अन तो मूक बनून राहतो. दूर हवेलीच्या खिडकीत उभी राहून चितेची धग आपल्या डोळ्यात साठवणारी छोटी बहु विमनस्क चेहऱ्याने चितेकडे पाहत असते. आस्ते कदम ती मागे सरकते आणि खालच्या मानेने खिडकी लावून घेते. पडद्यावरती ठाकूरच्या दारंखिडक्या बंद असलेल्या शोकमग्न हवेलीचं दृश्य दिसतं. हा सीन जीवाला चटका लावून जातो. संपूर्ण चित्रपटात सज्जातली दारं बंद करणारी छोटी बहु दिसते आणि अखेरीस मात्र हवेलीची खिडकी बंद करून ती जणू स्वतःला जगापासून अलिप्त करत कोंडून घेते.

sholay-climax

ठाकूरची सून होण्याआधी राधा ही बसंतीपेक्षाही जास्त बडबडी अन अवखळ असते पण गब्बरने तिच्या कुटुंबाची वाताहत केल्यापासून ती अक्षरशः पुतळा बनून राहत असते. जयच्या रूपाने तिच्या मनात प्रेमाचे अंकुर पुन्हा उगवण्याच्या बेतात असताना नियती पुन्हा एकदा तिच्यावर तोच प्रहार करते. या खेपेस तर तिला जगापुढे व्यक्तही होता येत नाही. सुखदुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यात व्यक्त होण्याची संधी मिळताच अंतःकरणातले बोल उघड करण्यातही एक आगळे समाधान असते. राधासारख्या कोवळ्या तरुणीस तर एकच दुःख पुन्हा पुन्हा भोगावे लागते आणि त्यावर मनातले कढ पिऊन टाकावे लागतात. शोलेच्या क्लायमॅक्सला राधा जेंव्हा खिडकी लावून घेते तेंव्हा आपण नकळत तिच्या दुःखात सामील झालेलो असतो. तिच्या अव्यक्त भावनांना आपण अश्रूतून वाट करून देतो. आपण आनंदाचे, हसण्याचे क्षण ज्यांच्या सोबत व्यक्त केलेले असतात त्यांना आपण सहजगत्या विसरून जातो पण ज्यांच्यासोबत आपण आपलं दुःख शेअर केलेलं असतं, जिथं आपलं काळीज हलकं केलेलं असतं ती माणसं आपण कधीच विसरू शकत नाही. दुःखात असणारी ही असामान्य ताकद आपल्या जगण्याचा संघर्ष बुलंद करत जाते. ‘शोले’ ही एक रसरसलेली सूडकथा आहे पण तिला छोटी बहुच्या कारुण्याची जी शोकमग्न झालर लागलेली आहे, तिच्यामुळे ‘शोले’च्या ज्वाला अधिक धगधगत्या होतात… छोटीबहुचं हवेलीमधलं स्मशानशांततेलं वावरणं, तिचं अचेतन जगणं, तिच्या शुष्क निर्जीव हालचाली आणि डोळे गोठवणारी नजर यामुळे अंतःकरणात कालवते. दिग्दर्शकाने हे दुःख इतकं उत्तुंग चितारलं नसतं तर कदाचित सूड फिका झाला असता…

लोकांनी काळजात गोंदवून घेतलेली हि कलाकृती सिद्ध करते की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ जगणं आणखी समृद्ध करतो.

Sholay: The Making of a Classic

Sholay Wall Sticker Decal

टायटॅनिक….शोकांतिकेची गाथा..(भाग १)

गेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।