ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हानंतर हळूच कुस बदलून येणारा वर्षाऋतू. ऊन-पावसाच्या झिम्मापाण्याचा खेळ, व्रतवैकल्ये, सणवार, मौजमस्ती म्हणजेच श्रावण! कुसुमाग्रजांनी त्याला हासरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर, साजिरा अशा उपमा दिल्या. त्यांच्याप्रमाणेच अनेक कवींनी त्याच्या लावण्याला आपल्या लेखणीने कवेत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजपर्यंत तरी त्याच्या सौदर्यांला बंदिस्त करण्याचं कौशल्य कुणी अवगत केलं नाही.
असं म्हणतात की, जे ना देखे रवी, ते देखे कवी! याबाबतीत मात्र ही म्हण सपशेल खोटी ठरते. प्रत्यक्षात त्याचं सौंदर्य कवीच्या कवनातही न मावणारं पहाटे पडलेल्या स्वप्नासारखं आहे. रंगीबेरंगी फुलपाखरासारखं आहे. विविध रंगांची फुललेली फुलं. हिरव्या पिवळ्या रंगांची शाल पांघरलेले डोंगर, दर्याकपारी आणि शेतं! भिजरी पायवाट. ओलं अंगण. ओली घरं आणि ओलं मन. सारचं कसं चिंब चिंब. ताजंतवानं! म्हणुनच त्याच्या येण्याची ओढ तुम्हाला, मला अगदी लहान थोरांना असते, खरयं ना! कारण, तो आहेच तसा, सगळ्यांवर मोहिनी घालणारा!
आयुष्यातील सगळे उन्हाळे, हिवाळे आपल्या कवेत घेऊन आशेच्या किरणांचे अंकुर फुलविणारा बहुरुपी जादूगार! चैतन्यदायी अशा श्रावणाशी आपण उत्सवप्रिय असल्याने लगेच गट्टी जमते आणि लगेच श्रावण शुद्ध पंचमीला पहिला नागपंचमीचा सण येऊन ठेपतो! या दिवशी आपण नागाची पूजा करतो. शेतातील पिकांची नासधूस करणारे जीवजंतू, उंदीर यांचा नाश करुन पिके हिरवीगार ठेवण्यात साप शेतकर्यांना मदत करतो. त्याच्याप्रती कुतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण मोठ्या भक्तीभावानं साजरा करतो.
त्यानंतर येतो तो समुद्रपुजनाचा दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमा! समुद्रात मच्छिमारी करणारे कोळी बांधव वर्षभर मासेमारीला चांगले दिवस यावेत म्हणून त्याच्याप्रती कुतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्याचबरोबर आपण बहीण-भावाच्या विशुद्ध प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनसुद्धा याच दिवशी साजरी करतो. रक्षाबंधनाचा आनंद ओसरत नाही तोच गोकूळ अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती येते! भगवान श्रीकृष्णाने दशावतर धारण करुन जगाचे कल्याण केले! तसेच अर्जुनाला गीता सांगून मानवी जीवनाचे सर्व सार उलगडून दाखवले. सर्व मित्रांमध्ये प्रेम, विश्वास निर्माण केला आणि गोपालकाला करुन तो सर्वांसोबत खाऊन समानतेची शिकवण दिली.
या काळात पिकांनासुद्धा बहर आलेला असतो. बळीराजा सुखावलेला असतो. त्याच लगबगीत पोळा म्हणजेच पिठोरी आमावस्या हा सण येतो. बैल म्हणजे शेतकर्यांचा सखाच! त्याचं ऋण फेडण्यासाठी पोळा सण म्हणजे एक निमित्त असते. वर्षभर ज्या बैलांच्या भरवशावर आपण शेतात नंदनवन फुलवतो त्यांच्याविषयी कुतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पोळा हा सण मोठ्या उल्हासात साजरा करतो.
श्रावण भरभरुन देण्याची शिकवण आपल्याला देतो. या महिन्यात लागोपाठ येणारे सणसुद्धा आपल्याला प्रेम आणि सद्भावाची शिकवण देऊन जातात. त्यामुळे दरवर्षी येणारा श्रावण रित्या हाताने कधीच येत नाही. बळीराजासाठी पिकाच्या येण्याची खुषखबर तो घेऊन येतो. सासुरवाशीण नवविवाहितेला तिच्या भावाच्या येण्याची चाहूल देऊन जातो. तिच्या मनाला माहेरी जाण्याची ओढ आणि हुरहुर लावून जातो. बच्चेकंपनीचा तर तो आवडता ऋतू आहे. महिनाभर मस्तपैकी आई गोडधोड खाऊ घालते. त्यामुळे लहानग्यांनादेखील त्याच्या येण्याची आस असतेच! तरुणांसाठी तर श्रावण म्हणजे सळसळता उत्साह अ्न स्वच्छंदी बरसण! कधी भावनांना व्याकुळ करणारं ऊन तर कधी त्याला आठवणींचा गारठा देणारी श्रावणसर! त्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावण मला तरी बहुरूपी जादूगारच वाटतो!
श्रावणात महिनाभर घराघरात आध्यात्मिक वातावरण असतं. सोमवार, शनिवार उपास. केळीच्या पानावरचे जेवण. सात्विक आहार तसेच सार्वजनिक ठिकाणी होणार्या पोथ्यांचं वाचन यामुळे वातावरण पवित्र होऊन जाते. या दिवसांत बरेच लोक मद्यपान आणि मांसाहारापासून दूर राहतात. स्वयंस्फूर्तीनं या महिन्यात हे सगळं घडून येते. त्यामुळेच श्रावणाला आपल्या धर्मग्रंथांतही विशेष मान आहे.
श्रावणाच्या रुपानं डोळे दिपवणार्या निसर्गाच्या लावण्याचा विहंगम नजराणा महिनाभर आपण अनुभवतो. निसर्गनिर्मित फळाफुलांचा वर्षभर मनसोक्त आनंद लुटतो. निसर्गाला त्याची परतफेड मात्र आपण कधीच करत नाही. आपण ग्लोबल झालो. जीवनशैली बदलली. झाडं तोडून काँक्रीटचं जंगल आपण झपाट्यानं वाढवतोय! घराचं घरपण जाऊन बंद दरवाजाच्या फ्लॅटने त्याची जागा घेतली! मी, माझं आणि मला यातच गुरफटून गेल्याने आपण प्रचंड संवेदनाहिन झालो आहोत. यानिमित्तानं या सृष्टीच्या जादूगाराजवळ एकच गार्हाणं मांडतो, या सिमेंटच्या जंगलातील माणूस नावाच्या प्राण्याचं बोथट झालेलं मन तेवढं श्रावणसरींनी पुन्हा तजेलदार अन टवटवीत कर!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
वाचण्यासारखे आणखी काही…..
वसुधा कोरडे-देशपांडे यांचा ब्लॉग
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.