एयर कंडिशनरमुळे वाढणाऱ्या वीज बिलाने त्रस्त आहात? आता घ्या विजेशिवाय चालणारा एसी
सध्या आपण सगळेच ह्या गरमीमुळे वैतागलो आहोत. उन्हाळ्यात वाढणारे तापमान, येणारा घाम आणि अंगाची होणारी लाहीलाही अगदी नकोशी वाटते.
ह्यापासून सुटका हवी असेल तर एसी खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. फॅन वगैरे असतो.. पण उकडवणाऱ्या गर्मीत एसीची हवा खाण्याची मजा काही औरच…
परंतु एसीची सर्वात मोठी समस्या म्हणजे विजेचा वापर आणि त्यामुळे वाढणारं वीजबिल.
कोणताही चांगल्या कंपनीचा एसी घरी वापरण्यास सुरुवात केल्यावर वीजेचं बिल ४००० ते ४२०० रुपयांनी वाढतं.
आपण कितीही प्रयत्न केले तरी त्यामध्ये फार तर २०० ते ३०० रुपयांचा फरक पडू शकतो. ह्यापेक्षा जास्त वीज वाचवणे आणि बिल कमी करणे एसी वापरताना शक्य होत नाही.
त्यामुळे एसीची गार हवा हवी असेल तर जास्त वीजबिल भरायची तयारी ठेवावी लागत होती.
पण आता मात्र आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण ह्यावर एक उत्तम उपाय आता आला आहे. ह्या उपायाने आता आपण घरात हवा तेवढा एसीचा वापर करु शकू आणि तरीही गगनाला भिडणारे वीज बिलदेखील येणार नाही.
कारण आता सौर एसी म्हणजेच सौर उर्जेवर चालणारा एसी बाजारात दाखल झाला आहे. म्हणजेच हा एसी वापरण्यासाठी विजेची आवश्यकता नाही.
जसे सोलर पॅनल पाणी गरम करण्यासाठी वापरले जातात तसेच हे एसी देखील सोलर पॅनल किंवा प्लेटला जोडले जातात. त्यामुळे उन्हाळ्यातील तळपत्या सूर्याच्या उर्जेवर हे एसी चालतात. त्यांना विजेच्या जोडणीची गरज नाही.
त्यामुळे अर्थातच ह्या एसीचा कितीही वापर केला तरी वीजबिल वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
हां, हयात एक अडचण आहे, ती म्हणजे हे एसी इलेक्ट्रिक एसीपेक्षा महाग आहेत, परंतु वीजबिलाचा वाढणारा दीर्घकालीन खर्च गृहीत धरता हे एसी परवडणारेच आहेत असं दिसून आलं आहे.
कशी होते दर महिन्याला हजारो रुपयांच्या वीजेची बचत?
बाजारात १ टन, १.५ टन आणि २ टन क्षमतेचे सोलर एसी उपलब्ध आहेत.
आपण आपल्या गरजेनुसार त्यातला एसी खरेदी करू शकतो. वीज बचतीच्या बाबतीत सोलार एसी स्प्लिट किंवा विंडो एसीच्या तुलनेत ९० टक्के वीजेची बचत करू शकतो.
जर आपण इलेक्ट्रिक एसी वापरत असू तर, तो दिवसाला २० युनिट्स (१५ -१६ तास एसी चालवल्यास) वीजेचा वापर करतो. याचाच अर्थ महिन्याला ६०० युनिट्स वीज वापरतो. म्हणजेच केवळ एसीचं एक महिन्याचं वीजबिल हे ४००० ते ४२०० रुपये इतकं होईल.
परंतु हेच जर सौर एसीबद्दल बोलायचे झाल्यास हा एसी आपली उन्हाळा आणि जास्तीचे वीजबिल दोन्हींपासून सुटका करतो.
एकदा सौर एसी बसवल्यावर जर आपण थोडी काळजी घेऊन सौर एसी वापरला तर कदाचित आपल्याला त्यासाठी त्यानंतर १ रूपयादेखील खर्च करावा लागणार नाही.
म्हणजेच एकदाच गुंतवणूक करा आणि वीज बिलाच्या टेन्शनपासून कायमचे मुक्त व्हा, अशी ही योजना आहे.
सोलर एसीची किंमत किती आहे?
आजच्या काळात बर्याच कंपन्या सौर एसी बनवतात. वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने जवळपास समान किंमतीची असतात.
पार्ट्सविषयी बोलायचे झाल्यास, सौर एसीमध्ये सामान्य एसी सारखेच फीचर्स असतात. परंतु सौर प्लेट आणि बॅटरी स्वतंत्रपणे जोडली गेलेली असते.
या एसीच्या किंमतीविषयी बोलायचे झाल्यास, १ टन एसी (१५०० वॅट सौर प्लेट) साठी रु.९७०००/-, १.५ टन एसीसाठी रु, १,३९,००००/- आणि २ टन एसीसाठी रु.१,७९,०००/- खर्च करावे लागतील.
हा खर्च आत्ता आपल्याला खूपच जास्त वाटू शकतो, परंतु या एसीमुळे दीर्घकाळापर्यंत आपल्याला जास्तीच्या वीज बिलापासून सुटका मिळू शकेल.
इथे आपण एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे की, एसी जितका जास्त क्षमतेचा (अधिक टन) असेल तितकी जास्त वीज त्यासाठी लागते.
परिणामी अधिक सोलार प्लेट्सची आवश्यकता भासते. त्यामुळे अशा एसींची किंमतही वाढते.
अर्थातच ही किंमत ही एकदाच करावयाची गुंतवणूक आहे आणि पुढे विशेष काहीही खर्च न येता आपल्याला कायमस्वरूपी एसी वापरायला मिळणार आहे.
आवश्यकता भासल्यास सोलर एसी वीजेवरही चालवता येईल का ?
इतर कोणत्याही सोलर उत्पादनाप्रमाणे ह्या एसीची सौर प्लेट देखील इनव्हर्टर आणि बॅटरीशी जोडलेली असते. ही सौर प्लेट सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करते, ज्यामुळे त्याला जोडलेली बॅटरी चार्ज होते.
एसी ह्या बॅटरीच्या उर्जेवर चालतो. परंतु जर एखाद्या दिवशी ढगांमुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे सौर प्लेटवर सूर्यकिरणे पडू शकली नाहीत तर काळजीचे कारण नाही.
ह्या एसीची जोडणी अशा प्रकारे केलेली असते की अशा वेळी घरातील वीजेच्या कनेक्शनसह तो एसी चालेल. अर्थात अशा वेळी वीजबिलाची बचत होणार नाही.
परंतु अशी परिस्थिति अपवादानेच येईल. एरवी उन्हाळ्यात सौर ऊर्जा मिळणारच हे नक्की.
तर हे आहेत सौर उर्जेवर चालणारे, वीज बिलात हजारो रुपयांची बचत करणारे सौर एसी.
सुरुवातीला करावा लागणारा खर्च सोडला तर अत्यंत किफायतशीर आणि अत्यंत उपयुक्त उपकरण. हे बसवून घेण्याचा विचार नक्की करा आणि वाढत्या उन्हाळ्यापासून आणि वाढत्या वीजबिलापासून सुटका करून घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.