सोन्याच्या दगिन्यांवर हॉलमार्क कंपल्सरी झाल्यास ह्याचा ग्राहक म्हणून आपल्याला काय फायदा होणार, खोटे दागिने कसे ओळखावे, सोन्याची शुद्धता कशी ओळखावी समजून घ्या.
भारतात सर्वांचा विशेषतः महिला वर्गाचा आवडता विषय म्हणजे सोन्याचे दागिने. सोन्याचे दागिने न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही.
आपल्याकडे लग्नकार्यात किती तोळा सोनं घालणार ही चर्चा झाल्याशिवाय लग्न ठरणे अशक्य आहे. तसेच गुंतवणूक म्हणून सोने घेण्याकडे देखील खूप लोकांचा कल असतो. त्यामुळे भारतात सोन्याची खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. जागतिक स्तरावरही आपला भारत सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.
असे असताना १६ जून, २०२१ पासून केंद्र सरकारने सर्व सोनारांना सोन्याचे दागिने आणि वस्तूंना हॉलमार्किंग करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच आजपासून फक्त हॉलमार्क प्रमाणपत्र असलेले दागिने आणि वस्तुच सोनार विकू शकतील.
पण हे हॉलमार्किंग म्हणजे आहे तरी काय? आपल्याला त्याचा काय फायदा? आणि आपल्याकडे आधीचे हॉलमार्किंग नसलेले दागिने असतील तर त्यांचं काय?
आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र. दागिने घडवताना सोन्याला उष्णता देऊन हवा तो आकार दिला जातो.
परंतु सोने हा धातू मुळात मऊ आणि नाजुक असल्यामुळे दागिना मजबूत बनण्यासाठी त्यात काही प्रमाणात तांबे मिसळले जाते.
किती तांबे मिसळले आहे ह्यावर त्या सोन्याची शुद्धता ठरते.
किती कॅरट सोन्यामध्ये किती तांबे मिसळायचे ह्याचे प्रमाण खरेतर ठरवून दिलेले आहे परंतु अनेक सोनार तसे न करता जास्त प्रमाणात तांबे मिसळून लबाडी करतात.
त्यांना असे करता येऊ नये म्हणून हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ह्यापुढे असे प्रमाणपत्र असणारे दागिनेच सोनार विकू शकतील अशी माहिती केंद्रीय ग्राहक सेवा मंत्री पीयूष गोयल ह्यांनी ट्वीट करून दिली आहे.
Continuing our Govt’s endeavour for better protection & satisfaction of customers, mandatory hallmarking in 256 districts will be implemented from 16 June 2021. No penalty will be imposed till August 2021.
This will help develop India as a leading global gold market center. pic.twitter.com/0Pv2UgPdCM
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 15, 2021
म्हणजेच ह्यापुढे सर्व सोनार २२ कॅरट, १८ कॅरट किंवा १४ कॅरटचे हॉलमार्क प्रमाणपत्र असणारे दागिनेच विकू शकतील.
सुरुवातीला वेगवेगळ्या २५६ जिल्ह्यात हा नियम लागू करण्यात आला आहे. हळूहळू संपूर्ण देशभरात हे लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
ह्याआधी असे हॉलमार्किंग असणारे दागिने विकणे सोनारांना अनिवार्य नव्हते कारण सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी करणारी पुरेशी केंद्रे आपल्या देशात नव्हती.
परंतु आता केंद्र सरकारने २०१७ पासून प्रयत्न करून अशी एकूण ९४५ केंद्रे देशभरात उभी केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपला दागिना हॉलमार्किंग केलेला आहे हे कसे ओळखावे?
आपला दागिना नीट निरखून पहा. दागिन्याच्या आतल्या बाजूला काही चिन्ह आणि काही अक्षरे दिसतील.
पहिला असतो तो ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् ( BIS ) चा लोगो, त्यानंतर सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण दर्शवणारा आकडा, तसेच ज्या केंद्रात सोन्याची शुद्धता तपासण्यात आली आहे त्या केंद्राचा लोगो आणि शिवाय सोनाराच्या नावाचा लोगो किंवा चिन्ह हे सगळं अगदी बारीक अक्षरात दागिन्याच्या आतल्या बाजूला कोरलेले असते. ही चारही चिन्हे किंवा माहिती असेल तर तुमचा दागिना हॉलमार्क प्रमाणित आहे असे समजावे.
अशा दागिन्यांच्या शुद्धतेची खात्री असते. त्यात भेसळ नाही असे प्रमाणपत्र बरोबर दिले जाते.
हॉलमार्किंगचा आपल्याला ग्राहक म्हणून नक्की काय फायदा होणार?
सध्याच्या परिस्थितीत देशात कित्येक लाख लहानमोठ्या सोनारांच्या पेढ्या कार्यरत आहेत परंतु सध्या त्यापैकी फक्त ३० ते ३५ हजार सोनारांकडेच BIS चं प्रमाणपत्र आहे.
ते देखील मोठ्या शहरात असणाऱ्या सोनारांकडेच आहे. असे असताना जे सोनार भेसळयुक्त सोने विकून ग्राहकांची फसवणूक करतात त्यांच्याविरुद्ध दाद मागणे आजवर शक्य नव्हते.
कारण त्यांनी केलेल्या भेसळीचा कोणताही पुरावा ग्राहकांना दाखवता येत नसे. परंतु आता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केल्यामुळे हे सोनार सोन्यात भेसळ करून ग्राहकांची फसवणूक करू शकणार नाहीत. त्यांना BIS ने प्रमाणित केलेलेच दागिने विकता येणार आहेत.
म्हणजेच हॉलमार्किंगचा आपल्याला सोन्याच्या शुद्धतेची खात्री आणि व्यवहारात फसवणूक न होणे असा दुहेरी फायदा होणार आहे.
सध्या जरी हा हॉलमार्किंगचा नियम काही ठराविक जिल्ह्यात लागू केला असला तरी लवकरच तो देशभर अमलात आणला जाणार आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे. ती शहरे आहेत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, जळगाव, सातारा, नागपूर इत्यादि.
जर आपल्याकडे ह्याआधी घेतलेले हॉलमार्क नसलेले दागिने असतील तर
काळजी करू नका. आपल्याकडे आधी घेतलेले हॉलमार्क नसलेले दागिने असतील तरी काळजी करण्याची गरज नाही.
आपल्या शहरात असणाऱ्या सोन्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रात जाऊन आपण आपल्या दागिन्यांची शुद्धता तपासून पाहू शकतो. तसेच त्याचे प्रमाणपत्रदेखील मिळवू शकतो.
तसेच जर आपल्याला आपले जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकायचे असतील तर ते विकत घेण्याची सोनारांना परवानगी आहे. ते त्या सोन्याच्या शुद्धतेप्रमाणे रक्कम ठरवून दागिने विकत घेऊ शकतात.
मात्र स्वतः नवीन दागिने विकताना ते हॉलमार्क केलेले असणे सोनारांना सक्तीचे आहे.
जर कोणी सोनार हॉलमार्क शिवाय दागिने विकताना आढळला तर त्यांना त्या दागिन्यांच्या किमतीच्या पाच पट दंड भरावा लागू शकतो तसेच एक वर्षाचा कारावासही भोगावा लागू शकतो.
त्यामुळे इथून पुढे सोने खरेदी करताना काळजी घ्या. हॉलमार्कचे चिन्ह असलेले दागिनेच खरेदी करा आणि आपली फसवणूक टाळा.
जागो ग्राहक जागो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.