सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: amruttulya chaha recipe in marathi | special tea recipe |
मित्रांनो, आपल्या आयुष्यात चहाची एक खास महत्त्वाची अशी जागा आहे. दररोज सकाळी आपला दिवस सुरू होतो तोच मुळी चहाचा घोट घेऊन !!! आणि हा चहा वाफाळता, कडक, सुगंधी असेल तर आपोआपच तोंडातून निघतो आsहाss!!! फ्रेश दिवसाची फ्रेश सुरुवात….
भारतीय माणसांचं चहा प्रेम तर जगप्रसिद्ध आहे. आपल्या देशात अनेक ठिकाणी चहाचे मळे आहेत. तिथूनच सुगंधी चहापत्ती आपल्या किचनमध्ये येते.
एक घोट चहामध्ये अशी काय जादू आहे बरं? की पहिल्या घोटातच शरीरात एनर्जी येते. आणि पुढे दिवसभर काम करायला आपण रेडी होतो. याचं रहस्य दडलंय ते चहा करण्याच्या पद्धतीत!!!
आपण रोजच चहा बनवतो. पण त्याची चव मात्र दररोज एकसारखी नसते. कधी चहा फक्कड जमतो तर कधी पहिलाच घोट मूड ऑफ करतो. आणि दिवसाची सुरुवात अशी कंटाळवाणी झाली ना, की पुढे प्रत्येक ठिकाणी आपली गाडी अडखळत चालते.
आज आम्ही खास तुमच्यासाठी लज्जतदार फक्कड चहा कसा बनवायचा याची सिक्रेट रेसिपी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही रोज याच पद्धतीने चहा बनवाल तर प्रत्येक दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न होईल. पाहुणे सुद्धा तुमच्या हातचा हा चहा पिऊन म्हणतील क्या बात है….!!!!
पाहूया तर मग ही स्पेशल चहाची मॅजिकल रेसिपी
हे प्रमाण तीन कप चहासाठी आहे.
सर्वप्रथम एक छोटा आल्याचा तुकडा (साधारण एक इंचाचा) आणि तीन वेलची कुटून घ्या. यासाठी दोन्हीही वस्तू खलबत्त्यात कुटून घेणे गरजेचे आहे. कारण जर आले किसून घेतले तर चहा कडू होतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चहा बनवताना आधी दूध फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल तपमानाला येऊ द्यावे. मग ते तापवून थंड करून तुम्ही चहासाठी वापरु शकता.
तीन कप चहासाठी दीड कप दुध वापरावे. थंड दुध वापरले तर ते फुटते आणि चहाचा विचका होतो. तुम्ही नेहमी जे दुध वापरता तेच या चहासाठी वापरा. कोणताही स्पेशल ब्रॅण्ड विकत आणण्याची गरज नाही.
ज्या क्रमाने आम्ही सांगितले आहे त्याच प्रमाणे एक एक पदार्थ चहात टाका म्हणजे चवीची भन्नाट केमिस्ट्री जुळून येईल.
आता चहा बनविण्यासाठी भांडे हाय फ्लेमवर गॅस वर ठेवा. यात मोजून तीन कप पाणी घाला. म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल. पाणी व्यवस्थित उकळले की दोन मिनिटांनी त्यात ठेचलेले आले व वेलची घाला. यावेळी फ्लेम मिडीयम वर ठेवा आणि दोन ते तीन मिनिटे उकळू द्या. म्हणजे ऍरोमा चहाच्या मिश्रणात उतरतो.
मित्रांनो, सिझन प्रमाणे तुम्ही यात मसाले मिक्स करु शकता. यामुळे चहाचे औषधी गुणधर्म वाढतील आणि चव पण झकास जमून येईल.
उन्हाळ्यात तुम्ही यात एक चमचा बडीशेप घालू शकता. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तर हिवाळ्यात चार पाच काळ्या मिरीचे दाणे उकळत्या पाण्यात टाका. यामुळे सर्दी, कफ यापासून बचाव होतो.
उकळत्या पाण्यात चहाचे मसाले टाकणे याला म्हणतात इन्फ्युजन.
ही प्रक्रिया चहाला सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी आवश्यक आहे. चहाचा बेस तयार करण्यासाठी ही पहिली पायरी आहे.
यानंतर आले, वेलचीचा रंग व सुगंध पाण्यात छानपैकी उतरतो. पण यासाठी पाणी मात्र उकळते असलेच पाहिजे. थंड पाण्यात जर का हे मसाले तुम्ही टाकलेत तर रंगाचा बेरंग झालाच म्हणून समजा. मग मात्र तुमचा चहा कडू चवीचा होईल. म्हणून इन्फ्युजन स्टेज खूप महत्त्वाची आहे. अजिबात घाई करू नका!!!
आता दुसरी स्टेज म्हणजे ब्लूमिंग.
अर्थात चहा पावडर व साखर मिक्स करणे. तुम्ही नेहमी जी चहा पावडर किंवा पत्ती चहा वापरता तोच वापरायचा आहे. मित्रांनो, आपल्या रेसिपीची हीच तर खासियत आहे.
सगळे पदार्थ नेहमीचेच पण चव मात्र अफलातून!!! आहे ना गंमत ?
तर मग चहा पावडर तीन चमचे आणि लगेच साखर तीन चमचे याप्रमाणात चहाच्या भांड्यात टाका. जोरदार उकळी येईल. आता गॅस मिडीयम वरुन लो फ्लेम वर ठेवा.
उकळी हळूहळू खाली बसून मिश्रण स्थिर होऊ लागेल. आता हे मिश्रण चमच्याने छान ढवळून एकजीव करून घ्या.
जर तुम्ही दूध आणि साखर एकत्र टाकलीत तरीही चहाची चव बिघडते. म्हणून योग्य वेळी योग्य पदार्थ वापरला पाहिजे.
आता यापुढील स्टेज म्हणजे ब्लेंडींग
उकळणाऱ्या सुगंधी मिश्रणात दूध मिक्स करणे. लेखाच्या सुरुवातीला आपण पाहिले की चहात थंड दूध वापरायचे नाही. त्याचे कारण आता तुमच्या लक्षात आले असेल.
उकळत्या चहात थंड दूध घातले की मिश्रणाचे तापमान एकदम कमी होते. त्यामुळे चव तर बिघडतेच पण थंड दुधावर असलेले फॅटस् किंवा साय या गरम चहात मिसळते व एक तेलकट थर जमा होतो. याच्यामुळे चहाची गंमतच निघून जाते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा चहात गरम केलेलं दूधच वापरायचं.
आता लो फ्लेमवरच दोन मिनिटे उकळून घ्या.
या टिप्स अगदी छोट्या छोट्या आहेत. पण जर का तुम्ही या व्यवस्थित फॉलो केल्यात तर चवीत मात्र प्रचंड फरक पडतो.
आता हे मिश्रण परत एकदा चमच्याने पूर्ण ढवळून घ्या. म्हणजे ते छान एकजीव होते. आणि चहाचे तापमान पण सगळीकडे समप्रमाणात विभागले जाते.
इथपर्यंत चहाला सुंदर सोनेरी रंग आलेला असेल. आणि चहा मसाल्याचा खमंग दरवळ घरभर पसरलेला असेल.
कधी एकदा चहाचा पहिला घोट घेतोय असे झाले असेल ना ?
हो, हो पण एकच मिनिट थांबा. शेवटची स्टेप बाकी आहे अजून !!!
कसंय मित्रांनो भन्नाट चव पाहिजे असेल तर कोणतीही पायरी स्कीप करुन चालणार नाही.
आता चहा गाळून घ्या. आणि वरुन थोडीशी मिक्स केलेली दालचिनी व वेलची पावडर घाला. अगदी चिमूटभरच बरं का !!! याला म्हणतात ऍरोमा…
चहाचा कप नाकाजवळ येताच मन प्रसन्न करणारा आणि मूड ताजातवाना करणारा हा ऍरोमा म्हणजे मुकुटातला हिराच जणूकाही. याच्याशिवाय चहाची मजा अधूरी आहे बरं !!!
ही दालचिनी व वेलची पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. फक्त घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. म्हणजे याचा सुगंध टिकून रहातो.
आता चवीचवीने हा चहा घ्या. अगदी डोळे मिटून ब्रह्मानंदी टाळी लागेल!!!!
या पद्धतीने तुम्ही रोज चहा बनवलात तर चव बिघडणार नाही. आणि मन प्रसन्न करणारा कडक, सुगंधी चहा पिऊन दिवसाची छान सुरुवात होईल.
जगात वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो. आणि प्रत्येक व्यक्तीनुसार ही आवड बदलत असते. एखाद्याला कोरा चहा आवडतो, तर कोणाला दुधाचा. आमचा अजिबात असा दावा नाही की हा जगातला सर्वात उत्तम चहा आहे.
पण या पद्धतीने चहा केलात तर नेहमीच एकाच चवीचा आणि फ्रेश ऍरोमा असलेला चहा तुम्ही पिऊ शकाल हे नक्की!!!
मग या पद्धतीने चहा बनवून तर बघा. आणि हो, कमेंट्स करुन आम्हाला नक्की कळवा.
लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.