असं म्हणतात की लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचं रुपांतर सोन्यात होते. तसंच काहीसं आपल्या आयुष्यात घडत असते. आपण कोणाला आदर्श मानतो आणि कोणाचं बोलणं मनावर घेतो ह्यावर अनेकदा आपण आयुष्यात कोणत्या रस्त्यावर जाणार हे अवलंबून असते. आयुष्याला कलाटणी देणारे क्षण जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा आपलं आयुष्य पूर्ण बदलून जाते. असा हा बदल करणारा प्रवास अजून अनेकांना आयुष्यात काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत जातो. उत्तम पैठणे हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या लिम्बारुई गावचे. तोंडवळ गावात एका पोल्ट्रीसाठी ड्रायव्हर म्हणून ३० वर्ष नोकरी करताना त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण दिली. ओम ह्या त्यांच्या मुलाने मग पुढे आपलं शिक्षण पूर्ण करताना बी.एस.सी. इन कॉम्प्यूटर सायन्स मध्ये पदवी घेतली.
३० वर्ष गाडी चालवल्यावर उत्तम पैठणे ह्यांचे दोन्ही गुडघे निकामी झाले. दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली पण एका गुढघ्याची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे त्यांना उभं राहणं पण मुश्कील होत होतं. अश्यावेळेस घराची जबाबदारी ओम पैठणे वर येऊन पडली. अश्या परिस्थितीत काय करावं ह्या विचारात असताना ओम चा बालपणीचा मित्र राहुल भालेराव ह्याने ओलासाठी गाडी विकत घेतल्यावर ओम ने लगेच ती चालवण्याला होकार दिला. दिवसा राहुल तर रात्री ओम असे २४ तास ओला साठी ही गाडी पुण्यातील रस्त्यावर धावायला लागली.
अश्याच एका रात्री ओम च्या गाडीत प्रवासी म्हणून रिटायर्ड कर्नल बक्षी हे प्रवासी होते. ओमचं शिक्षण आणि जुजबी माहिती मिळाल्यावर कर्नल बक्षी ह्यांनी त्याला भारतीय सेने बद्दल माहिती दिली. तसेच भारतीय सेनेत असलेल्या अनेक संधींबद्दल विस्ताराने सांगितलं. कर्नल बक्षींच्या शब्दांनी ओम पैठणे ने मनात एक नवीन लक्ष्य ठरवलं. ते लक्ष्य होतं भारतीय सेनेत प्रवेश. लहानपणापासून देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा ओमच्या मनात होतीच पण परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते स्वप्न अधूर राहिलं होतं. पण कर्नल बक्षीनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ओमला त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली होती.
कर्नल बक्षी नी त्याला लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू ह्यांच्याकडे भारतीय सेनेच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी आपला शब्द टाकला. पुढे ६ महिने ओम पैठणे ओला कॅब चालवत राहिला. पण त्याचवेळेस एस.एस.बी. परीक्षा आणि सी.डी.एस. परीक्षा २०१६ ला पहिल्याच प्रयत्नात पास होण्यात तो यशस्वी ठरला. ही परीक्षा पास झाल्यावर ओमला ऑफिसर ट्रेनिंग साठी भोपाळला जावं लागलं. तिथलं ट्रेनिंग पूर्ण करून ओम आता भारतीय सेनेचा एक ऑफिसर म्हणून आपलं पद स्वीकारण्यास तयार झाला आहे.
ओला कॅब चालवून आपली उपजिविका करणारा आणि एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ओम पैठणे चा ओला कॅब ते भारतीय सेनेतील एक ऑफिसर हा प्रवास थक्क करणारा आहेच पण त्याही पेक्षा अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. भारतीय सेनेच्या रिटायर्ड कर्नल बक्षींसारख्या परिसाने ओमच्या आत लपलेले सोन्याचे गुण नेमके हेरले. ते हेरायला त्याच्या गाडीमधून केलेला काही मिनिटांचा प्रवास पुरेसा होता. कर्नल बक्षींच्या परिसाने ओम पैठणे च्या आयुष्याला अशी कलाटणी मिळाली की ज्याचा विचार पण त्याने किंवा कोणीच केला नव्हता. ह्यामागे ओम पैठणे ची जिद्द आणि मेहनत जितकी महत्वाची आहे तितकीच कर्नल बक्षींची नजर आणि त्यांनी त्या सोन्याला घडवण्यासाठी केलेले सहकार्य महत्वाचे आहे. भारतीय सेनेच ट्रेनिंग घेतल्यावर ओम पैठणे च एकूण व्यक्तिमत्व पूर्ण बदलून गेलं आहे. पण भारतीय सेनेचा एक ऑफिसर बनल्यावरही ओम कर्नल बक्षीनां विसरलेला नाही. आपल्या आयुष्याचं ज्यांनी सोन केलं त्यांचा तो आजही ऋणी आहे.
आयुष्यात आपण कोणाला आदर्श मानतो आणि कोणाचं ऐकून रस्ता बदलतो हे आपल्या हातात असते. ओम पैठणे च्या आयुष्यात कर्नल बक्षींसोबत केलेला तो एक प्रवास पूर्ण आयुष्य बदलवून गेला. ओम चा हा प्रवास अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. ओम पैठणे मला तुझा अभिमान आहे. भारतीय सेनेचा एक अधिकारी म्हणून आणि तुझ्या जिद्दीला माझा सलाम. कर्नल बक्षी तुमच्या सारखे परीस आज भारतात आहेत म्हणून भारत सुरक्षित आहे. तुमच्यातल्या त्या परीसाला माझा साष्टांग नमस्कार.
असाच एखादा प्रवास आपल्याही आयुष्यात घडतो कधीतरी!! अगदी कलाटणी देणाराच नसेलही कदाचित. पण लक्षात राहणार प्रवास असतोच कि….. असाच लक्षात राहून गेलेला प्रवास कमेंट मध्ये लिहून नक्की शेअर करा.
वाचण्यासारखे आणखी काही…
प्रासंगिक
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.