सध्या पावसाळा जरी सुरू असला तरी मधल्या वेळी कडक ऊन पडू लागले आहे. अशा उन्हाच्या वेळात बाहेर पडावे लागले की त्याचा त्वचेवर नक्कीच परिणाम होतो. ऊन्हामुळे त्वचा काळवंडते, रापल्यासारखी दिसते आणि त्वचेचा रंग आणि पोत दोन्ही बदलतो. काही वेळा तर त्वचा चक्क भाजल्यासारखी दिसते. चेहऱ्याची त्वचा सर्वात नाजुक असल्यामुळे ऊन्हाचा सर्वात जास्त परिणाम चेहेऱ्याच्या त्वचेवर होतो.
बहुतेक वेळा सर्वांना असे वाटते की सन टॅन होण्याची समस्या फक्त उन्हाळ्यात जाणवते. परंतु हे खरे नाही, हिवाळा आणि पावसाळ्यात देखील उन्हात बाहेर पडल्यावर सन टॅन होऊ शकते. त्यामुळे बाराही महिने त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
सन टॅन म्हणजे नक्की काय?
आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते. आजूबाजूच्या वातावरणाचा, गर्मी, प्रदूषण, धुळ, धूर यांचा तसेच कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्यालाच टॅनिंग असे म्हणतात. टॅनिंगमुळे त्वचा भाजल्यासारखी होऊन त्वचेवर चट्टे देखील उमटतात. वेळोवेळी यावर उपाय केला नाही तर त्वचेची कायमची हानी होऊ शकते.
सन टॅन होण्याची कारणे?
प्रखर उन्हात जास्त वेळ राहणे हे सन टॅन होण्याचे प्रमुख कारण आहे. टॅनिंगचा परिणाम दोन प्रकारे दिसतो. एक तात्पुरत्या स्वरूपाचा आणि दुसरा हळूहळू होणारा.
१. प्रखर उन्हात गॉगल, टोपी, स्कार्फ न वापरता जाणे.
२. टू व्हीलर वरून जाताना चेहरा आणि हात नीट झाकून न घेणे
३. कोणत्याही स्वरूपाचे सनस्क्रीन लोशन न वापरणे
सन टॅन होण्याची लक्षणे
१. त्वचा काळी पडणे.
२. त्वचा लाल होणे.
३. त्वचा गरम होणे.
४. त्वचेवर लालसर रंगाचे गोल गोल चट्टे उमटणे.
५. त्वचेला खाज येणे.
६. त्वचेची सालपटे निघून येणे.
७. त्वचेवर बारीक पुरळ येणे.
सन टॅन होऊ नये म्हणून काय करावे?
१. कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. जाणे अत्यावश्यक असल्यास संपूर्ण अंग जातील असे कपडे वापरावेत. तसेच उत्तम प्रतीचा गॉगल आणि स्कार्फ वापरावा.
२. एस पी एफ १५ ते ३० असणारे चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन वापरावे. बाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लोशन लावावे.
३. सुती कपडे वापरावेत. त्यामुळे घाम चांगल्याप्रकारे शोषला जातो.
४. पोहण्याच्या तलावावर किंवा समुद्र किनारी जाणार असल्यास पाण्यात वापरलेले चालू शकेल असे सनस्क्रीन लोशन वापरावे. पाण्यातून बाहेर आल्यावर स्वच्छ पाण्याने अंग धुऊन टाकावे.
५. भरपूर फळे आणि द्रवपदार्थ असणारा आहार घ्यावा. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहून त्वचेचा पोत सुधारतो.
सन टॅन घालवण्याचे घरगुती उपाय
१. दही
एक वाटी दह्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर गार पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्यामुळे टॅनिंग कमी होते.
२. काकडी
काकडी खाण्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो हे तर आहेच. परंतु त्याबरोबरच किसलेल्या काकडीत थोडे दूध आणि लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर अर्धा तास लावून ठेवल्यास बराच फरक पडतो. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.
३. टोमॅटो
टोमॅटो चिरून त्याच्या आतला गर बियांसह टॅन झालेल्या त्वचेवर मसाज केल्याप्रमाणे चोळावा. टॅन झाल्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.
४. पपई
पिकलेली पपई कुस्करून तो गर टॅन झालेल्या त्वचेवर लावावा. त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
५. लिंबाचा रस
लिंबाचा रस काढून तो थेट टॅन झालेल्या त्वचेवर लावावा. १५ ते २० मिनिटे ठेवून धुवून टाकावा. बराच फरक पडतो.
६. बदाम
टॅन होऊन त्वचा जर खूपच भाजल्यासारखी झाली असेल तर भिजवून वाटलेल्या बदामाची पेस्ट त्या जागेवर लावावी. त्वचेला थंडावा मिळतो तसेच टॅनिंग कमी होऊन त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते.
७. ओट्स
ओट्स ताकात मिसळून त्यांचे स्क्रब तयार करावे. हे स्क्रब हळूहळू टॅन झालेल्या त्वचेवर चोळावे. त्यामुळे त्वचेवरील आवरण निघून जाते आणि त्वचा नितळ बनते.
८. बटाटा
बटाट्याच्या चकत्या करून त्या टॅन झालेल्या त्वचेवर लावून ठेवाव्यात. बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्च मुळे टॅनींग कमी होण्यास मदत होते.
९. कोरफडीचा गर
टॅन झालेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावून ठेवावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो तसेच सन टॅन कमी होण्यास मदत होते.
१०. नारळाचे पाणी
उन्हामुळे रापलेल्या त्वचेवर नारळाच्या पाण्याचा लेप लावून ठेवावा. तो संपूर्ण वाळेपर्यंत तसाच ठेवावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुऊन टाकावी.
११. अननस
पिकलेल्या अननसाच्या गरात चमचाभर मध मिसळावा. हे मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर अर्धा तास लावून ठेवावे. एक दिवसा आड हा उपाय केल्यास सन टॅन कमी होण्यास मदत होते.
१२. बेसन, हळद, दूध
दोन चमचे बेसन घेऊन त्यात पाव चमचा हळद मिसळा. आवश्यकतेप्रमाणे दूध घेऊन या मिश्रणाचा लेप तयार करावा. असा लेप नियमितपणे लावल्यास सन टॅन होत नाही, तसेच लवकर बरे होते. या मिश्रणात थोडीशी साय घातल्यास जास्त परिणाम होतो.
तर हे आहेत सन टॅन घालवण्याचे घरगुती उपाय. ह्या उपायांचा वापर अवश्य करून पहा. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर बाराही महिने हे घरगुती उपाय उपयोगी पडतात. कोणत्याही महागड्या क्रीम आणि लोशनपेक्षा घरच्या उपलब्ध साहित्यातून असे उपाय करणे खात्रीशीर तर असतेच शिवाय ते खिशालाही परवडते.
हे घरगुती उपाय वापरुन त्याबाबत तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.