वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने एका जुलमी ब्रिटीश दंडाधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, त्यावर ऐतिहासिक खटला चालला आणि तिने ७ वर्षे तुरुंगवास ही भोगला.
मात्र पुढं स्वतंत्र भारतात डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली.
भारताच्या अमृत महोत्सवात, विस्मृतीत गेलेल्या, या मुलीची प्रेरणादायी कहाणी वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल.
ही मुलगी तिच्या वयाच्या इतर किशोरवयीन मुलींसारखीच होती.
रात्री अभ्यास करताना टेबलाखालच्या अंधारालासुद्धा घाबरणारी.
ही मुलगी म्हणजे भारतातील सर्वात तरुण महिला क्रांतिकारक सुनीती चौधरी.
त्यांचा जन्म २२ मे १९१७ ला एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला.
१९३० ला सविनय कायदेभंगाची चळवळ जोरात सुरू होती-पोलिसांची क्रूरताही तितकीच प्रखर होती.
सुनीतीने ते क्रांतिकारक वातावरण, धरपकड, मिरवणुका आणि स्त्री-पुरुषांना निर्दयपणे केली जाणारी अटक पाहिली.
सुनीती जे अनुभवत होती तो मार्ग तिला निर्भयतेच्या एका नवीन दिशेकडे घेऊन चालला होता….
स्वातंत्र्य चळवळीने भारलेल्या वातावरणात ‘फैजुन्निसा गर्ल्स हायस्कूल’मधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या प्रफुल्ल नलिनी ब्रह्मा यांनी तिला मार्गदर्शन केलं, इतकंच नाही तर काही पुस्तकं पुरवली.
ही पुस्तकं म्हणजे मुख्यतः ब्रिटिशांनी बंदी घातलेले क्रांतिकारी साहित्य होतं.
“जीवन हे मातृभूमीसाठी समर्पित आहे” स्वामी विवेकानंदांच्या या शब्दांनी तिचा मातृभूमीवरचा विश्वास अढळ केला.
स्वातंत्र्य चळवळीने भारावलेल्या सुनीती जिल्हा स्वयंसेवक कॉर्प्सच्या मेजर बनल्या.
विद्यार्थी संघटनेसमोर भाषण करायला नेताजी सुभाषचंद्र बोस शहरात आले असताना, त्यांनी मुलींच्या परेडचे नेतृत्व केले.
प्रफुल्ल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना क्रांतिकारी चळवळीतील महिलांच्या भूमिकेबद्दल त्यांचे विचार काय आहेत असं विचारलं तेंव्हा
क्षणार्धात नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, “तुला पुढच्या रांगेत पाहून मला आनंद होईल.”
त्या काळात ‘छत्री संघ’ तरुण मुलींना प्रशिक्षण देत होती.
सर्वात हुशार आणि धाडसी प्रशिक्षणार्थी क्रांतिकारकांसाठी माहिती, कागदपत्रे, शस्त्रं, दारूगोळा आणि पैसा पुरवण्याची जबाबदारी पार पाडत होते.
त्यावेळी प्रफुल्ल, शांतीसुधा/ संतीसुधा घोष आणि सुनीती चौधरी यांनी मुलांच्या बरोबरीने आम्हांलाही जोखमीच्या जबाबदाऱ्या द्या अशी धाडसी मागणी केली.
काही ज्येष्ठ नेत्यांनी लहान मुलींना धोक्याची जबाबदारी पेलेल का अशी शंका व्यक्त केल्यावर सुनीती म्हणाली, “सध्याच्या वातावरणात जेंव्हा खूप गरज आहे, तेंव्हा जोखीम उचलण्यापासून आम्ही दूर राहिलो तर प्रशिक्षणाचा फायदा काय?”
भूमिगत असलेल्या बिरेन भट्टाचार्यजींनी या मुलींची गुप्तपणे मुलाखत घेतली आणि तिघीही पुरेशा धाडसी असल्याचं घोषित केलं.
त्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण त्रिपुरा स्टुडंट्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अखिल चंद्र नंदी यांच्या देखरेखीखाली सुरू झालं.
या मुलींनी शाळा सोडली, दाट वस्तीपासून दूर असलेल्या मायनामती टेकड्यांवर जाऊन गोळीबाराचा सराव केला.
मुख्य आव्हान टार्गेट शूट करणे हे नव्हतं तर रिव्हॉल्व्हरच्या मागच्या किकचं व्यवस्थापन करणं हे होतं.
खरं तर सुनितीची तर्जनी ट्रिगरपर्यंत नीट पोहोचत नव्हती, पण ती हार मानायला तयार नव्हती.
तिने तिच्या मधल्या लांब बोटाचा वापर करून बेल्जियन मेकच्या छोट्या रिव्हॉल्व्हरमधून प्राणघातक गोळ्या झाडण्याचा सराव केला.
आता त्यांचं लक्ष्य जिल्हा दंडाधिकारी चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स हे होते, जे सत्याग्रह मोडून काढण्यासाठी कधीही माघार घेत नव्हते.
चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स यांनी सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं आणि सरकारविरूद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक अहिंसक भारतीयाला अतोनात त्रास दिला.
यावर काही तरी उपाय गरजेचा होता, आणि ती जबाबदारी संति-सुनीती यांनी आपल्या शिरावर घेतली.
अखेर १४ डिसेंबर १९३१ ला सकाळी १० वाजता जिल्हा दंडाधिकार्यांच्या बंगल्यासमोर एक गाडी थांबली.
दोन मुली त्यातून खाली उतरल्या, हसत बागडत, उत्साहानं फसफसणा-या अशा या युवती होत्या.
दोघींच्या साडीभोवती सिल्कचं आवरण होतं, जे कदाचित थंडीपासून बचाव करण्यासाठी होतं!
त्या २ मुलींनी लांब कॉरिडॉर ओलांडण्याआधीच, कोचमन काहीशा घाईने तिथून निघून गेला.
मुलींनी ऑर्डरलीद्वारे मुलाखतीची स्लिप पाठवली आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नेपाळ सेन यांच्यासह दंडाधिकारी चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स बाहेर आले.
स्टीव्हन्सने त्यांना पाठवलेल्या पत्राकडे पाहिलं.
पत्रातल्या मजकुरानुसार या २ मुली, म्हणजे इला सेन आणि मीरा देवी स्विमिंग क्लबसाठी मॅजिस्ट्रेटकडे अपील करत होत्या.
खूप खुशामत करणारा “महाराज” हा शब्द आणि काहीसे चुकीचे इंग्रजी शब्द वापरल्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल
स्टीव्हन्सच्या मनात शंकाच उरली नाही.
“महाराजांची” सहानुभूती मिळवण्यासाठी इलाने स्वतःची ओळख “एका पोलिस अधिकाऱ्याची मुलगी म्हणून करून दिली.
आता मुली अधीर झाल्या होत्या. त्यांनी स्टीव्हन्सला संदर्भ म्हणून पत्रावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली.
स्टीव्हन्स त्याच्या चेंबरमध्ये गेला आणि लवकरच सही केलेला कागद घेऊन परत आला.
ही त्याची शेवटचीच चाल ठरली. कुख्यात दंडाधिकार्याचे शेवटचे दर्शन त्या दोन मुलींनी घेतलं, आणि दोन रिव्हॉल्व्हरनी सरळ त्याच्या ह्रदयावर नेम धरला.
आणि त्यानंतर पापणी लवण्याच्या आत झालेला गोळीबार सोबत असणारे एसडीओ सेन थांबवू शकले नाहीत.
या दोन युवतींना मात्र सेन यांनी लगेचच पकडलं, त्यावेळी शांती आणि सुनीती यांनी जोरदार मारहाणीपासून स्वतः चा बचाव करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही.
त्या सामो-या येणाऱ्या सगळ्या छळांसाठी सज्ज झाल्या.
त्यांच्या वेदना सहन करण्याची त्यांच्यात हिंमत होती.
लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली तरी त्या खचल्या नाहीत, त्यांच्या गुप्त संघटनेबद्दल एक अवाक्षरही त्यांनी काढलं नाही.
शस्त्रं शोधण्याच्या बहाण्यानं त्यांचा विनयभंग झाला तेव्हाही त्यांचा चेह-यावर कोणतेही भाव उमटले नाहीत.
क्रांतिकारकांनी शूर मुलींबद्दल पत्रिका लोकामध्ये वाटल्या.
सुनितीच्या मेजरच्या गणवेशातील फोटो लोकांना आवडला.
त्या फोटोखाली एकच ओळ लिहिलेली होती “विनाशाची धगधगती इच्छा आज माझ्या रक्तात आहे”.
काम फत्ते झालं पण मुलींना अजून बरंच अंतर कापायचं होतं.
खटला सुरू झाला तेव्हा त्यांनी केलेल्या कृत्यावर न्यायालयाचा विश्वासच बसत नव्हता.
संती सुनिती प्रेक्षकांची गर्दी पाहून खुश झाल्या.
त्यांनी न्यायाधीश आणि इतर सर्व न्यायालयीन सदस्यांकडे चक्क पाठ फिरवली.
कारण त्यांना बसायला खुर्च्याच दिल्या नव्हत्या.
जर माणूस म्हणून त्यांच्याप्रती मूलभूत सौजन्यच दाखवलं जाणार नसेल तर त्या ही कुणाला मारून मुटकून आदर द्यायला बांधील नव्हत्या.
जेव्हा एसडीओ सेन साक्षीदार म्हणून आले, त्यांनी जे घडलं ते सांगायल सुरवात केली तेंव्हा ते जोरात ओरडले “खोटारड्या, खूप मोठ्या खोटारड्या”
कोर्टरूममध्ये गोंधळ उडाला. अपमानित होण्याची भीती तर नव्हती, पण या दोन लहान मुलींना न्यायालयाची ही भीती वाटत नव्हती.
संती, सुनितीनं पोलिस व्हॅनपासून ते कोर्टरूमपर्यंत निर्भयपणे देशभक्तीपर गाणी म्हटली, आणि जमलेल्या सगळ्या लोकांशी हास्याची देवाणघेवाण केली.
निकाल लागला तेव्हा मात्र त्यांचं हसू मावळलं प्रेक्षकांना त्यांची एक वेगळी बाजू दिसली,
निराशेने ग्रासलेले दोन उदास चेहरे. कारण त्यांना फाशी न होता जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
याचा अर्थ असा होता की त्यांची हुतात्मा होण्याची संधी हुकली होती.
वातावरण आवाज घुमला “ही फाशी असायला हवी होती! फाशी देणेचं योग्य न्याय होईल!”
वार्ताहरांनी मात्र यावर शांततेचा पर्याय स्वीकारला.
संती, सुनितीला छळण्यात अधिकारी कुठेही कमी पडले नाहीत.
प्रफुल्लला मुख्य सूत्रधार म्हणून तुरुंगात टाकण्यात आलं.
नंतर, तिला कडक नजरकैदेत ठेवण्यात आलं, जिथे पाच वर्षानंतर, वैद्यकीय सेवेअभावी तिचा मृत्यू झाला.
संतीला इतर क्रांतिकारकांसोबत दुसऱ्या वर्गात ठेवण्यात आलं.
छोट्या सुनीतीला चोरट्यांनी आणि खिसेकापूंनी भरलेल्या तिसऱ्या वर्गात ढकलण्यात आलं होतं.
या तिसऱ्या वर्गात निकृष्ट अन्नापासून ते खराब कपडे होते आणि तिथं मानवी अधिकारांचं कुठंही दर्शन नव्हतं.
सुनितीची याला अजिबात हरकत नव्हती.
ती तिची दैनंदिन कामं निमूटपणे करत राहिली,
तिच्या वृद्ध आई-वडिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार, तिच्या मोठ्या भावाला केलेली अटक याबद्दल तिला नियमितपणे बातमी कळत होती.
सुनितीचा धाकटा भाऊ कलकत्त्याच्या रस्त्यांवर फेरीवाला बनला, आजारपणाने आणि उपासमारीने त्याचा मृत्यू ही झाला.
ही बातमी सुनीतीपर्यंत पोहोचली पण तिचा ठाम निश्चय या बातमीमुळे मोडून पडला नाही.
राजकिय पण नम्र वृत्तीच्या या मुलीच्या मनात आजुबाजुच्या गुन्हेगारांबद्दल कणव होती.
बीना दास यांनी एका घटनेबद्दल आवर्जून लिहिलं आहे, जिथे रमजानच्या उपवासानंतर, एका महिलेने सुनीतीला गोडसर शक्तीवर्धक पाण्याचा ग्लास देण्याचा आग्रह धरला कारण सुनिती या उपचारासाठी पात्र आहे असे त्या महिलेला वाटत होतं.
६ डिसेंबर १९३९ ला हा छळ संपला.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी झालेल्या कर्जमाफीच्या वाटाघाटीमुळे त्यांची सुटका झाली.
आता सुनीती २२ वर्षांची तरुणी होती. कोणतंही औपचारिक शिक्षण नसलेली एक स्त्री, फक्त तिचा भाऊ तिच्या मदतीला होता.
पण तिने आपलं क्रांतिकारकाचं ध्येय कधीच सोडलं नाही.
धैर्यानं सुनितीनं नवी सुरुवात केली, तिच्या अभ्यासासाठी प्रयत्न केले, आशुतोष महाविद्यालयातून प्री-युनिव्हर्सिटी कोर्स (ISc) च्या प्रथम विभागात उत्तीर्ण झाली.
सुनितीनं कॅम्पबेल मेडिकल स्कूल फॉर द लायसेंटिएट इन मेडिसिन अँड सर्जरी (एलएमएस) मध्ये प्रवेश घेतला .
१९४४ ला सुनितीने कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.
एमबीएस (आताच एमबीबीएस) पूर्ण केल्यानंतर, तिने स्वातंत्र्य चळवळीतले कार्यकर्ते आणि माजी राजकीय कैदी प्रद्योत कुमार घोष यांच्याशी लग्न केलं.
ते सुनितीच्या भावाचे मित्र ही होते.
तिच्या दयाळूपणामुळे आणि समर्पणवृत्तीच्या कौशल्यामुळे चंदननगरमध्ये लवकरच एक नामांकित डॉक्टर म्हणून प्रस्थापित झाली.
१९५१/५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, डॉ. सुनीती घोष यांना काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांकडून लढण्याचे तिकीट ऑफर करण्यात आलं होतं, जे त्यांनी ठामपणे नाकारलं.
डॉ. सुनीती घोष यांना आता राजकीय घडामोडींमध्ये स्वारस्य नव्हते, त्या आधीच त्यातून बाहेर पडल्या होत्या.
त्यानंतर डॉ. सुनीती घोष यांना स्वतः च्या कारकिर्दीसाठी राजकीय लढाया मात्र लढाव्या लागल्या.
सुनीती केवळ स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या नाहीत तर त्यांनी भावांना सुद्धा त्यांच्या व्यवसायात मदत केली.
अर्धांगवायूनं जखडलेल्या आपल्या पालकांची विनम्रपणे सेवा केली.
मुलांवर आणि निसर्गावर त्यांचं अतोनात प्रेम होते.
बागकाम, पोहणे आणि निसर्गाचा अभ्यास त्यांनी केला.
आपल्या मुलीला, भारतीला वेगवेगळे प्रसंग आणि सण साजरे करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
देशभक्ती, शौर्य, दयाळूपणा आणि प्रेरणेचा वारसा मागे ठेवून १२ जानेवारी १९८८ या निडर क्रांतिकारी महिलेनं अखेरचा श्वास घेतला.
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात अशा थोर क्रांतिकारक देशभक्ताला विनम्र अभिवादन..!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.