खरेतर तर कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. अमुक शिक्षण घेऊन प्रगती करता येते, किंवा तमुक काम करून नाव कमावता येते असे काही नसते.
तुम्ही त्या क्षेत्रात तुमचे पाय रोवून कशी प्रगती करता यावर सगळे अवलंबून असते.
मनापासून काम केले की तुमचे नाव चमकणारच.
तुम्हाला तुमच्या कामाविषयी प्रेम असेल तर तुमचे काम नावाजले जाणारच.
क्षेत्र कोणतेही असो, वेगळेपणा जपता येणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.
असाच वेगळेपणा जपत आर्किटेक्ट धृवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर यांनी नाव कमावले आहे.
या आर्किटेक्ट जोडीने ३ वर्षांपूर्वी काम सुरु केले आणि या कालावधीत त्यांची ६ घरे बांधून होऊन, आणखी ३ बांधली जात आहेत.
धृवांग आणि प्रियांकाच्या कामात अनेक वैशिष्ट्ये आहेत.
सर्वप्रथम तर ते जितके शक्य होईल तितके निसर्गाला पूरक साहित्य वापरून बांधकाम करतात.
त्यांचे अजून एक वाखाणण्याजोगे काम म्हणजे ते कामासाठी लोकल लेबरला प्रधान्य देतात.
आज या लेखात आपण या आर्किटेक्ट जोडप्याने हल्लीच बांधलेल्या एका अनोख्या घराबद्दल जाणून घेणार आहोत.
या घरा विषयी, घराच्या बांधकामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याअगोदर या घराची खासियत आपण जाणून घेऊ या.
मित्रांनो, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या घरात तापमान बाहेर पेक्षा थोडे थोडके नव्हे तर तब्बल १३ डिग्री कमी असते!
या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच यांनी बाहेरचे तापमान मोजले, ते होते ३८ डिग्री आणि त्याचवेळी घरातील तापमान होते २५ डिग्री!
बाहेर इतका उकाडा असतानाही घरातील तापमान इतके कमी कसे? एसी लाऊन? नाही!
तर घराच्या बांधकामासाठी वापरलेल्या सामानामुळे.
त्यांनी बांधलेले हे घर कामशेत या गावात आहे.
मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असलेल्या या गावात, साईट वर, पहिल्यांदा पोहोचल्यानंतर त्यांनी पूर्ण जागेची पाहणी केली.
तिथे कोणते नैसर्गिक साहित्य आहे, त्या भागात कोणता दगड आहे ज्याचा बांधकामात वापर केला जाऊ शकतो याचा शोध घेतला.
तेव्हा त्यांना समजले की त्या भागात राहणारे गावकरी काळ्या रंगाच्या दगडाने त्यांच्या घराचे बांधकाम करतात.
त्यांनी सुद्धा हाच दगड वापरून बांधकाम करण्याचे ठरवले पण यात एक अडचण होती. ती म्हणजे या दगडाचे वजन खूप जास्त होते.
यामुळे सात फुटाच्या वर हे दगड नेणे शक्य नव्हते.
म्हणूनच तिथल्या बांधकामात या दगडांसोबतच विटांचा सुद्धा वापर करण्याचे त्यांनी ठरवले.
धृवांग व प्रियांका यांनी हे घर बांधताना एक आगळीवेगळी गोष्ट केली, ती म्हणजे यामध्ये विटा धरून ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी सिमेंटचा वापर केला नाही.
या घराचे दोन मजले हे दगडांनी बांधले आहेत दगड एकत्र राहायला सिमेंटच्या ऐवजी मातीचा वापर केला गेला आहे.
याचे छपर सुद्धा कौलं व माती यांनी बांधली आहेत.
या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या घराच्या बांधकामात वापरले गेलेले लाकूड हे सुद्धा लोकल टिम्बर आहे.
याच्या वापरामुळे पर्यावरणाला कमी हानी पोहोचते.
घर बांधताना असा वेगळेपणा साधणारे धृवांग आणि प्रियांका आपल्या क्लायंटच्या सूचनांचा पण गांभीर्याने विचार करतात.
क्लायंटला नक्की काय हवे आहे यानुसार ते काम करतात पण ते करताना क्लायंट व पर्यावरण दोघांचा कसा फायदा होईल याच्याकडे त्याचा कल असतो.
आता याच क्लायंटला ‘लो मेंटेनन्स’ घर हवे होते कारण ते केवळ सुट्टी पुरतेच त्या घरात राहायला येणार होते.
त्यामुळे घराच्या आतील बांधकाम करताना धृवांग व प्रियांका यांना ही गोष्ट लक्षात घेऊन सोयी करायच्या होत्या.
घरात आतील बाजूने एरवी घरात असतात त्याच पद्धतीच्या टाईल्स वापरल्या गेल्या.
पण या टाईल्स एकमेकांना जोडायला मात्र चुन्याचा वापर केला गेला.
यामुळे अजून एक महत्वाचा फायदा असा की यामुळे घर जुने झाले, टाईल्स जुन्या झाल्या तरी त्यामध्ये भेगा पडत नाहीत. यामुळे काही वर्षांनी सुद्धा टाईल्स बदलायची गरज लागत नाही.
धृवांग सांगतात की प्रत्येक घराच्या, क्लायंटच्या गरजा वेगवेगळ्या असतात व घर बांधताना या गरजा डोक्यात ठेऊन त्या दृष्टीने विचार करावा लागतो.
पर्यावरणाला पूरक आणि क्लायंटच्या गरजा यांचा समतोल साधावा लागतो.
तसेच या घरात करावे लागले. घर लो मेंटेनन्स हवे होते यासाठी सिमेंटच्या ऐवजी चुना वापरला पण त्याचबरोबर चुना हा जास्त काळ टिकतो आणि सिमेंटसारखा तापत सुद्धा नाही.
शिवाय सिमेंटपेक्षा चुन्याचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने कधीही चांगलाच असतो.
चुन्याचा फायदा असा असतो की उन्हाळ्यात चुना उष्णता सोडून देतो व थंडीत धरून ठेवतो.
म्हणजेच चुन्याचा वापर केल्यामुळे उन्हाळ्यात घरात थंड वाटते व थंडीच्या दिवसात उबदार वाटते.
या घरात चुना, माती व विटा या तिन्हीचा वापर अशा पद्धतीने केला आहे की या घराच्या भिंतींमधून सुद्धा हवा खेळती राहते.
घराच्या बांधकामात जेव्हा सिमेंटचा वापर केला जातो तेव्हा त्या घराच्या भिंती पूर्णपणे सील होतात.
त्यामधून हवा खेळती राहण्याची काहीच शक्यता राहत नाही.
याच कारणामुळे बिल्डींग्समध्ये उन्हाळ्यात व दिवसा खूप उकडते.
सिमेंट खूप तापत असल्याने व उष्णता बाहेर पडायला सुद्धा काही मार्ग नसल्याने असे होते. पण चुन्याच्या बाबतीत असे होत नाही.
याचमुळे या घरातील तापमानात आणि बाहेरील तापमानात तब्बल १३ डिग्रीचा फरक आढळून आला.
यामुळे या घरात एसीची तर गरज नाहीच पण उन्हाळ्यात पंख्यांची सुद्धा गरज नाही.
या घराच्या बांधकामाला २ वर्ष लागली.
सहसा बांधकामाला इतका वेळ लागत नाही. दीड वर्षात बांधकाम पूर्ण होते. पण या घराचे बांधकाम करणारे मजूर हे तिथले स्थानिक होते.
त्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे काम दिले गेले होते.
त्यामुळे त्यांच्या शेतीचा सिझन सांभाळून त्यांनी बांधकाम पूर्ण केले.
पर्यावरणाचा विचार करून, पर्यावरणाला पूरक असे बांधकाम करावेसे वाटणे, त्यासाठी कष्ट घेणे आणि प्रत्यक्षात ते करून दाखवणे सोपे नसते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.