‘जुळ्याचं दुखणं’ हा शब्दप्रयोग आपण अगदी सर्रास वापरतो. पण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जाणवून देणारी एक घटना नुकतीच घडली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. दोघे जुळे भाऊ एकाच वेळी जन्माला आले आणि आणि दुर्दैवाने, एकदमच त्यांनी ह्या जगाचा निरोप देखील घेतला….
त्यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला आहे तो करोना.
हा करोना अनेकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे. त्यातीलच आहेत दोघे जुळे भाऊ, जोफ्रेड वर्गीस ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी.
मेरठच्या केंट एरियामध्ये राहणाऱ्या ग्रेगरी रेमंड राफेल ह्या शिक्षकाची ही दोन मुले.
ह्या दोन्ही मुलांचा जन्म २३ एप्रिल १९९७ ला झाला. दोघांच्या जन्मवेळेत फक्त ३ मिनिटांचे अंतर.
दोघेही एकदमच ह्या जगात आले. एकदमच शाळेत, कॉलेजात गेले. दोघांनीही कम्प्युटर इंजीनीरिंगचे शिक्षण एकत्रच घेतले.
एकाच वेळी दोघे ग्रॅजुएटसुद्धा झाले आणि एकदमच दोघांना नोकऱ्या देखील मिळाल्या.
हां, आता त्यांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या शहरात होत्या खऱ्या, पण सध्या वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे ते दोघे घरी एकत्रच होते.
नियतीला देखील त्यांना वेगळे करावे असे बहुधा वाटले नाही. गेल्या २३ एप्रिलला त्यांनी त्यांचा २४ वा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना करोनाने गाठले.
वडील रेमंड राफेल ह्यांनी सांगितले की २४ एप्रिल पासूनच दोघांनाही ताप यायला सुरुवात झाली.
घरातल्या सगळ्याच लोकांचे रीपोर्ट पॉजिटिव आले. सर्वांवर घरीच उपचार सुरु झाले.
परंतु १ मे च्या सुमारास दोघा जुळ्या भावांची ऑक्सिजन लेवल ९० पेक्षा कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती केले गेले.
तेथे काही दिवस उपचार घेतल्यावर त्यांचे रीपोर्ट देखील निगेटिव आले. परंतु १३ मे ला अचानक जोफ्रेडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
त्यापाठोपाठ राल्फ्रेडला देखील तसाच त्रास होऊ लागला. १३ मे ला १२ वाजता जोफ्रेडचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ मध्यरात्री राल्फ्रेडनी देखील ह्या जगाचा निरोप घेतला.
वडील रेमंड राफेल ह्यांनी सांगितले की १३ तारखेला दुपारी जेव्हा जोफ्रेडच्या मृत्यूची बातमी सांगणारा फोन हॉस्पिटलमधून आला तेव्हा, दुःखात बुडालेली त्यांची पत्नी म्हणजेच ह्या दोन्ही जुळ्या मुलांची आई फक्त एवढेच म्हणू शकली की आता राल्फ्रेडचे देखील काही खरे नाही. आणि खरोखरच तसेच झाले.
मध्यरात्री त्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी सांगणारा फोन आलाच. तर अशी ही दोन जुळ्या भावांची कहाणी. ते ह्या जगात एकदम आले, एकत्र जगले आणि एकत्रच इथून निघूनही गेले.
ह्या दुहेरी निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कारण शिक्षक असणाऱ्या वडिलांनी अतिशय मेहनतीने दोन्ही मुलांना शिकवले आणि आता कुठे चांगले दिवस आले असताना करोनामुळे दोन्ही मुलांचा बळी गेला.
ह्या जुळ्या भावांना एक थोरला भाऊ आहे. तोच आता त्याच्या आई वडिलांचा आधार. तर अशी ही एकत्रच ह्या जगाचा निरोप घेणाऱ्या जुळ्या भावांची हृदयस्पर्शी कहाणी. त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏