स्थळ: महिलाश्रम…
आज जरा नेहमीपेक्षा जास्तच धावपळ…
त्या धावपळीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता कारणही तसेच..
आज माईंचा ६१ वा वाढदिवस…!! “एकसष्टी….आनंदाची पर्वणीच..”
आज माईंनी ठेवणीतली छान, थोडी जरी असलेली साडी काढली, ती साडी नेसून त्यावर गळ्यात मोत्याची माळ घातली, सुंदरसा जुडा पाडला.
कपाळावर छोटीशी टिकली लावली पण लावतांना मात्र चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत होती.
का लावतेय मी ही टिकली? कुणाच्या नावानी लावतेय ? परत मनाला समजावले.. हिचा काय दोष तिची जागा तर आधीपासुनच ठरलेली आहे..
इतका विचार कशाला करायचा. सर्वसाधारण व्यक्तिमत्व पण चेहऱ्यावर आत्मसन्मान झळकत होता.
आज त्या साध्या पेहरावामध्ये सुद्धा सुंदर दिसत होत्या… त्या तयार होतच नाहीतर चित्रा आणि गौरी त्यांना बोलवायला आल्या..
माईंनी मानेनेच होकार दिला पण त्यांचा हॉल कडे जायला पायच ओढत नव्हता. काय कारण असावे?
त्या कुणाची तरी आतुरतेने वाट बघत होत्या का?…परंतु कुणाची?….
आजपर्यंत तर कुणीच भेटायला आले नव्हते कारणही त्यांनाच माहिती असावे. जरा विचार करीत थोडा वेळ त्या आरामखुर्चीत बसल्या आणि त्यांचे लक्ष चार वर्षांपूर्वी लावलेल्या मधुमालतीच्या वेलीकडे गेले…
मनातच पुटपुटल्या,”मधुमालती फुलांनी किती बहरलीय गं… आणि तुझ्या फांद्याचा पसारा पण किती पसरलाय सोबत मंदमंद सुगंध सुद्धा… सर्व परिसर दरवळून निघालाय..”
या मधुमालती प्रमाणेच तर मी नाही ना..?
छे!! ‘मी आणि मधुमालती कशी तुलना करणार?’ ती तिच्या जागी तटस्थपणे उभी आहे मी माझ्या जागी..
या पाच वर्षांमध्ये मी इथे काय दिलंय? दिलंय ते फक्त प्रेम आणि आपुलकी.. माझ्याकडे त्याशिवाय होतेच काय?
अगदी रिकाम्या हातांनी आले होते, आज माझी ओंजळ आपलेपणाने भरून गेलीय”
ही मधुमालती मला सोबत ठेऊन आपल्या सुगंधासोबत माझे प्रेम म्हणा, वात्सल्य म्हणा, ममता म्हणा याचा सुद्धा भार वाहते आहे.. किती आणि कसे गं तुझे आभार मानू !!”
माई म्हणजेच पूर्वीच्या अनिताताई.. महिलाश्रमामध्ये आल्यानंतर त्यांना सर्वजणी माई या नावानेच हाक मारायला लागल्या… माई तशा सर्व भावंडांमध्ये मोठया…
त्यांच्या पाठीवर दोन भाऊ आणि एक बहिण. परिस्थिती सर्वसाधारण… पण घराणे घरंदाज.
वडील गावातीलच शाळेत शिक्षक होते.. बऱ्यापैकी शेतीपण…. कशाची काही कमी नव्हती. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. वडिलांची त्यांच्यावर थोरली म्हणून खूप माया होती.. चारही भावंडं चंद्रकोरीप्रमाणे वाढत होतो.. माझे बालपण संपवून तारुण्यामध्ये पदार्पण केव्हा झाले कळलेच नाही.
बाबा आईला म्हणत, “अनिता आता वयात आलीय तिचं शुभमंगल उरकायला हवंय” मी आडून ऐकायचे.
बाबा लाडा कौतुकाने मला म्हणायचे, “अनिता भातुकलीच्या खेळातील राजा सोडायला हवाय हं, आता खरोखरचा घोड्यावरून येणारा राजा शोधायला हवाय” मी हे ऐकताच लाजून पळ काढुन आईमागे लपत होते.
किती सुंदर स्वप्नाळू दिवस होते ते.. नवरा मुलगा शोधायला सुरुवात झाली. एक स्थळ पसंतीस आलं.
चांगले घराणे म्हणून लग्न जुळले.. मला भातुकलीतील राजा भेटला.
हो !! तो भातुकलीतीलच राजा होता. त्याने अर्ध्यावर नाहीतर, डाव सुरू व्हायच्या आधीच मोडला होता….
किती निष्ठुर असतात लोक.. मांडवपरतनिला गेली ती कायमचीच.. आणून द्यायचे नाही म्हणून वरून तंबी..
हातावरील मेंदीचा रंग तसाच होता, हळदीच्या सुगंधाने अंग मोहरलेले होते पण मनाचं काय?
काचेचा हिरवा चुडा सुवासिनी झाल्याची जाण करून देत होता.
तो कधी किणकिणलाच नाही.. कोमल कळी फुलण्याआधीच कोमेजली.. किती क्षणीक असावं हे!!
स्वप्न तर बघत नव्हते ना…!! मोडलेल्या डावातील राणी केविलवाणी होऊन हे सगळं बघत होती ते उघड्या डोळ्यांनी.
सहजच हिंदी सिनेमातील गाणे आठवायला लागले,’मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया.’ हा कागद असाच कोरा राहणार का? की कुणी यावर सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करेल? तो कोराच राहिला.
म्हणाले बोलल्याप्रमाणे वागले नाहीत. २५० ग्राम सोनं आणि गाडी मागितलेली होती ते दिल्या गेलं नाही. निर्जीव वस्तू सोबत तुलना केल्या गेली. असं नाही की काहीच दिलेलं नव्हतं बरंच काही देवूनही न दिल्याचा आव आणीत होते.
बाबांनी खूप गयावया केली.. हातपाय जोडले पण काहीही उपयोग झाला नाही. थोडं थोडं देणं देत राहील..
पण ते ऐकायला तयारच नव्हते. मुलीच्या वडिलांनी खाली मान घालायची आणि मुलाकडच्यांनी त्यावर सूरी फिरवायची… किती सोपं झालय ना.
कोर्टकचेरी करायची तर मुलीची बदनामी होईल ही भीती. आज नाही तर उद्या येतील आणि मुलीला घेऊन जातील या खोट्या अपेक्षेवर जगत होते” उष्ण झळामध्ये तेवढीच शीतलता मनाला दिलासा देत होती..
दिवसामागून दिवस जात होते समोर काहीच होत नाही, तरूण मुलगी अशी डोळ्यासमोर कुढत बसलेली दिसत आहे. काय करावं? विचार करून करून थकायला आलं होतं. पूर्ण आयुष्य हिच्यासमोर पडलंय. परिणामी वडिलांनी अंथरूण धरलं.
उपचार सुरू झाले पण काहीच फरक पडत नव्हता. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी माझ्या नावे दोन एकर शेती करून दिलीय आणि म्हणाले मी गेल्यानंतर तुझं कसं होणार? असो तुला आधार. शुष्क वाळवंटातही एखादा पाण्याचा झरा मिळावा, अशी स्थिती होती.
क्षणीक समाधानच म्हणावं लागेल.. काही दिवसातच त्यांनी प्राण त्यागला.. लोकांची कुजबुज कानावर पडत होती. हे सर्व माझ्यामुळे झाले का? किती कमनशिबी आहे मी.! नवऱ्याचे प्रेम काय असतं हेही माहिती नाही आणि आता वडिलांचे.. समोर काय मांडलंय नशिबात कोण जाने.. आता लग्नच करायचे नाही ठरलं तर.. मनाचा ठाम निर्धार.
भावांना चांगलं शिकवायचे हे ठरवून मी शेतीकडे लक्ष द्यायला लागले, नोकरी करायची म्हटली तर बाहेर जावे लागेल म्हणून इथेच रहायचे म्हणजे आईलाही मदत होईल. मनात असलेला स्वप्न पक्षी एका हृदयाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवला.. त्याचे पंख छाटले..
एका भावाचे शिक्षण संपून तो बाहेरगावी नोकरीसाठी गेला प्रयत्नांना यश मिळत होते. थोडी जबाबदारी हलकी झाली होती दरम्यान बहीण पण वयात आलेली मग तिचे लग्न झाले ती तिच्या घरी सुखी होती.. भावाचे लग्न झाले असं सर्व चल चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होते..
छोटा भाऊ वडिलांच्या जागेवर गावातील शाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा सर्वात आनंद झाला असेल तर मला.. माझी तपश्चर्या फळास आली होती..
माझ्या त्यागाची पावती मिळाली होती.. आई पण मध्ये मध्ये आजारी पडत होती. आता सर्वांची लग्न होऊन आपापल्या संसारात मग्न होती माझे एकटेपण मला खायला उठत होते. आई सतत माझी काळजी करीत होती..
माझा एकमेव सहारा…. एकदिवस तिही मला एकटीला सोडून गेली हा निसर्गनियमच..!
माझे वय वाढत होते, चेहऱ्यावर वयाची खूण दिसायला लागली होती. नात्यांची गुंफण ढिली होत होती पण मला नात्यांची गुंफण जबरदस्तिने घट्ट करायची नव्हती कारण मधुर उसातील रस काढून घ्यावा आणि निघालेला चोथा कचरा म्हणून फेकावा. मला कचरा म्हणून जगायचे नव्हते तर त्यामधील मधुर रस वाटायचा होता..
माझे अस्तित्व काय आहे याची जाणीव करून द्यायची होती? माझ्या भावनांची आता इथे काहीच किंमत नव्हती. मी म्हणजे सर्वांना भार, जबाबदारी वाटायला लागली… पण मला हे ओझं बनून रहायचे नव्हतं तर मला आत्मसन्मानाने जगायचे होते.
हीच परतफेड मिळावी. नातं इतकं कमजोर वाटायला लागलं की, क्षणात वाटत होते हे सर्व बंध तोडून टाकावे नी स्वतः साठी जगावं.. इतकी बदलले होते मी की मी आज फक्त स्वतः पुरताच विचार करावा…
मला जमेल का? हो.. निश्चितच जमणार!! मन आणि शरीर पूर्णपणे तयार झाले.. घरी सर्वांना निर्णय सांगितला अवाक होऊन सगळे बघत होते.. एकटीचा प्रवास सुरु झाला होता…
धुक्यातून वाट निघत होती समोर होता तो वळणे घेत समांतर दिसणारा रस्ता..!! एकदाची मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचले.. रित्या हातानी आलेली एक निराधार महिला.. तिला आधार मिळाला होता..
पण आज बघा मीच या महिलाश्रमाचा आधार झालेली आहे.. इथे मला दूरची असून सुद्धा किती जवळची नाती मिळाली. मी इथे सर्वांची लाडकी माई झाले आहे हा विचार करीत असतानाच ताई म्हणून अस्पष्ट, किंचितसा ओळखीचा आवाज आला, बघते तर भाऊ आलेले..
त्यांनीच आज मुद्दामून त्यांना बोलवणे पाठविलेले होते.. डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसल्या आणि हसतच त्यांचे स्वागत केले.. परत माईंना बोलावणे आले. सर्वांना घेऊन त्या हाँलमध्ये आल्या.. पाय ठेवताच टाळ्यांचा कडकडाट!!
सुंदर डेकोरेशन केलेलं पाहून भारावूनच गेले.. त्यात किती ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं.. भाऊ सुद्धा बहिणीचा आदर बघून आश्यर्यचकीत झाले होते आणि त्यांचा सुद्धा बहिणीबद्दल अभिमानाने उर दाटून आला..
माईंनी केक कापला, मेणबत्ती तशीच ठेवली.. कारण ती स्वतःखाली अंधार ठेऊन आजूबाजूचा परिसर प्रकाशित करीत असते अगदी स्वतः प्रमाणे. तसंच काहीसं.. माईच्या डोळ्यात दोन लाखमोलाचे मोती चमकत होते.
हो..! ते लाखमोलाचेच होते कारण त्यामध्ये किती सुख दुःख लपलेली होती. नंतर त्यांना बोलायला माईक दिला. तोंडून शब्दच निघत नव्हते. हलकेच दोन मोती डोळ्यात दाटी झाल्यामुळे गालावर ओघळले मन घट्ट केलंय आणि बोलायला लागल्या मी इथे आले तेव्हा निराश्रित म्हणून.. पण आता मलाच या सर्व निराधार महिलांचा आधार म्हणून जगायचे आहे. मला त्यांच्याकरिता खूप काही करायचे आहे त्याकरिता मी माझ्या नावावर असलेली ( माझ्या वडिलांनी करून दिलेली) शेती विकून जी काही किंमत येईल ती मी इथे दान करीत आहे.. क्षणभर शांतता आणि लगेच टाळ्यांचा कडकडाट..!! आज मनावरचं ओझं हलकं झालंय.. नातं अजूनच घट्ट झालं होतं ते महिलाश्रमासोबत.. बहीण, भाऊ एकमेकांकडे बघत होती ती गहिवरून. मनी एक अभिमान बाळगून भाऊ सुदधा परतीला निघाले…
आता त्या भावांना निरोप देऊन जड अंतःकरणानी माई महिलाश्रमाच्या घरट्यात परतल्या होत्या..
ही कथा सत्यतेवर आधारित आहे पण त्याचा वाईट परिणाम न व्हावा म्हणून तिला काल्पनिकरित्त्या लिहिल्या गेले आहे..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.