आत्ता शूरवीर भारतीय सैनिक मेजर कौस्तुभ राणे यांचं अंतिम दर्शन घेऊन आलो. डोळ्यांच्या ओल्या कडा आणि जड अंतकरणाने ह्या शूरवीर भारतीय सैनिकाला शेवटचा निरोप देताना कुठेतरी मनात खंत होती. आपण खरच ह्या बलिदानासाठी पात्र आहोत का? तेच विचार खाली शब्दात मांडले आहेत.
माझी पात्रता आहे का?…
काल भारताने ४ वीर सुपुत्रांना गमावलं. देशाच्या सीमेचं अतिरेक्यांच्या घुसखोरी पासून संरक्षण करताना भारताचे ४ सैनिक शहीद झाले. त्या सैनिकांनी वयाच्या ऐन उमेदीत आपला जीव देशासाठी अर्पण केला. कोणाचं नुकतच लग्न झालं होतं तर कोणी एका लहान मुलाचा बाबा होतं. सगळेच सोनेरी दिवसांच्या त्या कालखंडातून जात होते. मग ही सगळी स्वप्न बाजूला करून देशप्रेमाने प्रेरित होऊन देशाच्या प्रेमापोटी त्यापेक्षा जास्ती तुम्ही, आम्ही सामान्य नागरिक सुखाने झोपावे म्हणून आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी स्वतःच्या जीवाच मोल देऊन आपली रक्षा करणाऱ्या त्यांच्या बलिदानाचं उत्तरदायित्व पेलण्याची माझी पात्रता आहे का?
ह्या देशातील तुम्ही, मी शांतपणे आपल्या घरी सुखाने झोपू शकतो. स्वातंत्र्य, लोकशाही आपले हक्क ह्याबद्दल आपण इतके जागरूक असतो की साधा एक नंबर आपल्याला न विचारता आपल्या फोन मध्ये सेव झाला तर आपल्या हक्कांची, पर्सनल स्पेस ची ती पायमल्ली होते. त्यासाठी आपण आवाज उठवतो. पण कधी हा विचार करतो का? आज आपण ते करू शकतो कारण आपण स्वतंत्र्य आहोत. ते स्वातंत्र्य जे आपल्याला १९४७ साली मिळालं ते टिकवण्याची काय किंमत मोजत आहोत? मी देशासाठी काय केलं आहे? फक्त इनकम टॅक्स भरला म्हणजे देशसेवा केली का? भारताला शेजारी बदलता येत नाहीत हे वास्तव स्वीकारताना भारताला पण मग आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची किंमत मोजावी लागणार हे ओघाने आलचं. पण हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जी किंमत आपण मोजत आहोत त्याची पात्रता आपली आहे का? ह्याचा विचार किती जण करतात?
राजकारणी आणि मिडिया ह्यांच्याबद्दल तर न बोललेलं बर. कारण सत्तेवर असलेले आधीच्या सरकारवर खापर फोडतात तर सत्तेतून बाहेर असलेले सत्तेवर असलेले काय करतात? असा सवाल करतात. बरं ह्या सगळ्या चिखलफेकीत आगीत तेल ओतायचं काम मिडिया करत असतो. सो कॉल्ड सुजाण प्रेक्षक, नागरिक, सामान्य माणूस ही सर्कस बघून स्वतःचं हसू करून घेतं असतो. कोणी काय केलं? आणि आम्ही काय केलं? ह्या पलीकडे देशासाठी काय करायला हवं हा मुद्दा कधी चर्चेत येत नाही किंबहुना जाणून बुजून आणला जात नाही. मरता आहेत न मरून दे. माझं काय गेल? माझा पगार किती वाढणार? पुढलं पे कमिशन कधी? माझ्या जातीला किती टक्के आरक्षण? माझ्या घरी ऑडी कधी येणार? अश्या सगळ्या मी च्या भोवती आपलं देशप्रेम फिरत असते. कारण देशप्रेम, अस्मिता उफाळून यायला आपल्याला आज काल जात, धर्म, संविधान आणि इतर अनेक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.
बाहेर आलेलं देशप्रेम दाखवण्याची पद्धत ही तशीच आक्रमक असते. संप, तोडफोड, मारझोड, एकमेकांनवर चिखलफेक ते आपल्याला काही माहित नसलेल्या मुद्यांवर आपण मत मांडून मोकळे होतो. ए.सी. केबिन मध्ये बसून आपण आंतराष्ट्रीय प्रश्न, काश्मीर प्रश्न, कारगिल युद्ध ते अगदी सियाचीन वर मत मांडतो. बर ह्यात मागे कोणीच नाही. एक सामान्य नागरिक ते राजकारणी आणि मिडिया सगळेच एका लाईन मध्ये. ह्यामध्ये नक्की खर काय आहे हे जाणून घेण्याची मानसिकता न एक नागरिक म्हणून आपली असते, न राजकारण्याची न मिडिया ची. प्रत्येकाला फक्त हव असते ते स्वातंत्र्य मला काय वाटते ते बोलण्याचं.
असा सगळा सावळा गोंधळ असताना तिकडे भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून ह्या भारतभूमीचं रक्षण करत असतात. कधी विचार केला का? त्यांनाही घर असते. त्यांना ही मुल-बाळ असतात. त्यांच्या ही काही इच्छा असतात. त्यांच्या हक्काच काय? आपला जीव आपण काही हजार रुपयांसाठी पणाला लावू काय? एक क्षणभर विचार करा उद्या लाख रुपये दिले तरी उणे ५६ डिग्री सेल्सिअस मध्ये शत्रूच्या निशाण्यावर गस्त घालाल का? देशाच संरक्षण कराल का? कोणतीही गोळी कुठूनही येऊन तुमचा जीव घेऊ शकत असताना फक्त पैसे मिळतात म्हणून त्या ठिकाणी जायची हिंमत कराल का? बरं हे सगळ वयाच्या पंचविशी मध्ये जेव्हा सगळी स्वप्न सत्यात पण आलेली नसतात. एक क्षणभर विचार केला न तरी ती ५६ इंचाची छाती ६ इंचाची राहणार नाही. जो माज आपल्याला आला आहे पैश्याचा, पोझिशन चा, स्वातंत्र्याचा तो उतरायला न ह्या विचारांचे काही क्षण पुरेसे आहेत.
मग जो सैनिक तिकडे काही विचार न करता आपल्या प्राणांची आहुती देत आपल्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी उभा राहतो त्याची निदान अहवेलना तरी करू नका. जे करतात त्यांना करून देऊ नका. राजकारण, समाजकारण करून आपली पोळी भाजणारे जे नेते, नेतृत्व आणि जी मंडळी आहेत त्यांना ती भाजू न देण्याच स्वातंत्र्य आपल्याला आहे त्याचा वापर करा. राजकारण्याच्या पायाशी डोकं झुकवण्यापेक्षा आपल स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या सैनिकाला केलेला एक सलाम जास्ती मोलाचा आहे. म्हातारपणात करोडो कमावून आणि ते उपभोगुन इहलोकीची यात्रा करणाऱ्या राजकारणाच्या अंतयात्रेत जाऊन आपला जीव गमावण्यापेक्षा एका सैनिकाच अंतिम दर्शन आणि त्याला समजावून घेणं जास्ती पुण्याचं काम आहे.
देशावर बलिदान करणारे सैनिक दुसऱ्याच्या घरात यावे म्हणून वाट बघण्यापेक्षा आपल्या घरातून एक हिरा आपण देऊ देशासाठी हे वाटणारा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे हे भान जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या सैनिकांच्या बलिदानाला पात्र ठरू. दोन दिवस हळहळ आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या नको असेल तर आपल्याला मिळत असलेल्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते हे समजून घेतलं तरी पुरेसं आहे. ह्याची सुरवात माझ्यापासून. मला तरी निष्क्रिय समाजाचा भाग होण्याची कोणतीही इच्छा नाही. मला ह्या तरुण सैनिकांचं बलिदान व्यर्थ नाही जाऊन द्यायचं. माझ्या परीने जितक काही होईल ते करण्याचं ठरवलं आहे. निदान एका सशक्त समाजाची निर्मिती आणि त्याचा भाग असण्याच तरी नक्कीच. ह्यात जे कोणी येतील नक्कीच त्या सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे. कारण त्या बलिदानाची पात्रता ह्या स्वतंत्र्य देशाचा नागरिक म्हणून मला तरी माझ्यात निर्माण करायची आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.