12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक प्रथमेश दाते

12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक, प्रथमेश दाते

21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिन

कुठलाही बाळ जन्मताना आईकडून 23 आणि वडिलांकडून 23 अशी 46 गुणसूत्र एकत्र घेऊन जन्मतं

एक सारख्या गुणसूत्रांची जोडी बनते. तेवीस गुणसूत्रांच्या जोड्यांनी एक जीव तयार होतो.

21वी जी ‘क्ष’ जोडी असते त्यात आई किंवा वडिलांकडून आलेलं एखादं जास्तीचं गुणसूत्र जोडी बनवताना त्रिकूट बनतं आणि बाळाला मतिमंद/गतिमंद बनवतं.

डाऊन सिंड्रोम…. त्यातही चार प्रकार असतात.

डाऊन सिंड्रोम असलेली कित्येक मुलं, मुली, व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, पण या मुलांचं आयुष्य त्यांच्या आईवडिलांसाठी एक खूप मोठी न संपणारी परीक्षा असते.

या परीक्षेत जणू बोर्डात येण्याचं धाडस केलं, त्या इचलकरंजीच्या ‘प्रथमेश दाते’ याच्या विषयी जाणून घेऊया.

प्रथमेश दाते ‘लायब्ररी असिस्टंट’…. बौद्धिक क्षेत्रात काम करणारा हा जगातला एकमेव गतीमंद.

29 नोव्हेंबर 1987 ला पुण्यात जन्मलेल्या प्रथमेशचं गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक शहर, इचलकरंजी.

वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या शहरात प्रथमेश डाऊन सिंड्रोम घेऊन जन्माला आला.

प्रथमेशच्या जन्माबरोबर त्याच्या आई-वडिलांची ही परीक्षा सुरू झाली. रोज नवीन नवीन आणि रोज अवघड प्रश्न.

कमी वजनाचा प्रथमेश रांगू शकला नाहीच, पण त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पायाला फळी बांधून दोन-दोन तास बांधून उभं करावं लागायचं.

खरंतर प्रथमेशचं संगोपन पुण्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर आनंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू होतं.

मात्र मतिमंद मुलाला आई-वडील जाणून बुजून त्रास देत आहेत या गैरसमजातून पोलिस कंप्लेंट करण्यापर्यंत काही शेजा-यांची मजल गेली.

हळूहळू मात्र गतिमंद प्रथमेशला नॉर्मल जीवन जगण्यासाठी सगळ्यांचीच मदत होत गेली.

शाळेचा प्रश्न आला तेव्हा या मुलाला नॉर्मल शाळेत घालायचं असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे प्रथमेशची आई शारदा आणि वडील प्रकाश दाते यांनी प्रथमेशला गंगामाई शाळेत घातलं.

एका बाळाची काळजी घ्यावी तसं प्रथमेशची आई त्याची शाळेतही काळजी घ्यायची.

प्रथमेशचे कोरडे कपडे घेऊन वर्गाबाहेर दिवसभर आई थांबायची. प्रथमेशने कपडे खराब केले की ती जागा साफ करून प्रथमेशचे कपडे बदलून त्याला पुन्हा वर्गात बसवायची.

हे करत असताना संपूर्ण दाते कुटुंबियांचा मोलाचा पाठिंबा मिळाला.

प्राथमिक शाळा संपली. हायस्कूलमध्येही दहावीपर्यंत प्रथमेशने मजल मारली.

प्रथमेश आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हायला हवा यासाठी त्याच्या आईवडिलांनी अक्षरशः हजारो प्रयत्न केले.

कधी संगीत शिकवण्याचा प्रयत्न केला तर कधी बुद्धिबळ, अभिनय, लेझीम टीव्ही चे गेम असे हजारो प्रयोग प्रथमेश वर केले गेले.

काही प्रयोग यशस्वी झाले तर काही सपशेल फसले, मात्र तरीही निराश न होता नवनवीन प्रयोग प्रथमेशच्या आई-वडिलांनी चालूच ठेवले.

डाऊन सिंड्रोम असल्यामुळे टिपिकल डोळे, ताठ केस घेऊन प्रथमेश अनेक वर्ष वावरला.

मात्र नंतर त्याच्या केसांवरती विशेष ट्रीटमेंट घेऊन त्यांना वळण देण्यात आलं.

गतिमंद मुलगा त्याला शिकवून काय होणार? असा विचार न करता त्याला त्याच्या आई वडिलांनी प्रत्येक अनुभव घेऊ दिला.

या अनुभवातून स्मशानाची वारी झाली, रेल्वे भेट झाली, बस मधून प्रवास करताना प्रथमेशनं तिकीट काढायचं होतं, गर्दीत काही अंतर राखून प्रथमेशला सोडलं जाई, विंडो शॉपिंग केलं जाई.

विशेष मुलगा म्हणून त्याची काळजी घेण्यापेक्षा त्याला आयुष्यातल्या सगळ्या अनुभवांना सामोरं जायला शिकवलं ते त्याच्या आईवडिलांनी.

डाऊन सिंड्रोम असणाऱ्या मुलांची शारीरिक क्षमता कमी असते.

तरीही प्रथमेशला त्याच्या आईनं सायकल शिकवण्याचा पण केलाच आणि प्रथमेश ही बऱ्याच प्रयत्नानंतर सुसाट सायकल चालवायला शिकला.

प्रथमेशला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना त्याच्या आईवडिलांनी पुण्यात मुक्कामही केला.

पुण्यातल्या नेपाळी लोकांच्या स्टॉलवर त्यांच्या परवानगीने प्रथमेशला रमू दिल्यानंतर प्रथमेशला आपण अगदीच वेगळे नाही, आपल्या सारखे इतर कोणी आहेत याची जाणीव झाली, आणि आत्मविश्वास जागा व्हायला लागला.

सकाळी उठल्यापासून स्वतःची कामे स्वतः करणे हे प्रथमेशला शिकवण्यासाठी बराच कालावधी लागला. बराच पेशन्सही ठेवावा लागला.

पण प्रथमेश हे सगळं करायला शिकला. आता वेळ होती ती, प्रथमेशला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र करण्याची.

प्रथमेशच्या आई-वडिलांनी हजारो प्रयोग केले होते त्याच बरोबर समुपदेशन आणि ट्रीटमेंट ही सुरू होती.

असंख्य शारीरिक वेदना सहन करत प्रथमेश स्वतंत्रपणे वावरत होता समारंभामध्ये सहजरीत्या मिसळत होता.

एके दिवशी कॉम्प्युटर आणि टायपिंगचा क्लास प्रथमेशला लावला.

सावकाश का होईना प्रथमेश कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीने हाताळू लागला आणि आई-वडिलांच्या आशेला पालवी फुटली.

तोपर्यंत तज्ञांकडून शिक्कामोर्तब झालं होतं की नीट शिकवलं तर एकाच पद्धतीचं म्हणजे स्टिरियोटाइप काम प्रथमेश करू शकेल.

प्रथमेशच्या आईवडिलांनी पुन्हा एकदा इचलकरंजी गाठली.

इचलकरंजीमध्ये दैनिकात प्रथमेशच्या नोकरीसाठी त्याच्या वडिलांनी प्रयत्न केला.

आनंदाची गोष्ट म्हणजे या दैनिकाने प्रथमेशला नोकरी दिली.

संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत नोकरीची वेळ होती.

प्रथमेश आणि त्याच्या आई-वडिलांचा विश्वास वाढवणारी अशी ही प्रथमेशची पहिली नोकरी होती.

प्रथमेश आणि त्याच्या आई-वडिलांनी अडचणींचा पहाड खोदून काढायचाच असं ठरवल्यामुळे एक दिवस एक संधी स्वतःहून दार ठोठावत प्रथमेशच्या घरी आली.

प्रथमेशच्या वडिलांनी पत्र लिहिलेलं असल्यामुळे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या समवेत आयुकात कार्यरत असणारे मधुसूदन गायकैवारी घरी आले.

मधुसूदन गायकैवारी, ज्यांनी “यूजर फ्रेंडली” “लायब्ररी सॉफ्टवेअर” तयार केलं होतं.

ते स्वतः प्रथमेशला ते सॉफ्टवेअर शिकवण्यासाठी पुण्यातून इचलकरंजीला आले.

प्रथमेश हे सॉफ्टवेअर शिकला.

त्यानंतर प्रथमेशच्या वडिलांनी गंथ्रालयाच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. बऱ्याच जणांना विनंती केली.

त्यांच्या विनंतीला मान दिला तो आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डी. के. टी. ई. इंजिनिअरिंग कॉलेजनं.

प्रथमेशला असिस्टंट लायब्ररीयन म्हणून संधी मिळाली. आज प्रथमेश 12 वर्षापेक्षाही जास्त काळ तिथं कार्यरत आहे.

World Down Syndrome Day prathamesh date

त्याचबरोबर पुणे विद्यापीठापासून स्कॉटलंड पर्यंतच्या ग्रंथालयात ट्रेनिंगसाठी प्रथमेशला आमंत्रण मिळाली.

प्रथमेशला लंडनचा ‘इंटरनॅशनल डाऊन सिंड्रोम अवॉर्ड’ मिळालं.

World Down Syndrome Day prathamesh date

हा अवॉर्ड मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला.

सुखाचे दिवस दिसत असतानाच प्रथमेशच्या आईला कॅन्सरने ग्रासलं.

आपल्या बाळासाठी तिने कॅन्सरशी ही दोन हात करून “आदर्श माता राष्ट्रपती पुरस्कार” मिळवला.

स्वतः प्रथमेशला 3 वेळा राष्ट्रपती पदकाने गौरवलं आहे.

prathamesh date

“ओनिर” या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकांने प्रथमेशवरती डॉक्युमेंटरी काढलेली आहे, जी जगभर प्रसिद्ध आहे.

एका मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका प्रथमेशला ऑफर झाली होती, मात्र त्याच्याबरोबर इतर अनेक मतिमंद मुलं, मुली ही सहभागी होणार होती.

प्रथमेशला सामान्य माणसासारखं, सामान्य माणसांमध्ये जगता यावं यासाठी मन घट्ट करून त्याच्या माता-पित्यांना ही संधी चक्क नाकारली… आणि आजही त्यांना त्याचा पश्चाताप होत नाही.

आज शेकडो पुरस्कार आत्मविश्वासाने स्वीकारून, आपलं काम चोख करत, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनलेला प्रथमेश आणि त्याला घडवणारे त्याचे माता-पिता यांचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.

World Down Syndrome Day prathamesh date

ज्यांनी गतिमंद, मतिमंद मुलांचा आयुष्य जवळून पाहिलं आहे त्यांना या अपार मेहनतीचं मोल लक्षात येईल.

मित्रांनो प्रत्येक पावलावरती अडचणी आल्या असताना प्रथमेश आज गगनात विहार करतोय मग तुमच्या आमच्या कडे सगळं असताना आपण निराश का बरं होतो?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक प्रथमेश दाते”

    • सलाम प्रथमेश व त्यांच्या आई वडीलांना , तसेच मनाचे टाल्क ला कारण हि महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाब आमच्या पर्यंत पोहचवली, त्या बद्दल धन्यवाद 🙏

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।