श्रावण महिन्यातील अशीच एक सकाळ..
सर्वत्र हिरवळ पसरलेली, जणू वसुंधरा हिरवा शालू नेसून नववधुप्रमाणे नटून कुणाची तरी प्रतीक्षा करीत होती, फुलांचा सुगंध नकळतच नाकाला गुदगुल्या करून जात होता.
फुलराणी फुलाभोवती पिंगा घालीत होती… आपल्याकडे कुणीतरी चोरट्या नजरेने बघत आहे हे पाहून मधेच थांबायची आणि लगेच गुणगुणत फुलावर बसायची किती आल्हाददायक वातावरण…!!
सकाळचे सात वाजले असतील, वासंती तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये एका हातात चहाचा कप आणि एका हाताने वर्तमानपत्रामध्ये काही विशेष वाचायला मिळतंय का हे बघत होती…
अचानक तिचे लक्ष समोरील रस्त्यावर गेले. नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली आणि त्यावर लखलखते सोनेरी किरण पडलेले त्यामुळे तो डांबरी रस्ता अधिकच चमकत होता आणि किरण गेले की पूर्ववत…
सतत् उनसावली हा लपंडाव खेळत होते.. पानावरील चोरून बसलेले दवबिंदू हळूच पानावरुन घसरगुंडी करण्यात मग्न होते. वासंतीने वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि निसर्गाचे हे चित्र बघण्यात तल्लीन होऊन गेली..
फोनच्या रिंग ने एकदम ती भानावर आली आणि बघते तर काय ..? कपातील चहा थंड होऊन गेलेला .!! त्या थंडगार चहाप्रमाणेच तिचे जीवन सुद्धा असेच थंडगार झालेले.. पण असो “हे माझे जीवन आहे आणि मला ते जगायचेच”…
आपल्या मनातील भावनांचा उद्रेक न होऊ देता त्या मनाच्या कुप्पीत साठवून ठेवल्या होत्या आणि आजच का हा उद्रेक व्हावा? आज मला इतकं उदास का वाटतंय ?…. अचानक तिचे लक्ष घड्याळाकडे गेले आता भराभर आवरायला हवंय..
नेहमीचीच ओढाताण…!! तिचा मुलगा अनय शाळेत जायला निघाला कारण त्यांची बस आलेली… मग तीही ऑफिसला जायला तयार झाली. खरं म्हणजे आज तिची मुळीच इच्छा नव्हती तरीही ती ऑफिस ला गेली परंतु तिचे आज कुठेच लक्ष नव्हते..
आज मला इतकं अस्वस्थ का वाटतंय ? नंतर ति अर्धा दिवस सुटी टाकून घरी आली नी स्वतःचे अंग तिने पलंगावर झोकून दिले आणि डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला…
तो तोच राज होता का? किती बदललेला.. पश्चात्तापाची एकही लकीर त्याच्या चेहऱ्यावर नव्हती… मग मला इतका त्रास का व्हावा..? काळ कुणासाठीच थांबत नसला तरी माणसाला कशी कोण जाणे थांबायची, मागे वळून पाहण्याची, पूर्वायुष्यात पुन्हा पुन्हा डोकावण्याची जन्मजातच सवय असते… तिचे मन तिला बजावत होते.. हे सर्व का आठवावे….?
राजची आणि तिची दोन दिवसांपूर्वी च एक समारंभात भेट झाली होती.. तो पूर्वीचा राज नव्हताच.. खूप बदललेला. काही वर्षांपूर्वीच त्या दोघांची एका मित्राच्या बहिणीच्या लग्नात भेट झाली होती.. पहिल्याच भेटीत तो तिला आवडला होता.
नंतर राजनेच तिला प्रपोज केले जणू ती या क्षणाची वाटच बघत होती की काय..!! गालांवर एकदम लाजरे हसू उमटले.. नंतर दोघांच्या भेटीगाठी घडू लागल्यात. हे मृगजळ आहे यामागे धावून उर फोडून घ्यायचा नाही हे घरच्यांनी तिला बजावून सुद्धा राजचे आकर्षक रूप, त्याची वागण्या बोलण्याची शैली तिला मोहित करीत होते..
ही काटेरी वाट असली तरी आपण हे काटे सहजच बाजूला करून मार्गक्रमण करू हीच आशा बाळगून होती. म्हणतात ना प्रेम हे आंधळ असतं.. ती राजवर जीवापाड प्रेम करू लागली.. दोघेही वेगळ्या कॉलेजला असले तरीही हुशारीची मात्र साम्यता.. जवळपास रिझल्ट पण सारखेच राहायचे.
तिच्या मते “तो तिच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा पुरुष…!!” पण शेवटी जे व्हायचे तेच झाले… तिच्या स्वप्नातील रचलेले मनोरे ढासळले होते.. घरच्यांचा विरोध म्हणा किंवा वडिलांचा धाक..! त्याने चक्क नकार दिलाय. ‘जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं असतं नाही का’? सुरम्य चित्र रेखाटावी आणि तेवढयाच निर्दयतेने पुसून टाकावी..
बस आता पुरे झालंय….!! का म्हणून मी रडावं ? आणि स्वतःलाच बजावले… वासंती: चल उठ आता…. आता तुला हेच दाखवायचं की, मी तुझ्याशिवाय जगू शकते.. “किती प्रेम केलंय मी तुझ्यावर राज आणि तू……!
काही दिवसांनी तिच्या बाबांनी तिच्याकरिता एक छान तिला साजेसं स्थळ आणलंय.. मुलगा सुसंस्कृत, देखणा, उच्च पदस्थ होता.. तिने सुद्धा होकार दिला आणि वासंतीने आता विनोदच्या घराचा उंबरठा ओलांडला… सर्व स्वप्न मनाशी कवटाळून…. एक मनोहर सुरम्य स्वप्न घेऊन….
इथूनच तिच्या जीवनाला एक वळण मिळाले.. सर्व काही सुरळीत चाललेले. विनोद खूप प्रेम करीत होता वासंतीवर.. बाकी कशाचीच काही कमी नव्हती… दोघेही नोकरी करणारे… सर्व वेल सेटल.. छोटासा अनय त्यांचा मुलगा. संसाराची ही फ्रेम… त्रिकोनी कुटुंब…
पण तिच्या सुखी जीवनाला परत ग्रहण लागले कारण विनोद नी ऑफिसमध्ये खूप मोठा फ्रॉड केला आणि त्यामध्येच त्याची नोकरी गेली.. मिळालेला हा डागाचा दागिना घेऊन तो नोकरीसाठी फिरत होता पण फ्रॉड केल्यामुळे परत त्याला कोण नोकरी देणार? खूप निराश झाला.. वासंतीने त्याला खूप समजावले अरे मिळेल की नोकरी आणि माझी नोकरी आहेच ना! कशाला इतकी काळजी करतोस….
आपल्याला आता अनय कडे पण बघावं लागणार.. पण पुरुषी अहंकार परत आडवा आला. त्यानंतर तो बार मध्ये बसून खूप प्यायला लागला.. दिवसेंदिवस पिणं वाढतच होतं आणि शेवटी ज्याची भीती तेच झाले त्याने निराशेच्या भरात स्वतःला संपवून टाकले…. म्हणतात ना, “विनाशकाली विपरीत बुद्धी”. आपल्या पत्नीचा, लहानग्या अनय चा सुद्धा त्याने विचार केला नाही..
“मानवी जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं पण माझ्या जीवनात तर सुखाचं कमी आणि दुःखाचेच वस्त्र लपेटलेले आहे… माझ्यासाठी देवांनी सुद्धा इतकं नीष्ठुर व्हावं”… वासंती..
डोळ्यातील अश्रू सुकायला आले तसा तिचा डोळा लागला.. वादळाचा तांडव आणि आभाळाचा गडगडाट ऐकून तिला जाग आली.. बघते तर आकाशात मळभ दाटलेले तिच्या मनाप्रमाणेच.. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळणार..!! काळाकुट्ट अंधार पसरलेला… क्षणात अनय ची आठवण.. त्याची शाळेतून येण्याची वेळ झालेली होती हा विचार करतेच आहे तर तो दारात हजर!
क्षणभर वासंती त्याचेकडेच पहात होती आणि एकदम त्याला घट्ट आलिंगन दिले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली खरोखरच पाऊस कोसळत होता…
वासंतीच्या नभनयनातून..!! मळभ दाटलेलं आकाश एकदम निरभ्र दिसायला लागलं आणि परत प्रकाशाचे किरण पडायला लागले…. आपल्या हातांनी अनयने तिचे अश्रू पुसले आणि ती एकदम ताडकन उभी राहिली आणि अनयला आपल्या कुशीत घेतले…. आणि त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत अनय.. अनय… तूच तर माझ्या जगण्याचा “आधार” आहेस आणि अर्थही…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Marvelos…शब्दरचना