दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात.

पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं.

यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

एकदा एक कावळा खूप दुःखी झाला, त्याला प्रचंड वाईट वाटत होतं.

काय हे आयुष्य आहे का? काय तो आपला रंग? काळाकुट्ट!

कोणीही आपल्याशी प्रेमानं बोलत तर नाहीच, पण एखाद्या घराजवळ बसलो तर लगेच सगळे उडवून लावतात.

फक्त श्राद्धाच्या दिवशी काय ती आपली किंमत.

इतर दिवशी कुणी ही आपल्याला पाळायला ही तयार नसतं.

हे दुःख अनावर होऊन त्यांनं तपश्चर्या केली.

त्याची तपश्चर्या पाहून चक्क देव प्रसन्न झाले आणि म्हणाले “माग काय हवे ते माग”

कावळा आधी जाम वैतागला म्हणाला “देवा, हे काही जीवन आहे का? हा कसला रंग मला दिला आहेस ?”

“मला हा रंगच नको. हा रंग, हे आयुष्यच बदलून हवंय.”

देव हसला, म्हणाला “ठीक आहे. तुला कसं आयुष्य हवंय? कुणासारखा आयुष्य हवंय?

कावळा म्हणाला “मला हंसासारखं आयुष्य हवं, पाण्यात ऐटीत पोहणारा पांढराशुभ्र हंस!”

देवानं मान हलवली, “नक्कीच तुला हंसासारखं आयुष्य देईन, पण त्या आधी माझी एक अट आहे एकदा हंसाला जाऊन भेटून ये”

कावळा लगबगीने हंसाला भेटायला उडत उडत एका तळ्याकाठी जाऊन बसला.

तिथे हंसांचा समुह बसला होता. माझ्यापेक्षा हे हंस कितीतरी पटीने सुंदर आहेत. ते नक्कीच आनंदी असतील.

कावळ्याच्या मनात पुन्हा एकदा निराशा दाटली.

इतक्यात एका हंसाचं कावळ्याकडे लक्ष गेलं त्यांनं विचारलं “कावळेदादा? काय झालं?”

कावळ्यांना सांगितलं की “मला माझ्या काळ्या रंगाचा प्रचंड कंटाळा आलाय, मला तुझ्यासारखा व्हायचंय त्यासाठी मी देवाकडं वर सुद्धा मागितलाय पण देव बाप्पानं मला तुझी भेट घ्यायला सांगितलं आहे”.

“खरं खरं सांग या पांढर्‍या शुभ्र रंगांमध्ये, पाण्यावरती ऐटीत तरंगताना तू खूप खुश असतोच ना रे?”

“मस्त आहे की नाही रे तुझं आयुष्य?”

ते ऐकून हंस म्हणाला छे रे! माझं आयुष्य कुठलं भारी? माझं आयुष्य ही एकसुरी!”.

“तुझ्याकडे काळा रंग आहे, माझ्याकडे पांढराशुभ्र रंग आहे एवढाच काय तो फरक.”

“पण या जलाशयाच्या पार्श्वभूमीवर माझा हा पांढरा रंग अजिबात उठून दिसत नाही.”

“हे लोक जेंव्हा माझा फोटो काढतात तेव्हा त्याच्यामध्ये मी दिसतच नाही रे”.

“रंग कसा हवा पोपटासारखा! हिरवागार रंग लालचुटुक चोच अहाहाहाहा! काय सुंदर आयुष्य असणार पोपटाचं!”

त्याचं हे उत्तर ऐकून हंस आणि कावळा देवाकडं गेले.

देव म्हणाले “ठीक आहे, मी दोघांची ही मागणी पूर्ण करतो पण अट कायम आहे, तुम्ही एकदा पोपट मामांना जाऊन भेटा.”

आता या पोपटाचा शोध घ्यायला हंस आणि कावळा दोघेही बाहेर पडले.

बराच काळ उडल्यावर शेवटी एका झाडावरती एक पोपट मामा बसलेले त्यांना दिसले.

पोपटाच्या शेजारी बसत कावळ्यांनं त्यांची विचारपूस केली.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर हंस म्हणाला “पोपट मामा खरं खरं सांगा या हिरव्यागार रंगामुळे, या लालचुटुक चोचीमुळे तुम्ही खूप छान दिसता.”

“तुम्ही तुम्ही खूप खुश असाल ना तुमच्या आयुष्यात?”

कावळा म्हणाला “तर काय? लोक तुम्हाला पकडून पिंजऱ्यात आपल्या घरी ठेवतात. तुमचे लाड करतात. सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे वाटता तुम्हांला पेरू, मिरच्या प्रेमान देतात.”

पोपट म्हटला “कसलं रे हे आयुष्य माझं? आणि हा काय रंग आहे? हिरवागार? अरे आत्ता माझ्या समोरून चार वेळा फेऱ्या मारल्या पण मी तुम्हाला दिसलोच नाही कारण या झाडाच्या हिरव्या रंगांमध्ये माझा हा रंग लपून जातो.”

“आणि ही माणसं आम्हाला पिंजऱ्यामध्ये ठेवून लाड नाही करत, आमचं आयुष्य नरक करून टाकतात रे, स्वातंत्र्यच हिरावून घेतात.”

“मला विचारशील तर रंग कसा हवा? मोरासारखा! खरंच राजेशाही आयुष्य म्हटलं तर ते मोराचं”

“त्याचा फुललेला पिसारा पहायला सगळे गर्दी करतात, त्याची गळालेली पिसं जपून ठेवली जातात.”

“आपला घनदाट पिसारा फुलवून मोर नाचायला लागला की पाऊस धावत येतो, खरं आयुष्य मोरांचचं.”

पोपटाचं हे उत्तर ऐकून हंस आणि कावळे दोघंही विचारात पडले.

शेवटी हंस, कावळा आणि पोपट पुन्हा एकदा देव बाप्पाकडे पोचले.

आता पोपटाला सुद्धा मोराचं आयुष्य हवं होतं.

देव म्हटला “ठीक आहे. त्यालाही माझी काही हरकत नाही.”

“पण माझी अट पुन्हा तीच आहे की तुम्ही तिघांनी एकदा मोराला जाऊन भेटा.”

आता कावळा, हंस आणि पोपट मोराच्या शोधात निघाले.

एका टेकडीवर पिसारा फुलवून लयबद्ध पावलं टाकत राजाच्या ऐटीत चालणारा मोर त्यांना दिसलाच.

हंस, कावळा आणि पोपट मोराजवळ जाऊन थांबले.

त्या तिघांना एकत्र बघून मोराला आश्चर्य वाटलं त्यांना विचारलं “काय आज तुम्ही तिघं एकत्र कसे काय?”

कावळ्यांनं सगळी कहाणी सांगितली ते ऐकून मोर खिन्न झाला.

मोर म्हणाला “मित्रांनो, जरा असंच शांत राहा. तुम्हांला काही ऐकू येते का बघा?”

सगळीकडे शांतता पसरली खरंच त्यांना पावलांचा आवाज ऐकू आला.

ही पावलं त्यांच्याकडेच येत होती. मोर म्हणाला “ही पावलं आहेत शिकाऱ्यांची.”

“या शिका-यांमुळं आम्हांला आमच्या जीवाचा भरवसा उरला नाही. शिकार्‍यांनी माझ्या आई-वडिलांनाही मारून टाकलं.”

“मोरांच्या पिसांसाठी हे शिकारी मोरांचा जीव घ्यायला ही मागेपुढं बघत नाहीत.”

“ही सुंदर मोरपीस आहेत आमच्याजवळ, पण उद्याचा दिवस पाहू शकू की नाही याची शाश्वती नाही.”

“मित्रांनो हा जीव वाचला तर हे आयुष्य ना?”

“कावळ्या, तुझ्यापासून ही कहाणी सुरू झाली तूच सांग तू मटन बिर्याणी ऐकली आहेस ? कावळा म्हणाला हो!

चिकन बिर्याणी ऐकली आहेस ? कावळा म्हणाला हो! कधी कावळा बिर्याणी ऐकलीस? कावळा निरूत्तर.

मोरानं विचारलं “कुणी तुझ्या जीवाचा शत्रू असतो?”

कावळा म्हणाला…. “नाही”.

“तुला कुणी त्रास देतं? तू कुणाला त्रास देतोस ?” कावळा म्हणाला नाही.

मोर म्हणाला “तर मग सगळ्यात भारी आयुष्य कावळ्या तुझंच आहे, कसली चिंता नाही, जीवाची भीती नाही, इतकं बिनधास्त आयुष्य सोडून तुला दुसऱ्यांच्या आयुष्याचा मोह का पडला ?”

मित्रांनो, आपलं ही असंच काहीसं होतं ना?

आपल्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला किंमतच वाटत नाही.

दुसऱ्यांकडच्या साध्या गोष्टी सुद्धा भारी वाटतात.

पण त्या गोष्टींसाठी त्यांना काय किंमत द्यावी लागते याची तुम्हांला कल्पनाच नसते.

यासाठीच आपल्या आयुष्याची कुणाशीही तुलना करू नका.

आपल्या सुखाची दुसऱ्यांच्या सुखाशी कधीच तुलना करू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।