पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली २० लाख रुपयांची बचत.
पुण्यातील रोजलँड रेसिडेन्सीनं पावसाच्या पाण्याची साठवण, कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण या गोष्टींचा वापर करत नैसर्गिक जीवनशैली स्वीकारली आहे.
कडक उन्हाळा आणि पाण्याची तीव्र टंचाई आता प्रत्येक शहरांत कॉमन झाली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे शहरवासीय टँकरवर लाखो रुपये खर्च करतात.
रोझलँड सोसायटीनं मात्र या समस्येवर मात करण्याचं एकमुखानं ठरवलं आणि मात केली आहे.
पुण्याच्या उपनगरात, पिंपळे सौदागर मध्ये असणारी रोझलँड रेसिडेन्सी गेल्या दहा वर्षापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग यशस्वीपणे राबवत आहे.
हा उपक्रम राबवायला लागल्यानंतर त्यांना कधीही पाण्याचा टँकर खरेदी करावा लागलेला नाही.
या उपक्रमाविषयी सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर सांगतात की “दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड देऊन आम्ही कंटाळलो होतो”.
“रोझलँड सोसायटी १२ एकरात पसरलेली आहे ३० इमारतींमध्ये एकूण १००० फ्लॅट्स आहेत. आणि २५०० रहिवासी राहतात”.
“सोसायटीसाठी लागणा-या पाण्याची गरज मोठी होती आणि टँकरवर प्रचंड पैसा खर्च करणे शक्य नव्हतं”.
“२००८ मध्ये सोसायटीच्या बैठकीत, जेव्हा कोणीतरी आम्हाला रेनवॉटर हार्वेस्टिंग सारखा शाश्वत उपाय सुचवला, तेंव्हा लगेच सगळ्यांनी होकार दिला”.
“नुसता होकार देऊन सदस्य थांबले नाहीत. तर रहिवाशांनी आणि सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीने संपूर्ण महाराष्ट्रात, तसंच औरंगाबादमधील श्री केडिया यांनी केलेल्या पावसाच्या पाण्याच्या संचयनाच्या विविध मॉडेल्सवर संशोधन केलं.
सोसायटीच्या बोअरवेल पुन्हा भरण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबविण्याचा निर्णय ही पूर्ण अभ्यासानंतरच घेतला.
रोझलँड सोसायटीला दररोज १० ते १२ लाख लिटर पाणी लागतं.
पुणे महानगरपालिकेकडून दररोज फक्त ७०,००० ते ८०,०००लिटर पाणी मिळतं.
बाकीचं पाणी बोअरवेलचं वापरलं जातं जे दरवर्षी पावसाळ्यात रिचार्ज केलं जातं!
२००९ मध्ये २.५ ते ३ लाख रुपये खर्च करून सहा इमारतींमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला.
त्यानंतर सोसायटी दरवर्षी सात-आठ इमारतीत हा प्रकल्प राबवत राहिली.
आजच्या घडीला सर्वच्या सर्व म्हणजे २२ बोअरवेल दर पावसाळ्यात ताज्या पावसाच्या पाण्याने रिचार्ज केल्या जातात.
त्यामुळे सोसायटीची दरवर्षी 20 लाखांपेक्षा जास्त बचत होते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करुन रोडलँड सोसायटी टँकरमुक्त झाली.
त्याचबरोबर काही नाविन्यपूर्ण उपायांचा वापर करून पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करण्यातही सोसायटी यशस्वी ठरली.
सोसायटीच्या सदस्यांनी त्यांच्या पूर्वीच्या पाण्याच्या वापराच्या जवळपास 30 % कपात करण्यात यश मिळवलं.
त्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी पाण्याच्या टाकीच्या फ्लश सिस्टममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
फ्लश टँकच्या खांद्याचा कोन बदलला आणि पाण्याच्या टाकीच्या आत भरलेली पाण्याची बाटली ठेवली.
फ्लश टँकचा कोन ३० अंशांपेक्षा कमी केल्याने जवळपास ३० % पाण्याची बचत झाली.
बचतीच्या मार्गावर आणखी एक पाऊल टाकत सोसायटीच्या कॅम्पसमध्ये CFL आणि LED लाइट बल्ब बसवून ऊर्जा-बचतीचा मार्ग अवलंबला.
यामुळे दरमहा १ लाख युनिटपेक्षा जास्त वीज वाचवण्यात ही सोसायटीला यश मिळालं.
आजूबाजूला एकही उद्यान नाही हे लक्षात घेऊन सोसायटीच्या रहिवाशांनी सोसायटीत वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
त्याचं फलित म्हणजे आज , सोसायटीच्या १२ एकरच्या परिसरात आंबा, ब्लॅकबेरी, पेरू आणि चिंच यांसारख्या फळांची ३००० हून जास्त झाडं बहरली आहेत.
एवढी सुंदर हिरवाई फुलल्यावर , या झाडांवर घरटी करणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली.
पक्षांना आकर्षित करण्यासाठी आणि गायब झालेल्या चिमण्यांचं संवर्धन करण्यासाठी रोझलँड सोसायटीने बर्ड फीडर बसवण्याचा उपक्रम हाती घेतला.
नाशिकमधील नेचर फॉर एव्हर नावाच्या एनजीओकडून ३०० पेक्षा जास्त बर्ड फीडर मिळवले आणि त्यांना वेगवेगळ्या झाडांवर टांगलं
आता, इथं अनेक पक्षी कायमस्वरूपी घरटे बांधतात.
आजूबाजूच्या भागातले लोकही हे पक्षी पाहायला आवर्जून येतात.
सोसायटीने कचरा व्यवस्थापनात 100% कचऱ्याचे विलगीकरण करून एक आदर्श निर्माण केला आहे.
भविष्यात असे भरपूर पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्याची सोसायटीची इच्छा आहे.
२००० पेक्षा जास्त रहिवासी असूनही प्रत्येकजण सोसायटीच्या प्रत्येक उपक्रमाशी सहमत आहेत.
तुमच्याकडच्या कल्पना अर्थपूर्ण असतील तर त्या लोकांना नक्की पटतील.
पर्यावरणपूरक मार्गाने वाटचाल केली तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो हे रोझलँड सोसायटीने दाखवून दिलं आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
फारच छान, अशा प्रकारचे उपक्रम सक्तीने राबवीणे गरजेचे आहे.