आजकाल टीव्ही वरती झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये बऱ्याच पान मसाल्याच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात.
मुह मे रजनीगंधा कदमो मे दुनिया, बोलो जुबा केसरी, किंवा त्योहारोंका मजा तो पान पराग से ही आता है, अशा आकर्षक टॅग लाइन्सनी सजलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातींचे प्रमोशन आपण ज्यांना आदर्श मानतो असे आपले आवडते सुपरस्टार्स मोठ्या थाटामाटात करत असतात.
हा पान मसाला तयार होतो कसा? कुठल्या कुठल्या गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात? याच्या सेवनाचे तोटे काय? पान मसाला खाण्याची सवय मोडण्यासाठी उपाय काय? अशा विविध गोष्टींचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
तर सुरूवातीला हा पान मसाला कसा तयार करतात हे आपण पाहू.
सुपारीचे तुकडे, कात, चुना, वेलची, लवंग, आणि ठराविक प्रमाणात खाद्य रसायने या सगळ्यांचे मिश्रण म्हणजे पान मसाला.
प्रत्येक कंपनी परत्वे याचे प्रमाण, चव, आणि फ्लेवरिंग एजंट वेगवेगळे असू शकतात.
पान मसाल्याची चव दीर्घकाळ टिकून राहावी, तो एका ठराविक कालावधी पर्यंत खाण्यायोग्य राहावा यासाठी त्यामध्ये पॅराफिन वॅक्स या रसायनाचा वापर केला जातो. हे केमिकल मिसळल्यानंतर छोट्या छोट्या पॅकेट मध्ये हा पॅक केला जातो.
पान मसाला, तंबाखू, गुटखा खाल्ल्याने आरोग्याचे होणारे तोटे
पान मसाला सातत्याने खत राहिल्याने अनेक शारीरिक व्याधी व समस्या निर्माण होऊ शकतात.
१) ल्यूकोप्लाकिया
प्रमाणाबाहेर पान मसाला खाल्ल्याने तोंडाच्या आत लाल फोड येणे, लाल डाग पडणे, तोंडाच्या आतील भागामध्ये जखमा होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
याला इंग्रजीत लुकोप्लकिया असे म्हणतात.
तोंडाचा कर्करोग
पान मसाल्याचे सेवन अतिप्रमाणात केले गेले असता तोंडाचा कर्करोग होण्याची संभावना असते. पान मसाला अधिक प्रमाणात खाल्ल्याने तोंड, जीभ व जबडा यामध्ये पांढरे डाग पडण्याची शक्यता असते. ज्याचे हळूहळू कर्करोगात रूपांतर होते असे संशोधन सांगते.
२) दात आणि हिरड्या यांचे नुकसान
पान मसाला दीर्घकाळ सेवन करत राहिले असता श्वासामध्ये दुर्गंधी, हिरड्यांचे सुजणे, दात कमकुवत होणे, दातांवरती चित्रविचित्र डाग पडणे ह्या समस्या उद्भवू शकतात.
ओरल सबम्यूकर फायब्रोसिस सारखा आजार पान मसाला सतत खात राहिल्याने होऊ शकतो, ज्यामध्ये व्यक्तीचे तोंड पूर्णपणे उघडत नाही.
३) फुफुसाचे आजार
पान मसाला खाल्ल्याने फुफुसावर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फुफुसाची कार्य प्रक्रिया अबाधित न राहणे, फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादी समस्या गुटखा पान मसाल्याच्या सेवनाने उद्भवू शकतात.
४) यकृत समस्या
शरीरातील महत्त्वाचा भाग असलेला अवयव म्हणजे यकृत होय. पान मसाल्याच्या दीर्घ सेवनाने हा अवयव निकामी होण्याची संभावना असते. पान मसाला खाल्ल्याने यकृतातील घाण वाढते, व मनुष्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
पान मसाला, तंबाखू, गुटखा सोडण्याचे उपाय
कुठली ही वाईट सवय सोडण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीची आवश्यकता असते. पान मसाला चघळन्याचे व्यसन सोडण्यासाठी आपली इच्छा हेच आपले महत्वाचे शस्त्र आहे. यासोबतच काही घरगुती उपाय आपल्याला सवय सोडवण्यासाठी मदत करू शकतात.
१) सेलेरी आणि लिकोरिसचा वापर
पान मसाला चघळण्याची वाईट सवय सोडविण्यासाठी पान मसाल्या ऐवजी सेलेरी बियांचे छोटे छोटे तुकडे आणि लिकोरिस खिशात ठेवावे, जेव्हा जेव्हा पान मसाला चघळण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा या दोन्हीं मिश्रणाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
२) जिरे आणि गरम पाणी
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकून प्यायले असता पान मसाला चघळण्याची इच्छा काही प्रमाणात कमी होते. दिवसातून तीन-चार वेळा हे पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो
३) गवती चहा
सामान्य चहाऐवजी नैसर्गिक चहा किंवा हर्बल चहा चे दिवसातून एक-दोन वेळा सेवन केल्याने पान मसाला चघळण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
आपले तोंड नेहमी हायड्रेट ठेवल्याने देखील तुम्ही पान मसाल्याच्या चघळण्याच्या वाईट सवयींपासून दूर राहू शकता.
४) तुळशी आणि ब्राम्ही ची पाने
तुळशी आणि ब्राम्ही ची पाने नियमितपणे सकाळच्या वेळी चावून खाल्ल्याने पान मसाला खाण्याच्या सवयीला मोडता घातला जाऊ शकतो.
तुळशीची पाने शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम करतात. निकोटीन सारखे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी हा उपाय अत्यंत परिणामकारक ठरतो.
याव्यतिरिक्त ध्यानधारणा योगाभ्यास आणि व्यायाम यांसारख्या चांगल्या सवयीचा देखील आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी उपयोग होतो.
असे केल्याने पान मसाला चघळण्याची सवय हळूहळू नाहीशी होण्यास मदत होते.
पान मसाला सोडण्याचे फायदे
कुठलीही वाईट सवय सोडून चांगली सवय अंगीकारण्यात फायदेच फायदे असतात.
यामुळे केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.
पान मसाला चघळण्याची सवय सोडून दिल्याने नैराश्य व चिंतेपासुन पासून मुक्ती मिळू शकते. यकृत निरोगी राहण्यास मदत होते. फुफ्फुसा संबंधी समस्यांचे निराकरण होऊन चांगले आयुष्य लाभू शकते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.