मान्सून येतो आणि येताना पाऊस, नवंसंजीवन आणि उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आणि आर्द्रतेपासून सुटका घेऊनच येतो.
पण मित्रांनो तुम्हांला पावसाळा जितका प्रिय तितकाच तो वनस्पती, प्राणी, जिवाणू आणि विषाणूंना ही आवडतो हे तुम्हांला माहिती आहे ना?
म्हणूनच, पाऊस एंजॉय करत हुंदडणं, पावसात भिजणं, शेतातल्या डबक्यात डुबकी मारणे किंवा रस्त्यावर मिळणाऱ्या ताज्या कापलेल्या फळांचा आस्वाद घेणं, हे करताना खूप काळजी घ्यावी लागते.
पावसाळा पुर्ण एंजॉय करण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी, आज आम्ही तुम्हांला सोप्या सोप्या आरोग्य टिप्स देणार आहोत.
१) व्हिटॅमिन “सी” चं आहारात प्रमाण वाढवा.
व्हायरस आणि बॅक्टेरियांच्या यांच्या वाढीसाठी पावसाळा हा उत्तम काळ असतो.
दर वर्षी पावसाळा सुरू झाला की विषाणूजन्य ताप, ऍलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणावर होतं.
याचं कारण हेच आहे मित्रांनो की, या काळात हवेत इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त जीवाणू असतात.
निरोगी राहण्यासाठी, तुमची प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं असतं.
प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्हिटॅमिन “सी” युक्त आहार घेणं.
व्हिटॅमिन सी युक्त आहारासाठी मोड आलेली कडधान्यं, ताज्या हिरव्या भाज्या आणि संत्री, लिंबू यांचा आहारात समावेश करा.
२) स्वच्छ पाणी प्या.
पावसाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे आपोआप पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं.
तुमचं शरीर निरोगी राहण्यासाठी ते हायड्रेटेड असणं गरजेचं असतं.
पावसाळ्यात, ब-याच वेळेला अशुद्ध पाणीपुरवठा होत असतो.
अशावेळी तुम्ही स्वच्छ आणि शुद्ध पाणी पीत असल्याची खात्री करा, मग ते घरात असो किंवा बाहेर.
बाहेर सुद्धा शुद्ध पाण्याविषयी आग्रही रहा.
शक्य असेल तिथें तुमची पाण्याची बाटली तुमच्या बरोबर घेऊन जाणं सुरक्षित ठरेल. .
3. प्रोबायोटिकचे सेवन वाढवा.
प्रोबायोटिक्स हे निरोगी सूक्ष्मजीव आहेत जे तुमच्या आरोग्याचं रक्षण करतात.
आतडे आणि पचनसंस्थेमध्ये हे प्रोबायोटिक असतात.
दही, ताक आणि घरगुती लोणचं अशा प्रोबायोटिक तत्वांनी युक्त पदार्थांचं सेवन वाढवा.
त्यामुळं तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारतं.
पचन संस्थेचं काम सुधारतं.
संभाव्य संसर्गाविरूद्ध लढण्याची तुमच्यात ताकदही निर्माण होते, म्हणजेच प्रतिकार शक्ती ही वाढते.
४) पावसाळ्यात जंक फूड खाणं टाळा.
रस्त्यावर मिळणारे ताजे खाद्यपदार्थ, ताजी फळं आणि रस्त्यावरच विकले जाणारे बाकीचे खाद्यपदार्थ आवर्जून टाळावेत.
याच कारण असं, की रस्त्यावरचे खड्डे पाणी आणि चिखलानं भरून गेलेले असतात.
या साठलेल्या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक सूक्ष्मजीव तयार होतात.
हे सूक्ष्मजीव अन्नपदार्थांकडे सहज आकर्षित होतात.
अन्नपदार्थ जितका जास्त काळ खुल्या हवेच्या संपर्कात राहतील, तितके जास्त सूक्ष्मजीव अन्नात तयार होतात.
त्यामुळे, पावसाळ्यात जेंव्हा जेंव्हा तुम्ही जंक फूड खाल तेंव्हा तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढते.
५) डासांची निर्मिती होणारी ठिकाणं नष्ट करा.
पावसाळ्यातील सर्वात जास्त वाढणारी समस्या म्हणजे डासांची निर्मिती.
हे ओंगळवाणे, इवलुसे कीटक तुम्हाला दयनीय बनवायला सक्षम असतात.
घाबरू नका! तुम्ही डासमुक्त परिसर काळजीपूर्वक तयार करू शकता.
घरात उघड्या पाण्याचा साठा नसल्याची खात्री करा.
पाणी नेहमीच झाकून ठेवा.
त्याचप्रमाणे, जवळपासचे नाले तुंबलेले नाहीत आणि तुमच्या जवळपासच्या भागात पावसाचं पाणी साचून राहणार नाही याची खात्री करा.
साचलेल्या पाण्यातच तर डासांचा जन्म होतो,
त्यामुळे जितकं शक्य आहे, तितके साचलेल्या पाण्याचे स्रोत काढून टाका, डासांची संख्या कमी व्हायला खूप मदत होईल.
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणारा लेख या लेखाच्या शेवटी वाचा.
६) आंघोळीच्या पाण्यात जंतुनाशक घाला.
खूप जणांना पावसात भिजायला, भटकायला आवडतं.
काही जणं कामावरून येताना, जाताना चिंब भिजतात.
ज्या, ज्या वेळी तुम्ही पावसात भिजाल तेंव्हा न चुकता डेटॉल, सॅव्हलॉन किंवा बेटाडाइन सारख्या जंतुनाशकानं आंघोळ करण्याचं लक्षात ठेवा.
हा उपाय तुम्हांला लाखो सूक्ष्मजीवांपासून वाचवेल, तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त रहायला मदत मिळेल.
बाहेरून आल्यावर हात पाय आणि चेहरा धुण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.
लक्षात ठेवा, चेहरा, हात पाय धुण्यासाठी फक्त स्वच्छ पाण्याचाच वापर करा.
७) ओले कपडे इस्त्री करा
हे वाचायला विचित्र वाटतयं ना ?
पण ओलसर कपड्यांना मान्सून सीझनमध्ये इस्त्री करायलाच हवी.
कपडे जिथे ठेवले जातात ती ठिकाणं थंड, कुबट होतात आणि पाऊस जसजसा वाढत जातो तसतसं कुबटपणा कोंदटपणा वाढून ओल वाढायला लागते.
तुमचे कपडे गरम, निर्जंतुक करण्यासाठी क्वचितच सूर्यप्रकाश मिळतो.
ओल्या कपड्यांवर जीवजंतूंची वाढ होते, शिवाय ओलसर कपड्यांमुळे त्वचेला त्रासही होतो.
त्यामुळे पावसाळ्यात कपड्यांना इस्त्री करणं हा एक उत्तम उपाय आहे.
८) फळं आणि भाज्यांची विशेष काळजी घ्या.
पावसाळ्यात घराबाहेर जेवण्याऐवजी घरातलं स्वच्छ, ताजं, शिजवलेले अन्न खाण्याला प्राधान्य द्या.
पावसाळ्यात, फळं आणि भाज्या वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे धुवून घ्या.
कारण फळं आणि भाज्यांवर बरेच जंतू असतात.
रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कच्ची, कापलेली फळं, सॅलड खाणं पावसाळ्यात तरी टाळा.
९) पुरेशी झोप घ्या
पावसाळ्यामध्ये काम करत किंवा वेब सिरीज पाहत रात्री उशिरापर्यंत जागू नका.
७-८ तासांची झोप ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसंच पावसाळ्यात फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता कमी करायला मदत करते.
१०) नियमित व्यायाम करा.
पावसामुळे तुमच्या व्यायामाला सुट्टी देऊ नका.
जे व्यायाम घरात उत्कृष्ट पद्धतीने करता येतात ते व्यायाम आवर्जून करा.
व्यायामामुळं तुमचं वजन आटोक्यात राहीलच, पण तुमच्या प्रतिकारशक्तीसाठीही तो उत्तम ठरेल.
व्यायामामुळे तुमच्या हृदयाला गती मिळते, रक्त प्रकिया सुधारते आणि सेरोटोनिन (आनंद देणारे संप्रेरक) उत्पादनाला चालना मिळते.
या सगळ्या गोष्टी व्हायरस आणि जीवाणूंविरूद्ध तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
११) हाताची स्वच्छता ठेवा.
तुम्ही घराबाहेर असताना आणि घरी परतल्यानंतर काही खाण्यापूर्वी तुमचे हात काळजीपूर्वक धुवा.
हाताच्या स्वच्छतेमुळे तुमच्या हाताच्या त्वचेवर अस्तित्वात असलेले जवळजवळ सगळे सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि तुम्हांला तर माहीतच आहे की, पावसाळ्यात या हानिकारक जंतूंची संख्या वाढलेली असते.
१२) एसीमध्ये प्रवेश करताना तुम्ही कोरडे असल्याची खात्री करुन घ्या.
तुमचं ऑफिस किंवा घर वातानुकूलित असेल आणि प्रवास करताना जर तुम्ही भिजला असाल, तर एसी खोलीत, आत जाण्याआधी जरा थांबा.
स्वतःला शक्य तितकं कोरडं करण्यासाठी टॉवेल बरोबर ठेवा.
एअर कंडिशनर खोलीत तुमची त्वचा आणि कपडे ओले असतील तर तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
१३) डासांपासून काळजी घ्या.
साचलेलं पाणी जास्तीत जास्त साफ करून ही डासांचा प्रश्न पावसाळ्यात उरतोच.
ते दिवसभरात तुम्हांला कुठंही आणि कधीही चावू शकतात.
त्यामुळे बाहेर जाताना मॉस्किटो रिपेलंट्स मलम लावा.
घरातही, मच्छरदाणी, धूप यांचा वापर करा.
नियमित आरोग्य तपासणी करा आणि जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१४) आपली नखं स्वच्छ ठेवा.
नखांची काळजी वर्षभर घेतली पाहिजे तरीही, पावसाळ्यात तुम्हाला ही काळजी जास्त करायला हवी.
तुमची नखं नियमितपणे कापून घ्या आणि स्वच्छ धुवा, ज्यामुळे तिथं जंतू आणि बॅक्टेरिया जमा होणार नाहीत.
१५) ऍलर्जीपासून स्वतःचं संरक्षण करा.
पावसाळ्यात ऍलर्जी तीव्र होऊ शकते.
जर तुम्हांला माहित असेल की तुम्हांला धूळ, बाष्प किंवा प्रदूषणाची ऍलर्जी आहे, तर तुम्ही बाहेर जाताना मास्क घालणं आवश्यक आहे.
तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली अँटी-एलर्जीक औषधं नेहमी तुमच्याबरोबर ठेवा.
१६) आजारी लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
पावसाळ्यात बर्याच लोकांना फ्लू किंवा सामान्य सर्दीची लागण होते, अशा व्यक्तीबरोबर वावरताना तुम्हांला खबरदारी घ्यावीच लागेल.
तुम्ही प्रवास करत असताना, तुम्हांला दिसणाऱ्या आजारी लोकांपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्यात साथीचे रोग न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती देणारा लेख या लेखाच्या शेवटी दिलेला आहे.
१७) ओले शूज वापरू नका.
पावसाळ्यात कामावर जाण्यासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर पडणं आणि शूज स्वच्छ आणि कोरडे घेऊन परत येणं जवळजवळ अशक्य आहे.
घरी आल्यावर मात्र तुमचे चिखलाने माखलेले किंवा भिजलेले शूज नीट स्वच्छ करा आणि तुम्ही ते पुन्हा घालण्यापूर्वी ते पूर्ण कोरडे होऊ द्या.
ओल्या शूजमध्ये रोगजंतुंची वाढ होते.
तुमच्याकडे रोज वापरायच्या शूजची जोडी कोरडी असल्याची खात्री करा किंवा तुम्ही पावसाळी विशेष रबर शूज निवडू शकता.
मित्रांनो पावसाळा हा एक नितांतसुंदर आणि चैतन्य वाढवणारा ऋतू आहे, पण आरोग्यासाठी तो संवेदनशीलही आहे.
थोडीशी काळजी आणि साध्या सोप्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन पावसाळा या ऋतूचा आनंद नक्की घेऊ शकता.
पावसाळ्यात साथीचे रोग न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.