वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एखादा फेमस वडापाव चा स्टॉल असतोच.
सगळ्यांना परवडेल असा हा वडापाव, जेवणाला पर्याय ठरतो.
पण हा वडापाव नेमका कधीपासून सुरू झाला काही कल्पना आहे?
मुंबईत पुर्वी कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात होत्या.
या कापड गिरण्यांमध्ये कामगारांसाठी झटपट, स्वस्त नाश्ता म्हणून वडा पावाचा शोध लागला
१९६६ मध्ये एका मुंबईकराने हा शोध लावला असं मानलं जातं.
नोकरदार वर्गाची भूक भागवण्यासाठी तयार झालेल्या बहुतांश भारतीय पदार्थांप्रमाणे, मुंबई आणि आता संपूर्ण महाराष्ट्राच्या आवडत्या, वडा पावाचं मूळ ६० च्या दशकाच्या मध्यात आहे.
चटपटीत वडापाव ज्यात मसालेदार लाल चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यांचा समावेश असतो, त्याचा शोध अशोक वैद्य यांनी लावला असे मानलं जातं.
अशोक वैद्यांनी त्यावेळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे लघुउद्योजक होण्याचा निर्णय घेतला.
अशोकचा मुलगा नरेंद्र यांनी सांगितलं की “१९६६ मध्ये माझे वडील मुंबईत त्यांच्या छोट्याशा दुकानात पारंपारिक वडे आणि पोहे विकायचे. त्यावेळी बन पाव हा गिरणी कामगारांमध्ये एक नवीन ट्रेंड बनला होता”
“गिरणी कामगारांच्या खिशात मावेल अशा झटपट पोटभर जेवणाची गरज ओळखून अशोक वैद्यांनी बटाटयाचं सारण भरून बनवलेला वडा तेलात तळून, तो मऊ लुसलुशीत पावत घालून चटणीसोबत तो सर्व्ह केला.”
अल्पावधीतच अशोकचा वडापाव गिरणी कामगारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला.
तेव्हापासून सकाळी, दुपारी, रात्री अशोकच्या स्टॉलवरून वडापाव घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या.
काहींनी तर हा नवा पदार्थ शहराच्या वेगवेगळ्या भागात विकायला सुरुवात केली.
आज हा वडापाव संपूर्ण महाराष्ट्रात व्यापून राहिलेला आपल्याला दिसतो.
६ जुलै १९९८ ला वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी अशोक वैद्य यांचं निधन झाले.
अशोक वैद्य यांच्या पश्चात त्यांचा मुलगा नरेंद्र याने वडिलांचा व्यवसाय हाती घेतला.
दादर रेल्वे स्टेशनवर पश्चिम मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर वैद्यांचा हा गरमागरम वडा पाव आजही मिळतो.
५० वर्षांहून जास्त काळ गाजलेला हा वडा पाव आजही प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयात एक वेगळचं स्थान व्यापून आहे.
या वडा पावानं महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांतून आणि लहान गावांतून यशस्वी प्रवास केला आहे.
प्रत्येक विक्रेता या वडापावला स्वतःची एक वेगळी टेस्ट, एक वेगळा फ्लेवर देतात, स्वतः ची आणि वडापावची एक नवी ओळख निर्माण करतात.
२३ ऑगस्ट हा दिवस जागतिक ‘वडा पाव दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
श्रीमंतांच्या पंक्तीत बसणा-या बर्गरच्या या भारतीय आवृत्तीचे गरीबासह श्रीमंत, तरुण, लहान मुलं स्त्रिया आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा चाहते आहेत.
मित्रांनो, तुमच्या भागातला प्रसिद्ध वडापाव कोणता? त्याचं नाव, आम्हांला कळवायला विसरू नका!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.