खूप वर्षांनी तिचा नंबर मिळाला. वाटलं ओळखणार नाही मला. पण राहवलं नाही आणि मी नंबर Dial केला.
फोन उचलला गेला. “हेल्लो! मी वसुधा बोलतेय..” म्हणाले, तशी ती किंचाळलीच. “अगं, कुठेयस तू ? किती दिवसांनी बोलतेयस?” असं म्हणत ती सुरु झाली आणि आम्ही चक्क १/२ तास बोलून मगच थांबलो. ती माझी जुनी मैत्रीण. काळाबरोबर मैत्रीचे धागे विरत जातात असं आपलं उगाच वाटत होतं.
पु. लं. नी म्हटलंय,
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असंही काही नाही .
पण मी तुला विसरणार नाही हि झाली खात्री,
आणि तुला ह्याची जाणीव असणं हि झाली मैत्री.’
काही मित्रांच्या बाबतीत हे अगदी घडतं. वर्षानुवर्ष contact नसतो. मग फोन केला कि, तसाच पूर्वीचा आवाज येतो. “बोलो, कैसी हो?” त्यांत मधली अनेक वर्षं पुसली जातात. इतके दिवस आपण बोललो नाही ह्याची नाराजी नसते आणि आपल्याला आधार देण्यासाठी हात पुढे आलेला असतो. वाटतं, ‘यारो, दोस्ती बडीही हसीन है.. ये न हो तो क्या फिर बोलो ये झिन्दगी है……’
पैसा, सत्ता, ऐश-आराम ह्या बरोबर असं कुणीतरी मनातलं बोलणारं आणि बोललेलं समजणारं असणं किती आवश्यक असतं नाही? मानस शास्त्रज्ञांच्या मते, मानसिक रोगातून बाहेर पडण्यासाठी Support System असणं खूप फायद्याचं असतं. हि Support System मित्र होऊ शकतात.
मैत्रीचा प्रवास सुरु होतो रोज भेटण्यातून, बोलण्यातून. त्याला समोरच्याकडून कसा Response मिळतो ह्यावर मैत्री वाढणं, टिकणं अवलंबून असतं.
मैत्री झाली कशी हे आठवण्याचा प्रयत्न केला कि जाणवतं. ओळख झाली तेव्हा फक्त एका 😚Smile शिवाय आपण काहीही दिलं-घेतलेलं नसतं. ह्या Smile चं रुपांतर हळूहळू ‘Hi!’ मध्ये होतं. मग हळूहळू एकेका वाक्याची देवाणघेवाण पुढे घेऊन जाते. कदाचित, एखादं जिवाभावाच नातं सापडू शकतं.
ह्या नात्याला वयाचं बंधन नसतं. मैत्री हि कोणत्याही चांगल्या नात्याची सुरुवात ठरू शकते, मग ते नातं आई-मुलीचं असेल, नवरा-बायकोचं असेल किंवा भावडांच किंवा कोणतंही. त्यांत मैत्री आली कि ते फुलत. समृद्ध होतं.
बरेचदा, आपण डोक्यात अनेक कल्पना घेऊन वावरत असतो. स्वत:च्या कमीपणाच्या किंवा मोठेपणाच्या, आपल्या आवडी-निवडींच्या आणि अशाच काहीशा लोक आपल्याबद्दल करत असणाऱ्या विचारांच्या. मग आपण पुढे सरकतच नाही. कोणतीतरी गोष्ट आपल्याला Response देण्यापासून अडवत असते. असं झालं कि आपण स्वत:चेच पाय ओढतो. आपण स्वत:ला जणू काही मिटूनच घेतलेलं असतं. इतरांचा Response आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला तो देता येत नाही. मैत्रीचं नातं रुजवताना थोडंसं Responsive व्हायला हवं.
शाळेतल्या बाईनी एक खूप छान वाक्य सांगितलं होतं. बहुदा, ना.सी. फडकेंच असावं, ‘समुद्रातल्या शिंपल्यानी नेहमी उन्मीलित अवस्थेत असावं, स्वातीच्या नक्षत्रांच्या जलधारा केव्हा पडतील आणि त्यातून मोती केव्हा होतील हे कुणी सांगावं?’ मैत्री करण्यासाठी असंच उन्मीलित अवस्थेत असण्याची गरज असते.
काही म्हणतील नकोयत मला मित्र. पण मित्रा, असा किती काळ तू कुढत राहणार? स्वत:शीच बोलत राहणार?…..जेव्हा आपण इतरांशी बोलू लागतो, Open होतो, मैत्री करतो तेव्हा प्रकाशाचा एक उबदार कवडसा दिसू लागतो. जो आपल्याला Mature व्हायला मदत करतो. आधाराचा हात देतो. थोडसं हसू देतो… और जिने को क्या चाहिये?
वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, पुणे
वाचण्यासारखे आणखी काही….
हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…
मुलांचे लाड कितपत करावे?
मुलांना आई-बाबांचा धाक असणं खरंच आवश्यक आहे का?
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.