काही व्यक्ती आयुष्याला फारसं सिरीयसली घेत नाहीत.
नोकरी मिळालेली आहे तर कशीतरी करत रहा…. या एटीट्युडने ते दिवस ढकलत राहतात.
कामाला उशीर झाला, फिकीर नाही? सहका-यांना मदत करायची तयारी नाही, प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, अशा अनेक सवयी एखाद्या दिवशी तुमच्या नोकरीवर गदा आणु शकतात.
अशा कोणत्या चुकीच्या सवयी आहेत जाणून घ्या आणि त्यांना वेळीच सुधारा.
1) चालढकल करणे
कामाची जी एक ठरवून दिलेली वेळ असते त्यावेळेच्या एलेव्हन अवरला काम करायला गेलात तर एकच गोष्ट होते, फजिती….
त्यामुळे करू, बघू अजून खूप वेळ आहे असा चालढकलपणा कोणत्याही नोकरीत करू नका.
2) खोटेपणा करु नका
आपलं चारित्र्य घडवायला आयुष्य वेचावं लागतं.
कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव पाडण्यासाठी, आपली ओळख निर्माण करण्यासाठी, आपला अमीट ठसा उमटवण्यासाठी ज्या नोकरीत आहात त्या नोकरीशी, त्या कंपनीशी प्रामाणिक राहा.
एक पैसा सुद्धा कंपनीचा स्वतः साठी अवैधरीत्त्या वापरू नका.
कंपनीची स्टेशनरी आपल्या खाजगी कामासाठी वापरू नका. बिलामध्ये, व्यवहारामध्ये अफरातफर करू नका.
त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व निर्दोष राहील. तुमच्याकडे कोणीही बोट दाखवणार नाही. आणि तुमची नोकरी कायमस्वरूपी टिकेल.
3) नकारात्मक वृत्ती
ब-याच व्यक्ती सतत तक्रार करतात किंवा आपल्या सहकाऱ्यांविषयी गॉसिप करतात.
ही सवय तुमच्या नोकरीसाठी अतिशय घातक ठरू शकते.
सतत कटकट करणाऱ्या, सतत समस्या उभी करणाऱ्या व्यक्ती कुणालाच आवडत नाही.
तुमच्या बॉसला तरी तुमचा रडीचा डाव कसा आवडेल?
तुमच्या ग्रुप मध्ये जर तुम्ही एकटेच असाल सतत नकारात्मक सूर लावत असाल तर नक्कीच तुमच्या नोकरी विषयी कुणाकडे सहानुभूती उरणार नाही.
4) तत्परतेचा अभाव
तुम्ही जॉबच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नसाल एनर्जीने काम करत नसाल तर ते तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही.
लंच ब्रेक, टी ब्रेक नंतर लगेचच तुम्ही तुमच्या कामाकडं नवळता टंगळमंगळ करत असाल तर हा स्वभाव तुम्ही ताबडतोब बदलला पाहिजे.
तुमच्या कामाविषयी तुमची सजगता आणि तत्परता कायम असली पाहिजे.
5) तंत्रज्ञानाचा वापर करून सुसंवाद साधत नसाल तर वेळीच सावध व्हा.
जसजसं जग बदलत चाललय तसतसं कामाचं स्वरूपही बदलत चाललं आहे.
तंत्रज्ञान आजच्या कामाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
तंत्रज्ञानातल्या एक महत्त्वाचा घटक म्हणजे ईमेल.
माणसाला सध्या इतकी कामं, इतकी व्यवधान असतात की संवादातून मिटिंगमधुन ठरलेल्या गोष्टी कदाचित विसरल्या जाऊ शकतात.
अशा अनेक महत्वाच्या गोष्टी, तुमच्या कामाची प्रगती जबाबदार व्यक्तीला इमेलद्वारे पाठवले पाहिजेत.
त्याचबरोबर तुम्हाला आलेले इमेल्स वेळेवर चेक करणं हे ही तुमचं कर्तव्य आहे.
ईमेल्स चेक करण्याबाबतीत टाळाटाळ करु नका.
6) सोशल मीडियाचं व्यसन
प्रत्येक व्यक्ती आपआपल्या मोबाईल मध्ये गुंग असते. त्यासाठी कोणताही काळ नसतो किंवा वेळ नसते.
पण सोशल मीडियामध्ये गुंतल्यामुळे तुम्ही समोरच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष करत असता त्यामुळे कामांमध्ये चुका होऊ शकतात.
जर तुम्ही सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळेचं बंधन स्वतःवर घालून घेतलं तर तुम्ही नोकरीमध्ये चांगली प्रगती करू शकाल.
कामाच्या ठिकाणी सोशल मीडियावर गुंतू नका.
7) चुकीची देहबोली
कामावर जाताना तुमचे खांदे पडलेले असतात का? कामाविषयी बोलताना तुमची नजर भिरभिरत असते का?
एखादं काम सोपवल्यानंतर त्या कामाविषयी उत्सुकता, आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही का?
अहो, ही सगळी चुकीची देहबोली तुमच्याविषयीचा गैरसमज तुमच्या बॉसच्या मनात तयार करत असते.
8) बेफिकीरपणा
तुम्ही जिथं नोकरी करता त्या कंपनीची रीतभात शिकून घ्या.
तिथला ड्रेस कोड फॉलो करणं, कपडे व्यवस्थित धुवून इस्त्री करुन घालणं, केस नीटनेटके असणं ही प्राथमिक गरज आहे.
चुरगळलेले कपडे, अवतार करून ऑफिस मध्ये जाणं तुमच्या एकूण वागणूकी विषयी बेफिकीरपणा करू नका.
त्याच बरोबर तुमच्या सहकार्यांविषयी संवेदनशील रहा आपुलकी दाखवा.
9) उत्तम भाषा वापरा.
प्रत्येकावर वेगवेगळे संस्कार झालेले असतात. प्रांतानुसार प्रत्येकाची भाषा वेगळी असते.
मात्र वरिष्ठांशी किंवा सहका-यांशी बोलताना भाषेतून अनादर दाखवू नका.
समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल अशा तीव्र शब्दांचा कधीच वापर करु नका.
आपलं म्हणणं, समोरच्या व्यक्तीच्या चुका अगदी सौम्य भाषेत मांडण्याचा प्रयत्न करा.
कधीही तारसप्तकात बोलू नका.
10) टीममध्ये मिसळा.
आयुष्यात बरीच कामं तुम्ही एकट्याने हाताळली असतील.
मात्र नोकरी करताना सर्वासह काम पुरं करण्यासाठी प्रयत्न करा.
एकमेकांना सांभाळून घेत, कधी कौतुक करत कधी बदल सुचवत , कधी तुमच्याकडे कमीपणा घेत कामाला मुर्त द्या.
मी एकट्याने सगळं काम पार पाडेन असा आडमुठेपणा करू नका.
11) स्वतःवरचं नियंत्रण सोडू नका.
आजच्या जीवनशैलीत काम म्हणजे प्रेशर, सतत वाढणारा ताण.
या तणावाखाली आपलं संतुलन हरवलं तर बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात.
त्यामुळे तणाव कमी करणारे व्यायाम, प्राणायाम यांच्यासाठी रोज थोडा वेळ ठेवाच.
12) अकार्यक्षमता
नोकरीत वावरताना जसं तुमचं वागणं, बोलणं उत्तम पाहिजे तसंच तुमच्या कामाची पध्दत चांगली पाहिजे.
प्रचंड कचरा असलेलं टेबल, फायलींचा गोंधळ, कामात सातत्यानं होणारा उशीर यामुळे तुमच्या विषयी वाईट मत तयार होऊ शकतं.
गडबड गोंधळ करू नका. कामाव्यतिरिक्त उगाच बडबड करू नका. वैयक्तिक गोष्टींची चौकशी करू नका.
13) विचार करून बोला
विचार करून बोला, नोकरी करताना कधीही बोलून विचार करण्याची वेळ येऊ देऊ नका.
14) सभ्यता पाळा.
नोकरी पत्करल्यानंतर ज्युनिअर, सिनियर कुणीही समोर असू दे, वस्तुंची, विचारांची देवाणघेवाण करताना सभ्यतेच्या नियमांचं पालन करा.
सहकारी, महिला यांच्याशी चुकून ही असभ्य वर्तन, लाजीरवाणं वर्तन करू नका.
नोकरीच्या ठिकाणी कोणत्या चुका करू नये हे पाहिलं, एक उत्तम व्यक्ती म्हणून नोकरीच्या ठिकाणी आणि आयुष्यात ही समजून उमजून वागलात तर यश हे तुमचचं आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.