दृष्टिकोन: पतीपत्नीच्या नात्याची एक भावस्पर्शी गोष्ट

मित्रांनो, आजची गोष्ट पतीपत्नीच्या नात्याबद्दल खूप काही सांगणारी आहे. कोणतंही नातं हे खूपच जाणीवपूर्वक जपावं लागतं.

आणि त्यातूनही नवराबायकोचं नातं म्हणजे तर अगदी अलवार!!! म्हटलं तर रेशीम बंध, पण जर का यात कटूता आली तर मात्र हेच बंध संपूर्ण आयुष्य जखडून टाकतात.

यासाठीच आयुष्याचा जोडीदार म्हणून जी व्यक्ती आपण निवडतो तिच्याशी निखळ, निर्मळ सुसंवाद असला पाहिजे.

मनातल्या मनात जर काही गोष्टी साचून राहिल्या तर परस्परांना दोष देण्याची वृत्ती वाढीस लागते. आणि बघता बघता एका सुंदर परिकथेऐवजी रडकथा जन्माला येते.

आमच्या वाचकांसाठी अशीच एक खास गोष्ट आम्ही घेऊन आलो आहोत.

आम्हाला खात्री आहे की ही गोष्ट मनापासून समजून घेतलीत तर तुमच्या नात्याकडे पहाण्याची एक नवीन दृष्टी तुम्हाला लाभेल.

यातल्या पात्रांची नावं तो आणि ती. चला तर मग वाचूया त्यांची गोष्ट !!!

आज त्या दोघांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस!!! पण दोघांचाही मूड ठीक नव्हता.

अगदी काही वेळापूर्वीच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. निमित्त होतं साधंसंच. पण त्यामुळे दोघांची तोंडं दोन दिशांना झाली होती.

आजकाल ही चहाच्या पेल्यातील वादळं वरच्यावर उफाळून येत होती. वरवर जरी सर्व आलबेल दिसत असलं तरी खोलवर कुठेतरी काहीतरी बिनसलं होतं. आणि दोघांनाही हे समजत होतं.

लग्नानंतरचं एक वर्ष अगदी छान निघून गेलं.

हौसमौज, सणवार, एकमेकांना जपणं, मनसोक्त फिरणं यातच हे गुलाबी दिवस अत्तरासारखे उडून गेले.

हळूहळू नव्याची नवलाई संपून विसंवादाचा सूर कधी लागू लागला ना त्याला कळलं ना तिला.

अशीच पाच वर्षे निघून गेली. नात्यातील पूर्वीची ओढ, असोशी आता राहिली नव्हती.

एकप्रकारचं साचलेपण, नाराजीचं मळभ दाटून आलं होतं.

शेवटी तिने ठरवलं की, आज या विषयाला तोंड फोडायचंच. तो बाल्कनीत शून्यात नजर लावून एकटक कुठेतरी पहात बसला होता.

ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, “आपल्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून खूपच अंतर पडत चाललंय. रोजरोजच्या भाडणांना मी तर पार कंटाळून गेले आहे. नक्कीच आपल्या दोघांमध्ये काही दोष असले पाहिजेत. आणि त्यामुळेच हा सततचा विसंवाद होतोय. यावर आपल्याला दोघांनाही काम करावेच लागेल. नाहीतर हा प्रश्न असाच चिघळत जाईल. हे नातं वाचवायचं असेल तर गंभीरपणे विचार करण्याची हीच वेळ आहे. यावर मला एक उपाय सुचलाय.”

असं म्हणून तिने आपल्या हातातील डायरी त्याच्यासमोर धरली. ती म्हणाली, “पुढच्या एका वर्षात या डायरीत रोज माझ्यामध्ये तुम्हाला ज्या कमतरता दिसतात त्या लिहून ठेवा.

अशीच अजून एक डायरी मी माझ्यासाठी आणली आहे. तुमच्यामध्ये मला ज्या उणीवा जाणवतात त्या मी रोज एक वर्षभर त्यात लिहून ठेवेन.

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला पुढच्या वर्षी आपण एकमेकांनी काय लिहीलं आहे ते वाचूया. त्यावर चर्चा करुया आणि आवश्यक ती सुधारणा देखील करुया.”

पतीने काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली आणि तिच्या हातातील डायरी स्वतःकडे घेतली.

दिवसांमागून दिवस उलटत गेले. वाऱ्याच्या वेगाने काळ पुढे चालला होता. हां हां म्हणता एक वर्ष कधीच उलटून गेलं.

आणि तो दिवस पुन्हा एकदा उगवला, लग्नाचा वाढदिवस!!!

तो आणि ती एकमेकांच्या समोर बसले होते. दोघांच्याही हातात डायऱ्या होत्या. तिने आपल्या हातातील डायरी त्याच्याकडे दिली.

त्याने डायरी चाळून पाहिली. प्रत्येक पानावर काहीतरी लिहीलेलं होतं. डायरी शेवटच्या पानापर्यंत भरलेली होती.

त्याने पहिलं पान उघडलं. त्यावर तिने लिहीलं होतं, तुम्ही मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला मला काहीच गिफ्ट दिलं नाही. ही गोष्ट माझ्या मनाला खूपच लागली.

दुसऱ्या पानावर लिहीलं होतं, माझे आईबाबा आपल्याकडे रहायला आले होते. आपण सर्वांनी मिळून नाटक पहायला जायचं ठरवलं. ऐनवेळी महत्त्वाची मिटिंग आहे असं सांगून तुम्ही आलाच नाहीत.

त्यांच्यासमोर माझी लाज गेली. दिलेला शब्द पाळण्याची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे.

तिसऱ्या पानावर लिहीलं होतं, तुमचे मित्र आपल्या घरी जेवायला आले होते. मी दिवसभर खपून एवढे पदार्थ बनवले, पण तुम्ही एका शब्दाने माझं कौतुक केलं नाही.

त्यावेळी मला प्रकर्षाने असं वाटलं की तुम्हाला माझी काही किंमतच नाही.

तो एक एक पान उलटत गेला. प्रत्येक पानावर त्याच्याबद्दल तक्रार, नाराजीचा सूर होता.

दररोज त्याचं कोणतं ना कोणतं वागणं तिला खटकत होतं. आणि वर्षभरात हा डोंगर तिच्या मनात साचून राहिला होता.

त्याचं शेवटपर्यंत वाचून झाल्यावर ती म्हणाली, “मला वाटतं आता तुमच्या चुका तुम्हाला समजल्या असतील आणि यापुढे तुम्ही त्या परत करणार नाही.”

त्याने फक्त संमतीदर्शक मान डोलावली. आता पत्नीने त्याच्या हातातून डायरी घेतली व वाचू लागली. पण तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण डायरी तर कोरीच होती.

हे पाहून तिला भयंकर राग आला आणि वाईटही वाटलं. नाराजीनेच ती म्हणाली, “तुम्ही तर काही लिहायचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. मी मात्र नियमितपणे आपण ठरविल्याप्रमाणे रोज लिहीत होते. तुम्हाला एवढं पण करावंसं वाटलं नाही का?”

त्यावर तो म्हणाला, “शेवटचं पान उघडून पहा. मी मला काय वाटतं ते तिथे लिहीलंय.”

ती घाईघाईत शेवटचं पान उघडून वाचू लागली. त्यावर लिहिलं होतं, “डियर, तुझ्याशी कितीही भांडलो, ओरडलो तरी खरी गोष्ट हीच आहे की मी मनापासून तुझा आभारी आहे. गेल्या पाच वर्षांत तू आपल्या घराची, माझ्या आईबाबांची एवढी काळजी घेतली आहेस की ती व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. त्यामुळे मला तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार करायची नाही. जरा थांब, लगेच हुरळून नको जाऊस!!! तुझ्यात पण काही दोष आहेत. काही कमतरता आहेत. पण तुझा त्याग, समर्पण आणि प्रेम यापुढे या लहान सहान उणीवा अगदीच नगण्य आहेत. माझ्यात तर हजारो दोष आहेत. तरीसुद्धा तू मला वेळोवेळी सांभाळून घेत आलीस. माझ्या चुकांना नजरेआड पण करत आलीस. माझ्यासाठी सर्वात महत्वाचे हेच आहे की, आपल्यात मतभेद झाले तरी तू माझी सावली बनून अखंड साथ देत आहेस. माझ्या अस्तित्वाची खूण म्हणजे माझी ही सावली!!!

मग तिच्यात मला कमतरता कशा बरं दिसतील? तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहेस.

माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत असाच भांडत, लढत, तुझ्यावर प्रेम करत मी तुझ्यासोबत जगणार आहे.

आशा आहे की तुलाही अशीच माझ्यासोबतीने वाटचाल करायला आवडेल. बस्स, मला हे एवढंच तुला सांगायचंय.”

आता मात्र तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

तिने झटकन त्याच्या हातातून आपली डायरी ओढून घेतली. धावत जाऊन तिने ती डायरी जाळून टाकली.

आगीच्या ज्वाळा डायरीचं एकेक पान भस्मसात करत होत्या आणि त्याचवेळी तिच्या मनात साचलेली त्याच्याबद्दलची नाराजी, तक्रारी सर्व काही नाहीसं होत होतं.

तो आणि ती एकमेकांना बिलगून उभे होते. शब्द मुके झाले होते पण नजर मात्र बोलत होती.

त्या नजरेत ठाम विश्वास होता पुढचं संपूर्ण आयुष्य एकमेकांना जसं आहे तसं स्विकारण्याचा. परस्परांचे गुणदोष पहाण्यापेक्षा आता

ते दोघेही एकमेकांचा आधार होऊन जगणार होते…कायमच !!!

मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? नात्यामध्ये अपेक्षा जेवढ्या जास्त तेवढंच अपेक्षाभंगाचं दु:ख मोठं. म्हणूनच समोरच्या व्यक्तीला आपलंसं करताना त्याच्या गुणदोषांसकट स्विकारावं.

असा संपूर्ण स्विकार म्हणजे मजबूत नात्याचा पाया.

आणि यावरच तर सहजीवनाचा सुंदर महाल उभारला जातो. प्रेम, आपुलकी आणि आस्था असेल तर प्रत्येक नातं मधुर होऊन जातं.

जोडीदाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. चुकाच शोधत बसलो तर आयुष्य कमी पडेल.

पण जर एकमेकांना समजून घेऊन पुढे निघालो तर आयुष्य म्हणजे एक आनंदयात्रा होईल !!!

गोष्ट आवडली तर लाईक व शेअर करा. तुमच्या नात्यात तुम्ही कोणत्या गोष्टी आवर्जून पहाता हे कमेंट्स करुन आम्हाला नक्की कळवा.

असेच अर्थपूर्ण संदेश देणारे लेख मनाचेTalks द्वारे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो. त्यांचा आनंद घ्या व उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

नवरा बायकोमधले पेल्यातले वादळ संपले की पुन्हा मैत्री कशी करायची

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय