चला ‘ सोशल ‘ बनुया ..!

माणूस हा समाजशील प्राणी आहे असं आपण जेंव्हा म्हणतो, तेंव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरुप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आणि समाजशीलतेच्या व्याख्याही.. आदिम काळात ज्यावेळी भाषा अस्तित्वात नव्हती तेंव्हाही मानव हातवारे करून एकमेकांशी सवांद साधतच होता. जसजसा काळ बदलत गेला तसतशी सवांदाची नव-नवीन साधने विकसीत होत गेली, आणि मानवाची सवांद साधण्याची ओढ वाढत गेली.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साईटच्या आविष्काराने तर अवघे जग मुठीत आले आहे. जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसऱ्या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकते. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी अथवा अभीव्यक्तीसाठी इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हतं. आजची पिढी एकमेकांशी ‘कनेक्ट’ राहण्यासाठी याच माध्यमाचा वापर करते. तुम्ही तुमच्या आकाउंटचे मालक….. तुम्हाला सवांद साधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य. कुणी तुम्हाला अंकित करू शकत नाही वा दबावही आणू शकत नाही. एखाद्याचे विचार पटत नसतील तर त्याला आपण डिलीट करू शकतो. एव्हडं स्वातंत्र्य सोशल मीडियाने आपल्याला बहाल केलं आहे. आणि त्यामुळेच ते आज तरुणाईसह आबालवृद्धांच्या गळ्यातील ‘ताईत’ बनले आहे.

पूर्वी ‘ साक्षर ‘ आणि ‘ निरक्षर ‘ अश्या दोन वर्गांमध्ये लोकांचं वर्गीकरण केल्या जायचं.. मात्र आज ‘ ऑनलाईन ‘ आणि ‘ ऑफलाईन ‘ या वर्गात लोकांची विभागणी केल्या जाते, यावरून Social Media ची ताकत आपल्या लक्ष्यात येऊ शकेल ! परंतु या ‘ ऑनलाईन ‘ चे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा दृष्टीक्षेपात येतं आहेत. आपली समाजशीलता अधिक व्यापक करण्यासाठी मानवाने वेगवेगळ्या साधनांचा शोध लावला, मात्र या संसाधनामुळे त्याची समाजशीलताच ‘ खुजी ‘ बनत चालली असल्याचे दिसत आहे. व्हाट्स अप, फेसबुक, ट्विटर आदी प्रभावी सोशल साईट मुळे दिलखुलास अभिव्यक्त होण्याचं एक व्यासपीठ आपल्याला मिळालं.. त्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रश्नावर तद्वतच समाजातील विविध घडामोडींवर वैचारिक घुसळण होऊ लागली.. अनेकांना आपले विचार व्यक्त करता येऊ लागले.. समाजातील अनेक समस्यांवर या माध्यामातून उपायही निघाले आहेत. इतकेच नव्हे तर या माध्यमांमुळे काहींचे जीव सुद्धा वाचले. परंतु जसा माध्यमाचा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होतो. कारण शेवटी ते एक तंत्रज्ञान आहे.. त्यामुळे ते स्वत:च्या मर्जीनं चालणारं नाही.. त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो, यावरच त्याचा उपयोग ठरतो. आणि सोशल मीडिया तर ‘ दुधारी ‘ तलवारीसारखा आहे. या तलवारीच्या धारीवरून चालत असताना थोडा जरी संयम ढळला तर स्वतःची आणि समाजाची हानी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे या माध्यमांशी विवेकाने जुळवून घेणे फार जरुरीचे ठरते.

आपली जीवन जगण्याची सुलभता अधिक व्यापक करण्यासाठी मानवाने वेगवेगळ्या साधनांचा शोध लावला, मात्र या संसाधनांनी निर्माण केलेल्या आभासी जगात किती मग्न व्हायचे? याची मर्यादा त्याला न ठरवता आल्याने हेच तंत्रज्ञान आज त्याच्या जीवावर उठू लागले आहे. हातात स्मार्टफोन आला म्हटल्यावर सतत काहीतरी बघण्याची आणि गेम खेळण्याची चटक लागून मुले छंदीष्ट बनू लागली. पारंपरिक खेळांना नाकारून व्हिडिअाे किंवा माेबाइल गेम्सच्या आभासी दुनियेत रमलेला वर्ग मोठा आहे. या गेम्सचे इतके व्यसन तरूणाईला लागले आहे की, या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. पण आता विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले हे कळलेच नाही. काही दिवसापूर्वी मुंबईतील मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळे आत्महत्या केली. मागच्या वर्षी ‘पोकेमॉन गो’ या गेमने दहशत पसरवली होती. फक्त व्हिडीओ गेमच नाही तर ‘सेल्फी’च्या वेडानेही अनेकांचे जीव घेतले आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सगळय़ांचेच आयुष्य या तंत्रज्ञानाने किती झपाटले आहे याचेच हे पुरावे आहेत. तंत्रज्ञानाचा बेछूट वापर मानवाच्या जीवावर उठला असतानाही कुणी यातून शहाणपणाचे धडे घ्यायला तयार नाही. लहान मुलांचं जाऊ द्या.. त्यांचं मन अबोध असतं, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं याच ज्ञान त्यांना असणार तरी किती ? परंतु, तरुणाई आणि तुमच्या आमच्या सारखी जाणकार लोकांनाही या तंत्रद्यानाने वेडं केलं असेल तर निश्चितच परिस्थिती चिंताजनक आहे. लहान मुलांनी काय करू नये काय करावं, हे पाहण्याची आणि ठरविण्याची जबाबदारी थोरांची असते मात्र तेच जर ‘सेल्फी’ नावाच्या जीवघेण्या वेडात अडकले असतील तर काय म्हणावे.

आज आपण शिकून सवरून सुशिक्षित झालो परंतु सोशल मीडिया नेमका कसा हाताळावा, त्यातून काय करावं आणि मुख्य म्हणजे काय टाळावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं दिसत नाही. त्यामुळेच सुशिक्षितांकडून अशिक्षितांसारखा या मीडियाचा वापर केला जात असल्याचे प्रकर्षानं जाणवत आहे. हे फक्त आपल्याकडेच होत नाही तर परदेशातही या मीडियाचा गैरवापर केल्याच्या घटना दररोज घडतात. हत्या करून त्याचे अपडेट सोशल मीडियावर टाकण्यापासून ते दंगली भडकविण्याच्या भडक पोस्ट टाकल्याची अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. नुकतेच भीमा कोरेगाव प्रकरण घडले. यात अफवा पसरविण्याचा सर्वात मोठा वाट सोशल मीडियाचा होता. सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना आपण काय करतो याचे भान राहलेले नाही. समाजस्वास्थ्यासाठी हे भान राखणे महत्त्वाचे आहे.

मुळात सोशल मीडियाला गेटकीपर नाही. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे प्रकट होतो आणि यातून मग समाजासमाजात द्वेष, विकृती पसरविली जाते. याला बंधन घालण्यासाठी आयटी अ‍ॅक्टचीही निर्मिती करण्यात आली, परंतु सोशल माध्यमांना देशाच्या सीमेत बांधून ठेवता येत नसल्याने तोही कुचकामी ठरत आहे. तसेही कायद्याने कुठल्याच गुन्हेगारीला आजपर्यंत पायबंद घालता आलेला नाही.. सायबर क्राईमला तर मर्यादाच नाहीत. त्यामुळे या तंत्रज्ञानाला कसे नियंत्रित करणार.? जाणीवजागृती व माध्यमसाक्षरता वाढवणे हा यावरील एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

सोशल मीडिया हे ‘ सोशल ‘ होण्याचं प्रभावी साधन आहे. वर्षानुवर्षे न बोललेली माणसे या निमित्ताने परत संपर्कात येतात. लांब अंतरावर असलेली माणसे सहज एकमेकांशी संपर्क साधू शकतात. आपले आनंद दुःख वाटू शकतात. चांगले विचार मांडू शकतात, जनजागृती घडवू शकतात. हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. हि आपली जबाबदारी आहे कि आपण या माध्यमाला आयुष्यात किती महत्व द्यायचं. या मीडियावर आलेल्या बातमीचा किंव्हा पोस्टचा किती परिणाम करून घ्यायचा. आलेल्या पोस्टची आधी शहानिशा करावी, त्यात किती तथ्य आहे ते पाहावे मग कृती करावी. धार्मिक तेढ, व्यक्ती द्वेष , धर्मद्वेष , वर्णद्वेष , अश्लीलता पसरविणाऱ्या पोस्ट पासून आपण दूरच राहिले पाहिजे, आपल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कारण ‘ सोशल मीडिया ‘ हा ‘ सोशल ‘ होण्यासाठी आहे. ‘ अँटी सोशल ‘ होण्यासाठी नाही..‼

वाचण्यासारखे आणखी काही….

आपुलाची वाद आपणाशी!
भ्रमाचा भोपळा फुटला!!
राज्यातील महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग….

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय