तहान

“साहेब पाया पडतो. गरीबाला काही मदत करा. आई आय.सी.यु. मध्ये आहे. पैश्यांची खूप गरज आहे.”

संजयला रोजच्या बसमधील प्रवासी विनवणी करत होता. संजय त्याला बस मध्ये फक्त चेहर्‍याने ओळखत होता. संजयला भरून आले. त्याने जवळचे पाच हजार काढून दिले. ते त्याने किराणामाल घेण्यासाठी ठेवले होते. कुणी मदत मागायला आलाच तर माणूस फार फार पाच, दहा किंवा जास्तीत जास्त शंभर देईल. मग संजयने का? त्याला एव्हढे पैसे दिले असतील.

त्याला नाव विचारले. आशुतोष नाव सांगीतलं त्याने. त्याचा नंबर घेऊन डायल केला त्याने. संजय बोलला.

“आशुतोष मित्रा काही काळजी करू नकोस. तुझी आई लवकरच बरी होईल. आणि नंबर ह्यासाठी मी घेतला. आता माझ्या जवळ पैसे नाहीत पण तू फोन कर मी काहीतरी करेन बंदोबस्त.”

संजयची जन्म देताच आई देवाघरी निघून गेली. सांभाळ पहिले चारपाच वर्ष आजीने केला. नंतर वयाने झुकलेली आजी देवाघरी निघून गेली. आता इतर भावांच्या जोडीला तो वाढला. तो समजदार झाला. आई ह्या नात्याबद्दल त्याला नेहमीच जिज्ञासा वाटायची. आईच्या प्रेमाबद्दल तो खूप ऐकायचा.

आता मोठ्या भावाचे लग्न झाले. खूप दिवसात घरात कुणी तरी आपलं म्हणायला स्त्री आली. सर्व तिला खूप प्रेम देऊ लागले. आणि थोडक्यात म्हणजे घरातील सर्व तिच्या कडून प्रेमाची अपेक्षा ठेऊ लागले.

ह्या मध्ये संजय असा होता की त्याला मुळात आईचे प्रेम मिळालेच नव्हते. त्याच्या पेक्षा मोठ्या दोघा भावांना थोडंफार का होईना आईचे प्रेम मिळाले होते. कधी मावशी, आत्या, काकू यांच्या कडे तो तशी अपेक्षा ठेवायचा. पण त्याला समजायचं की त्यांच्या स्वत:च्या मुलांसारखे त्या आपल्याला प्रेम देत नाही. तसं ही वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते. वडिल त्यांना आईचे प्रेम देण्याचे खूप प्रयत्न करत होतेच. पण संजयला ती स्त्रीमधील आई हवी होती.

आज घरातले सर्व आनंदित होते. पाच वाजेपर्यंत घरातील तीघे भाऊ व वडिल यांनी चाैघांनी सात किलो पेढे वाटले. संजय आज काका झाला होता. त्याच्या मोठ्या भावाला कन्यारत्नाचा लाभ झाला होता. घरात आज लक्ष्मीचे आगमन झाले होते. घरातील सर्वांनीच आज कामावर सुट्टी घेतली होती. आतून डाॅक्टरांनी येऊन मोठ्या भावाला हात मिळवला आणि सांगीतलं.

“अभिनंदन , सचिन तुम्हाला मुलगी झाली.”

सचिनला खूप भरून आले. त्याने नकळत डाॅक्टरांच्या पायाला हात लावला. सगळ्यात जास्त आनंद संजयला झाला होता. घरात नविन सदस्याची वाढ सर्वांना सुखावून गेली. मुलींना काय काय हवं असतं. मनात तो तिला हव्या असणार्‍या सामानाची यादी तयार करायला लागला. सुंदर फ्राॅक, नेल पाॅलीश, लिपस्टिक, केसांचा काटा. हातात बांगड्या, तिला सुंदर चप्पल. मेकपच सामान तो यादी बनवत होता.

हाॅस्पिटलच बील भरलं. डिस्चार्ज घेऊन ते आई व बाळासह घरी आले. आता तो आई आणि बाळाचे नातं ऐकून होता ते प्रत्यक्षच पाहू लागला. आईने विश्वातील पहिल अन्न बाळाला दिले. दुधाच्या रुपात ते त्याने पाहिलं. बाळाची वाढ आईच्या शरीरापासून झाली. हे पण त्याने पाहिले. बाळाला माॅलिश करून सुंदर अंघोळ वहिनी घालतेय तो रोज पाहयचा. वहिनी बाळाला बोबडे बोल बोलतेय हे तो पाहयचा. त्याला वाटायचं आपण पण पुतणीला उचलून घ्यावे तिचे लाड करावे. पण मनात तो घाबरायचा. नाजूक बाळ ते आपल्याला सांभाळता येईल का?. खूप नाजुकशी कळी ती आपण कशी सांगणार ?. म्हणून तो बाळाल उचलून घेत नव्हता.

आई आणि बाळ ह्या नात्याबद्दल त्याला मनातून खूपच उच्चतम आदर होता. अभियांत्रिकी पदविका मिळवून तो नुकताच नोकरीला लागला होता. सात हजार पगार घेत होता. त्या मधील पाच हजार तो वडिलांना किराणामाल वा घर खर्चाला देत होता. आज त्याने पगारातील पाच हजार रुपये काढून वडिलांना देण्यासाठी ठेवले होते. तर अोळख काढून आशुतोष आला. त्याची आई आय.सी.यु. मध्ये असल्याचे ऐकून त्याचे ह्रदय पिळवटून निघाले आणि त्याने जवळचे पाच हजार रुपये देऊन टाकले. थोड्यावेळातच त्याला आठवले. आता वडिलांना काय सांगायचं. हा विचार त्याच्या मनात आला. पण स्वत:च्या मनाला तो समजावत होता की आपण तर काही चुकीचं केले नाही मग बाबांना खरं सांगून टाकू.

तो घरी आला जवळची बॅग त्याने ठेवली. फ्रेश होउन छोट्या पुतणीच्या शेजारी बसून थोडा तो खेळला. आता वडिल आल्यावर ते माझ्याकडे पैसे मागणार नाही. कारण नोकरीला लागून पाच महिने झाले. अजून पर्यंत संजयने न मागताच पैसे दिले होते. आज माझा पगार झाला असणार हे वडिलांना माहित आहेच.

याने वडिलांना घडलेला प्रसंग कथन केला. आशुतोषची आई आजारी आहे आणि त्याला पैश्याची गरज होती. त्याला पैसे दिले. वडिलांना वाटले असेल. आशुतोष नावाचा याचा कुणी मित्र असेल. आणि त्याला संजयने उसने पैसे दिले असतील. म्हणून त्यांनी संजयला विचारले.

“आशुतोष पैसे परत कधी करणार आहे?.”

आता वडिलांच्या प्रश्नाने संजय काहीसा गोंधळला.

समविचारी माणसांची मैत्री दृढच असते. आशुतोष थोडाफार शिकलेला. म्हणजे आठवी पर्यंतच. का? तर शासनाच्या नियमांचा लाभार्थी ठरला म्हणून. जसा नववी इयत्तेत गेला मग शासनाच्या नियमातून बाहेर झाला. तसी पण शिक्षणात गोडी नव्हती. घमेंडखोर खूपच होता आशुतोष.

घरच्यांना सांगायचा…. “मला गरज नाही शाळेची, मी शिकावं अशी गरज तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही मला शाळेत पाठवता.”

घरचे मग वैतागून बोलायचे….. “हो रे बाबा. आम्हालाच गरज आहे. शिक आता वय आहे तर. कर थोडेफार उपकार आमच्यावर.”

नवव्या इत्तेत नापास झाल्यावर मग काय आता मजाच मजा करायची. त्याच्या सारखेच काही मित्र मिळाले. मग खाण्यापिण्यासाठी जगात जे उपलब्ध आहे. त्या सर्व पदार्थांची चव घ्यायची. मग ते चांगले वाईट हे ठरवायचं नाही. यात मग काही व्यसन पण होतेच.

आता पैश्यांची नितांत गरज भासू लागली. मग मिळेल ते काम करायचं होतेच. पण मिळणारा पैसा कमी आणि खर्च जास्तच. मग सुरवात झाली लहान मोठ्या चोर्‍यांना. कुणाला भावनिक कोंडमारा करून फसवायचं.

संजय ज्या बसमध्ये कामावर जातांना प्रवास करायचा. त्याच बसमध्ये आशुतोष प्रवास करायचा. रोज प्रवास करणारे प्रवासी चेहर्‍याने एकमेकाला ओळखत असतात. पुढे हा प्रवास जर दीर्घकालीन राहिला तर मग नावानिशी ओळख होत असते. आशुतोषची आणि संजयची चेहर्‍याने चांगली ओळख होती. नजरा नजर झाल्यास एकमेकांना हास्य देऊन स्वागत करत होते. पण मैत्री हा प्रकार नव्हता दोघांमध्ये. कारण विचारातील विरुद्ध दिशा. मग आशुतोष व त्याच्या मित्रांचा ग्रुप वेगळा. तर संजय व त्याच्या मित्रांचा ग्रुप वेगळा.

आशुतोषच्या मित्रांची एकमेकात विमल व तंबाकूची देव घेव. आपल्या चारपाच मित्रांच्या व्यतिरिक्त आणखी प्रवासी आहेत याचे भान त्यांना नसायचे. जोरात जोरात गप्पा करायच्या. चायना मोबाइलवर जोरात गाणं वाजवायचं. विना साउंड वर मोठ्या आवाजात गाणं ऐकवणे हे गुण चायना मोबाइलचे सर्वांना माहित आहेत. बस मधून खाली उतरवल्यावर चहाच्या जोडीला सिगारेट मारायची मगच कामावर. या मैत्री मधून मग ठरायचे आठवड्याच्या सुट्टीचे नियोजन कुठे पार्टी करायची. मग कुणाचा वाढदिवस तर लग्नाचा वाढदिवस फक्त काही कारण हवे असायचं दारूच्या पार्टीसाठी. आशुतोषने सर्व मित्रांच्या पार्ट्या झोडपल्या. आता त्याच्या कडे प्रत्येक जण अपेक्षा ठेऊन होता. पण आशुतोषला सर्वांना पार्टी देणं परवडत नव्हते. प्यायला आनंद देणारी दारू जास्त प्रमाणात खरेदी करायला परवडणारी नव्हती. मिळणारे पैसे त्याला रोजच्या खर्चाला पुरत नव्हते. आता त्याच्या डोक्यात नवीन क्लुप्ती आली. संजयचा मित्रांचा ग्रुप त्याच्या नजरे समोर नाचत होता. शिकलेली मुलं व आपल्यापेक्षा चांगले पैसे कमवणारी.

संजय व त्याचे मित्र जगातील घडामोडी बद्दल चर्चा करणारे. आदर्श विचारांची देवाणघेवाण करणारे. कुणाला कशी मदत करता येईल या बद्दल विचार असणार्‍या गप्पा त्यांच्याकडे असायच्या. संपर्कात असणार्‍या व्यक्तीशी आत्मियता पुर्वक संवाद करायचे.
संजय या मध्ये असा एकमेव होता. त्याच्या बोलण्यात आई बद्दल खूप असायचे. आयुष्य त्याला खूप काही देत होतं. पण त्याला आईचे प्रेम मिळणारे नव्हते. आईच्या प्रेमाला पारखा संजय. मनातून बोलण्यातून आईची सेवा करायचा. प्रत्येक विवाहित स्त्रीला तो आईच्या रुपात पाहयचा.

आशुतोषला माहित होते. कुणाचा पगार किती तारखेला होतो. त्याने काही दिवस संजयचे निरीक्षण केले. त्याच्या बोलण्यातून आईचा उल्लेख त्याने ऐकला. आता संजयला आपण गाठून पैसे घ्यायचे त्याच्या कडून. संजयला त्याने एकट्याला गाठले. आज त्याने गोड बोलून, आई आजारी सांगून पैसे काढले.

मित्रांना लगेच फोन करून सांगीतले उद्या भेटा मी सर्वांना पार्टी देणार. मित्रांना पार्टी हवी होती. ते कश्याला खोलात जाऊन विचारतील त्याने कुठून पैसे आणले.

आशुतोष सर्व पैसे पार्टीमध्ये ऊडवून मोकळा झाला. जे पैसे कमवायला संजयला महिनाभर मेहनत करावी लागली.


संजय वडिलांच्या प्रश्नाने गोंधळला. वडिलांना म्हणाला.

“बाबा तो माझा मित्र नाही. फक्त बसमध्ये आम्ही एकमेकाला चेहर्‍याने अोळखतो. त्याची आई आजरी आहे. हे ऐकल्यावर मला राहवलं नाही. मी जवळचे पैसे त्याला काढून दिले.”

वडिलांना मुलगा फसला गेलाय हे समजल. पण याला आईचे प्रेम देता नाही आले याचे दुःख झाले. त्यांनी सांगीतले.

“बेटा हे जग सरळ झाडंच तोडतो. तीच उपयोगात असतात. तुला कदाचित फसवलं असेल. काळजी घेत जा बाळा. पैसे कमवायला तुला महिना लागला. ज्याने फसवले तो लगेच संपवून मजा करील. थोडीफार चाैकशी करायची किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहून यायचे.”

आता संजयला वाटले बाबा बोलतायत ते पण खरंच की आशुतोषच्या आईला बघून यायला काय हरकत आहे.

सकाळी तो कामावर जातांना बसमध्ये चढला त्यावेळेस आशुतोष त्याला दिसला नाही. संजयला वाटले आई जवळ कदाचित थांबला असेल. त्याने काही रोजच्या प्रवाश्यांना विचारून पाहिलं. उत्तर मनासारखं मिळाले नाही. दुसर्‍या दिवशी पण आशुतोष त्याला बसमध्ये दिसला नाही.

आता संजयला काळजी वाटायला लागली. आई बरी असेल ना?. काही अघटित तर घडले नसेल ना.

आशुतोष संजय ला टाळू लागला. त्याला वाटायचं कुणी याला जर सांगीतलं तर. हा माझ्याशी भांडणं करेल. मग तो संजय गेल्यावर दुसरी बस पकडायचा. संजय व्याकूळ झाला होता. त्याच्या मनात फक्त आशुतोषच्या आईचा विचार असायचा. आज त्याने नक्कीच केले संध्याकाळी आशुतोषच्या आईला पाहून यायचे. आशुतोष फोन उचलत नव्हता.

आता बसमध्ये सर्व सह प्रवाश्यांना माहित झाले. संजयला फसवलं गेले. संजयचे मित्र बोलले अाता जर तो बसमध्ये किंवा कुठे भेटलाना का त्याला दाखवू. आशुतोष बद्दल सर्वांना माहित झाले होते. तो असच कुणालाही फसवत असतो. पण संजयचे मन अजून मानायला तयार नव्हते. आईला का कुणी आजारी पाडेल? तो मनोमन आईच्या निरामय स्वास्थ्यची प्रार्थना करायचा.

सर्व मित्रांनी ठरवलं आपण सर्वांनी मिळून आज आशुतोषच्या घरी जायचे. त्यांनी त्याचा पत्ता शोधला.

संध्याकाळी संजय व त्याचे तीन मित्र आशुतोषच्या घरी पोचले. आशुतोष घरात नव्हता.
त्याचे वडिल घरात होते. त्यांनी सर्वांना आत घेतले. विचारपूस झाल्यावर त्यातील एकाने सांगीतलं.

” आशुतोशची आई आजारी आहे. अस आशुतोष सांगत होता. म्हणून आम्ही आईची खयालात विचारायला आलो आहोत.”

खरं कारण त्यांनी सांगीतलं नाही. घरी आईवडिलांना खर सांगून त्यांना दुखवायचे नव्हते. आशुतोषच्या वडिलांना मुलाचे पराक्रम माहित होते. ते समजून चुकले आशुतोषने यांना पैश्यांची फसवणूक केली असणार. त्यांनी विचारले.

“तुम्हा कुणाकडून पैसे वगैर घेतलेत का उधार त्याने.”

एक मित्र बोलता झाला.

“हो काका, हा संजय याच्या कडून आशुतोषने पाच हजार रुपये घेतले. संजय आसुतोषला ओळखत नव्हता. पण त्याने आई आजारी आहे असं सांगीतलं. याची आई याला जन्म देताच देवाघरी निघून गेली. याला आईच्या प्रेमाबद्दल खूप अोढ आहे. कुणाची आई आजारी असली किंवा वारली तर हा खूपच दुःखी होतो. आशुतोषने आई आजारी असल्याचे सांगीतलं आणि याला राहवलं नाही. तो रोज आशुतोषला फोन करतोय पण तो फोन उचलत नाही. सकाळी बसला भेटत नाही. आईची तब्येत नक्की कशी आहे?. यासाठी त्याने अाग्रह धरला व तो आम्हांला इथं घेऊन आला.”

घरातून आशुतोषची आई सर्व ऐकत होती. ती बाहेर धावत आली. संजय नक्की कोण चाैघातला तिच्या लक्षात आले नाही. ती चाैघांकडे बघून बोलली.

“खूप चांगली मुलं आहात तुम्ही. तुम्हांला आशुतोषने फसवलं पण मी तुमचे पैसे देते.”

अजून पर्यंत खाली मान घालून बसलेला. संजय उठला आणि आईला म्हणाला .

“आई, तू आजारी आहेस. आय. सी. यु. मध्ये आहेस. मला आई नाही पण कुणाची आई संकटात आहे हे मला कधीच पाहवत नाही. मला पैसे नको परत फक्त तू व्यवस्थित आहेस ह्याच गोष्टीबद्दल खूप आनंद झाला. तू बरी व्हावीस म्हणून तर मी पैसे दिले होते. आता तर तू बरीच आहेस. मग मला पैसे परत करायची गरज काय.”

नकळत आशुतोषच्या आईने संजयला मिठीत घेतले होते. व दोघांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

समाप्त


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय