यती (हिममानव) नक्की अस्तित्वात असेल का? आणि त्याचा इतिहास काय आहे?

यती (हिममानव)

भारतीय सेनेने त्यांच्या एक टीमला यती अर्थात हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळल्याचं अधिकृतरीत्या जाहीर केलं. हे ठसे जवळपास ३२ X १५ इंच इतक्या मोठ्या आकाराचे आहेत. नेपाळच्या हद्दीजवळ असलेल्या मकालू बेसला हे ठसे आढळून आले. ९ एप्रिल २०१९ ला हे ठसे आढळून आल्यावर काही दिवस ह्याचा अभ्यास केल्यावर त्यांनी हे ठसे पुढच्या संशोधनासाठी खुले केले आहेत. भारतीय सेनेच्या आजच्या घोषणेमुळे यती हा हिममानव अस्तित्वात आहे की नाही ह्यावर जगातील अनेक तज्ञांच्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. यती म्हणजे नेमकं काय? ह्या मागे इतकं गूढ का दडल आहे ह्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल.

यती (हिममानव)

यती (हिममानव) हा एक प्राणी जो दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे. यती आहे किंवा नाही? ह्याचं उत्तर होय आणि नाही असं आहे. कारण यतीला अजून कोणी सदृश्य बघितल्याचे किंवा त्याचे असण्याचे पुरावे मिळालेले नाहीत. अगदी एकदा फोटोत पकडण्याचा प्रयत्न पण फसलेला आहे. पण त्याचवेळी अनेकांनी त्यांना यती दिसल्याचा किंवा त्याच्या पाउलखुणा दिसल्याचं वर्णन केलं असून अश्या पाउलखुणा अनेकदा हिमालयाच्या कुशीत आढळून आल्या आहेत. त्यामुळे यती (हिममानव) नक्की आहे का? हा प्रश्न आजही जगभरातील संशोधकांपुढे न उलगडलेलं कोडं आहे.

अलेक्झांडर ने भारताच्या हिंदू संस्कृतीवर इसविसनपूर्व ३२६ साली हल्ला केल्यावर त्याने यतीला बघण्याची इच्छा व्यक्त केली होती अशी नोंद आहे. पण इथल्या लोकांनी यती हिमालयात असून त्याचं दर्शन दुर्लभ असल्याचं त्याला सांगितलं होतं. तसेच आपल्यासाठी तो त्रासदायक असून त्यापासून लांब राहण्याची सूचना ही केली होती. ह्या नंतर अनेक पौराणिक कथेत यतीचा उल्लेख केला गेलेला आहे.

यती (हिममानव)

१९२१ च्या सुमारास पत्रकार हेन्री न्यूमन ह्यांनी एव्हरेस्टच्या मोहिमेवरून परतणाऱ्या काही ब्रिटीश गिर्यारोहकांची भेट घेतली. त्यांनी एवरेस्ट च्या पायथ्याशी मोठ्या पाउलखुणा आढळल्याची नोंद केली होती. १९२५ ला रॉयल जिओग्राफी सोसायटी चे एन.ए. तोम्बाझी ह्यांनी ४६०० मीटर उंचीवर असलेल्या झेमू ग्लेशियरवर माणसा सारखा प्राणी दिसल्याची नोंद केली आहे.

हा प्राणी दोन पावलांवर चालत असल्याचं ही निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. ह्यावर संशोधन करणाऱ्या मायरा शाक्ले ह्यांनी १९४२ च्या सुमारास गिर्यारोहकांना दोन अस्वस्ल सदृश्य प्राणी दिसल्याची नोंद केली आहे. १९५१ ला ब्रिटीश शोधकर्ता एरिक शिप्टोन ह्यांनी यती चा फोटो घेतल्याची नोंद आहे. १९५३ ला एवरेस्ट च्या पहिल्या मोहिमेत सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे ह्यांनी एवरेस्ट वर यती च्या पाऊलखुणा दिसल्याची नोंद केली आहे. ह्या नंतर अनेक गिर्यारोहक ते अनेक सामान्य लोकांना हिमालयात यती च्या पावलांचे ठसे दिसल्याची नोंद जगभर झाली आहे.

यती (हिममानव) बद्दलचं कुतूहल जगात इतकं आहे की इतिहासात यती वर संशोधन करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या गेल्या. ह्यात रशिया, ब्रिटन सारख्या देशांचा समावेश आहे. यती च्या संशोधनासाठी २०१३ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक ब्रायन स्केस ह्यांनी पूर्ण जगात यती असल्याचं मानणाऱ्या लोकांकडून यतीचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याचं आवाहन केलं. ह्या पुराव्यात केस, हाड, दात, मांस अश्या गोष्टी समाविष्ट होत्या. त्यांना जवळपास ५७ पुरावे मिळाले ज्यातले ३६ पुरावे डी.एन.ए. चाचणीसाठी निवडण्यात आले. ह्या सर्व पुराव्यांचा ताळमेळ जगात माहित असलेल्या सगळ्या डी.एन.ए. शी मिळवला गेला. ह्यातले अनेक पुरावे हे ज्ञात असलेल्या प्राण्यांशी जुळून आले. पण ह्यातले २ पुरावे मात्र १०० टक्के पृथ्वीच्या ध्रुवावर खूप वर्षापूर्वी राहणाऱ्या अस्वलांशी मिळाले. ही ध्रुवीय अस्वस्ल पृथ्वीवर जवळपास ४०,००० ते १,२०,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती. ह्यातील एक पुरावा भारतातून तर दुसरा भूतान मधून मिळालेला होता. ह्यावर दोन संशोधकांनी अजून संशोधन करून आपला अहवाल रॉयल सोसायटी जनरल मध्ये प्रसिद्ध केला आहे.

मकालू बेस कॅम्प

बघायला गेलं तर यती (हिममानव) चा शोध गेली कित्येक शतके चालू आहे. पण अजूनही यती नक्की कसा आहे? कोण आहे? काय आहे? ह्या बद्दल पूर्ण जगातील संशोधकात संभ्रमाचं वातावरण आहे. कारण यती असल्याचे पुरावे तर मिळत आले आहेत. पण तो नक्की कुठे आहे? ह्याचा शोध आजही लागलेला नाही. आज भारतीय सेनेच्या पुराव्यांनी पुन्हा एकदा यती बद्दलच्या गुढ्तेला अजून एक वलय प्राप्त झालं आहे. भारतीय सेनेने हे फोटो जगाला दाखवताना हे दाखवण्या मागचा उद्देश हा यती बद्दल अजून संशोधन करण्याचा आहे असं स्पष्ट आपल्या ट्वीट मध्ये म्हंटल आहे. यती (हिममानव) मिळेल तेव्हा मिळेल पण पुन्हा एकदा एका न उलगडलेल्या कोड्याची उकल करण्याचे प्रयत्न पूर्ण जगभर केले जातील. ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!