पॊर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल हि माहिती तुम्हाला असली पाहिजे!!

हॅलो सर आपलं नाव xxx आहे का? आपला नंबर आमच्याकडे रजिस्टर झालाय. आपण ट्रेडिंग करता ना? कुणाच्या सल्ल्याने करता? करीत नाही म्हणता? का करीत नाही ? आपला खूप तोटा झालाय का यापूर्वी? आम्ही तुम्हाला चांगले कॉल देऊन तुम्हाला भरपूर फायदा करून देऊ. सध्या आमच्या काही दिवस फ्री ट्रायल चालू आहेत. आपण इंटरेस्टेड आहात का?

एक ना दोन असे अनेक प्रश्न एकापाठोपाठ विचारले जाण्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला असेलच. आपली वैयक्तिक माहीती (नाव व मोबाइल क्रमांक) आपल्या डिपॉसीटरीकडून / एक्सचेंजकडून मिळवून अनेक जण असे फोन सातत्याने आपल्याला करीत असतात. आपणच तुमचे तारणहार असून एकदा आम्हाला संधी द्या अशी विनवणी करीत असतात. दलालांमधील स्पर्धा, त्यामुळे कमी कमी होत गेलेली दलाली, डिस्काउंट ब्रोकर्सचे आगमन आणि त्यांनी आकर्षित करून घेतलेले गुंतवणूकदार यामुळे नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या दलालांचे उत्पन्न घटले असून बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या त्यांना योजाव्या लागत आहेत.

मग याला पूरक व्यवसाय म्हणून म्युच्युअल फंड एजन्सी, विमा एजंट, यूलीप योजना विक्री, पेन्शन योजना विक्री असा पूरक व्यवसाय त्यांनी चालू केला आहे. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित आहे. याहून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी प्रोट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम यांचा आधार घेतला जात आहे. यातून मिळू शकणारा फायदा हा अधिक असल्याने अनेकांना त्याचा आधार आहे. यांच्याकडून केले जाणारे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन यास कोणतेही कायदेशीर पाठबळ नसून ते पूर्णपणे व्यक्तिगत आहे. त्यामुळे आपली खात्री असल्याशिवाय अशा सापळ्यात न अडकणे केव्हाही गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे.

ही एक अनुचित व्यापारी प्रथा असून आपण काही न करता आपल्याला कोणीतरी भरपूर पैसे मिळवून देईल ही लोकांना असलेली भाबडी आशा याचे मूळ आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ वसंतराव पटवर्धन या संबंधात, लाभ आणि लोभ यात एका मात्रेचा फरक असल्याने यातील सीमारेषा अतिशय पुसट असल्याचा उल्लेख त्यांच्या लेखांमध्ये करीत असतात.

खरंतर फी आकारून व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराकडून दिली जाणारी, गुंतवणूक संच व्यवस्थापन योजना (PMS) ही सर्वसामान्यांसाठी मुळी नाहीच, तर ज्यांचे उत्पन्न अतिउच्च आहे त्यांच्यासाठी आहे. यात आपल्या गुंतवणुकीचे मिश्रण कोणत्या वेगवेगळ्या साधनांत असावे की ज्यायोगे आपले उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण होईल याचा विचार केला जातो. यातून कोणत्याही प्रकारे ठोक उत्पन्न मिळू शकेल याची हमी नाही त्यासाठी लागणारा खर्चही शेअरवरील दलाली, म्युच्युअल फंड योजनेचे कमिशन यांच्या तुलनेने खूप अधिक आहे.

याचप्रमाणे यासाठी आवश्यक किमान गुंतवणूक ही पैसे व /आणि रोख्याच्या स्वरूपात 25 लाख रुपये आहे. सामान्य गुंतवणूकदार ज्यातून किती उत्पन्न मिळेल याची हमी नाही अशा स्वरूपात एवढी मोठी गुंतवणूक करू शकत नाही ज्यांना शक्य आहे जे अधिक धोका पत्करू शकतात त्यांना हा जास्तीचा पर्याय आहे. तेव्हा ही नेमकी काय योजना आहे याची आपण सर्वसाधारण माहीती करून घेऊयात. काय सांगावं, कदाचित येत्या काही दिवसात आपल्याला त्याची जरूर पडू शकेल.

यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे
  • यासाठी किमान गुंतवणूक 25 लाख रुपये आहे. ती रोख, शेअर्स, युनिट, बॉण्ड या प्रकारात वेगळी किंवा एकत्रित चालते.
  • अशी सेवा सेबीकडे नोंदणीकृत ब्रोकर किंवा त्यांच्या फर्म्स आपल्या ग्राहकांना देऊ शकतात. त्यासाठी वेगळी नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे.
  • ही ग्राहकांच्या गरजेनुसार त्याचे ध्येय गाठण्यासाठी मदत म्हणून उपलब्ध केलेली वैयक्तिक सेवा असून त्याचा सुयोग्य मोबदला संबंधित व्यक्तीकडून घेतला जाईल. त्यासाठी व्यक्तिगत करार केला जाईल.
  • यातून निश्चित उत्पन्न मिळण्याची कोणतीही हमी देता येत नाही. तथापि पूर्वी अशा योजनेतून किती टक्के उत्पन्न मिळवले ते जाहीर करण्याची तसेच वार्षिक 6 ते 10 % मोबदला मिळाल्यास किती रक्कम होऊ शकते ते सांगता येईल.
  • करारात सांगितल्याप्रमाणे हे व्यवहार पारदर्शी असून त्याची माहिती रोजच्या रोज ग्राहकास कळवली जाईल. त्याचा मासिक, त्रैमासिक वार्षिक खातेउतारा यातून होणारा अल्पमुदतीचा / दिर्घमुदतीचा भांडवली लाभ आणि त्यावर बसणारा कर याची माहीती द्यावी लागेल. याशिवाय ग्राहक त्याच्याकडे असलेल्या सांकेतिक क्रमांक वापरून आपला खातेउतारा कधीही (24 × 7) पाहू शकेल.
  • करारातील तरतुदीप्रमाणे गुंतवणूक प्रमाणात बदल करता येईल. 25 लाखावरील अधिक रक्कम मागणी केल्यास काढून घेता येईल अथवा त्यात वाढ करता येईल.

ही योजना दीर्घकाळात लाभ मिळावा या हेतूने असल्याने त्याचा कालावधी, त्यातील बदल, योजनेत बदल परस्पर संमतीने आधीच केले जातील आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.

हेजिग करण्याच्या मर्यादेत डिरिव्हेटिव्हीजचे व्यवहार त्यांना करता येतील. फक्त डिरिव्हेटिव्हीज साठी ही सेवा कोणासही देता येणार नाही.

सर्वसाधारणपणे आपल्या अपेक्षेनुसार गुंतवणूक संच निर्माण करण्याचे ब्रोकरला सर्वाधिकार देऊन अथवा त्याच्याकडून नियमितपणे सल्ला घेऊन आपण आपला व्यवहार करायचा अशा दोन पद्धतीने या योजनेत सहभागी होता येते. याबद्दलची तपशीलवार माहीती नियम अटी आपणास ज्यांच्याकडे ही योजना आहे त्यांच्याकडून मिळू शकेल ती वाचून पूर्णपणे विचार करूनच त्यात सहभागी व्हावे.

यापेक्षा कमी रकमेच्या योजना आपल्या ब्रोकर्सकडे आहेत परंतू यात आपल्या हिताचा विचार किती असेल याबाबत संशय आहे. आपला नफा होवो अथवा तोटा, ब्रोकरला त्याचे ठराविक कमिशन मिळत असतेच त्यामुळेच हा टर्नओव्हर वाढावा त्यायोगे जास्तीतजास्त कमिशन मिळत रहावे हा त्यांचा सुप्त हेतू असतो. त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी व्यवहार सतत करावा यासाठी त्यांनी खास माणसे नेमली असून ती आपल्याला फोन करून हे शेअर विका यांच्याऐवजी हे शेअर्स घ्या असा सल्ला देत असतात.

हे बरोबर नसले तरी ही त्यांची व्यावसायिक अपरिहार्यता आहे हे लक्षात घ्या. यामध्ये निष्पक्ष सल्ला देणारे, विश्वासार्ह असे खूप कमी लोक असून त्यांची आपली भेट होणे दुर्मिळ आहे तेव्हा कुणीतरी आपला फायदा करून देईल या भ्रमात राहू नये. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि भरपूर जोखीम घेण्याची तयारी आहे ते विकताचाही सल्ला घेऊ शकतात आणि त्यांना तो पॊर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस च्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण स्वतः अभ्यास करूनच आपले गुंतवणूक निर्णय घ्यावेत, चुकांचे अवलोकन करावे, त्याच चुका वारंवार करू नयेत. आपली स्वतःची गुंतवणूक शैली ठरवावी ती इतरांना सांगावी इतरांची जाणून घ्यावी. चालता येत नसेल तर जरुरीपुरताच कुबड्यांचा आधार घ्यावा मात्र चालता यायला लागलं की तो सोडून द्यावा आणि आपली प्रगती आपणच करावी.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय