गीतेमध्ये श्रीकृष्णांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हांला स्वतःची ओळख नव्यानं होईल.
गीतेत सांगितलेल्या गोष्टींचा जर जीवनामध्ये समावेश केला तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, की कधीही कोणाकडून धोका मिळणार नाही.
ही गीतेची शिकवण प्रचंड मौलिक आहेत.
या मौलिक, अनमोल गोष्टींपैकी १० महत्त्वाच्या गोष्टींची आज आपण चर्चा करू या.
या १० गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्यात तर सगळी सुखं तुम्हांला तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळतील.
१) रहस्य उघड करू नका
मानवाची दुर्बलता कशात लपली आहे असं तुम्हाला वाटतं?
पैसा? प्रेम? की अहंकार?
छे!!! माणसाला दुर्बल करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याच्या जीवनातील रहस्यं…
तुम्ही कितीही शक्तिशाली, प्रबळ असलात तरी तुम्ही लपवून ठेवलेली रहस्यं ही तुमच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतात.
यासाठी कायम शक्तिशाली राहण्यासाठी स्वतःची रहस्यं कोणालाही सांगू नका, अगदी स्वतःच्या मित्रांनाही सांगू नका.
बिभीषणाला रावणाचं बलस्थान माहिती होतं म्हणूनच श्रीराम रावणाला दुर्बल करून त्याचा वध करू शकले.
२) इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करू नका
जीवनाच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी माणूस प्रचंड मेहनत करत असतो.
हे सगळे करूनही जर यश मिळत नसेल तर माणूस इतरांबरोबर स्वतःची तुलना करून, तसे वागण्याचा प्रयत्न करू लागतो.
तुम्हांला शाळेचे दिवस आठवतात का? बरीच मुलं कॉपी करून पास होताना तुम्हाला आठवतील.
जीवनाच्या परीक्षेत मात्र ही कॉपी करता येत नाही.
कारण शाळेतली प्रश्नपत्रिका सर्वांसाठी समान असते, जीवनाची प्रश्नपत्रिका मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळी असते.
मग त्याची उत्तंरही प्रत्येकासाठी वेगळीच असतील ना?
३) यश अपयशाच्या व्याख्या काय?
यश-अपयश, हार-जीत आयुष्याचा मोठा भाग आहे.
यश मिळाल्यानंतर तुमचा आनंद गगनात मावत नाही, तर दुःखात वेदनेचा समुद्र उसळतो.
पण आयुष्यातला इतका महत्त्वाचा प्रश्न बनलेली ही हार-जीत, हे अपयश नेमकं आहे तरी काय ?
यश-अपयश कोणतीही वस्तू नाही. तर एक मनस्थिती आहे.
तुमचा शत्रू जिंकतो तेंव्हा तुम्ही हरत नाही, तुम्ही तेंव्हा हरता जेव्हा तुम्ही तुमचं अपयश स्वीकारता.
ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत म्हणजे अपयश नाही, तर ध्येयापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करणं जेंव्हा तुम्ही थांबवता तेंव्हा तुम्ही हरता.
म्हणूनच न थकता, न हरता प्रयत्न करत राहा. हार स्वीकारू नका.
ज्या दिवशी तुम्ही हार स्वीकारणं बंद कराल यश तुमच्या कवेत असेल.
४) निस्वार्थ कामाची पावती.
अतिविशाल वडाचं झाड तुम्हांला माहिती असेलच.
वडाच्या झाडाचं बीज मोहोरीच्या दाण्यापेक्षाही लहान असतं..
पण वडाचं झाड मात्र जगातल्या प्रचंड झाडांमध्ये गणलं जातं.
त्याच्या बीजांमध्ये प्रचंड फांद्या नसतात, पानं नसतात, पण जसजसं झाड मोठं मोठं वाढत जातं तस तसं त्याच्या फांद्या पुन्हा जमीनीकडे झेपावतात आणि मूळ होऊन झाडाला आधार देतात.
हा आयुष्याचा एक मोठा धडा आहे.
निस्वार्थीपणे काम करा, दुसऱ्यांना मदत करा.
तुम्ही ज्यांना मदत कराल ते तुमचे मदतनीस होतील, तुम्हाला आणखीन बलवान करतील.
आयुष्य आणि तुमच्या कामाचा विस्तारही वाढवतील.
निस्वार्थी काम तुमच्या मृत्युनंतरही तुमची ओळख कायम ठेवेल.
५) बडबड करणं टाळा
मानवी शरीर हे निसर्गाचा एक उत्तम आविष्कार आहे. मानवी शरीरासारखी गुंतागुंतीची रचना दुसरीकडे कुठंही बघायला मिळत नाही.
मनुष्याचं शरीर जितकं गुंतागुंतीचं तितकं ते नीट समजून घेतलं तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते.
आपल्या शरीरामध्ये पाच इंद्रिये असतात.
भाव गुण आणि वस्तूंचा अनुभव या पाच इंद्रियांद्वारे आपल्याला घेता येतो.
नाक, कान, त्वचा, डोळे आणि जीभ या पाच इंद्रियांचं प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे.
दोन डोळे दिलेले आहेत, दोन कान आहेत, नाकाला दोन मार्ग आहेत त्वचा संपूर्ण शरीरभर आहे पण जीभ मात्र एकच, असं का?
कारण प्रकृतीला असं वाटतं की तुम्ही भरपूर ऐकावं, भरपूर पहावं, ज्ञानग्रहण करावं आणि कमी बोलावं.
कारण अति बडबडी व्यक्ती ही स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देते.
६) जवळच्या व्यक्तींना कसं ओळखायचं?
तुम्ही नेहमी ऐकत असाल की आयुष्यात पुढे जायचं असेल तर जवळच्या लोकांची साथ द्यायला पाहिजे.
मात्र ही साथ देण्यापूर्वी, सोबत करण्यापूर्वी हे जाणून घ्या की तुमच्या जवळची व्यक्ती नेमकी आहे कोण?
ज्यांच्याशी तुमचे रक्त संबंध असतात ते जवळचे असतात? की मित्रमंडळी जवळचे असतात? हितचिंतक असतात?
आपल्या जवळची व्यक्ती तीच असते जी चांगल्या कार्यासाठी तुम्हाला प्रेरित करते.
पुढे जायला प्रोत्साहन देते.
ज्यांच्या मदतीमुळे सामाजिक नुकसान होतं ती व्यक्ती तुमच्या जवळची नाही, तुमची हितचिंतक नाही हे नेहमी लक्षात घ्या.
म्हणूनच तुमच्या हितचिंतक म्हणून तुम्हाला सोबत करणारे, सहकार्य करणारे, हुशारीने निवडा.
७) प्रगतीच्या मार्गावर आपल्या जवळच्या व्यक्तींपासून दूर व्हा.
तुम्ही ज्या व्यक्तीवर, ज्या तुमच्या कुटुंबावर प्रेम करता, त्यांच्या सोबत कायम राहण्याची तुमची इच्छा असते, त्यांच्यापासून लांब जाण्याची कल्पना ही तुम्हाला सहन होत नाही.
पण एका ठराविक काळानंतर आपल्या सुह्रदांपासून लांब जाणं खूप महत्त्वाचं ठरतं.
आई-वडिल प्रत्येक पावलावर मुलांना मार्गदर्शन करत राहिले तर मुलं स्वःतचा मार्ग शोधायला कसं शिकतील?
आयुष्यातले स्वतःच्या रस्त्यावरचे अडथळे ही मुलं कशी पार करतील?
आणि म्हणूनच एका विशिष्ट काळानंतर उबदार वातावरणातून बाहेर पडणं गरजेचं ठरतं.
८) सकारात्मक विचारांची शक्ती .
जुन्या काळातली एक गोष्ट आहे. एक व्यापारी कामानिमित्त बाहेर पडला आणि त्याच्यासमोर एक मांजर आडवी आली.
मांजर पाहून व्यापारी उलटा परत घरी गेला, आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहायला लागला.
तो पुन्हा जेंव्हा घरातनं बाहेर पडला तेंव्हा राजवाड्यापर्यंत जाणारं वाहन निघून गेलं होतं.
त्या वाहनातून तो राजाला भेटायला जाणार होता आणि एक भेटवस्तू राजाला देणार होता.
मात्र तो व्यापारी राजवाड्यात पोहोचला नाही म्हणून राजाने चिडून व्यापाराचा व्यापार बंद पाडला.
त्यामुळे चिडलेल्या व्यापा-याचं बायकोशी भांडण झालं.
बायको आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.
व्यापाऱ्याकडे आता कुटुंब नव्हतं की धनही नव्हतं.
मात्र त्यासाठी हा व्यापारी त्या मांजराला दोषी ठरवत होता.
त्याच वेळेला दुसरा एक व्यापारी राजाकडे जायला बाहेर पडला होता.
त्याच्या समोर सुद्धा ती मांजर आडवी गेली होती.
मात्र व्यापाऱ्यांनं तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं, आणि तो राजवाड्यात पोहोचला.
त्याच्यावरती राजा प्रचंड खुश झाला आणि त्याचा व्यापार वाढवायला त्याला प्रोत्साहन दिलंच, पण मोठं घसघशीत बक्षीसही दिलं.
घरी परतलेल्या त्या दुसरा व्यापाराच्या घरात आता आनंदीआनंद होता.
दोन्ही ठिकाणी एकच घटना घडली, मात्र दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या.
असं तुमच्या आयुष्यात ही घडत असतं. तुमच्या आयुष्यात नियतीचा एक मोठा वाटा असतोच, पण त्यापेक्षा महत्त्वाची ठरते ती तुमची प्रतिक्रिया.
तुमच्या सकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या आयुष्याला चांगला आकार देतो.
९) थकवा.
तुम्हाला असं वाटतं का की दिवसाला २४ तासां ऐवजी २६ तास असते तर विश्रांती घ्यायला एखाद दोन तास जास्त मिळाले असते.
कारण दिवसभराचं काम करता करता तुम्ही थकून जाता.
दिवसभर किती कष्ट करतो असं तुम्हाला वाटतं.
मात्र तुमच्या नजरेत जी व्यक्ती यशस्वी असते त्यांच्याकडे पण दिवसाचे २४ तासच उपलब्ध असतात.
मग ती माणसं यशस्वी का होतात ?
कारण ती माणसं असं काम निवडतात जे काम करताना त्यांना आनंद होतो.
त्यांना आपण काही अवघड नको असलेलं काम करतो असं वाटतंच नाही.
कारण तो त्यांच्या आनंदाचा भाग असतो.
तुमच्या मनाला रुचेल पटेल ते काम जर तुम्ही आनंदानं आणि समाधानानं केलंत तर तुम्हाला थकवा जाणवणार नाही.
१०) वेळ अमूल्य आहे.
तुमचं आयुष्य वाळूच्या घड्याळासारखं असतं.
जी वाळू वरच्या भागातून खाली पडलेली आहे ती तुमचा भूतकाळ आहे, आणि जी अजूनही वरच्या भागात शिल्लक आहे ती वाळू म्हणजे तुमचं भविष्य आहे.
वर्तमान तो अरुंद भाग आहे ज्यातून ती वाळू हळूहळू खाली घसरते आहे.
तुमच्याकडे जगण्यासाठी हाच छोटासा वर्तमानाचा क्षण आहे, ज्याचा वापर कसा करायचा आहे हे तुमच्या वागण्यामुळे ठरतं.
जे घडून गेलं त्याचं दुःख करत बसायचं की जे येणार आहेत त्याची वाट पहायची चिडायचं हे तुमच्या हातात आहे.
सगळं वर्तमानाच्या छोट्याश्या पटलावरती या क्षणातच घडणार आहे.
प्रसन्न आनंदी राहायचं असेल तर हाच तो क्षण आहे.
वाट पाहत राहिलात तर हा क्षणही भूतकाळात जमा होईल.
म्हणूनच आनंदासाठी, मदत करण्यासाठी कधीही वाट पाहू नका.
तुमच्या हातात आत्ताचा जो क्षण आहे त्याचा योग्य वापर करा.
कारण गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही.
तर मित्रांनो, श्रीकृष्णाने सांगितलेल्या या १० गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते कमेंट्स मध्ये सांगा आणि चातुर्याने जगण्याचा आनन्द घ्यायला शिका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very much appreciated your initiative,
Very nice and TRUE
Thanks for sharing