ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत.
“मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर!
एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे.
आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना प्रेरणास्थान मानतात.
नेमका काय आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्ष?
१९६४ ला एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रतीक्षा यांचं वयाच्या १६ व्या वर्षी सदाशिव कडू यांच्याशी लग्न झालं.
सदाशिव कडू हे SBI मध्ये बुकबाइंडर म्हणून काम करायचे.
लग्न झालं तेंव्हा प्रतीक्षा यांचं शालेय शिक्षणही पूर्ण नव्हतं.
तरीही लग्नानंतर त्यांना शिक्षण सोडावं लागलं.
एका मुलाचा जन्म झाला, आणि दुर्दैवाने केवळ वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला.
पतीचे शिल्लक असलेले पैसे घेण्यासाठी प्रतिक्षा यांना बँकेत जावं लागायचं.
मुलाचं संगोपन करायचं तर नोकरीची नितांत गरज होती, पण त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती.
म्हणून मग प्रतिक्षा यांनी नोकरीसाठी बँकेचीच मदत मागितली.
त्यांना बँकेत सफाई कामगाराची अर्धवेळ नोकरी मिळाली.
बाथरूम साफ करणे, खुर्ची-टेबल साफ करणे, झाडलोट, पुसणं अशी कामे त्या करायच्या, त्या बदल्यात त्यांना महिन्याला ६० ते ६५ रुपये मिळायचे.
बँकेसोबतच त्या इतर छोटी-मोठी कामंही करत राहिल्या. जेणेकरून मुलाचं संगोपन करता येऊ शकेल.
पण प्रतिक्षा यांना पक्कं माहिती होतं की त्यांचा जन्म केवळ या कामांसाठी नाही.
बँकेत काम करणाऱ्या लोकांना पाहून प्रतिक्षा यांनी जिद्दीने त्यांच्यासारखंच व्हायचं ठरवलं.
प्रतीक्षा यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांसमोर आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि काही बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी त्यांना मदत केली.
प्रतीक्षा दहावीच्या परीक्षेला बसल्या. त्यानंतर नाइट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बारावीची परीक्षा ही यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या.
खरंतर प्रतिक्षा यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती.
इतकी बिकट की, मुलानं त्यांच्याकडे बिस्किट मागितलं तर ते विकत घ्यायला, बसमधून एक स्टॉप आधी उतरून वाचलेल्या पैशातून बिस्कीट पुडा विकत घ्यावा लागायचा.
प्रतीक्षा यांनी १९९५ मध्ये मानसशास्त्रात पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांना लिपिक पदावर बढती मिळाली.
त्याआधी १९९३ मध्ये प्रतीक्षा यांनी बँक मँनेजर प्रमोद तोंडवळकर यांच्याशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं झाली.
प्रमोद यांच्या कुटुंबीयांना त्यांंचं हे नातं मान्य नव्हतं, त्यामुळे प्रमोद त्यांच्या कुटुंबातून बाहेर पडले आणि प्रत्येक पावलावर त्यांनी प्रतिक्षा यांना साथ दिली.
२००४ मध्ये प्रतीक्षा यांना प्रशिक्षणार्थी अधिकारी या पदावर बढती मिळाली .
आणि आयुष्याचा संघर्षाला न घाबरता लढणा-या प्रतिक्षा यांना यावर्षी म्हणजे जून २०२२ मध्ये सहायक महाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली.
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी, हार न मानता लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा प्रतिक्षा तोंडवळकर यांच्याकडून मिळते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.