घोरणारे लोक स्वतः निवांत झोपतात कारण त्यांच्या स्वतःच्या घोरण्याचा आवाज त्यांना येत नाही. कित्येक घोरणाऱ्या लोकांना हे मान्यच नसते की ते घोरतात. परंतु त्यांच्यामुळे घरातील इतरांची झोप मात्र डिस्टर्ब होते.
बहुतेकांना असे वाटते की घोरण्यावर काही उपाय नाही, परंतु ते खरे नाही. घोरण्यावर अनेक घरगुती उपाय शक्य आहेत. आज आपण ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
घोरणे ही झोपेशी निगडीत समस्या आहे. एखादी व्यक्ती झोपल्यानंतर अगदी सुरुवातीपासून ते झोपेत असताना केव्हाही घोरू शकते. घोरताना नाकातून किंवा घशातून आवाज येतो. श्वास घेतला जात असताना असा आवाज येतो. काही लोकांना घोरल्यामुळे घसा दुखण्याची समस्या येऊ शकते.
घोरण्याची समस्या का उद्भवते?
बहुतांश लोक घोरण्याच्या समस्येने ग्रस्त असतात परंतु त्यांना हा त्रास का होतो हे समजत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा झोपेत नाकाने स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या नाक आणि घशामध्ये तीव्र स्वरूपाची स्पंदने निर्माण होतात. त्याचा आवाज म्हणजेच घोरणे.
घोरण्याची लक्षणे
१. झोपेत श्वासोच्छ्वास करताना मोठ्या प्रमाणात आवाज येणे.
२. झोपेत काही वेळाने काही सेकंदसाठी श्वास थांबणे.
३. झोपेत श्वास न घेता आल्यामुळे एकदम हडबडून जाग येणे.
४. दिवसभर सुस्त वाटणे.
५. दिवसा झोप येणे.
६. खूप थकवा जाणवणे.
काय आहेत घोरण्याची कारणे?
तसे तर घोरण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारणे आज आपण जाणून घेऊया.
१. स्थूलपणा
वजन वाढणे हे घोरण्याचे प्रमुख कारण आहे. वजन वाढले की त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती मांसाचे आवरण वाढते. त्यामुळे झोपल्यावर श्वासनलिकेवर ताण पडतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तेव्हा घोरणे सुरु होते.
२. खूप जास्त प्रमाणात मद्यपान
खूप जास्त प्रमाणात मद्यपान करण्यामुळे गळ्याचे स्नायू प्रसरण पावतात. त्यामुळे श्वास घेताना घोरण्याचा आवाज येतो.
३. सायनस
हे घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे. सायनस मुळे नाकातील हवा आत घेणारी छिद्रे आकुंचन पावतात. वारंवार सर्दी होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी ती व्यक्ती घोरू लागते.
४. स्नायू कमकुवत होणे
वयानुसार किंवा झोपेच्या गोळ्या घेण्यामुळे तसेच जास्त प्रमाणात मद्यपान करण्यामुळे गळ्याचे व घशाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. कमकुवत झाल्यामुळे त्यातून जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात आणि ती व्यक्ती घोरू लागते.
५. टॉन्सिल्स वाढलेले असणे
टॉन्सिल्स वाढल्यामुळे घोरण्याची समस्या लहान मुलांमध्ये दिसून येते. तसेच जीभ जाड असेल तर लहान मुले घोरतात.
तर ही आहेत घोरण्याची निरनिराळी कारणे. ह्यावर खालील घरगुती इलाज करणे शक्य आहे.
१. पुदिना
पुदिन्यामध्ये नाक आणि घसा मोकळे करण्याचे गुणधर्म असतात. झोपण्याआधी दररोज पुदिन्याचे ३,४ थेंब तेल पाण्यात घालूने त्या पाण्याने गुळण्या केल्या की घोरण्याची समस्या कमी होते. तसेच एक कप उकळत्या पाण्यात १०, १२ पुदिन्याची पाने घालून ते काही काळ ठेवून द्यावे. पिण्याजोगे झाले की पानांसकट पिऊन टाकावे. हा उपाय नियमित केला की घोरणे कमी होते.
२. दालचिनी
झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात ३ चमचे दालचिनी पावडर घालून पिण्यामुळे घोरणे कमी होते.
३. लसूण
लसूण एकूण आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. झोपण्यापूर्वी २,३ लसणाच्या पाकळ्या चावून खाऊन पाणी प्यावे. त्यामुळे घोरण्याची समस्या कमी होते.
४. हळद
हळद अँटीबायोटिक आणि अँटीऑक्सिडंट असते. झोपताना कोमट दुधात हळद घालून पिण्यामुळे घोरणे कमी होते.
५. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी इनफ्लमेटरी गुणधर्म असतात. ऑलिव्ह ऑइल आणि मध समप्रमाणात मिसळून त्याचे दररोज सेवन केल्यास घशातील कंपने कमी होतात आणि घोरणे कमी होते.
६. वेलची
वेलचीचा सर्दी खोकल्यामध्ये औषधासारखा उपयोग होतो. रात्री झोपण्याआधी अर्धा तास वेलदोड्याचे ३, ४ दाणे कोमट पाण्याबरोबर घेण्यामुळे घोरण्याची समस्या कमी होते.
७. दूध
रोज रात्री झोपताना कोमट दूध पिण्यामुळे घोरणे कमी होते.
८. वाफारा घेणे
नियमितपणे वाफारा घेण्यामुळे नाकाचे आणि घशाचे रंध्र मोकळे होतात. त्यामुळे घोरणे कमी होते.
तर हे आहेत घोरण्याच्या समस्येवरचे घरगुती उपाय.
ह्याशिवाय आणखीही सोपे उपाय आहेत. ते खालीलप्रमाणे
1) रात्री खूप जास्त जेवण न करणे.
2) झोपताना योग्य उशी घेऊन योग्य स्थितीत झोपणे.
3) वजन आटोक्यात ठेवणे.
4) नियमितपणे व्यायाम करणे.
5) फार जागरण न करणे.
6) झोपेच्या गोळ्या न घेणे.
7) मद्यपान न करणे
8) कपालभाती आणि प्राणायाम नियमित करणे.
ह्या सर्व उपायांनी घोरण्याची समस्या नक्कीच कमी होते, हे उपाय जरूर करून पहा.
हे उपाय करूनही तुमची समस्या कमी होत नसेल तर कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.