“स्वप्रतिमा” आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी……

self-image

जगात आपण किती आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण आपल्या स्वतःच्या नजरेत कसे आहोत. कारण जगाने तुम्हाला त्रास दिला काय नी कौतुक केलं काय, एकदा का तुम्ही स्वतःची विशिष्ट प्रतिमा बनवली की तीच आयुष्यभर जपता. म्हणजेच स्वतःची स्वतःविषयी मनात बनवलेली प्रतिमा तुमचं जगणं ठरवत असते. मग ही प्रतिमा तयार तरी कशी होते? ती चांगली किंवा वाईट का बनते? ती बदलता येऊ शकते का? असे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडतील, कारण जर स्वप्रतिमा ठरवणार असेल की आपण किती आनंदी किंवा यशस्वी जीवन जगतो तर ती कशी आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणायची ते आपण बघू.

सर्व प्रथम ही स्वप्रतिमा कशी बनते हे आपण पाहुयात. ही प्रतिमा आपण करत असणाऱ्या विचारांवर व समजुतीवर बनते. हे विचार किंवा समजुती तयार होण्यास काही गोष्टी कारणीभूत असतात. त्यात आपल्या भूतकाळात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी, यशापायशाचे धक्के, कोणी तरी आपला केलेला छळ, पाणउतारा, मानखंडना आणि लहानपणी मनावर झालेले संस्कार अशा बऱ्याच गोष्टी यास कारणीभूत आहेत. या गोष्टींवरून आपण आपल्या सकारात्मकतेचे किंवा नकारत्मकतेचे महाल मनात बांधलेले असतात. ज्यावेळी आपलं मत विशिष्ट घटनेसाठी असाच का विचार करत? असा प्रश्न ज्यावेळी आपल्याला पडतो त्यावेळी, आपल्याला जाणवू लागेल की या घटनेच्या मताबाबत आपला भूतकाळ जबाबदार आहे. आपण आपल्या पूर्वग्रहदूषित मतांचा धांडोळा घेऊन वर्तमानातील स्वप्रतिमा व इतर मते बनवलेली असतात. मग यात विशिष्ट गोष्ट आपण करू शकू किंवा नाही, हे ठरवण्यासाठी आपली स्वप्रतिमा महत्वाची असते.

ज्यावेळी मनोमन तुम्हाला वाटत की ही घटना आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो तर तसे करण्यास तुम्ही सर्वप्रथम सकारात्मक पाया रचता. ज्यावर तुमचं यशापयश ठरणार असतं. सतत आपण ही गोष्ट करू शकतो असा विश्वास तुमच्या मनात अगोदरपासून असेल, तर त्या सतत विचार करण्याने आणि त्या अनुषंगाने कृती करण्याने आपण यशाच्या मार्गावर पादक्रमण करत जातो इतकं मात्र निश्चित. जर हाच विचार उलटा असेल आणि गतकळाच्या काही कडवट आठवणी तुम्ही हृदयात सांभाळून असाल तर मात्र परिणाम नकारात्मक बघायला मिळतील. अपयशाशिवाय दुसरं काहीच पदरात नसेल.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर आपल्या मनात असणारी नकारात्मक प्रतिमा पुसून आपण जीवन सकारात्मक किंवा चांगल्या विचारांनी जगू शकतो. जगात श्रेष्ठ होऊन गेलेली लोक कधी ना कधी आयुष्यात हरलेली असतात, ठेचा खाल्लेल्या असतात, सामाजिक दाहकतेने मनाला चटके बसलेले असतात पण तरीही ते आयुष्य यशस्वीपणे जगू शकले कारण कोणत्याही संकटांना तोंड देण्याची उमेद त्यांनी आपल्या मनात तेवत ठेवली होती. कोणाला शाळेत “ढ” किंवा “मठ्ठ” ठरवण्यात आलं, कोणाला वारंवार आपल्या व्यवसायात हार मानावी लागली, कोणाला जे हवं होतं ते कधीच मिळालं नाही पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही ती म्हणजे स्वतःवर विश्वास आणि धीर धरण्याची वृत्ती.

काही गोष्टींना फळ लागायला उशीर लागतो, कधी आपली तपश्चर्या कमी पडते म्हणून एका वेळेकरता अपयशी ठरतो याचा अर्थ प्रत्येकवेळी असंच घडेल असं नसत. अब्राहम लिंकन, गांधीजी, आइन्स्टाइन अशा किती तरी जणांची उदाहरण सांगता येतील की जे प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकले नाही पण त्यांनी सातत्याने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून व स्वप्रतिमा बदलून यश संपादन केलं.

आपण एका माणसाच उदाहरण घेऊ या, ज्याचा चेहरा एका अपघातात विद्रुप झाला आहे. प्रत्येकवेळी ज्यावेळी तो दाढी करतो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील जखमेची खूण त्याला निराश व्हायला भाग पाडते कारण आधीचा चेहरा त्याला आठवत राहतो. आता आपण पहिल्यासारखे सुंदर दिसत नसल्याची खंत त्याच्या मनात भरून राहते. तो हळूहळू नैराश्याच्या गर्ततेत खोलवर बुडू लागतो. पण काही वेळानंतर त्याला प्लास्टिक सर्जनबद्दल कळत आणि तो आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या खुणेवर इलाज करतो. जी कालवर चेहरा विद्रुप करणारी खूण होती ती निघून गेल्यामुळे हरवलेला आत्मविश्वास म्हणा किंवा नकारात्मक विचारांच जाळ म्हणा, नाहीसं झाल्याने पुन्हा मनात उमेद निर्माण होऊन त्याची गाडी रुळावर येते. जर बारकाईने बघाल तर जे विचार त्याने मनात केले होते त्याने त्याला अस्वस्थता जाणवली आणि ते विचार निघून जातातच तो पुर्ववत आत्मविश्वासी झाला. चेहऱ्यावर असणारी जखम भरण ही तशी बघायला गेलं तर गौण गोष्ट आहे परंतु इथं मात्र वेगळं घडताना दिसून येत. असेच आपणही आपल्या मनात आपल्याबद्दल विविध प्रतिमा निर्माण करून ठेवलेल्या असतात ज्या योग्यवेळी आपल्याला नकारात्मक विचार करायला भाग पाडतात. मग अशावेळी कोणी आपल्याला कितीही समजावलं तरी आपण मात्र आपल्या मनाचं मानून रस्ता हरवल्यासारखं फिरत राहतो. त्यामुळे स्वतःची स्वप्रतिमा बदलणं म्हणजेच ती चांगली बनवणं गरजेच आहे.

ज्यावेळी तुमची स्वतःबद्दल असणारी प्रतिमा शाबूत आणि सुरक्षित असेल त्यावेळी तुम्ही चांगलं आणि आत्मविश्वासी जीवन जगत आहात असा अनुभव घ्याल. ज्यावेळी तुम्ही स्वतःबद्दल असुरक्षित आणि धोकादायक वाटून घ्याल त्यावेळी अनेक चिंता, काळज्यांची वारुळं तुमच्या मनाला पोखरत जातील. ज्यावेळी तुम्हाला स्वतःबद्दल लाज वाटत राहील त्यावेळी तुम्ही जगापासून दूर पळाल, स्वतःला लपवण्याचा प्रयत्न कराल. जीवनात काहीही सर्जनशील करण्याऐवजी एकटेपण वाढवत जाऊन निराश होऊन बसाल. असेच बरेचसे विचार आपण स्वतःबद्दल केलेले आहेत, जसं की मी खूप काळा आहे, मी खूप जाड आहे, मला काहीच येत नाही, मी कधीही पहिला येऊ शकत नाही, अमुक तमुक गोष्ट करणं हे मला कधीच शक्य होणार नाही. असे किती तरी वाक्ये आपण आपल्या मनात साठवून ठेवलेली आहेत, जे आपल्या सुखी आयुष्यातील चालताना पायाला बांधून घेतलेले दगड आहेत, जे आपले पाय मागे खेचतात. स्वतःबद्दल मनात असणारी नकारात्मक प्रतिमा आपल्या दुःखाच मूळ आहे ती बदलताच नव्या गोष्टी नव्याने शिकता येतात, प्रयत्नाने यशस्वी होता येत.

जीवनाच्या प्रवाहात सगळ्याच गोष्टी काही तुमच्या आमच्या मनासारख्या घडत नाहीत. आणि त्यामुळे नकळतच आपली प्रतिमा नकारात्मक होत जाते. आणि हि नकारात्मकता धुऊन काढण्यासाठी सर्वप्रथम स्वतःची वास्तव प्रतिमा निर्माण करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही चांगले किंवा वाईट म्हणजे काही कमतरता असलेले असा. कारण प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कमतरता हि असतेच. आहे त्याचा स्वीकार करा. मग कोणी “ढ” असू शकेल, कोणी दिसायला कृरुप असेल तर कोणी गरीब असू शकेल. स्वतःचा आहे तसा स्वीकार केल्याने पुढचा मार्ग आपल्याला आपोआप नजरेस पडू लागेल.

बऱ्याचवेळा संकट येतील, कधी त्रास होईल तर कधी धीर खचेल. पण आपल्याला हव्या असलेल्या इप्सितस्थळी पोहचेपर्यंत आपण हटायचं नाही असं ठरवलं तर नक्कीच यशस्वी होण्याचा पाया मनातल्या मनात तयार झाला म्हणून समजा. स्वतःत असणारे सामर्थ्य आणि उणिवा ओळखायचा प्रयत्न करा. जे सामर्थ्य आहे ते उत्तरोत्तर वाढवत न्यायला हवं आणि ज्या कमतरता किंवा उणिवा आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. या उणिवा सामर्थ्यात बदलायला हव्यात.

आपणास हवे असलेले बदल जीवनात उतरवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या आता आपण बघुयात. शिकणं, शिकलेल्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी कृती करणं आणि या सर्व गोष्टी करताना ते अनुभवणं, याबरोबरच चांगल्या विचारांची जोड देणं, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचं मनातल्या मनात चित्रण करणं या एका छोट्याशा सवयीला आपल्या अंगी भिनवून सुद्धा आपण यशाच्या व आनंदी जीवनास सुरुवात करतो.

ज्याप्रमाणे आपण आपल्या जुन्या झालेल्या चपला टाकून देतो, विरलेले कपडे वापरायचं बंद करतो अगदी हेच तत्व आपण आपल्या विचारांना का लागू करत नाही? जे विचार मनात अनावश्यक वादळ उठवतात, जी मनात भरून राहिलेली रागाची धगधगती ज्वाला आपणाला आतल्या आत जाळते आहे, जे चिंतेच मनात असणार मोहळ आपला प्राण कासावीस करण्यास उद्युक्त करत ते आपल्याला सोडवता का येत नाही?….. तर जे नियम जुनाट कपड्याना आणि चपलांना आपण लावले आहेत ते मात्र आपण आपल्या विचारांना किंवा मनात असणाऱ्या गोंधळाला लावलेले नाहीत. भूतकाळातील विचारांची मगरमिठी आपल्याकडून सोडवत नाही म्हणून आपल्या जीवनात अशांतता, नकारत्मकता भरून राहिलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रयत्नपूर्वक त्याग करण्यास आपणास शिकावं लागेल. तेव्हा आपली स्वप्रतिमा उन्नतीच्या मार्गावर प्रवेश करेल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

व्यस्ततेचा मनोविकार
मनातलं जंगल…
उत्कृष्टतेचा ध्यास


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 Response

  1. Shobha Wagle says:

    सकारात्म विचार सदैव प्रगती पथावरच नेतात हे मस्त समजावले.छान लेखन शैली. लेखआवडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!