क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी विशेष

सावित्रीबाई फुले मराठी बातम्या

ज्योत बनून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्या जीवनात प्रकाश घेऊन येणारी क्रांतिकारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले.

पावलोपावली सत्वपरीक्षा देत सावित्रीबाई काट्यातून फुलं वेचत गेल्या.

आज घराघरातून शिकलेली, सवरलेली उंच भरारी घेणारी मुलगी आपल्याला बघायला मिळते ती केवळ सावित्रीबाईंमुळेच.

पहिली भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं झाला.

1840 ला ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचं लग्न झालं तेव्हा सावित्रीबाई होत्या जेमतेम 9 वर्षाच्या तर ज्योतिराव फुले होते 13 वर्षाचे.

लग्न होऊन सासरी येताना सावित्रीबाईनी ख्रिश्चन मिशनरीनं दिलेलं एक पुस्तक आणलं होतं.

ज्योतिरावांना शिक्षणाचा हा मार्ग आवडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवलं.

सावित्रीबाईंना प्राथमिक शिक्षण ज्योतिरावांनी दिलं

त्यानंतरच्या शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवाळकरांनी उचलली.

अहमदनगरमध्ये अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी शिक्षक प्रशिक्षण वर्ग घेतलेला होता. त्यात सावित्रीबाई सहभागी झाल्या.

तर दुसऱ्यांदा पुण्यातला एका शाळेत आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण वर्गात ही त्यांनी सहभाग नोंदवला.

ज्योतीरावांचा सांभाळ त्यांची मावस आत्या सगुणाबाई यांनी केलेला.

इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून सगुणाबाई काम करायच्या. त्यामुळे त्यांना इंग्रजीही बोलता यायचं.

सावित्रीबाईं बरोबर सगुणाबाईंनी ही शिक्षण आणि शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं.

1847 ला वंचित मुलांसाठी सगुणाबाईंना शिक्षक नेमून एक शाळा सावित्रीबाई आणि जोतीरावांनी सुरू करून दिली. पण ही शाळा फार दिवस सुरु राहिली नाही.

त्यानंतर जी शाळा सावित्रीबाईंनी सुरु केली त्या शाळेची इतिहासाला नोंद घ्यावी लागली.

1 जानेवारी 1848 ला पुण्यात बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली.

आज आपण कल्पनाही करू शकणार नाही की अतिशय कर्मठ वातावरणात मुलींची शाळा सुरू करणं हे सावित्रीबाईंचं किती मोठं धाडस होतं.

शाळेच्या वाटेवरती येता-जाताना होणारा चिखल, शेणाचा मारा, प्रचंड विरोध, धमक्या यांना न जुमानता सावित्रीबाईंनी हाती घेतलेले व्रत चालूच ठेवलं.

इतकंच नाही तर 4 वर्षात 18 शाळा सावित्रीबाईंनी सुरू केल्या.

भारतीय व्यक्तींनी मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा म्हणजे सावित्रीबाईंनी सुरू केलेली भिडे वाड्यातली ही मुलींची शाळा.

सुरुवातीला 6च मुली शाळेत आल्या पण वर्ष संपता संपता मुलींची संख्या 40 ते 45 इतकी झाली.

प्रचंड विरोध पत्करून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं काम सावित्रीबाईंनी जोतीरावांच्या साथीनं केलं.

केवळ मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देणं एवढंच सावित्रीबाईंचं कार्य मर्यादित नव्हतं, तर मुलींना माणूस म्हणून जगण्यासाठी अनेक संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या.

त्याकाळी बारा तेरा वर्षाच्या लहान मुली विधवा बनत. कुणाचा आसरा नसलेल्या या मुली एखाद्या नराधमाची शिकार ठरत.

त्यातून गरोदरपण आलं तर अशा मुलींसमोर मरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसायचा. अतोनात छळ नशिबी यायचा.

या मुलींना ज्योतिरावांनी आश्रय दिला. सावित्रीबाईंनी त्यांचं बाळंतपण केलं.

अशाच एका विधवेचं मूल दत्तक घेऊन सावित्रीबाई आणि जोतीरावांनी त्याचं नाव यशवंत ठेवलं.

त्याकाळी समाजात विधवा स्त्रियांचे केस कापण्याची प्रथा जी केशवपन म्हणून ओळखली जाते ती सुद्धा सुरु होती.

ही जुलमी प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा सावित्रीबाईंनी कल्पकतेने लढा दिला.

ज्योतिराव यांच्या निधनानंतर दत्तकपुत्र यशवंतला चितेला अग्नि देण्यासाठी विरोध झाला, तेव्हा सावित्रीबाईनी स्वतः पुढे येउन अग्नी दिला.

अनिष्ट प्रथांचा असुर सावित्रीबाईंनी वेळोवेळी ठेचला आणि महिला आणि मुलींना मोकळा श्वास घेऊ दिला.

काळ्याकुट्ट अंधारात ज्योत म्हणून पुढं आलेली ही सावित्री लेकी सुनांना मार्ग दाखवणारी मशाल झाली.

जोतीरावांच्या निधनानंतर सत्यशोधक परिषदेचं कामही समर्थपणे सावित्रीबाईनी सांभाळलं.

प्रचंड विरोध पत्करून कामाचा डोंगर उभा करणाऱ्या सावित्रीबाईंनी मनाची संवेदनशीलता मात्र हरवू दिली नाही.

इतक्या सगळ्या व्यापात आहे त्यांनी आपल्या भावना काव्यबद्ध, शब्दबद्ध केल्या.

१८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकशी सुबोध रत्नाकर ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली.

“जा, शिक्षण मिळवा” ही सावित्रीबाईंची कविता प्रसिद्ध आहे.

सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. तिथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता.

त्याकाळात सावित्रीबाईंनी भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्या म्हणून ही काम केलं.

1896 ला दुष्काळ पडला तेंव्हा सावित्रीबाईंनी अन्नधान्य कपडे यांचा गोरगरिबांना पुरवठा केला.

त्यापाठोपाठ 1897 ला प्लेगची महाभयंकर साथ आली.

इथेही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. पुणे नगरपालिकेला पत्र लिहून उपाययोजना करायला सांगितल्या.

आपण केवळ काठावरून सूचना न देता स्वतः मैदानात उतरल्या.

सावित्रीबाईंनी या साथीत दत्तक पुत्र यशवंतला बरोबर घेऊन रुग्णसेवा केली.

याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सावित्रीबाईंना प्लेगन गाठलं.

10 मार्च 1897 ला ही क्रांतीची ज्योत कायमची पंचत्वात विलीन झाली.

मात्र या क्रांती ज्योतीचा प्रकाश आज ही प्रत्येक घरातल्या लेकी सुनांच्या मार्गावरती पसरून काळाकुट्ट अंधाराला दूर लोटतो….

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!