महाराष्ट्राची शान असणारे, हे १५ किल्ले तुम्ही पाहिले आहेत का?

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा

असं ज्या महाराष्ट्राचं वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे त्या महाराष्ट्रात दगडांचे चिरे किल्ले बनून आजही उभे आहेत.

तुम्हाला अंदाज आहे का महाराष्ट्रात किती किल्ले असतील?

तब्बल 350 किल्ले महाराष्ट्राने स्वत:च्या अंगाखांद्यावर बाळगलेले आहेत.

आश्चर्य वाटलं ना?

किल्ल्यांच्या संख्येचं आश्चर्य ओसरलं की महाराष्ट्राचे हे प्राचीन किल्ले त्यांच्या भव्यतेने, शौर्याच्या कहाणीने तुम्हांला थक्क करून सोडतील.

या किल्ल्यांमधून इतिहासाच्या पाऊलखुणा तुम्हाला सापडतील.

कसं होतं, त्या वेळचं जीवन याची झलक सुद्धा तुम्हाला या किल्ल्यांमुळे लक्षात येईल.

मराठी योद्धांचा पराक्रम, त्यांचं जीवन पाहताना आज तिथलं निसर्गसौंदर्य सुद्धा तुम्हाला भुरळ घालेल आणि ट्रेकिंगचा थरारक अनुभव सुद्धा मिळेल.

साडेतीनशे किल्ल्यांची एकदम माहिती देणे अवघड आहे ना?

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला निवडक किल्ल्यांची सफर घडविणार आहोत.

चला तर मग सुरवात करुया रायगडपासून

१) रायगड- जिथं शिवराज्याभिषेक झाला तो महाराष्ट्राच्या मनात वसणारा किल्ला म्हणजे रा मराठा अभिमानाचं प्रतीक.

रायगड हा ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचा किल्ला आहे.

समुद्रसपाटीपासून 820 मीटर उंचीवर असणाऱ्या या किल्ल्याच्या भिंती अनेक ऐतिहासिक प्रसंगाच्या साक्षी आहेत.

मराठी स्त्रीचं वाघाचं काळीज बघायला मिळालं त्या हिरकणीचं धाडस घडलं ते ही या रायगड किल्ल्यातच.

युरोपियन लोक याला पूर्वेचं जिब्राल्टर म्हणत. याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज होते.

1659 साली राजचंद्रजी मोरे यांच्याकडून रायगड मराठ्यांनी जिंकला.

मराठी राज्याचा पहिला वैभवशाली राज्याभिषेक सोहळा सुद्धा याच किल्ल्यावरती रंगला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा गड मोगलांच्या आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

वर्षानुवर्ष हल्ले झेलून सुद्धा हा किल्ला आजही आपलं रांगड वैभव जपत ताठ मानेनं उभा आहे…

रायगड किल्ल्याचा जरतारी इतिहास, भव्य वास्तुकला, सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या हिरव्यागार द-यांचं दृश्य आणि गंगासागर तलाव दुर्गप्रेमींना आपल्याकडे खेचून आणतात.

चढायला अतिशय अवघड असणा-या या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 1737 पायऱ्या सर कराव्या लागतात.

रायगडची अवघड चढण ट्रेकर्सना कायमच खुणावते.

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक रायगड मानला जातो.

रायगड

  • रायगड पाहण्याची वेळ 8 ते 5
  • प्रवेश फी -30 रुपये
  • जवळचा विमानतळ- मुंबई आणि पुणे
  • जवळचे रेल्वे स्टेशन -माणगाव

मुंबईपासून 163 तर पुण्यापासून 131 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला माणगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त 17 किलोमीटर वर आहे. खाजगी वाहनांनी सुद्धा तुम्ही रायगडला जाऊ शकता.

२) राजमाची

पारंपरिक होळीचा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी शेकडो लोक आजही जिथे येतात तो गड म्हणजे राजमाची.

पायवाटेने जाताना चिक्कार धबधबे, द-या, टुमदार खेडी नजरेला पडतात.

एखाद्या चित्रकाराला प्रेरणा देणारा असा हा गड.

राजमाचीच्या पायवाटेवरचा नजरा बघत थांबू नका, कारण राजमाचीच्या तटबंदीच्या शिखरापर्यंत धाव तुम्हाला घ्यायला हवी. तरच तुम्हाला श्रीवर्धन आणि मनरंजन वरून दिसणारे दृश्य बघून आयुष्याची सार्थकता जाणवेल.

पावसाळ्याच्या दिवसात तर निसर्गाचा अनोखा नजारा तुम्हाला राजमाचीवर पाहायला मिळतो.

किल्ल्यांमध्ये वैष्णवी मंदिर आणि पाण्याचे साठे तुम्हाला ऐतिहासिक कालीन जीवनाचे दर्शन घडवतात.

राजमाचीची सफर म्हणजे ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव.

राजमाची

  • राजमाची पाहण्याची वेळ ८ ते ६
  • प्रवेश फी – फ्री
  • जवळचा विमानतळ मुंबई पुणे
  • जवळचं रेल्वे स्टेशन कर्जत

मुंबईहून कर्जत मार्गे कोंडाणा गावाकडून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता. हा साधारण तीन ते चार तासांचा प्रवास आहे. पुण्यावरून जाणार असाल तर लोणावळ्यातून उधेवाडीला जा आणि 30 ते 40 मिनिटात राजमाची सर करा.

दोन्ही मार्ग जरा खडबडीत आहेत आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जरा जास्त धोकादायक होतात.

त्यामुळे ट्रेक करताना विचार करूनच नियोजन करा

३) शिवनेरी

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन जन्मस्थान म्हणजे शिवनेरी.

या किल्ल्याभोवती सतराव्या शतकातील लष्करी तटबंदी आहे.

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर जवळ हा किल्ला उभा आहे.

छोट्या ट्रेकसाठी आणि नव्या ट्रेकर्ससाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.

शिवनेरी किल्ल्यावर गंगा आणि यमुना नावाचे वर्षभर वाहणारे झरे आहेत.

किल्ल्याचे मधधोमध असणारा तलाव आणि वाटेत जागोजागी बहरलेल्या बागा या थकलेल्या मनाला नवसंजीवनी देतात.

  • किल्ला पाहण्याची वेळ -5.30 ते 7
  • प्रवेश फी -25 रु.
  • जवळचा एअरपोर्ट पुणे
  • जवळचं रेल्वे स्टेशन पुणे

shivneri

पुण्यापासून 94 किलोमीटर वर जुन्नर मध्ये वसलेल्या या किल्ल्यावरती दोन किलोमीटरचा ट्रेक तुम्हाला करता येतो.

मुंबई आणि पुणे दोन्हीकडून जायला सोयिस्कर मार्ग आहे.

मुंबईतून एक्सप्रेसवे तर पुण्यातून जुन्या मुंबई हायवेनं शिवनेरीवर पोहोचता येतं.

४) तुंग

पवना लेकच्या. नजरेतून ओव्हल शेपचा हा किल्ला तुम्हाला अनुभवता येतो.

समुद्रसपाटीपासून 1075 मीटर उंचीवर हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.

1600 सालात आदिलशाही घराण्यानं बांधलेला हा किल्ला कसा बांधला असेल? याचं अनेकांना आजही आश्चर्य वाटतं.

इथे मात्र ट्रेकिंग करायला अनुभवी गडी पाहिजे.

कारण तुंग या नावाचा अर्थच मुळी कठीण असा आहे.

त्यामुळे इथला ट्रेक अवघड आहे.

पण एकदा का ही अवघड चढण पार करून तुम्ही शिखरावर पोहोचला तर तुम्हाला नितांत सुंदर दृश्य नजरेत साठवता येईल, आणि तुमच्या श्रमाचे सार्थक होईल.

गडावर तुम्ही तुंगी देवी आणि गणपती चे दर्शन ही घेऊ शकता.

  • तुंग गड पाहण्याची वेळ संपूर्ण दिवस
  • प्रवेश फी-फ्री
  • जवळं रेल्वेस्टेशन -लोणावळा
  • जवळचा विमानतळ -मुंबई एअरपोर्ट

तुंग

लोणावळ्यापासून मळवली पर्यंत जाऊन तुंगला जाता येतं. मळवली रेल्वे स्टेशन पासून हा गड फक्त 12 किलोमीटरवर आहे.

५) प्रतापगड

जावळी खोऱ्यात वसलेला, महाबळेश्वर पासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणाऱ्या प्रतापगडला अनेक पर्यटक सातत्याने भेट देतात.

अफजलखानाशी, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक लढाई याच गडावर झाली.

किल्ल्यावर स्वराज्याच्या बऱ्याच घडामोडी ही घडल्या.

आजच्या घडीला तुम्ही किल्ल्यातला किल्ल्यातले तलावही पाहू शकता.

यातले चार तलाव पावसाळ्यामध्ये ओसंडून वाहत असतात.

किल्ल्यातून खालचा मराठमोळ्या गावांचा नजरा आजही पाहायला मिळतो.

समुद्रसपाटीपासून 1080 मीटर उंचीवर असणारा हा किल्ला त्याच्या मोहकतेने पर्यटकांचे मन वेधून घेतो, आणि ट्रेकर्सना ट्रेकिंगसाठी साद घालतो.

या किल्ल्यावरती ट्रेक करायला बरेच जण उत्सुक असतात.

कारण इथला ट्रेकिंगचा अनुभव थरारक असतो.

  • किल्ला पाहण्याची वेळ सकाळी 8 ते 6.30
  • प्रवेश फी- फ्री
  • जवळचे रेल्वे स्टेशन -सातारा आणि पुणे
  • जवळचा विमानतळ पुणे मुंबई

प्रतापगड

महाबळेश्वरला बाय रोड जाऊन किंवा रेल्वेने पोचून तिथून तुम्ही प्रतापगडला भेट देऊ शकता.

६) मल्हार गड

मराठ्यांनी बांधलेला शेवटचा गड हा मल्हारगड.

दिवेघाटावर टेहाळणी बुरुज म्हणून हा बांधण्यात आला होता.

शहराच्या गजबजाटापासून दूर नेणारा असा हा किल्ला तुम्हाला प्रेमातच पाडेल.

वळणदार घाट आणि खोल द-यांनी या गडाचं चित्र अधिक उठावदार केलेलं आहे.

तुम्ही जर नशीबवान असाल तर हरिण रानडुक्कर यांची झलक तुम्हाला गडावरती पाहायला मिळेल.

घराच्या वरच्या बाजूनं भव्य जेजुरी मंदिर आणि पार्वती टेकड्यांचं दर्शनही होतं.

  • मल्हार गड पाहण्याची वेळ -24 तास
  • प्रवेश फी -फ्री
  • जवळचे रेल्वे स्टेशन -पुणे
  • जवळचा विमानतळ -पुणे एअरपोर्ट

मल्हार गड

पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरवरती मल्हारगड आहे त्यामुळे बसन किंवा ट्रेननं सासवड जवळच्या सोनोरी गावापर्यंत पोचून तुम्ही मल्हार गडावरती जाऊ शकता.

७) कुलाबा किल्ला

अरबी समुद्राने वेढलेला कुलाबा किल्ला किंवा अलिबाग किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे.

इतिहासकारांच्या मते 300 वर्षाचा हा प्राचीन किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लष्करी तटबंदी म्हणून वापरला जायचा.

त्याकाळी हा किल्ला नौदलाचं प्रमुख केंद्र होता. ब्रिटिशांवरती हल्ला करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जायचा.

जलमार्गाने या किल्ल्यावर ती जाण्याचा पर्याय निवडला तर लाटांचा धीरगंभीर आवाज शहरी कलकलाटापासून तुम्हाला खूप दूर घेऊन जाऊ शकतो, याचा तुम्ही अनुभव घ्याल.

भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे कुलाबा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे

  • किल्ला पाहण्याची वेळ ६ ते ६
  • प्रवेश फी -15 रुपये
  • जवळचा विमानतळ मुंबई
  • जवळचं रेल्वे स्टेशन पेण पनवेल

कुलाबा किल्ला

अलिबाग, मुंबईशी रोड आणि जलमार्गाने सोडलेला आहे, त्यामुळे जेट्टी किंवा फेरीबोट मधून सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता, किंवा निसर्गरम्य रस्त्याचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता.

८) लोहगड

सोळाव्या शतकात बांधलेला एक लष्करी किल्ला म्हणून त्याला ओळखलं जातं, तो लोहगड किल्ला 5 वर्षांचा अपवाद वगळता कायम मराठा साम्राज्याचा एक भाग होता .

समुद्रसपाटीपासून 1033 मीटर उंच असलेला लोहगड किल्ला ट्रेकिंग साठी सर्वोत्तम मानला जातो.

विसापूर किल्ल्याला एका छोट्याशा पट्ट्यांनं जोडलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी पर्वणीच ठरतो.

कारण एका दिवसात दोन किल्ल्यांना भेटी देणं यासारखा आनंद नाही.

विशेषतः पावसाळ्यात गडावरची पायवाट अतिशय सुंदर होऊन जाते.

थोडस आणखीन पुढे जाऊन भाज्या लेणी सुद्धा तुम्ही बघू शकता.

कारनंही तुम्ही गडापर्यंत जाऊ शकता.

लोहगडाच्या शिखरावरून दिसणारे जलाशयाचे विहंगम दृश्य मोठं मनोहारी असतं.

  • लोहगड पाहण्याची वेळ- ९ ते ६
  • प्रवेश फी- फ्री
  • जवळचं विमानतळ -मुंबई, पुणे
  • जवळचं रेल्वे स्टेशन- मळवली रेल्वे स्टेशन

लोणावळा मुंबई आणि पुण्याला मध्यवर्ती ठरतं लोणावळ्यापासून लोकलनेही मळवलीला जाता येतं.

तिथून तुम्ही किल्ल्यापर्यंत सहज जाऊ शकता मळवली स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हा लोहगड आहे.

9) तिकोना

समुद्रसपाटीपासून 1,107 मीटर उंचीवर असणारा तिकोना किल्ला ट्रेकिंग साठी महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.

या टेकडीचा आकार त्रिकोणी असल्यामुळे या गडाचं नाव तिकोणा.

याला विमान गड असही म्हणतात, वितनगड असंही म्हणतात.

हा किल्ला कोकणातल्या पवन मावळ प्रदेशातला प्रमुख डोंगरी किल्ला आहे.

या किल्ल्यावर मंत्रमुग्ध करणारी बौद्ध आणि सातवाहन लेणी आहेत.

ही लेणी पाहून ध्यानामध्ये हरवून जाण्याचा तुमचा विचार पक्का होईल.

पण सह्याद्री मधली मनोहारी दृश्य पाहण्यासाठी जागे राहा, नीट डोळे उघडून पहा!

किल्ल्यात त्र्यंबकेश्वर महादेव वसतो, त्याच्या समोर तुम्ही नतमस्तक ही होऊ शकता.

  • तिकोना किल्ला पाहण्याची वेळ- सकाळी ८ ते संध्याकाळी ६
  • प्रवेश फी- फ्री
  • जवळचा विमानतळ मुंबई पुणे
  • जवळचं रेल्वे स्टेशन -लोणावळा कामशेत

तिकोना

लोणावळ्यातून तुम्हाला कामशेतला जायला वाहन मिळू शकतं. कामशेतहून ती तिकोना पेटला जाऊन तुम्ही किल्ला बघू शकता.

10) शनिवार वाडा

कात्रज तलावाचं पाणी पुण्यातल्या पेठेत आणून शनिवारवाड्यात खेळवलं होतं, हे आजही एक आश्चर्य मानले जात.

अनेक कारंज्यांनी आणि हौदांनी युक्त असा हा भुईकोट किल्ला एकेकाळी प्रचंड गजबजलेला होता.

शनिवारवाड्या मुळे मराठी काळातली शाही वास्तुकलेची झलक आपल्याला बघायला मिळते .

बाजीराव पेशव्यांनी हा शनिवारवाडा पुणे शहरात उभा केला. पेशव्यांचं ते निवासस्थान होतं.

आजही उभी असणारी भक्कम तटबंदी आपल्या पोटात अनेक गुपीतं बाळगून आहे.

मराठा साम्राज्याच्या शौर्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी शनिवारवाड्याला भेट द्यायलाच हवी

shaniwar wada

  • शनिवारवाडा पाहण्याची वेळ – सकाळी ८ ते संध्याकाळी ६
  • प्रवेश फी- 25 रुपये
  • पुणे शहराच्या हृदयात असलेला हा किल्ला एअरपोर्ट पासून 12 किलोमीटर अंतरावर ते आहे.

11) सिधुदुर्ग.

सशस्त्र सुसज्ज आरमाराची गरज ओळखून शिवाजी महाराजांनी समुद्राच्या खडकावरती उभा केलेला किल्ला म्हणजे मालवणचा सिंधुदुर्ग

100 पेक्षा जास्त पोर्तुगिज वास्तुविशारद, आणि हजारो भारतीय मजुरांच्या कौशल्यामुळे सिंधुदुर्ग 3 वर्षात उभा राहिला.

या किल्ल्यावरून क्षितिजापर्यंत दिसणारा अथांग समुद्र तुम्ही अनुभवू शकता.

  • किल्ला पाहण्याची वेळ – सकाळी ८ ते संध्याकाळी ७
  • प्रवेश फी -25 रुपये
  • जवळचं विमानतळ -दाभोली
  • जवळचं रेल्वे स्टेशन -कुडाळ

सिधुदुर्ग

कुडाळ रेल्वे स्टेशन पासून 45 किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला आहे.

१२) वसई

शूर, धोरणी, मनमिळाऊ चिमाजीअप्पा जे बाजीराव पेशव्यांचे धाकडे भाऊ होते, चिमाजी अप्पांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध मोहीम उघडून वसईचा किल्ला मिळवला आणि पोर्तुगीज सत्तेची मुळे छाटून टाकली.

6 व्या शतकातला हा किल्ला आहे.

ग्रीक व्यापाऱ्यांनं 6 व्या शतकात वसई किल्ल्याला भेट दिल्याचा उल्लेख आहे.

640 ला चिनी प्रवासी झुआन झांगने या किल्ल्याला भेट दिली होती, असंही सांगितलं जातं.

आज शूटिंग स्पॉट म्हणून हा किल्ला खूप लोकप्रिय आहे.

अनेक बॉलीवूडपटाचं शूटिंग इथं झालेलं आहे.

  • वसई किल्ला पाहण्याची वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 7
  • प्रवेश फी -फ्री
  • जवळचं रेल्वे स्टेशन – वसई रेल्वे स्टेशन

वसई

मुंबईतून लोकल्सनही तुम्ही वसईला जाऊशकता.

१३) सिंहगड

पुणे शहराच्या अगदी जवळ असणारा असणारा हा किल्ला मूळचा कोंढाणा.

तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन किल्ला परत मिळवला.

गड आला पण सिंह गेला म्हणून हा सिंहगड

मराठा साम्राज्यात अटीतटीनं गड मिळवणारी ही लढाई एक कटू आठवण बनून राहिलेली आहे.

सिंहगडला वरपर्यंत कारनेही जाता येतं किंवा दोन अडीच तासांची चढाई करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता.

समुद्रसपाटीपासून 1312 मीटर उंच असणाऱ्या या किल्ल्यावर बरेच चढ-उतार आहेत, जे शत्रूपासून संरक्षण यासाठी केलेले होते.

सिंहगडावरून खडकवासला धरण डोळे भरून पाहता येतं.

किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत.
एक ईशान्य भागात ज्याला पुणे दरवाजा म्हणतात, तर दक्षिण पूर्व भागातल्या दरवाजाला कल्याण दरवाजा म्हणतात.

छत्रपती राजाराम महाराजांची समाधी या किल्ल्यावर आहे.

काली मंदिर आहे हनुमानाचा पुतळा तुम्ही सिंहगडावर पाहू शकता.

त्याचबरोबर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिस्तंभ सुद्धा आहे.

  • सिंहगड पाहण्याची वेळ- सकाळी ८ ते संध्याकाळी ६
  • जवळचा विमानतळ- पुणे एयरपोर्ट
  • जवळचं रेल्वे स्टेशन -पुणे रेल्वे स्टेशन

सिंहगड

सिंहगड पुणे शहरापासून 30 किलोमीटर वरती आहे आणि शहरातल्या लोकल ट्रान्सपोर्ट ने जोडलेला आहे.

१४) दौलताबाद

औरंगाबादजवळची अजंठा वेरूळ ही प्रसिद्ध ठिकाण आपल्याला माहिती आहेत पण मराठ्यांच्या मुळावर तिचा पहिला घाव बसला ती महाराष्ट्राची राजधानी देवगिरी किल्ला जो अल्लाउद्दीन खिलजीने कपटाने जिंकला होता तो सुद्धा औरंगाबाद जवळ आहे.

अभेद्य असणारा हा किल्ला कुणालाही लढून जिंकता आला नाही.

हा किल्ला नेहमी कपटानं जिंकला गेलाय.

देवगिरी किल्ला नंतर दौलताबाद झाला.

औरंगाबाद पासून अवघ्या 15 किलोमीटर वरती हा दौलताबाद किल्ला आहे.

बाराव्या शतकात यादव रामकुमार भिल्लम याने हा किल्ला बांधला.

समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यातून दौलताबाद शहर हे दिसतं.

ट्रेकिंगसाठी हा किल्ला उत्तम मानला जातो.

  • किल्ला पाहण्याची वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ६
  • प्रवेश फी- २५ रुपये
  • जवळचा विमानतळ औरंगाबाद
  • जवळचे रेल्वे स्टेशन औरंगाबाद

दौलताबाद

औरंगाबाद विमानतळ आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशन तसेच औरंगाबाद शहरापासून अगदी जवळ असलेला हा किल्ला आपण आवर्जून पाहायलाच पाहिज

१५) प्रबळगड

बहामनी सुलतानांनी बांधलेला प्रबळगड पनवेल आणि कल्याण किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी होता.

मुरंजन हे या किल्ल्याचे मूळ नाव, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत त्याचं नाव बदललं गेलं आणि हा झाला प्रबळगड.

पश्चिम भागाच्या बाजूने किल्ल्याची पायवाट घनदाट जंगलाने व्यापलेली आहे, त्यामुळे इथला ट्रेक साहसी अनुभवांनी समृद्ध होतो.

  • किल्ला पाहण्याची वेळ- दिवसभर
  • प्रवेश फी – 25 रुपये
  • जवळचे विमानतळ: मुंबई
  • जवळचे रेल्वे स्टेशन: पनवेल रेल्वे स्टेशन

प्रबळगड

पनवेल हे मुंबईच्या लोकल रेल्वे आणि रोडवेजने सहज जोडलेलं आहे. पनवेलहून, किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असलेल्या ठाकूरवाडीला जाण्यासाठी तुम्ही स्थानिक गाडी भाड्याने घेऊ शकता आणि तेथून ट्रेक ही सुरू करू शकता.

महाराष्ट्रातले हे काही पाहायलाच हवे असे किल्ले.

त्यांची आपण थोडक्यात माहिती आज घेतली.

येणाऱ्या सुट्टीमध्ये तुम्ही यातल्या एखाद्या न पाहिलेल्या किल्ल्याची सफर नक्कीच आयोजित करू शकता.

तुमच्या गावात किंवा तुमच्या गावाजवळ असा कोणता अनोखा किल्ला आहे का? किंवा तुमचा आवडता किल्ला कोणता ? याविषयी आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “महाराष्ट्राची शान असणारे, हे १५ किल्ले तुम्ही पाहिले आहेत का?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय