भागबाजारा (Stock Market) मधे व्यवहार करताना आपण सर्वसाधारणपणे बाजारांच्या वेळेत आपला व्यवहार होइल असे सौदे (Orders) टाकतो . ह्या ऑर्डर्स आपण प्रचलित बाजारभावाप्रमाणे (Market Orders) किंवा विशिष्ट भावाने (Limit Orders) टाकतो हे आपल्याला माहीत आहेच .BSE /NSE सकाळी ०९:१५ ते दुपारी ०३:३० या वेळात सुरू असते. ही वेळ बदलून वाढण्याची नजीकच्या काळात शक्यता आहे. सध्या या वेळेपूर्वी १५ मिनिटाचे प्रीओपनिंग सेशन असते, यामधे आणि बाजार बंद झाल्यावर १० / २० मिनिटाच्या विश्रांतीनंतर, २० मिनिटाचे पोस्ट क्लोजिंगसेशन असते. या मध्येही व्यवहार होवू शकतात. ते कसे यासंबंधीची माहिती करून घेवूया.
बाजारात विविध गट कार्यरत असल्याने किंमतीत सतत फरक पडत असतो. हे भाव एका मर्यादेत रहावेत म्हणून बाजारात सर्कीट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर्सची यंत्रणा आहे .ती कशी चालते हे आपण मागील लेखात पाहिले. यात अकस्मात व खूप मोठा फरक पडला तरी बरीच पडझड होवू शकते. असे न होता समतोल किंमत मिळावी (equilibrium price) म्हणून या प्रणालीचा खूपच उपयोग होतो. प्रिओपन सेशन मधे आपण व्यवहार करण्याचे ठरवलेल्या शेअरचा आजचा खुला भाव (Opening Price) काय असेल ते ठरवले जाते. या भावानेच पहिला व्यवहार केला जातो .हा भाव प्रिओपनिंग सेशन मधे कसा ठरतो ते पाहूया. या सेशनची तीन भागात विभागणी केली आहे.
सकाळी ०९:०० ते ०९:०८ या आठ मिनिटात यात भाग घेणाऱ्या सर्वाना आपल्या मार्केट किंवा लिमिट ऑर्डर टाकता येतात याच कालावधीत त्या दुरुस्त (Modify) करता येतात किंवा रद्द (Cancel) करता येतात.
यापुढील ४ मिनिटात म्हणजे ०९:०८ ते ०९:१२ याकाळात कोणत्याही ऑर्डर टाकता येत नाहीत , बदलता येत नाहीत किंवा रद्दही करता येत नाहीत .या कालावधीत आजचा पहिला व्यवहार कोणत्या भावाने होइल ते ठरते. हा भाव ठरवण्याचे वेगवेगळे प्रमुख निकष आहेत. यामधे कालचा बंद भावाच्या (closing price) तुलनेत आज एका विशिष्ट किंमतीला असलेल्या समभागांच्या ऑर्डरची संख्या विक्रेते आणि खरेदीदार, या किंमतीला उपलब्ध समभागांची मागणी पुरवठा, या किंमतीला जुळणाऱ्या आणि न जुळणाऱ्या समभागांची संख्या यांचा विचार केला जातो. यामधे खालीलप्रमाणे कोणतीही एक प्रमुख शक्यता असू शकते. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज कमी अथवा जास्त अश्या —
१. एका विशिष्ट भावाला बऱ्याच ऑर्डर पुऱ्या होत आहेत आणि फारच थोड्या ऑर्डर शिल्लक रहात आहेत .तर ती किंमत म्हणजे आजचा सुरुवातीचा भाव असे समजले जाते.
२. दोन विशिष्ट भावांना सारख्याच ऑर्डर्स पूर्ण होत असतील तर ज्या किंमतीच्या सर्वात कमी ऑर्डर शिल्लक राहतील तो भाव कमी /जास्त काहिही असेल तरी आजचा सुरुवातीचा भाव समजण्यात येईल .
३. दोन विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात आणि शिल्लक ऑर्डर्सही सारख्याच रहातात .अशा परिस्थितीत जो भाव बंद भावाचे जवळ आहे (कमी जास्त कोणताही) तो आजचा सुरुवातीचा भाव ठरेल .
४. दोन्ही विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात .शिल्लक ऑर्डर्स सारख्याच रहातात आणि दोन्ही भाव हे कालच्या बंद भावाचे वर खाली सारख्याच अंतरावरुन आहेत अशा परिस्थितीत कालचा बंद भाव हाच आजचा खुला भाव होतो .
५. या कालावधीत व्यवहार न झालेले समभाग जेव्हा पहिला व्यवहार जुळून येईल तेव्हा तो ज्या भावाने होइल तोच आजचा खुला भाव असेल .
अशा तऱ्हेने मिळालेल्या समतोल किंमतीने (Equilibrium Price) ज्यानी ऑर्डर दिली आहे त्यांची व ज्यानी बाजारभावाप्रमाणे (Market Price) ऑर्डर टाकली आहे या सर्वांचे व्यवहार नोंदवले जावून मान्य केले जातात .
यापुढील काळात म्हणजे ०९:१२ ते ०९:१५ हा काळात शिल्लक राहिलेला काळ हा प्रिमार्केट आणि नॉर्मल मार्केट यामधील संक्रमणाचा कालावधी (Buffer Period) असून याकाळात शिल्लक राहिलेल्या सर्व लिमिट ऑर्डर्स नियमित ट्रेडिंग सेशनकडे वर्ग होतात .तांत्रिकदृष्ट्या पहिल्या ८ मिनिटांतच या ऑर्डर्स स्वीकारल्या जात असल्याने हे व्यवहार फक्त ८ मिनिटेच होतात .
बाजार दुपारी ०३:३० ला बंद झाल्यावर नियमीत हिशोब करण्यासाठी व्यवहार बंद होतात आणि ०३:४० ला BSE आणि ०३:५० ला NSE चे पोस्ट क्लोजींग सेशन चालू होते, ते २० मिनीटे चालते यामधे खरेदीदार आणि विक्रेते यांना एक्सचेंजने ठरवलेल्या दरानेच खरेदी /विक्री व्यवहार करता येतात .हा दर शेअर आणि डेरिव्हेटीवचे बाबतीत दुपारी ०३:०० ते ०३:३० या कालावधीतील सर्व व्यवहारांचा सरासरी भाव असतो .दर एक मिनिटांनी उलाढाल व सरासरी भाव नोंदवला जावून त्याची अंतिम सरासरी ३० मिनीटांनी काढली जाते . या वेळेत व्यवहार न झालेल्या शेअरचे बाबतीत शेवटचा व्यवहार ज्या भावास झाला तो भाव ही त्याचा बंद भाव असतो . रोजच्या रोज खरेदी करून विक्री करणारी किंवा विक्री करून नंतर खरेदी करणारे (Day Trader) यांना त्यांचे अपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर जर गुंतवणूकदाराना शेअरचा बंद भाव मान्य असेल तर त्याच दिवशी शेअर खरेदी करण्याची अधिकची संधी प्राप्त होते .
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.