लोकं रिटायरमेंट प्लॅनिंग का टाळतात? जाणून घ्या ही पाच कारणे

रिटायरमेंट हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक असं वळण की जिथून पुढचं आयुष्य हे बदलत जातं. एक तर वाढतं वय, त्यानुसार होणारे शारीरिक बदल, आजारपण आणि त्या अनुषंगाने समोर येणारी परिस्थिती यांचा विचार करून सावधपणे पुढे जावं लागतं.

गेल्या साधारणपणे दहा वर्षांत लोकांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे. ते आधीपासूनच रिटायरमेंट बद्दल गंभीरपणे विचार करुन मिळणारा पैसा योग्य ठिकाणी कसा गुंतवला जाईल याचा प्लान तयार करतात. त्यासाठी आर्थिक नियोजन करतात. व्यावसायिक सल्ला घेऊन गुंतवणूक करतात.

पण हे प्रमाण अजूनही खूपच कमी आहे. भारतातील एकूण लोकसंख्या विचारात घेतली तर रिटायरमेंट प्लानिंग बाबत लोकांमध्ये पाहिजे तेवढी जागरुकता दिसून येत नाही.

दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे ही संकल्पना अभावानेच आढळते. त्याऐवजी लोकं शॉर्ट टर्म गोल्स वर जास्त पैसे खर्च करतात.

असं का होत असावं ? तुम्ही सुद्धा यापैकी एक आहात का?

तुम्ही रिटायरमेंट प्लानिंग बद्दल विचार करता का?

त्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवता का?

रिटायरमेंट प्लानिंग हा दूरदृष्टीने आखलेला आणि भविष्याचा विचार करून तयार केलेला आराखडा असायला हवा. आणि मग जर वयाच्या साठाव्या वर्षी तुम्ही निवृत्त होणार तर पुढील तीस वर्षे लक्षात घेतली पाहिजेत.

माणसाचे सरासरी वय पंच्याऐंशी वर्षे मानून या वयापर्यंत व्यवस्थितपणे सर्व गरजा भागतील एवढी मोठी रक्कम साठाव्या वर्षांपर्यंत आपल्या हातात असली पाहिजे.

बऱ्याच लोकांना वाटतं की एखादा पेंशन प्लॅन असणारी योजना पाहून त्यात पैसे गुंतवले म्हणजे झालं रिटायरमेंट प्लानिंग. पण असं अजिबात नाहीय. ‘रिटायरमेंट प्लान’ या नावाने तुम्हाला खपवलेला तो एक मार्केटिंग प्लान आहे हे कृपया लक्षात घ्या.

आता एवढ्या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाकडे पुरेसं लक्ष का दिलं जात नाही?

जाणून घेऊया रिटायरमेंट प्लॅनिंग टाळण्यामागची कारणे यामागची कारणे.

१. रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे स्वार्थी विचार.

एका फायनान्शिअल प्लानिंग च्या व्याख्यानात श्रोत्यांना एक प्रश्न विचारला गेला.

नीट वाचा हा प्रश्न आणि त्याची उत्तरे!!!

तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आर्थिक उद्दिष्टे कोणती आहे?

मुलांचे शिक्षण, घर खरेदी, घेतलेले कर्ज फेडणे, मुलीचे लग्न वगैरे अशी अनेक उत्तरे मिळाली.

पण यात सर्वात रिटायरमेंट प्लानिंग बद्दलचा विचार अगदी मोजक्या 2-3 जणांनी बोलून दाखवला. या व्याख्यानाला आलेल्या लोकांचे वय हे ३० ते ५० च्या दरम्यान होते.

यानंतर क्षणभर शांत राहून वक्त्यांनी जे शब्द उच्चारले ते सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजेत.

“बहुतांश लोकांना रिटायरमेंट प्लॅनिंग गरजेची आहे हे मनाशी पक्के ठाऊक असते, पण ते ही गोष्ट मान्य करत नाहीत. कारण इतर जण आपल्याला स्वार्थी म्हणतील अशी भीती त्यांना वाटते.”

आणि हे इतर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच आईवडील, मुले, नातलग, मित्रमंडळी, पती किंवा पत्नी!!!

यांना आपण स्वार्थी आहोत असं का वाटू शकतं?

कारण रिटायरमेंट प्लानिंग करणं म्हणजे एक मोठी रक्कम जमविणे. काही वर्षं पुरेल इतकी मोठी गुंतवणूक आणि ती देखील स्वतः च्या गरजांसाठी.

भारतीय व्यक्तीची मानसिकता ही इतरांच्या गरजा आधी भागवणे आणि नंतर स्वतःचा विचार करणे अशीच आहे. अशावेळी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून काही नियोजन करणे हा स्वार्थ आहे असे मनात येऊ शकते.

पण हळूहळू का होईना, अशा प्रकारे विचार करण्याच्या सवयीत बदल होत आहे. आपल्या इच्छा, गरजा यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आपल्या स्वप्नांना गुंडाळून ठेवणे हे काही योग्य नाही. आणि भविष्याचा विचार करणे म्हणजे स्वार्थ मुळीच नाही.

२. अजून माझ्याकडे खूप वेळ आहे.

कल्पना करा की तुमचे वय ३० वर्षे आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही आहात.

आता तुमच्या मनात सर्वात प्रबळ इच्छा असेल ती घर विकत घेण्याची. किंवा आहे त्यापेक्षा जास्त पॅकेज कसं मिळेल? हाच विचार तुम्ही करता.

या काळात आपण एवढी धावपळ करत असतो की, कोणी रिटायरमेंट प्लानिंगचा विषय जरी काढला, तर आपण लगेच म्हणतो, “काय घाई आहे? आत्ता कुठे तिशी आलीय.”

याबाबत केलेल्या सर्वेक्षणात सुद्धा असंच दिसून आलंय की तरुण माणसे निवृत्तीचा फारसा विचार करतच नाहीत कारण अजून या गोष्टीला भरपूर वेळ आहे असंच त्यांना वाटतं. पण रोजच्या धावपळीत काळ कसा भरभर पुढे जातो हे कळतही नाही. आणि मग ४०, ४५ किंवा ५० व्या वर्षी जाग येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि आपण लवकर रिटायरमेंट प्लानिंग का केले नाही याचा पश्चात्ताप होतो.

म्हणून जेवढ्या लवकर सुरुवात करु तेवढं चांगलं. हळूहळू आपण सेव्हिंगची रक्कम वाढवत नेऊ शकतो.

३. ‘रिटायरमेंट गोल’ स्पष्ट नसणे.

पुढील दहा किंवा वीस वर्षांच्या काळात आपले आयुष्य कसे बदलणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. भविष्यकाळ चांगला असेल की वाईट हे आपल्याला कळणे शक्य नाही. पण जर भविष्यातील आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक असणारी तरतूद याबद्दल आपण काही कल्पनाच करु शकत नसलो तर मग त्याविषयी योजना तरी कशी बनवणार?

दूरदृष्टीचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. आपल्या पैकी बरेच जण उत्तम पगाराची नोकरी करत असतात पण त्यांना दर महिन्याला अकाउंटला जमा होणारा पगार एके दिवशी थांबणार याची नोंद घ्यावी असं मात्र वाटत नाही.

आणि निवृत्ती नंतरचे जवळपास तीस वर्षे आयुष्य आपण कसं काढणार हा विचारही करावासा वाटत नाही. त्यावेळी वयोमानानुसार तब्येत वारंवार बिघडणार. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज भासणार.

आपली मुले आपल्याला सांभाळतील ही सर्वच पालकांची इच्छा असते. पण तसं होईलच याची खात्री देता येत नाही. काही कारणाने मुलांच्या आयुष्यात जर काही समस्या आल्या तर ते त्यातच गुंतून पडतील.

सर्व काही ठिकठाक चाललं असताना भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करणे कोणत्या व्यक्तीला आवडेल? म्हणजे जर का आपल्याला दररोज दोन वेळा पंचपक्वान्नांचे जेवण मिळत असेल तर पुढे कधीतरी उपाशी रहावं लागेल हा विचार करायला मन तयारच नसतं मुळी!!!

समाजात आपल्याला असंख्य लोकं दिसतील, जे चांगली कमाई करत होते पण रिटायरमेंट नंतर मात्र त्यांना हलाखीच्या परिस्थितीत जगणं भाग पडलं.

मित्रांनो, जरा जीवनाचं कटू सत्य लक्षात घ्या. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला मानाने वागवले जात नाही. कोणत्याही निर्णयात तुमचे मतही विचारले जात नाही. म्हणून आतापासूनच सावध रहा. आणि आर्थिक नियोजन करण्याची सुरुवात करा.

४. बचत करण्याची सवय नसणे.

महिन्याच्या शेवटी हातात काही उरलंच नाही तर तुम्ही बचत कशी करणार? गेल्या काही वर्षांत महागाई खूपच वाढली आहे. त्यामानाने उत्पन्न वाढत नाही. जर का तुम्ही शहरात रहात असाल आणि कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती असाल तर खरंच बचत करणं फार कठीण आहे. पण म्हणूनच सुरुवातीपासून पैसे जपून खर्च करण्याची सवय असली पाहिजे.

कारणं कोणतीही असली तरी निवृत्ती नंतर पैसा गाठीशी असलाच पाहिजे हे खरंय. आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. दुसरा कोणीही म्हातारपणी तुमची देखभाल करायला येणार नाही.

आतापासूनच महिन्याच्या खर्चाचा आढावा घ्या. कुठे पैसे वाचवता येतील ते पहा. आणि त्याप्रमाणे पैसे बाजूला टाकायची सुरुवात करा.

थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण बचतीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. म्हणून अगदी महिन्याला १००० रुपये जरी वाचवलेत तरी चालेल. हळूहळू ही रक्कम वाढवत न्या.

चांगले गुंतवणुकीचे पर्याय समजून घ्या. आर्थिक साक्षरता हा समृद्धी कडे वाटचाल करण्याचा दुवा आहे हे लक्षात ठेवा.

मग वाट कसली बघताय, आजपासून पैसे वाचवायला, आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक करायला लागा!!!

५. मुलं हीच भविष्याची पुंजी!!!

हे आहे पाचवं कारण कोणत्याही प्रकारचे रिटायरमेंट प्लानिंग न करण्याचे!!!

खरंतर हा संवेदनशील विषय आहे. त्याबाबत वेगवेगळी मतं असू शकतात. पण शहरातील लोकं मात्र आता आपली उतारवयातील आर्थिक जबाबदारी मुलांवर पडू नये म्हणून जागरूक होताना दिसत आहेत.

आपल्या मुलांना उत्तम प्रकारे वाढविणे, चांगले शिक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे पण त्याबदल्यात मुलांनी म्हातारपणी आपल्याला सांभाळावे ही अपेक्षा आता निदान शहरी लोकांमधे तरी दिसत नाही.

पण अजूनही लहान शहरे, किंवा खेड्यात आईवडिलांना सांभाळणे हे मुलांचे कर्तव्यच आहे अशी विचारसरणी दिसून येते.
मुले म्हणजे म्हातारपणचा आधार अशी पालकांची पण मनोवृत्ती असते.

याबाबत एक ऑनलाईन सर्व्हे केला गेला. यातील ४९ % लोकांच्या मतानुसार जर तरुणपणी आईवडील मुलांसाठी आपली हौसमौज बाजूला ठेवून, अपार कष्ट करून त्यांचे संगोपन करत असतील, तर वृद्ध आईवडिलांना मुलांनी सांभाळलेच पाहिजे.

पण २१ % लोकांच्या मते मात्र पालक आपले कर्तव्य करत असतात याची परतफेड म्हणून मुलांकडून काही अपेक्षा ठेवू नये.

याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करुन जरुर सांगा.

यातून एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. आणि रिटायरमेंट बाबत तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणत्या प्रकारे बचत करता हे जाणून घेणं आम्हाला आवडेल.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय