तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं हे कळतच नाही, अशावेळी वापरा या पाच युक्त्या

तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं हे कळतच नाही, अशावेळी वापरा या पाच युक्त्या

आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे योग्य नाही. टीममध्ये काम करणे हे तर कौशल्याचे काम आहे.

इतरांचा दृष्टीकोन समजून घेणे, त्यांच्या मतांचा आदर करणे आणि काही बाबतीत विचार जुळत नसतील, तरीही व्यक्त होताना मर्यादा न सोडणे फार आवश्यक असते.

आपले शिक्षक, बॉस, आणि इतर माणसे यांच्याशी सलोख्याचे संबंध असतील तर रोजचं जगणं सुसह्य आणि आनंददायी असतं. आपला प्रवास सुरळीत पार पडतो.

कारण ही माणसे आपल्याला मार्गदर्शन करतात. अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना यांच्याशी सुसंवाद असणे गरजेचे असते. पण दर वेळी आपल्या आजूबाजूला असणारी माणसे समंजस असतीलच असे नाही. काही वेळा अगदी विक्षिप्त आणि लहरी माणसांशी गाठ पडते. यांच्याशी कसं वागावं हेच कळत नाही. कारण आपण कितीही चांगुलपणा दाखवला तरीही ही माणसे कशात ना कशात खोट काढतात. घालून पाडून बोलतात किंवा मौन धारण करतात. मग आपण अगदी गोंधळून जातो.

काय करावं म्हणजे यांच्याशी नीट संवाद साधला जाईल हाच विचार आपण करत रहातो. पण ते शक्य होत नाही कारण यांचा आडमुठ्या स्वभाव!!!

अशा विचित्र परिस्थितीत तुम्ही अडकला असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. या लेखातून आम्ही पाच युक्त्या तुम्हाला सांगणार आहोत. या वापरुन तुम्ही विक्षिप्त माणसांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.

खरंतर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नसतंच मुळी. आपण फक्त आपल्या वागण्यावर कंट्रोल ठेवू शकतो. इतरांनी जरी कितीही उकसवण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना कसं सामोरं जावं हे आपल्यावर अवलंबून असतं. त्यांच्या बोलण्याला कसा प्रतिसाद द्यावा, कोणत्या गोष्टी चक्क नजरेआड कराव्यात हे आपल्याला समजलं‌‌ की मग आपण आरामात त्यांच्याशी डील करु शकतो.

नाहीतर अशी माणसं बघता बघता तुमचा आनंद हिरावून घेतात. आणि यांच्या संगतीत एकेक दिवस काढणं महाकठीण होऊन बसतं.

तिरसट माणसांना सामोरं जाण्याचे उपाय काय आहे?

या पाच युक्त्या चतुराईने वापरा आणि स्वतःला तिरसट माणसांपासून वाचवा.

१. लहरी माणसांवर टीका करणं बंद करा.

तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल. तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करुच नका. कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे.

त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधता येणार नाही. तेच तेच विचार पिच्छा पुरवतील. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल. जेव्हा अशी माणसं भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरु असतं.

आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं‌ असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेलं अयोग्य वर्तन, तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेला मानसिक कोंडमारा इतरांना सांगता. यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणं ही सुद्धा एक इच्छा असू शकते.

कारण आपल्याला असहाय वाटत असताना कोणीतरी धीर दिला तर मनाला उभारी येते. आपण किती भयंकर परिस्थिती मधून जात आहोत हे इतरांना कळावं यासाठी पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळलं जातं. पण यामुळे नकारात्मक भावना अजूनच वाढत जातात.

कोळसा उगाळावा तितका काळाच हे लक्षात असू द्या. जेवढं तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलाल तेवढा तुमचा त्रास अधिक वाढेल. यावर उपाय एकच तो म्हणजे अशा विक्षिप्त व्यक्तीला आपल्या मनात थारा देऊ नये आणि तिच्याबद्दल काहीही बोलूच नये.

२. स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका.

नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, संताप, निराशा निर्माण करते. दररोज ही माणसे अवतीभवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात.

मग आपले मन नको त्या कल्पना करु लागते. जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करु लागतात. त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन, तिचा सुद्धा अपमान करेन हे विचार घोळत रहातात. आणि मन आपण जसं वळवू तसं वळतं. जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं. मग जर सतत या नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण रहातो. यामुळे लवकर थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे, चंचलता, झोप न लागणे, चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात.

म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका. यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मूळावर घाव घालणे.

म्हणजे काय करायचं?

तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करुन एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणं सुरू करेल त्याच क्षणी मनाला रोखायचं.

त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही. त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा.

संगीत, वाचन, व्यायाम किंवा नवीन स्कील शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं.

यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण कल्पनेतील भुतं तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाहीत.

म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत रहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं आहे.

३. तापदायक माणसांना धन्यवाद द्या.

तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थॅन्क्स म्हणायचं?

तर थोडा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत रहातात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो.

यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलणं, इतरांच्या मताचा आदर करणं, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्या वागण्यातून समजतं.

आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात. आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते.

मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढं निवडायचं हे मनाला कळतं. एकदा का ही समज आली की कितीही तिरसट, विक्षिप्त आणि लहरी व्यक्तीशी तुम्ही संवाद साधू शकता. त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करु शकता. कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाइफ लेसन झालेला असतो. त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बाणवत असता. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या.

तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यात त्यांनी मोठा हातभार लावला आहे. कमळाचं उदाहरण लक्षात ठेवा. आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फुलणं सोडून देत नाही.

४. स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या.

आपल्या मर्यादा ओळखा. दुसऱ्याकडून होणारा अपमान, टोमणे सहन करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते.

उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. अशावेळी बाऊंड्रीज ठरवाव्या लागतात. म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन पण ज्याक्षणी ती आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचे आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही याची तिला जाणीव करून देणे.

यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखावणारी व्यक्ती एका अंतरावर रहाते. त्यांचे शब्द, कृती यांनी तुम्ही घायाळ का होता? कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात, हृदयात जागा देता.

जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत. विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर ठेवू शकता. म्हणजे त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे, किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण न जाणे असे उपाय तुम्ही करु शकता.

पण खरी कसोटी असते की, ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात. अशावेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं.

पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अशावेळी मानसिकरित्त्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता. म्हणजे गरजे इतका संवाद ठेवणे, त्यांच्याकडून मदतीची, कौतुकाची अपेक्षा न ठेवणे. त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे.

फक्त हो, नाही, बरं अशा थोडक्या शब्दांत बोलणे आटोपते घेणे. यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आहात आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवतील.

दुसरी शक्यता अशीही आहे की तुम्ही दाद देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दामहून प्रयत्न करतील, पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मणरेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करु देणारच नाही.

या बाऊंड्रीज आपलं संरक्षण करतात. यांचा वापर कसा करायचा हे सरावाने जमतं. जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कोरी ठेवायची.

किंवा मनाचा दगड करुनच तिला सामोरं जायचं. हे कुंपण आपणच तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच पहायचं.

५. स्वतःचं वागणं तपासून पहा.

कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत. ते आपल्याला समजून घेत नाहीत. मानसिक छळ करतात.

पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटं तुमच्याकडे वळलेली असतात. त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा.

आपलं काही चुकतंय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं सुद्धा खटकतं, चेष्टा मस्करी केलेली चालत नाही.

मग दुसऱ्या कोणी सहज गंमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अती गांभीर्याने घेतात. अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून रहाता येत नाही.

सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं वाटतं. अतीभावनाप्रधान स्वभाव घातक ठरतो.

त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये. खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमलं पाहिजे. त्याचप्रमाणे अती अहंकार सुद्धा काही उपयोगाचा नाही. त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळवून घेणे कठीण होते.

हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी तपासून पहा. इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतः मधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत. मनुष्य स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत भरतात पण स्वतः च्या उणीवा मात्र दिसत नाहीत.

पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे. त्याचा स्विकार करणे, ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत रहाणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे.

तर मित्रांनो आता कधीही तुम्हाला एखाद्या तापदायक माणसाच्या संगतीत रहायची वेळ आली तर या पाच युक्त्या वापरा. म्हणजे तुम्हाला कमीत कमी मनस्ताप होईल.

यातला कोणता उपाय तुम्हाला आवडला हे जरूर कमेंट्स करुन सांगा.

तुम्ही अशा विचित्र व्यक्तींना कसे सामोरे जाता. आपली मानसिक शांती कशी टिकवून ठेवता हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

यातून इतर वाचकांना सुद्धा अवघड परिस्थितीत कसं वागायचं हे कळेल.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

मनाचेTalks वाचत रहा आणि मनातील विचार व्यक्त करा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!