महात्मा गांधी – माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा

मोहनदास करमचंद गांधी! माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा कसा बनतो, याचे मूतिर्मंत उदाहरण. कमरेला पंचा आणि हातात काठी घेणाऱ्या सामान्य शरीरयष्टीच्या या माणसाने कोणतेही शस्त्र हाती न घेता, फक्त एका विचारावर ब्रिटिशांची सत्ता उलथवली. गांधीजींच्या जीवनातील हे एक मोठे कार्य. अर्थात, फक्त इतकाच आशय गांधीजींच्या जीवनाला देता येणार नाही. तर या महामानवाने आपल्या आचारातून आणि विचारातून जगाला शांतता, मानवतावाद, बंधुभाव, अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. म्हणूनच त्यांचे विचार आजही अजरामर आहेत. किंबहुना, सध्यस्थितीत जगभरात वाढलेला हिंसाचार बघितला तर महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्व प्रकर्षाने जाणवते. आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज अधोरेखित होते. पण, हुतात्म्यांच्या स्मृती या आगीसारख्या असतात, काही वेळा त्या भडकतात तर काही वेळा भडकवतात. काळाच्या ओघात कधी तरी त्याच्यावर राखेचे थर जमून निखारे विझतात. नंतर हे हुतात्मे त्यांच्या तसबिरींमधून, चित्रांमधून आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढविण्याइतपत मर्यादित बनतात. हे सुद्धा एक वास्तव. त्यामुळे आज गांधीजींचा जयंतीदिन साजरा करत असताना महात्माजींकडून आपण काय शिकलो, त्यांची शिकवण कितपत आचरणात आणली. यावर अंतर्मुख व्हायला हवे.

एकीकडे महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार, आणि दुसरीकडे हिंसेचं गडद होत असलेलं सावट. अशा परस्परविरोधी स्थितीत आपण आज उभे आहोत. हिंसेचं समर्थन करणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. विचारांची लढाई विचारांनी करण्यापेक्षा विचार मांडणाऱ्यालाच संपविण्याची राक्षसी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांमागेही हीच प्रवृत्ती होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतलेल्या प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्याच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या कारण ते समाजहिताचा विचार मांडत होते. त्यांच्या विचारला तोड सापडत नव्हता. म्हणून मग विचारवंतांचाच काटा काढण्यात आला. तसे पाहता ही प्रवृत्ती पुरातन काळापासून अस्तित्वात दिसून येते. जगदगुरु संत तुकाराम महराजांच्या अभंगवाणीला तोड सापडले नाही म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या विचाराला तोड सापडले नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

अर्थात, बंदुकीच्या गोळीने माणूस संपतो पण त्याचे विचार संपविता येत नाही, ही बाब महात्मा गांधी यांच्यापासून ते डॉ. दाभोळकर यांच्यापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे. पण, ही बाब या प्रवृत्तीच्या ध्यानात येत नाही, हे खरं दुर्दैव. महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आल्यानंतर अवघ्या जगाने त्यांचा विचार स्वीकारला. देशात आजही गांधीजींच्याच विचारांचाच उदोउदो केला जातो. त्यांनी दाखविलेल्या सत्य अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गवरूनच लोक न्यायाची अपेक्षा करतात. गांधी विचारांचे समर्थक आणि विरोधक हे दोघंही त्याचे महत्व आजरोजी मान्य करत आहेत. किंबहुना गांधी विचाराशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही याची खात्री पटल्याने मनात असो कि नसो गांधींचा जयजयकार करणे हे त्यांच्या विरोधकांसाठीही अपरिहार्य बनले. अशी या विचारांची महती. मात्र ‘कळतं पण वळत नाही’ या म्हणीप्रमाणे आजही गांधींना शिव्या घालणारी जमात देशात शिल्लक आहे. आणि या देशात उपद्रव करण्याच्या त्यांच्या घडामोडी सुरूच असतात. महात्मा गांधी यांचे विचार कालातीत असल्याने त्यांना कधीही धक्का बसणार नाही. मात्र सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी आज गांधीविचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज भारतासमोर आतंकवाद, नक्षलवादाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. संपूर्ण जगच दहशतवादाच्या भयाखाली मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीत गांधीजींचे विचार यावर मार्ग काढण्यासाठी उपयोगी ठरू शकतील. देशांतर्गत निर्माण झालेल्या अविश्वासाच्या भावनेला नक्षलवादला गांधीजींच्या मार्गाने आहवान केल्या जाऊन वंचितांना प्रवाहात सामील करून घेतल्यास या संकटाची त्रीव्रता कमी होऊ शकेल. गांधीजींच्या नावाची माळ जपत अनेकांनी सत्तेच्या खुर्च्या हस्तगत केल्या. मात्र सत्ताकारणाच्या गलिच्छ राजकारणात गांधी विचारांची हत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.

समानतेच्या तत्वाचा विचार मांडून भेदभाव दूर करण्यासाठी गांधीजींनी जीवनभर कार्य केले. पण सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याऐवजी आज जात, धर्म, पंथ, वर्ग यात लोकांची विभागणी करत स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचा उद्योग राजरोसपणे केला जातोय. भ्र्रष्टाचार, महागाई, गरिबी, शेतकरी आत्महत्या, वीज- पाण्याचे दुर्भिक्ष आदी समस्या सर्वसामान्यांच्या मानगुटावर बसल्या असताना राजकारण्यांना चढलेली तथाकथित विकासाची झिंग बघितली तर यांना अद्याप गांधी विचार समजलेच नाही, असे म्हणावे लागेल. म्हणूनच आपणच आपल्या कर्माने गांधीजींची शिकवण अपयशी ठरविण्याचे पाप करत आहोत का, यावर सर्वानी अंतर्मुख झाले पाहिजे. गंभीर गुन्हे करून कारागृहात गेलेल्या कैद्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांनि प्रेरित होत आपला जीवनमार्ग बदलल्याचे बऱ्याचदा वाचनात आले आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याची शक्ती गांधी विचारात असल्याचे यावरून सिद्ध होते. त्यामुळे आज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हिंसेच्या मार्गाने शोधू पाहणाऱ्या पिढीला सावरण्यासाठी महात्माजींचे अहिंसेचे तत्वज्ञान उपयोगी पडू शकते. युवकाच्या राष्ट्रभिमान जागृत करण्यासाठी तर गांधी विचार फार मोठ्या मार्गदर्शकाचं काम करतील, यात दुमत नाही. त्यासाठी गरज आहे ती ‘महात्मा गांधी आचरणात आणण्याची.. उद्या गांधी जयंती साजरी करत असताना त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा..!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय