दुर्गाशक्ती – भारतीय सैन्यातील पहिली स्त्री सैन्य अधिकारी प्रिया झिंगन

प्रिया झिंगन

भारतीय सेना हे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या अंगातलं रक्त सळसळतं. भारतीय सेनेचा गणवेश अंगावर असणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न बाळगणारी प्रिया झिंगन पण होती. लहानपणापासून भारतीय सेनेचा गणवेश अंगावर घालण्याचं प्रियाने ठरवलं होतं. भल्या मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे न जाता देशासाठी काहीतरी करण्याचं प्रियाने लहानपणीच ठरवलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असणारी प्रिया लहानपणापासून हेच मानत ठसवत आली होती की पुरुषांपेक्षा स्त्रिया कुठेच कमी नाहीत. जी कामे पुरुष करू शकतात ती सगळीच स्त्रिया करू शकतात.

प्रिया झिंगन

देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न प्रियाला स्वस्थ बसू देत नव्हतं. तो हिरव्या रंगाचा गणवेश तिला खुणावत होता. पण भारतीय सेनेत त्या वेळेला स्त्रियांना प्रवेश नव्हता हे प्रियाला पचनी पडत नव्हतं. तिने थेट भारतीय सेनेचे तत्कालीन प्रमुख सुनिथ फ्रांसिस रॉड्रीक्स ह्यांना सरळ पत्र लिहून स्त्रियांसाठी भारतीय सेनेचे दरवाजे उघडण्यासाठी विनंती केली. भारतीय सेनेचा गणवेश अंगावर घालणं हे माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. तो अनुभवण्याची संधी एक भारतीय नागरिक म्हणून मला मिळायला हवी असं तिने पत्रात लिहिलं होतं. प्रियाच्या त्या पत्राला तत्कालीन भारतीय सेनेच्या प्रमुखांनी उत्तर देताना पुढल्या दोन वर्षात स्त्रियांना भारतीय सेनेत दाखल होण्याचे दरवाजे उघडले जातील अशी ग्वाही दिली. एका सामान्य स्त्रीने लिहिलेल्या पत्राला भारतीय सेनेच्या प्रमुखाने उत्तर देणं हे प्रियासाठी मोठा गर्वाचा क्षण होता.

आपल्या शब्दाला जागताना १९९२ साली भारतीय सेनेने स्त्रियांना भारतीय सेनेत समाविष्ट होण्यासाठी एक जाहिरात पेपरात दिली. ती जाहिरात म्हणजे प्रियाने आपल्या लहानपणीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात गवसणी घालणाच्या दृष्टीने आलेली एक नामी संधी होती. प्रियाने एकही क्षण न दवडता ह्यासाठी फॉर्म भरला. तोवर प्रियाने कायद्यातून पदवीचं शिक्षण घेतलं होतं. भारतीय सेनेत ऑफिसर म्हणून रुजू होण्यासाठी लागणारी सारी दिव्य पेलताना प्रियाने भारतीय सेनेतील प्रवेश नक्की केला. पण हे सोप्पं नव्हतं. ऑफिसर ट्रेनिंग एकेडमी, चेन्नई इकडे प्रिया आणि त्यासोबत २५ मुलींच्या पहिल्या बॅचचं ट्रेनिंग सुरु झालं. प्रिया ला भारतीय सेनेच्या ट्रेनिंग मध्ये घेताना कॅडेट ००१ असा क्रमांक दिला गेला. ह्या क्रमांकाने पुरुषांसाठी मर्यादित असणाऱ्या एका क्षेत्रात स्त्रीने आपला प्रवेश नक्की केला होता. भारतीय सेनेचा हिरव्या रंगाचा गणवेश परिधान करणं हे एकच स्वप्न जगलेल्या प्रियाने आपल्या स्वप्नाला पादाक्रांत करणाच्या दृष्टीने प्रवासाला सुरवात तर केली होती.

प्रवासाची सुरवात आणि प्रवास ह्यात जमीन आस्मानाचं अंतर असतं हे प्रिया सोबत असलेल्या सगळ्याच स्त्रियांना दिसून आलं. भारतीय सेनेच प्रशिक्षण हे जगातील सर्वोत्तम असं मानलं जातं. अतिशय कडक आणि शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं हे प्रशिक्षण म्हणजे ह्या सगळ्यांसाठी एक कसोटी होती. भारतीय सेनेने स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता ज्या प्रकारचं प्रशिक्षण आणि अग्निदिव्यातून पुरुष अधिकाऱ्यांना जावे लागते त्याच परीस्थितीतून स्त्रियांना प्रशिक्षण दिल गेलं. तुम्ही स्त्री आहेत का पुरुष ह्या पेक्षा तुम्ही एक सैन्य अधिकारी असणार आहात हाच विचार सगळ्यात आधी केला गेला. ह्या पूर्ण प्रवासात प्रिया आणि तिच्या सहकारी स्त्रियांना अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं. पण ह्या सगळ्यांना पुरून उरत ६ मार्च १९९३ ला प्रियाला भारतीय सेनेतील एक अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालं. त्यानंतर तब्बल १० वर्ष भारतीय सेनेत ऑफिसर म्हणून काम करताना प्रिया प्रत्येक क्षण लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे जगली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर

“It’s a dream I have lived every day for the last ten years.”

२००२ मध्ये प्रिया झिंगन भारतीय सेनेतून “मेजर” ह्या पदावरून निवृत्त झाली. प्रिया जरी निवृत्त झाली तरी आपल्यामागे प्रियाने एक कारवा जोडला जो आजतागायत वाढत जातो आहे. एक स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे दाखवताना प्रियाने भारतीय सेनेच्या प्रमुखांना लिहिलेलं पत्रच आज स्त्रियांना भारतीय सेनेचे दरवाजे उघडू शकलं. ह्याच वर्षी जून मध्ये भारतीय सेनेचे प्रमुख बिपीन रावत ह्यांनी घोषणा केली आहे की आता स्त्रिया भारतीय सेनेत प्रमुख भूमिकेत म्हणजेच कॉमब्याट (लढाईत) मध्ये भाग घेऊ शकणार आहेत. लढवय्या स्त्रिया असा एक ग्रुप भारतीय सेनेत असेल व शत्रूशी समोरासमोर दोन हात करण्यात सक्षम असेल. आज पुरुषांसाठी मर्यादित असणाऱ्या आणि वर्चस्व मानल्या गेलेल्या क्षेत्रात देशासाठी काहीतरी करण्याची आणि भारतीय सेनेचा तो गणवेश अंगावर घालण्याची अनेक स्त्रियांची स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना ह्याची पहिली मानकरी होण्याचा आणि आपल्या स्वप्नांना मनापासून जगून “हम भी कुछ कम नही” हा आत्मविश्वास प्रत्येक भारतीय स्त्री ला देणाऱ्या दुर्गाशक्ती प्रिया झिंगन ह्यांना माझा मनापासून सलाम.

वाचण्यासारखे आणखी काही…

काय सांगितला होता सचिन तेंडुलकरने त्याच्या यशाचा मूलमंत्र..
स्वतः अडथळे पार करत जगण्याचा उत्सव करायला शिकवणारा संदीप माहेश्वरी
पवन दिवानी न माने …


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. J K Patil says:

    Good Information. Like it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!