करोना झालाय, घाबरू नका. जाणून घ्या ६ मिनिट वॉक टेस्ट बद्दल आणि सुरक्षित रहा.
सध्याचा काळ हा कोविड महामारीचा आहे. कोविड-१९ किंवा करोना ह्या आजाराचे विषाणू सर्वत्र पसरत आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊन ते आजारी पडत आहेत.
आत्तापर्यंत हे तर सर्वांच्या लक्षात आलेच आहे की हा एक गंभीर आजार आहे आणि लवकर आणि योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्णाच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो.
करोना होऊ न देण्यासाठी गर्दीत जाणे टाळणे, बाहेर जाताना मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सॅनीटायझरचा वापर करणे हे उपाय आहेतच.
परंतु दुर्दैवाने जर कोविडचा संसर्ग झालाच तर लगेच योग्य ते औषधोपचार करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात झालेला संसर्ग योग्य औषधे घेऊन बरा होतो.
परंतु मुख्य काळजी असते ती कोविड रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची.
कारण शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो आणि परिणामी ते अवयव निकामी होऊ लागतात.
ह्याचे पर्यवसान रुग्णाच्या मृत्यू मध्ये होते. त्यामुळे कोविड रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ न देणे आणि कमी झालेच तर ते लगेच ओळखून रुग्णाला ऑक्सिजन देणे हा कोविड मृत्यू टाळायचा मुख्य मार्ग आहे.
बऱ्याचवेळा कोविड रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होताना अगदी नॉर्मल वाटतो, पण अगदी काही तासामध्ये रुग्णाचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन रुग्ण गंभीर होतो.
कोविड पेशंट्स मधील हा एक अतिशय चिंताजनक प्रकार आहे.
नॉर्मल व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजन जरा जरी कमी झाला कि त्याला लगेच धाप लागणे, अस्वस्थ वाटणे असा त्रास जाणवू लागतो.
मात्र कोविड पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन ९४ च्या खाली गेला तरीही रुग्ण अतिशय फ्रेश असू शकतो.
तसेच विश्रांती घेत असलेल्या रुग्णाचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले तर नॉर्मल दिसते, मात्र रुग्णाने थोडी हालचाल केली, बाथरूमला जाणे किंवा अंघोळ करणे अशी काही कामे केली कि लगेच धाप लागते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसते.
बरेचदा ही परिस्थिति लक्षात न आल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक खालावून कोविड पेशंटचा मृत्यू होतो.
पण ह्यावर उपाय शक्य आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सतत तपासणे आणि त्यावर लक्ष ठेवणे हा ह्यावरचा उपाय आणि त्यासाठी ‘६ मिनिट वॉक टेस्ट’ 6 Minute Walk Test करणे आवश्यक आहे. आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
‘६ मिनिट वॉक टेस्ट’ ‘6 MWT’ कशी करावी?
१. शक्यतो रुग्ण ही तपासणी करत असताना बरोबर कोणीतरी हजर असावे.
२. रुग्णाने कापडी किंवा सर्जिकल मास्क लावावा.
३. टेस्ट सुरु करण्यापूर्वी ऑक्सिमिटरने म्हणजेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणाऱ्या यंत्राने ऑक्सिजनची पातळी मोजून नोंद करावी. (सुरुवातीलाच ही नोंद ९४ पेक्षा कमी आली तर ही तपासणी करू नये आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.)
४. त्यानंतर सलग ६ मिनिटे आपण नेहमी चालतो तश्या गतीने खोलीमध्ये चालावे.
५. ६ मिनिटे झाल्यानंतर ऑक्सिमिटरने पुन्हा ऑक्सिजनची पातळी मोजावी. जर ती ९४ पेक्षा खाली गेली असेल किंवा पहिल्या नोंदीपेक्षा ३ हून अधिक ने कमी झाली असेल तर रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे असे समजावे आणि डॉक्टरांशी बोलावे.
६. टेस्ट सुरु असताना मध्येच रुग्णाला धाप लागली अथवा इतर काही त्रास जाणवला तर टेस्ट थांबवावी व ऑक्सिमिटरने पुन्हा ऑक्सिजनची पातळी मोजावी. वरीलप्रमाणे बदल आढळल्यास रुग्णाला ऑक्सिजनसाठी रुग्णालयामध्ये दाखल करावे.
७. वयस्क रुग्णांसाठी ही टेस्ट ३ मिनिटांसाठी करावी आणि जर सहन होत असेल तरच ६ मिनिटांसाठी करावी .
दिवसातून ३ ते ४ वेळा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणे व कमीत कमी एक वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करणे यामुळे कोविड रुग्ण घरी असताना गंभीर होणार नाही.
लपलेली ऑक्सिजनची कमतरता देखील आपण वेळीच ओळखू शकू आणि रुग्णाला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी वेळ मिळेल.
परंतु ६ मिनिट वॉक टेस्ट मध्ये बदल आढळल्यास पुन्हा पुन्हा टेस्ट करून पाहू नये. त्याउलट रुग्णाला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगून पोटावर झोपवावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयामध्ये दाखल करावे.
होम आयसोलेशन मधील रुग्णाने रक्तातील ऑक्सिजनची कमतरता स्वतःहून शोधण्यासाठी ही ‘६ मिनिट वॉक टेस्ट’ दररोज एक ते दोन वेळा करणे आवश्यक आहे.
त्यामुळे बसल्या जागी धाप लागणे / छातीमध्ये दाब वाटणे / गोंधळण्याची स्थिती / बोलताना त्रास होणे / शरीराचा भाग निळसर दिसणे अशी गंभीर लक्षणे निर्माण होण्याची वाट न बघता रुग्णाला वेळेवर रुग्णालयामध्ये दाखल करणे आणि कोविड मृत्यू टाळणे शक्य होईल.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.