डिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले? वाचा या विशेष लेखात

‘इस्माईल ओमर गुएललेह’ ज्यांना ‘आय.ओ.जी.’असंही म्हटलं जातं; हे नाव भारतीयांसाठी खूप अपरिचित आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांना भारताचा सगळ्यात मोठा दुसरा नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन २०१९ ला सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे आय.ओ.जी. भारतीयांसाठी एक कुतूहल असले तरी त्यांच्यामुळे अनेक भारतीय तसेच विदेशी नागरिकांचा जीव वाचला आहे. ते आहेत डिजिबोटी चे राष्ट्राध्यक्ष!!
‘ऑपरेशन राहत’ हे भारताचं मिशन जागतिक स्तरावर नावाजलं गेलेलं मिशन आहे. त्याला कारण ही तसंच आहे. ह्या पूर्ण मिशन मध्ये ४६५० भारतीय नागरिकांना तर ४१ देशांच्या ९६० परदेशी नागरिकांची भारताने युद्धभूमी ‘येमेन’ वरून सुखरूप सुटका केली होती. भारताचं हे मिशन यशस्वी होण्यामागे एक व्यक्तिमत्त्व होतं ज्यांच्यामुळे हे शक्य झालं ते म्हणजे पूर्व आफ्रिकेतला एक देश ‘डिजीबोटी’ चे राष्ट्राध्यक्ष ‘इस्माईल ओमर गुएललेह’ (आय.ओ.जी.).
‘इथोपिया’ येथे जन्म झालेले इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी तिकडून स्थलांतर करून ‘डिजीबोटी’ इथे आश्रय घेतला. पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. डिजीबोटी ला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची नियुक्ती सिक्रेट पोलीस मध्ये झाली. त्यांनी ह्या साठी सोमालियन सिक्रेट सर्विस आणि फ्रेंच सिक्रेट सर्विस इथून आपलं ट्रेनिंग घेतलं. आपल्या काकांच्या पावलावर पाउल टाकत त्यांनी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. डिजिबोटी मध्ये मुख्यतः फ्रेंच तसेच अरब भाषिक राहतात. यातील अरबांकडून होणाऱ्या विद्रोहाला त्यांनाही सामोरं जावं लागलं. पण निवडणुकीत मतांच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत ठेवलं. अनेक विरोध होऊन पण २०१६ साली त्यांना ८७% मत मिळाली होती. पुन्हा एकदा इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) डिजीबोटी चे अध्यक्ष झाले.
२०१५ साली येमेन मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर भारताने आधी सांगून पण ५००० पेक्षा जास्त भारतीय तिकडे अडकून पडले होते. येमेन राष्ट्र ‘नो फ्लाय झोन’ झालं. अशा परिस्थितीत भारताने मदत मागितली ती डिजीबोटी कडे. त्या राष्ट्राने भारताला आपलं विमानतळ तसेच बंदर वापरण्याची मुभा दिली. मग भारतीय नौसेना, भारतीय वायू सेनेने भारतीयांनातर युद्धभूमीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढलंच पण त्याच सोबत ४१ देशांच्या ९६२ नागरिकांना बाहेर काढलं. ह्यात अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रांस, इटली सारख्या बलाढ्य देशांचे नागरिक तर दुसरीकडे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान सारख्या देशांचे नागरिक ही समाविष्ट होते. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी अतिशय अडचणीच्या काळात भारताला ही मदत केली. भारताने ही ह्याची जाणीव ठेवताना पुढे डिजीबोटीशी राजनैतिक संबंध घट्ट केले.
गेल्या ४ वर्षात इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी भारताला दोन वेळा भेट दिली आहे. ह्या शिवाय भारताने डिजीबोटी मध्ये लीडरशिप सेंटर सुरु केलं आहे, सैनिकी तळ उभारण्यासाठीही भारताने पावलं टाकली आहेत. डिजीबोटी हिंद महासागराच्या उत्तर टोकावर आहे. डिजीबोटीकडे सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापाराची सूत्रे आहेत. जगाच्या व्यापाराच्या २५% सामानाची वाहतूक ह्या सागरी मार्गावरून होतं असते. म्हणून डिजीबोटीचं सागरी महत्त्व प्रचंड आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी २०१५ साली केलेल्या मदतीची आठवण आणि येणाऱ्या काळात आपले संबंध अजून सुदृढ करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने देशाचा दुसरा क्रमांकाचा नागरी पुरस्कार, अर्थात ‘पद्मविभूषण’ देऊन इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांचा गौरव केला आहे.
इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांच्या मदतीसाठी प्रत्येक भारतीय नागरिक त्यांचा ऋणी तर आहेच पण भारत सरकारने योग्य व्यक्तींना योग्य वेळी सन्मानित करताना जागतिक पातळीवर पद्म पुरस्कारांची शान वाढवली आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.