सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?

सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येते.

जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात, कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते, जीवनातून नाही.

वाढती आयुर्मर्यादा, साधारणपणे पुढची पंचवीस वर्षे, वाढते वैद्यकीय खर्च या सर्वांचा विचार करून मिळालेल्या पैशांचे वेळीच योग्य नियोजन करणे जरुरीचे आहे इतक्या कष्टाने जमवलेली आणि पुढे दीर्घकाळ वापरायची पूंजी अयोग्य ठिकाणी गुंतवली गेली तर, सन्मानाने जगण्याऐवजी लाचारीची वेळ येऊ शकते.

यासाठी आपल्या गरजा, गुंतवणुकीची रक्कम जोखिम स्वीकार करण्याची तयारी, याचा विचार करून कोणत्याही योजनेशी संबधीत नसलेला आणि स्वतंत्रपणे फी आकारून काम करणारा वैयक्तिक गुंतवणूक नियोजक (Indipendent financial planner) शोधून त्याच्याकडून सल्ला घ्यावा.

यासाठी मोजलेली सल्ला फी, ठराविक कालावधीनंतर घेतलेला आढावा आणि त्याप्रमाणे वेळीच केलेले बदल हा आपल्या आयुष्यातील सर्वात योग्य असा महत्वाचा गुंतवणूक निर्णय ठरू शकतो.

आपल्या गुंतवणूकीवर दीर्घकाळ महागाईवर मात करणारा परतावा मिळावा अशी सर्वांचीच अपेक्षा असणार. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

यातून सर्व साधारण सर्वाना योग्य असे गुंतवणूक पर्याय आपण शोधू शकतो काय? या गोष्टीचा आपण विचार करु. त्याचप्रमाणे काही लोकांना आलेले अनुभव यातून काही शहाणपण शिकता येईल का याचा विचार करुयात.

आपल्याला पैसे मिळणार आहेत असे समजले तर आपल्या सभोवती अनेक जण अनेक हेतू ठेऊन आजुबाजुस जमा होतात.

यात मित्र, नातेवाईक, विविध योजनांचे अभीकर्ते, बँक कर्मचारी यांचा समावेश होतो. ते त्याना रस असलेल्या किंवा ते ज्यांचे अभीकर्ते आहेत अशाच योजना किंवा बँक कर्मचारी त्यांच्या बँकेने पुरस्कृत केलेल्या योजना प्रामुख्याने त्यांच्या फायद्यासाठी आपल्या गळ्यात कशा आडकवता येतील यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतात.

त्यांच्या दृष्टीने आपण त्यांचे मित्र कमी आणि संभाव्य गिऱ्हाईक जास्त असतो. मात्र ते, त्यांना आपली किती काळजी वाटते, असे दर्शवतात एकदा का तुम्ही त्यांच्या योजनेत सहभागी झालात की एकदम अनोळखी व्यक्तिसारखे वागू लागतात.

यातील काही लोक तर इतके गळी पडतात की ते आपल्यावर जात, धर्म, मराठी माणूस, मैत्रीची शपथ, पूर्वी त्यांनी केलेली मदत, गरीबी यासर्वांचा भांडवल म्हणून वापर करतात त्यांची योजना सोडून दुसऱ्या योजनेचे नाव जरी काढले तरी ती योजना कशी बंडल आहे ते पटवण्याचा प्रयत्न करतात.

आपण तरीही बधलाे नाही तर माझ्यासाठी तरी किमान काहीतरी करच येथपर्यत येतात. या लोकांना निक्षून नाही म्हणून सांगणे हे मोठे आव्हान आहे.

यात जर आपण यशस्वी झालो तर अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. खाली सूचवलेले पर्याय त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार असून त्यातील पहिले तीन पर्यायांना अन्य काही पर्याय आहे असे मला वाटत नाही.

1) आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे कारण वैद्यकीय खर्चात झालेली बेसुमार वाढ. एखादे मोठे आजारपण आपली सर्व जमापूंजी क्षणार्धात नाहीशी करु शकते.

आपल्याकडे आरोग्यविमा असेल तर तो असल्याचे मानसिक समाधान मिळते आणि आजारपण आल्यास काही प्रमाणात मदत होते. अशा प्रकारची सवलत आपणास आधी घेतलेल्या योजनेतून, आपल्या पुर्वीच्या व्यवस्थापनाकडून अथवा आपल्या मुलामुलींकडून मिळत असेल तर ठीक, अन्यथा यासाठी तरतूद करणे जरुरीचे आहे.

सध्या बँक ऑफ इंडिया कडून त्यांच्या खातेधारकांसाठी “न्यू इंडिया इन्शुरन्स” कंपनीची गट आरोग्यविमा योजना उपलब्ध असून याद्वारे जास्तीत जास्त ५ लाख रुपयांचा आरोग्यविमा एका कुटुंबाकरिता ₹ ७२४६/- मध्ये उपलब्ध आहे.

यामध्ये पति पत्नी आणि २५ वर्षांखालील २ मुलांना यांचा समावेश होऊ शकतो. सर्वात कमी किंमतीत मिळणारा हा आरोग्य विमा असून या पर्यायाचा अवश्य विचार करावा आणि दरवर्षी आठवणीने त्याचे नूतनीकरण करावे.

आपल्या जास्तीचे गरजेसाठी www.policybazzar.com या संकेतस्थळावरून आरोग्यविमा देणाऱ्या कंपनीचा शोध घेवून त्याचा हप्ता ऑनलाइन भरावा.

अशा प्रकारे हप्ता भरल्यास भरीव बचत (२०%) होते. काही कंपन्या २/३ वर्षांचा हप्ता एकदम स्वीकारून त्यात काही सवलत देत आहेत त्यांचाही विचार करता येईल.

उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवण्यासाठी नियमीत उत्पन्नाची गरज आहे. सध्या आपली जमाराशी सुरक्षित ठेवून सर्वाधिक वार्षिक ८.५% व्याज देणारी सीनियर सिटीझन सेव्हीग स्कीम २००४ ही एकमेव सरकारी योजना आहे. या योजनेचे खाते पोस्ट,सरकारी /खाजगी /मान्यताप्राप्त सहकारी बँकेत काढता येते.

व्याज दर तिमाहीस मिळते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेवता येतात. एवढी रक्कम ठेवल्यास तिमाहीस ₹३१८७५/-म्हणजेच मासिक ₹१०६२५/- ची सोय होते. व्याज करपात्र असून गुंतवणुकीला ८०/सी च्या मर्यादेत सूट मिळते.

2) या पुढील अतिशय महत्वाचा पर्याय म्हणून मी “Hdfc Prudance Fund Dividend Payout” हा पर्याय सुचवतो आहे.

हा एक बेलेन्स फंड असून यात समभागातील उच्च परतावा आणि कर्जरोख्याची सुरक्षितता यांचा गेली १९ वर्षे सातत्याने उत्तम समन्वय साधला आहे.

निवृत्तांसाठी ही काळाच्या कसोटीवर उतरलेली सर्वोत्तम योजना आहे. दर महिन्याच्या २५ तारखेला या योजनेकडून लाभांश देण्यात येतो.

हे यूनिट आपण त्याच्या NAV प्रमाणे कधीही घेऊ अथवा विकू शकतो. यामधे समभाग प्रमाण मोठे असल्याने शेअर मार्केटच्या वर खाली होण्यावर याची NAV कमीजास्त होऊ शकते.

मागील अनुभवांवरून यामधे २०% वाढ अगर घट होऊ शकते. हा पर्याय विचारात घेण्यासाठी प्रथम आपल्या मनातील नफा आणि तोटा या संकल्पना तपासून घायला हव्यात.

योजनेच्या NAV मधे घट झाल्याने होणारा तोटा /नफा आभासी असतो. खराखुरा तोटा होण्यासाठी सदर यूनिट आपणास त्या दराने विकावे लागतील. तीच गोष्ट नफ्याची.

तेव्हा यात गुंतवणूक करताना आपण आपणास शक्यतो कधीही परत घ्यावी न लागणारी आणि जास्तीत जास्त शक्य रक्कम गुंतवावी.

आपल्याला दरमहा लाभांश मिळतो की नाही ते पहावे. NAV पाहून मनस्ताप करून घेऊ नये. केवळ याच पर्यायातून आपणास पुरेसा करमुक्त परतावा मिळू शकतो.

NAV चा विचार फक्त सुरुवातीस गुंतवणूक करताना करावा. म्यूचुअल फंडामध्ये आपण कोणत्याही मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करु शकतो.

मात्र या पर्यायात अभीकर्त्याची मदत घ्यावी असे माझे मत आहे.

मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे निवृत्त व्यक्तीस चांगल्या आणि सातत्याने उच्च परतावा देणाऱ्या, महागाईवर मात करणाऱ्या योजनेची गरज असल्याने सध्याच्या दराने हे यूनिट्स अभिकर्त्यामार्फत खरेदी केल्यास ११.८ % तर थेट गुंतवणूक केल्यास १०.३ % वार्षिक परतावा मिळतो.

तेव्हा दोन्ही पर्यायात आपल्याला सारखाच लाभांश मिळूनही साधारण १.५ % चा फरक पडतो.

उदाहरणार्थ — १० लाख रुपये आपण अभिकर्त्याच्या मदतीने गुंतवले तर त्याचे ३२७८६.८८ यूनिट्स मिळतील यावर दरमहिन्याच्या २५ तारखेला मिळणारा लाभांश ०.३ %प्रमाणे ₹ ९८३६/- दरमहा मिळेल तर थेट गुंतवणूक केल्यास २८५७१.४२ यूनिट्स मिळतील यावर मिळणारा लाभांश ₹ ८५७१/- दरमहा असेल. यामधे ९८३६-८५७१= १२६५/-₹ एवढा फरक पडतो.

निवृत्त व्यक्तीचे दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे. अशी गुंतवणूक करून यात आपण धोका पत्करतो आहोत का? याचे उत्तर होय असे आहे.

परंतु जोपर्यंत मासिक १%चे आसपास परतावा मिळत असेल तर NAV कमी होत असताना जर हे यूनिट्स विकण्याची वेळ आपल्यावर आली तर आणि तरच तोटा होईल.

तेव्हा निश्चितपणे जास्तीत जास्त किती रक्कम आपणास लागणार नाही तेवढीच रक्कम या योजनेत गुंतवावी. सध्या जोखिम नसलेल्या योजनांचा सरासरी निश्चित परतावा हा ८%चे आसपास आहे.

यातून १० लाख रुपयांवर मासिक ₹६६६७/- मिळू शकतात. दीर्घ काळात मिळणाऱ्या जास्तीच्या ₹ ३१६९/- मधून जर आपण ₹ २०००/- ईक्विटी म्यूचुअल फंडाचे SIP मधे गुंतवल्यास हा धोकाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होईल.

moneycontrol व valueresarch यांचे संकेतस्थळांवर सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या म्यूचुअल फंड योजनांची यादी उपलब्ध आहे. त्याचा गुंतवणूक निर्णय घेण्यास संदर्भ म्हणून मदत होऊ शकेल.

अशा प्रकारे विभाजन करूनही काही रक्कम शिल्लक रहात असल्यास काही उपलब्ध पर्याय व त्यावर मिळणारा परतावा खालीलप्रमाणे —-

सहा वर्षे मुदतीचे भारत सरकारचे कर्जरोखे : किमान गुंतवणूक १००० ₹, सध्याचा व्याजदर ८ %वार्षिक ,व्याज करपात्र.

उच्च दर्जा धारण करणाऱ्या कंपनी ठेवी : मुदत १ ते ५ वर्ष किमान गुंतवणूक ५ ते २५ हजार ,व्याजदर ७ ते ८% व्याज करपात्र.

पोस्टाची मासिक प्राप्ती योजना : मुदत ५ वर्ष किमान गुंतवणूक ६ हजार कमाल ४.५ सहगुंतवणूकदारासह ९ लाख, व्याजदर ७.७%

विविध पेन्शन योजना : या मध्ये रक्कम दीर्घकाळ गुंतून रहाते. मासिक व्याज निरंतर मिळत रहाते. विमा कंपन्या, म्यूचुअल फंड, पेन्शन फंड यांच्याकडून अशा योजना राबवल्या जातात. परतावा ६ ते ७.५ % एवढा आहे. या योजनेची तपशीलवार माहिती योजनेच्या पुरस्कर्त्याकडून समजून घ्यावी. व्याज करपात्र.

मुदत ठेव योजना : बँक, पोस्ट, फायनांस कंपन्या, गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, पतपेढी, मायक्रोफायनांस कंपन्या यांच्या योजना आहेत. मुदत १४ दिवस ते ७ वर्ष, व्याजदर ४ ते ८ %

याशिवाय इतर विविध बचत योजना, सोने, चांदी, कमोडिटी, समभाग वायदे व्यवहार, विविध प्रकारचे कर्ज रोखे, स्थावर मालमता खरेदी असे अनेक पर्याय उपलब्ध असून यातील प्रत्येक पर्याय हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो.

या व्यतिरिक्त निवृत्त व्यक्तीने काही महत्वाच्या गोष्टी तसेच पैसे वाचवू शकणाऱ्या काही गोष्टी अंगीकारणे जरुरीचे आहे. पैसे वाचवणे म्हणजे पैसे मिळवणे होय.

1) सर्व गुंतवणूक आपण व जोडीदार याचे संयुक्त नावे ठेवावी. त्यासाठी वारस नोंदणी करावी मिळालेल्या पावत्या, पासबुक सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांची वेगळ्या ठिकाणी नोंद करून ठेवावी.

2) किमान काही महीने पै न पै चा जमाखर्च लिहावा आणि महीना अखेर त्याचा आढावा घेऊन भविष्यात अनावश्यक खर्च टाळावा.

3) आपल्याला भेट म्हणून काही रक्कम द्यावी असे वाटते. होता होईतो आशा भेटी देऊ नयेत. आपल्या पश्चात ही रक्कम जोडीदारास व नंतर वारसाना आपल्या इच्छेनुसार मिळावी असे इच्छापत्र बनवून ठेवावे.

4) शक्यतो गुंतवलेली रक्कम मोडू नये. सध्या बऱ्याच बँका आपल्या बचतखात्याशी निगडीत मुदत ठेव बनवून देतात त्याचा वापर करावा.

5) दगाबाज मित्र आणि स्वार्थी नातेवाईक यांच्यापासून सावध रहावे.

6) योग्य किमतीस योग्य वस्तू (value for money) यास अनुसरून उचित व्यवहार कोठे होतात याचा सतत शोध घ्यावा म्हणजे आपोआपच पैसे वाचतील.

7) मोठ्या प्रमाणात सातत्याने काही औषधे लागत असतील तर, काही दुकानदार एम आर पी पेक्षा कमी दराने औषधे विकतात त्यांचा शोध घ्यावा. ऑनलाइनही २० %सूट मिळते. जेनेरीक औषधे अजून कमी किंमतीत मिळतात. काही वैद्यकीय चाचण्याही अल्पखर्चात वेगवेगळ्या न्यासामार्फत केल्या तेथे कराव्या.

8) आवश्यकता नसल्यास मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेत गुंतवणुक करु नये.कारण यामुळे आपल्या आर्थिक प्रवाहामध्ये फरक पडतो.

9) आपल्या पैशातून करदेयता वाढणार नाही याची पुरेशी काळजी घ्यावी

10) म्यूचुअल फंडातील अल्पमुदतीच्या नफ्यावरील करदेयता एस डब्ल्यू पी (sistyematic withdrawal plan) चा वापर करून कमी करण्याचा प्रयत्न करा.

11) आपल्या गुंतवणुकीवरील परताव्यातील काही भाग समभागसंबद्धीत योजनेत गुंतवून महागाईवर मात करा व आपली खरेदीक्षमता वाढवा.

12) नियोजन करताना किमान पुढील २५ वर्षे, हे कायम लक्षात ठेवा.

ही यादी अजून वाढू शकते. ती आपण जास्तीत जास्त परिपूर्ण बनवू या. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेेत.

(एक महत्वाची सूचना : वरील लेख माझी निवृत्तीनंतरची गुंतवणूक सर्व साधारणपणे कशी असावी याचा विचार करून अभ्यासासाठी लिहीला असून यावर विचारमंथन व्हावे. मात्र वैयक्तिक गुंतवणूक करताना आपण आपल्या वैयक्तिक गुंतवणूक नियोजकाची मदत आणि मार्गदर्शन घ्यावे.)

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय