कॅमेरा…

कॅमेरा

काल घर पुन्हा एकदा लावायला घेतलं. खरे तर घरातील समान दुसरीकडे हलवून मग पुन्हा एकदा व्यवस्थित लावायचे हे शिवधनुष्य पेलणे म्हणजे आपल्या सगळ्या क्षमतांचा कस असतो. अनेक गोष्टी वर्षोनुवर्षे ज्या आपल्या आठवणीतून पुसल्या गेल्या आहेत त्या सगळ्या समोर येतात. अनेकदा त्या बघताना आपण पुन्हा एकदा भूतकाळात जातो.

काही क्षण तिकडे थांबतो आणि पुन्हा वर्तमानात येऊन आपल्या कामाला लागतो. पण काही गोष्टी अश्या काही भूतकाळात नेतात की पुन्हा परत यावसं वाटत नाही. आयुष्यात एकेकाळी प्राणापलीकडे जपलेल्या गोष्टी ज्यांच्याशिवाय आयुष्य आपण गृहीत धरत नव्हतो किंवा त्या काळी आपल्याकडे असणं प्रतिष्ठेच लक्षण होतं. पण त्यांची किंमत शुन्यापलीकडे काहीच नाही हे सत्य स्वीकारायला ही आज आपण तयार होत नाही हीच त्या गोष्टीची जादू असते. अशीच एक गोष्ट मला आज सापडली. ती म्हणजे आमचा पूर्वीचा कॅमेरा.

बाबांनी आपला खण लावायला घेतल्यावर त्यांच्या तिजोरीतून अनपेक्षितपणे एक पाकीट समोर आलं. त्यातून पुन्हा एकदा हाताला लागला तो लाल रंगाचा, प्रचंड लोभस वाटणारा कोनिका पॉप चा कॅमेरा. आजही ३० वर्षानंतर त्याच्या रुपाची मोहिनी माझ्या मनावर कायम आहे.

पहिल्यांदा जेव्हा बाबांनी त्याला आमच्या घरात आणलं तेव्हा पहिल्यांदा बघताना जो आनंद झाला तोच आज मला त्याला ३० वर्षांनी बघताना झाला. खरे तर त्याला अगदी नाजूकपणे हाताळताना बाबांच्या अनेक सूचनांना मला त्या वेळेला सामोरे जावं लागलं होतं. त्या काळी तो हातात मिळणे म्हणजे वर्ल्ड कप मिळवण्या एवढ खडतर होतं. कारण त्याला असं काही माझे बाबा जपायचे जसं तो काचेचा बनलेला होता. पण तेव्हा आपल्याकडे कॅमेरा असणं ही गोष्टचमुळी माझी कॉलर टाईट करणारी होती.

कॅमेरा मधून फोटो कसे काढतात ह्याची अक्कल हुशारी मला त्या वेळेला असली तरी त्याचं ते रोल पुढे ढकलण्यासाठी असलेलं बटन फिरवायला बाबांची परमिशन लागे. कारण आपण कुठे फिरवताना ते अडकलं की बाबांचा एक धपाटा पाठीत पडला म्हणून समजावं. कॅमेराचा रोल बंदिस्त करणारं मेन स्वीच म्हणजे अडकलेला श्वास. कधी चुकून ते खाली ओढलं गेलं तर रामायण आणि महाभारत आमच्या घरात नक्की हे आधीच निक्षून सांगितलेलं होतं. कारण रोल बाहेरच्या प्रकाशात आला की त्या ३६ फोटोत बंदिस्त केलेले ते सगळेच क्षण आयुष्याच्या पटलावरून पुसले गेले. अनेकदा ह्याच भीतीने मी त्या कॅमेरा पासून लांबच राहिलो.

आपण काढलेला फोटो कोणता हे अनेकदा वर्षभर लक्षात ठेवण्याची गरज पडायची. कॅमेरा चा वापर हा अतिशय सिमित आणि फक्त काही विशेष क्षणांसाठी होतं होता. त्यातही सगळेच्या सगळे ३६ फोटो एका वेळेस काढून संपत नसतं. फोटो पुरवण्यासाठी अनेकदा कित्येक क्षण टिपायचे टाळले जायचे.

कॅमेरा

पिकनिक असो वा एखाद कार्य त्याच्या वेळेचं गणित करून कोणता फोटो काढायचा हे ठरलेलं असायचं. कारण ३६ संपल्यावर दुसरा रोल असला तरी तो व्यवस्थित कॅमेरामध्ये भरणार कोण हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर असायचा. काही मोठं रॉकेट सायन्स त्यात नसलं तरी त्या काळी असं करणारा माझ्या दृष्टीने तरी कोणीतरी खूप हुशार व्यक्तिमत्व असायचं. कारण तो रोल पूर्ण मागे फिरवून मग त्याला नीट बाहेर काढून त्यात दुसरा रोल भरून तो पुन्हा सुरळीत पुढे सरके पर्यंत माझ्या सकट बाबांचा जीव टांगणीला लागलेला असायचा.

हे सगळं दिव्य पार पाडून पुन्हा ते टिपलेले फोटो समोर यायचे तेव्हा लग्नात काढलेल्या फोटोंसोबत बारशाचे फोटो एकाच अल्बममध्ये विसावायचे. आज पुन्हा एकदा ३० वर्षांनी त्याला हातात घेतला तेव्हा हे सगळं आठवून मी आणि बाबा हसलो. बाबांना आजही त्या कॅमेराचं अप्रूप आहे कारण चक्क बाबांच्या तिजोरीत त्याला खास जागा आहे.

आज रोल असणारे कॅमेरे ते कॅमेराचे रोल असणारी संस्कृती कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी ह्याच कॅमेराने माझ्या आयुष्याच्या पटलावरचे रंग टिपले होते. त्याने टिपलेल्या त्या आठवणी आजही माझ्या जवळ अल्बमच्या रूपाने आहेत. आज त्या बघताना पुन्हा एकदा मन भूतकाळात जाते पण तो टिपणारा कॅमेरा मात्र काळाच्या पडद्याआड गेला होता. आज त्याला टिपण्याची संधी मी सोडली नाही. आज त्याच्यापेक्षा कितीतरी प्रगत आणि अगणित फोटो घेणाऱ्या त्याच्या पुढल्या पिढीतून त्याचा फोटो मी घेतला. आज तो फोटो बघताना पुन्हा एकदा त्या लाल रंगाने ३० वर्षापूर्वी जशी भुरळ लावली होती अगदी तशीच भुरळ मला पुन्हा एकदा घातली.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!