हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) आणि करदेयता!!

हिंदू अविभाज्य कुटुंब

हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) स्वतंत्र अशी कायदेशीररित्या निर्माण करण्यात आलेली व्यक्ती असून आयकर कायदा 2(31) नुसार स्वतंत्र अधिकार आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि परंपरागत पद्धतीने पिढीजात कौटुंबिक संपत्तीचे हस्तांतरण कुटुंबातील जेष्ठ पुत्राकडून त्याच्या जेष्ठ पुत्राकडे होत असे. जरी मालमत्ता त्याच्या नावावर असली आणि कुटुंबाच्या भल्यासाठी कोणतेही निर्णय घेण्याचा त्यास अधिकार असला तरी तो त्याचा मालक नसून विश्वस्त आहे ही त्याची भावना असे.

कुटुंबातील इतर सभासदही ही मालमत्ता वाढवण्यात हातभार लावत असत. अनेक कुटुंब एकत्रितपणे आपला पिढ्यानपिढ्या चालू असलेला कौटुंबिक व्यवसाय किंवा शेती करीत असत. केवळ भारतखंडातच असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचा मान राखत सन 1917 साली ब्रिटिशांनी आणलेल्या हिंदू कायद्यात ही संकल्पना स्वीकारण्यात येऊन हिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले.

पुढे सन 1961 मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. पारंपरिक व्यवसाय, मालमत्तेमुळे किंवा यात समावेश असलेल्या व्यक्तींनी कायदेशीर तरतुदींचे पालन करून आपली मालमत्ता तेथे हसत्तांतरीत केल्याने, भेट म्हणून दिल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे, हे उत्पन्न व्यक्तीचे नसून कुटूंबाचे आहे त्यामुळे त्याचे वेगळे विवरण दाखल करण्याचे मान्य केले आहे. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वतःचे आणि HUF चे असे वेगवेगळे विवरणपत्र भरावे लागते. आयकर कायद्यात हिंदू अविभाज्य कुटुंब याची वेगळी व्याख्या करण्यात आलेली नाही. हिंदू कायद्यात याचा उल्लेख असून त्या प्रमाणे कुटुंब म्हणजे एकाच रक्ताचे नातेवाईक त्यांच्या बायका व अविवाहित मुली यांचा समावेश आहे. याची निर्मिती करार करून न होता ती विवाह आणि प्रजोत्पादन यातून आपोआपच होत असते.

जन्माने हिंदू, बौद्ध, शीख अथवा जैन असलेल्या व्यक्तींना हिंदू अविभाज्य कुटुंब निर्माण करता येते आणि त्याचे वेगळे विवरणपत्र भरता येते. पती आणि त्याची पत्नी मिळून 2 व्यक्तीचे हिंदू अविभाज्य कुटुंब होऊ शकते. यात पती हा कर्ता (Ansestor) असतो परंतू पत्नी ही रक्ताची नातेवाईक नसल्याने ती फक्त सदस्य (Member) असते असे मानले जात असे आणि तिचे अधिकार मर्यादित असत तर त्यांची मुले ही पतीची रक्ताची नातेवाईक असल्याने त्याचा दर्जा आणि अधिकार सहदायक (copercenors) या प्रकारचा म्हणजेच कर्त्याप्रमाणे असतो. पती हा कर्ता त्याची मुले सहदायक या सर्वांचा एकूण मालमत्तेत सारखा वाटा असतो. तर पत्नीचे अधिकार राहणे, पालनपोषण यापुरते मर्यादित होते तिला ते कर्ता अथवा सहदायक यांच्याकडून मिळवता येण्याचा अधिकार होता. फक्त तिला वेळोवेळी भेट म्हणून मिळालेले दागिने हे स्त्रीधन समजण्यात येऊन त्यावर पूर्ण अधिकार असतो.

यातील सर्व लोकांचे वैयक्तिक असे वेगळे उत्पन्न साधन असेल अथवा नसेलही. त्यांनी आपल्या पारंपरिक मालमत्ता, उद्योग, भेट, इच्छापत्र यातून हसत्तांतर केलेल्या मालमत्तेतून मिळालेल्या उत्पन्नाची वेगळी मोजदाद केली जाते. फक्त पती आणि पत्नी मिळून झालेल्या हिंदू अविभाज्य कुटूंबाच्या उत्पन्नाची वेगळी मोजदाद होत नाही. त्यांना मूल झाले की ते मूल सदर कुटुंबाचा सहदायक होते त्यानंतरच उत्पन्नाची वेगळी मोजणी होऊ शकते.यास स्वतंत्र कायम स्थायी क्रमांक (PAN) वेगळे व्यवसायनोंदणी प्रमाणपत्र मिळू शकते.

एकत्र कुटुंबाची अशी मालमत्ता निर्माण व्हावी यासाठी करण्यात आलेली ही वेगळी व्यवस्था आहे. ही व्यवस्था कशी असावी यासंबंधीचा करारही करता येतो. या मालमत्तेतून व्यवसाय किंवा गुंतवणूक करून मिळालेली संपत्ती, तर हे मिळवण्यासाठी त्यातील सदस्यांना पगार देता येतो ही रक्कम खर्च म्हणून दाखवता येते. 80/C नुसार केलेली गुंतवणूक, घरभाड्यावरील प्रमाणित वजावट किंवा अनुमानीत करदेयता योजनेखाली उत्पन्नातून घेतलेली वजावट नियमानुसार याला मिळू शकते. सदस्यांचा आयुर्विमा, आरोग्यविमा काढता येतो.

कुटुंबाच्या नावावर घर घेऊन गृहकर्जावरील सवलती घेता येतात. सर्वसाधारण व्यक्तींना असलेल्या कररचनेनुसार यातील उत्पन्नावर करआकारणी केली जाते. अलीकडे आलेल्या पथदर्शी निकाल (Landmark judgements) आणि त्यानुसार झालेल्या विविध सुधारणानुसार कर्त्याच्या निधनानंतर त्याची पत्नी कर्ता बनू शकते तर कुटूंबातील मुलींना (त्या विवाहित असोत अथवा अविवाहित) समान अधिकार आहेत.

ही रचना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ अजय हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याचे 1 लाख 50 हजाराची त्यांनी गुंतवणूक केली त्याप्रमाणे सर्व वाजावटी घेऊन त्याचे करपात्र उत्पन्न 15 लाख आहे. अलीकडे त्याचे वडील मधुकर यांचे निधन झाले त्यांना 5 लाख रुपये भाड्याचे उत्पन्न मिळत होते. अजय हा एकुलता एक मुलगा असल्याने वारसा हक्काने हे भाडे त्यास मिळेल त्यामुळे त्याचे करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या 30% प्रमाणित वजावट घेऊन त्याचे 15 लाख अधिक 3 लाख 50 हजार मिळवून 18 लाख 50 हजार होईल. त्यावर त्यास 3 लाख 62 हजार 500 कर द्यावा लागेल.

त्याने तो कर्ता आणि त्याची पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी यांचे हिंदू अविभाज्य कुटुंब बनवले. त्यामुळे त्याचे उत्पन्न 15 लाख यावर 2 लाख 62 हजार 500 रुपये कर द्यावा लागेल तर त्याच्या हिंदू अविभाज्य कुटुंबाचे उत्पन्न 3 लाख 50 हजार त्यावरील कर 5 हजार हे उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी असल्याने मिळणारी करसुट 5 हजार होऊन कोणताही कर द्यावा लागणार नाही. अशा प्रकारे त्याला आपला 1 लाख रुपये कर वाचवता येईल.

या पद्धतीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे याची निर्मिती करणे जेवढे सुलभ आहे त्याहून त्याचे विसर्जन करणे कठीण आहे. त्याची विभागणी करता येऊ शकते. सर्व सहदायकांचा समान अधिकार असल्याने यातील सभासदांची संख्या जसजशी वाढेल तसतसे त्याचे विसर्जन, विभागणी करणे कठीण होऊन जाते. यास त्यात असलेल्या सर्व सभासदांची संमती लागते. विभागणी होईपर्यंत कायम विवरणपत्र भरावे लागते. विभागणीमुळे मिळालेले उत्पन्न व्यक्तीच्या व्यक्तिगत उत्पन्नात मिळवले जाते.असे उत्पन्न मिळालेला लाभार्थी त्याचे वेगळे HUF तयार करून त्याला मिळालेली संपत्ती नव्या HUF कडे हस्तांतरित करू शकतो.

आता एकत्र कुटुंब पद्धती केवळ अपवादाने अस्तीत्वात असताना फक्त कर वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या वेगळ्या तरतुदी भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लागू असाव्यात का? यावर गांभीर्याने विचार चालू असून भविष्यात समान नागरी कायदा लागू झाल्यास या संकल्पना कदाचित कालबाह्य होतील.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!