नवीन वर्षाचे संकल्प सत्त्यात उतरावेत यासाठी माझ्या आयडिया!!

या वर्षी या महिन्याचा वापर मी ‘बफर महिना’ म्हणून करायचा ठरवलं आहे. म्हणजे काय? तर नवीन गोष्टी करायला एका अख्या महिन्याची वाट बघायची नाही.

बघता बघता २०१९ चा शेवटचा महिना सुरु झाला सुद्धा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना, ‘हे वर्ष किती पटकन गेलं, आत्ता तर कुठे २०१९ ची सुरुवात झाली होती आणि डिसेंबर आला सुद्धा!’ असं वाटत असेल.

तर अनेकांना या वर्षात आलेल्या अडचणीमुळे किंवा त्यांच्या आयुष्यातल्या इतर काही घडामोडींमुळे हे वर्ष चांगलंच लांबल्या सारखं वाटलं असेल.

‘हे वर्ष एकदाचं संपत आलं आता नवीन वर्षाची सुरुवात चांगली होऊ दे.’ असंही बऱ्याच लोकांना वाटलं असेल. थोडक्यात काय? आजच्या दिवशी कॅलेंडरचं पान पलटताना मात्र मागच्या अकरा महिन्यांची पानं पलटताना वाटतं त्यापेक्षा नक्कीच वेगळं काहीतरी प्रत्येकाला जाणवलं असणार.

डिसेंबर महिन्याचं हेच वैशिष्ट्य आहे. या महिन्यात बहुतेक लोकांना वेगळाच हुरूप आलेला असतो. या एका महिन्यात आपण मनातल्या मनात नवीन वर्षाचं एकदम जोरदार स्वागत करून काय काय नवीन गोष्टी करायच्या आहेत त्या ठरवतो.

हा उत्साह खूप चांगला असतो, त्या निमित्ताने आपण अनेक याद्या करतो मग त्या नवीन काही शिकायच्या गोष्टींच्या असतात, आपल्यात घडवून आणायच्या बदलांबद्दल असतात, काही पुस्तकांच्या नावांची असतात तर काही फिरायला जाण्याच्या गावांची.

जवळजवळ अख्खा महिना एकतर या गडबडीत नाहीतर ३१ डिसेंबरचं नियोजन करण्यात जातो. या सगळ्यात आपण एक फार महत्वाची गोष्ट मात्र करायला विसरतो आणि यावर्षी या जाणाऱ्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला मी नेमकी तीच गोष्ट करायची ठरवली आहे आणि या लेखाच्या निमिताने तुमच्यापर्यंत ती पोहोचवायचा प्रयत्न करत आहे.

दरवर्षीच आपण ‘नवीन वर्षात करायच्या गोष्टी’ अशा नावाची एकतरी यादी करतो, अगदी कागदावर लिहिली नाही तरी मनातल्या मनात तरी अशी यादी असतेच.

सुरुवातीचे एक-दोन.. अगदी चार-पाच महिने आपण त्या यादीचा पाठपुरावा घेतो, काय काय नवीन गोष्टी ठरवलेल्या असतात त्या नित्य-नेमाने करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हळूहळू आपला उत्साह कमी होत जातो.

हळूहळू नवीन सुरुवात जुनी होत जाते आणि आपण नव्याने सुरु केलेल्या गोष्टी थोड्या थोड्या करत बंद करतो आणि मग काहीच काळात त्या यादीकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष होऊ लागतं. वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात तर अशा कुठल्या यादीचा पूर्णपणे विसरच पडतो आणि असेच महिने पुढे जात असताना अचानक डिसेंबर उजाडतो की परत नवी यादी करायचा नवा उत्साह आपल्यात संचारतो.

‘झाले गेले विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे’ या युक्तीप्रमाणे आपण गेल्या वर्षात केल्या त्या चुका केल्या, आता पुढे जाऊ असं स्वतःशी ठरवत पुढे जायला बघतो हे चांगलंच आहे पण यात केलेल्या चुका जरी विसरून जाऊ असं आपण ठरवत असलो तरी त्या चुका नेमक्या काय होत्या हे आपल्याला समजणं आवश्यक आहे.

नवीन वर्षाचं नियोजन करताना या वर्षाचा आढावा घेणं हे विसरता कामा नये आणि म्हणूनच मी माझी मागच्या वर्षीची यादी माझ्यासमोर घेऊन बसले आहे.

आता मुळात मी वर म्हटलं तसं मी मागच्या वर्षी काही अशी ठोस यादी केली नव्हती, काही गोष्टी स्वतःपुरत्या ठरवल्या होत्या इतकंच. तर आता याच ठरवलेल्या गोष्टी मी माझ्यासमोरच्या कागदावर उतरवल्या.

त्यातल्या किती गोष्टी मी केल्या, केलेल्यातल्या किती गोष्टी मनापासून करून पूर्ण केल्या, किती गोष्टी अर्धवट सोडून दिल्या आणि किती गोष्टी केल्याच नाहीत अशी एक वेगळी यादी केली.

ज्या गोष्टी अर्धवट सोडल्या त्या परत सुरु करायच्या का? ज्या गोष्टींना सुरुवातच करायची राहून गेली त्या गोष्टी परत करायला सुरुवात करायची का असे एकनाअनेक प्रश्न समोर उभे ठाकले.

मग ज्या गोष्टी केवळ आळसापोटी मागे पडल्या त्या परत कराव्या अशा निष्कर्षाला मी पोहोचले, ज्या गोष्टींबद्दल आता स्वारस्य उरलं नाही त्या उगाच ओढून ताणून करायच्या नाहीत असं ठरवलं आणि ज्या गोष्टी मी मनापासून पूर्ण केल्या त्याबद्दल स्वतःला छानसं बक्षीस द्यायचं सुद्धा ठरवलं.

हे केल्याने हातात घेतलेलं काम पूर्ण झाल्याचं समाधान तर मिळतंच शिवाय आपण कुठे चुकलो, काय कमी केलं, कशामुळे खोळंबा आला, मुळात आपण स्वतःबद्दल अवाजवी अपेक्षा बाळगल्या होत्या का अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळाल्यामुळे नवीन यादी करायला सोपं होतं.

उगीच उत्साहाच्या भरात नवीन गोष्टींना सुरुवात करून त्या बंद करण्याची वेळ येऊ नये यासाठी ही यादी उपयुक्त ठरेल असं वाटत आहे.

आता आला प्रश्न तो नवीन यादीचा. जे शक्य आहे, जे आपल्याला खरंच करायचं अथवा शिकायचं आहे अशाच गोष्टी या यादीत असाव्यात असं मी ठरवलं आहे. उदाहरण द्यायचं तर माझ्या यादीत एक-दोन नवीन चांगल्या सवयी, एकदोन स्वतःमध्ये सुधारणा व्हावी अशा सवयी, एखादी नवीन कला जोपासाची असल्यास ती आणि दरवर्षी माझ्या यादीत असतेच ती गोष्ट- म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त पुस्तकं वाचणं इत्यादी गोष्टी असणार आहेत.

आता बोलूया या लेखाची सुरुवात ज्याच्यापासून झाली त्याच्याबद्दल- डिसेंबर महिना. या वर्षी या महिन्याचा वापर मी ‘बफर महिना’ म्हणून करायचा ठरवलं आहे. म्हणजे काय? तर नवीन गोष्टी करायला एका अख्या महिन्याची वाट बघायची नाही.

मागच्यावर्षी ठरवलेली एखादी राहिलेली गोष्ट जर या महिन्यात करता येण्यासारखी असेल तर ती करायचीच आणि नाही तर सरळ नवीन वर्षाच्या ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या चक्क या महिन्यापासून करायला सुरुवात करायची!

यामुळे या नवीन सवयींना म्हणा किंवा बदलाला म्हणा, आपण सरावलेले असू. एकदम एखादी गोष्ट सुरु केली की ती करायचा उत्साह अल्पकाळात मावळतो त्यामुळे या महिन्याभरात यादीतली एकेक गोष्ट घेऊन एकेका आठवड्याला ती करायचा प्रयत्न करायचा म्हणजे एकदम चार-पाच नवीन गोष्टी एकावेळेस सुरु करायचा सुद्धा अवघडलेपणा येणार नाही शिवाय आपण या सगळ्या सवयींना किंवा बदलांना सरावलेले असल्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण सगळ्या गोष्टी एकत्र सुरु करू शकतोच आणि या वर्षी काही कमी पडू नये म्हणून मागच्या वर्षीचा यादीचा घेतलेला आढावा आपल्या हाताशी आहेच!

आणि हो, या महिन्याअखेरीपासूनच मी जर या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी केल्या तर त्याबद्दल मी स्वतःला छानसं बक्षीस सुद्धा देणार आहे!

२०२०ची तयारी मी आजपासूनच सुरु केली आहे, तुम्ही?

लेखन: मुग्धा शेवाळकर

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय