मकर संक्रांत, पतंग आणि ती आठवण

मकर संक्रांत पतंग

आज नेहमीप्रमाणेच सकाळी उठले आणि….

हलकेसे शब्द “वो..वो…काट..” कानावर पडले….

मग मी बाहेर आले तर काही मुले आपआपल्या गच्चीवर पतंग उडवीत होते… साधारणतः त्यावेळेला दहा बारा पतंग असतील आणि तेच शब्द “वो.. वो… काट ..”🕺

आणि ……..

नेमकी ती पतंग कटून आमच्या गच्चीवर पडली मग ती मुलं धावतंच आली आमच्या घरी ..

विनवणी करू लागली, “काकू द्याना पतंग”…..

मी पण त्यांना काही आढे वेढे न घेता गुपचुप पतंग देऊन मोकळी झाले.

किती कमावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!!!

व्हायलाही हवा होता त्यांचा पतंग उंच उडत होता…. आकाशात भरारी घेत होता!!

कर्तुत्वरूपी भरारी घेऊनच आकाशात उडायचं होतं जणू… यामध्येच मला खूप समाधान वाटले😍

हल्ली मुलं पुस्तकांच्या ओझ्यानी इतकी दबलेली आहेत की त्यांना काही गोष्टींचा आनंदच घेता नाही आणि ……

मग मला एकदम दहा बारा वर्षांपूर्वीचा माझा मोठा मुलगा आठवला….

संक्रात आली की किती याची सारखी धावपळ..😅

चक्री, पतंगी.. सुत अजून खूप काही.. गच्चीवरून खाली ये जा सतत सुरू होती…

मला मात्र सतत टेन्शन हा आता अभ्यास करणार की नाही आणि किती दिवस हेच चालणार?

म्हणून… किती वेळ असा हा पतंग उडविण्यात घालवेल.?🤔

त्याच बिल्डिंगमध्ये माझ्या मुलाच्या वयाची मागे पुढे दोन चार वर्षाच्या फरकांनी आठ दहा मुले होती..

काय विचारायचे… खूप धुमाकूळ ….छोटी छोटी गोड गोड वानरसेनाच जणू 🐒🐒😀

सकाळपासूनच या आमच्या बच्चा कंपनीची धावपळ सुरू व्हायची..

एकमेकांना हे आण ते आण…मला मात्र हा ‘आई भात दे’ म्हणून सारखा त्रास द्यायचा.

खरं म्हणजे चिपकविण्यासाठी दुसरंही काही चाललं असतं पण नाही त्यांना भातच लागायचा…

जणू आईकडून कुठल्या जन्माचा सूड घेतो की काय? असं वाटायचं 😅

मी चिडायची मग मी पण रागारागानीच एक छोटा गंजभर वेगळा केलेला भातच नेऊन दिला आणि याला दोन दिवस पुरवायचा म्हणून प्रेमाची ताकीद पण देऊन आले…

यांच्या सोबत आमच्या बिल्डिंगमधील मोठे लोकही (पतंग प्रेमी) असायचे..

ते पण त्यादिवशी आपल्या वयाचा विसर पडून या बच्चा कंपनीत मिसळून आपल्यातील छोटं मुल शोधायचे….😚

गाण्याच्या तालावर पतंग उडायची ती थेट आकाशाच्या दिशेने स्वछंद विहार करायला….

पण छान वाटायची ती संक्रात…!!! एकत्र, सर्वांना स्नेहाच्या नात्यांनी बांधून ठेवलेली, तिळगुळाची गोडी घेऊन आलेली….

एक वर्षी तर यांनी मांजा बनविण्याचे ठरविले (हल्ली यावर बंदी आली आहे) ही गोष्ट वेगळी आणि सर्व टीम सज्ज

आदल्या दिवशीच सुरू झाली तयारी.. काचेचा चुरा (काच कुटून), सिरस, रंग, धागा वगैरे….

विटांची चूल मांडून ती पेटवल्या गेली आणि मांजा घोटने सुरू झाले….

किती घाणेरडा वास सुटला होता त्यावेळी🤧…

काही जण मोठी मंडळी रागवत पण होते.. ऐकले तर ती बच्चा कंपनी कुठली…!!

एकदाचा मांजा तयार झाला नी कुठलेतरी युद्ध जिंकून आल्याचा आनंद यांना झालेला होता.. 👻

कदाचित काही केल्याचं समाधान पण असेल आणि होणारच!!

संपूर्ण रात्र जागून काढली होती या मुलांनी… दुसऱ्या दिवशी बोट कापणं सुरू झालं…

मग काय विचारायचे आमच्या चिरजीवांनी मस्त उपाय शोधून काढला त्यावर….

सर्व बोटांना चिकट पट्ट्याच लावून घेतल्या…पूर्ण टेपच खाली झाला..

‘हसायला पण येत होते आणि रागवायला पण…’

आणि हे मग आठ ते दहा दिवस चालायचे…. पण संक्रांतीचा दिवस म्हणजे विचारूच नका….

जेवणाचे सुद्धा भान रहात नव्हते…. यांची वाट बघून आमची मात्र तीळगुळाची केलेली पोळी थंड होऊन जात होती..

संध्याकाळी बिल्डिंग मधील आम्ही सर्व महिला पण जमायचो मुलांसोबत.. एकीने चक्री हातात घेऊन दुसरीने पतंग उडविण्याचा प्रयत्न केला की असे वाटायचे आम्हाला पण पतंग उडविता येते हो…!!!

ती हातभर उंचावर जायची ती बाब वेगळी😜

मग दिवसाची सांगता म्हणून चिवडा वगैरे करून या चमुचे पुढारी पतंगीला दिवा लावून ती उडवायचे…

जणू सर्व जगाला प्रकाशमय संक्रात असू दे हा संदेश देणारी …..

“चली.. चली रे पतंग चली चली रे….”

ती कशी उडवायचे ते मात्र माहिती नाही😌

असा हा संक्रातीचा सण आला की मला नेहमीच धावाधाव करणारा, थंडीचे दिवस असून सुद्धा घामाघूम झालेला, एका हातात दोन चार पतंगी, चक्री घेऊन धाड धाड जिना उतरून येतांना माझा मुलगा आठवतो…

आज तो एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतोय. मी आजही खात्रीने सांगते की संक्रांतीच्या दिवशी त्याची बोटे जरी संगणकावर फिरत असतील तरी त्याचे लक्ष मात्र बाहेर कुठे पतंग दिसते का?…

लुकलूकणारे दोन डोळे…. आकाशाकडे मधून मधून बघत असणार…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

पतंगीचा सण,
शुभेच्छांचे वाण,
तीळगुळाचा गोडवा
सदैव अतरंगी असू द्यात,
पतंगीला ढील देत
स्नेहाची नाती अजूनच घट्ट करू यात…

Image Source: https://nenow.in/

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!