मागच्या एका लेखात आम्ही तुम्हाला शिकेकाईमुळे केसांना काय फायदे होतात, शिकेकाईमुळे केसांचे आरोग्य कसे सुधारते हे सांगितले.
लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यातील बरेचसे फायदे तुम्हाला कदाचित आधीपासून माहीत असतील, काही तुमच्या विस्मरणात गेले असतील तर काही तुम्हाला नव्याने समजले असतील.
त्या लेखाला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला.
लेखाच्या शेवटी आम्ही सांगितलेच होते की शिकेकाईचा वापर कसा करायचा, वेगवेगळ्या केसांच्या प्रकारांना शिकेकाई कोणत्या पद्धतीने वापरायची याबद्दल माहिती देणारा अजून एक लेख तुम्हाला लवकरच वाचायला मिळेल.
त्यात सांगितल्याप्रमाणे आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी तीच माहिती घेऊन आलोय.
मागच्या लेखात तुम्ही शिकेकाईच्या फायद्यांबद्दल वाचले आता हा लेख वाचून झाल्यावर तुम्हाला शिकेकाईचा वापर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा समजतील.
शिकेकाईचे फायदे वाचल्यानंतर, तुम्ही सुद्धा ती वापरून बघायला उत्सुक असाल, हो ना? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे.
पण इतर शाम्पूचा जसा फेस होतो तितका शिकेकाईचा होत नाही.
जर शिकेकाई बरोबर रिठाचा सुद्धा वापर केला तर जास्त प्रमाणात फेस यायला मदत होते.
शिकेकाई आणि रिठ्याच्या वापराने केस स्वच्छ सुद्धा होतात.
केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर कसा करावा
केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे बाजारात मिळणारी तयार शिकेकाईची पावडर तुम्ही वापरत असलेल्या शाम्पूमध्ये मिसळायची आणि तो शाम्पू दर वेळेला केस धुताना वापरायचा.
विकतची शिकेकाई पावडर वापरायची का? त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे का?
अशा शंका तुम्हाला येत असतील तर शिकेकाईच्या शेंगा आणून त्याची पावडर घरी सुद्धा करता येऊ शकते.
शिकेकाईची पावडर घरी करायची असल्यास शिकेकाईच्या शेंगा विकत आणून त्या साधारण ४ दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या आणि घरच्या मिक्सरवर त्याची बारीक पावडर करून घ्यायची.
बाजारात शिकेकाईचे तयार साबण सुद्धा मिळतात.
जर तुम्हाला केमिकल फ्री उत्पादने हवी असतील, पण तुमच्याकडे सगळे सोपस्कार करायला वेळ कमी असेल तर हे नैसर्गिक, तयार शिकेकाईचे साबण सुद्धा चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात.
पण जर तुम्हाला फक्त शिकेकाई वापरायची असेल आणि केमिकल शाम्पू पूर्णपणे बंद करायचे असतील, तर खालील काही पद्धतीप्रमाणे शिकेकाईचा वापर केस धुण्यासाठी केला जाऊ शकतो.
१. शिकेकाईचा शाम्पू कसा तयार करायचा?
रात्री झोपण्यापूर्वी शिकेकाईच्या शेंगा, रिठा आणि आवळ्याची पावडर (जी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते) भिजत ठेऊन सकाळी ते पाणी चांगले उकळून घ्यायचे.
तुम्हाला हवे असेल तर त्यात कडुलिंबाची पाने, मेथी बियांची पूड सुद्धा घालू शकता.
व्यवस्थित उकळून थंड झालेले पाणी नीट मिक्स करून, गाळून घ्यायचे.
गाळलेले जे पाणी उरेल, तो म्हणजे शिकेकाई वापरून घरच्याघरी तयार केलेला शाम्पू.
या शाम्पूमध्ये दोन तीन चमचे पाणी घालून फेस काढून घ्यायचा आणि तो केसांना आणि डोक्याला व्यवस्थित लाऊन, नेहमीप्रमाणे केस धुवून घ्यायचे.
या शाम्पूचा इतर शाम्पूसारखा फेस होणार नाही, पण यामुळे केस स्वच्छ, सुंदर नक्की होतील.
२. शिकेकाईचे तेल कसे तयार करायचे?
चमचाभर शिकेकाई पावडर अर्ध्या वाटी तेलात घालून मिक्स करून घ्यायची.
हे तेल बरणीत भरून २ ते ३ आठवडे मुरु द्यायचे.
मधूनच बरणी हलवून आतील मिश्रण मिक्स करून घ्यायचे.
३ आठवड्यानंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस धुण्यापूर्वी या तेलाचा वापर केला जाऊ शकतो.
हे तेल नियमितपणे केसांना लावल्यास केसांची वाढ सुधारते.
३. शिकेकाईचा हेयर पॅक कसा करायचा?
तुमच्या केसांच्या प्रकृतीनुसार शिकेकाईचे वेगवेगळे हेयर पॅक केले जाऊ शकतात.
काहींचे केस खूपच रुक्ष असतात, काहींचे सारखे तेलकट दिसतात.
खाली वेगवेगळ्या केसांच्या प्रकाराला शिकेकाईचे हेयर पॅक कसे करायचे, कसे वापरायचे याची माहिती दिली आहे.
तुम्हाला जो हेयर पॅक सूट होईल तो तुम्ही घरच्याघरी तयार करून तुमचे केस निरोगी आणि सुंदर करू शकता.
१. कोरड्या, रुक्ष केसांसाठी
केस जर कोरडे आणि रुक्ष असतील तर शिकेकाई आणि दही हे केसांना आवश्यक ते पोषण देतात.
हा पॅक करण्याची कृती सुद्धा अगदी सोपी आहे.
एका वाटी दह्यात साधारण दोन चमचे शिकेकाई घालून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची.
ही पेस्ट केसांना, मुळापासून २० मिनिटे लाऊन ठेवायची आणि नंतर धुवून घ्यायची.
कोरड्या केसांसाठी शिकेकाईचा अजून एका प्रकारे पॅक करता येतो.
अर्धी वाटी शिकेकाई आणि एक चमचा आवळ्याची पावडर कोमट पाण्यात २ तासांसाठी भिजवून ठेवायची.
हे मिश्रण केसांना लाऊन ठेवायचे. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाकायचे.
२. तेलकट केसांसाठी
तेलकट केस असतील तर ते स्वच्छ ठेवणे जिकरीचे काम असते कारण केसांच्या मुळाशी तेल साचून तिथे धुळीचे कण अडकून बसतात.
यामुळे केसांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होत नाही. यासाठी २ चमचे शिकेकाई पावडर, १ चमचा हिरवे मुग वाटून केलेली पावडर आणि एक चमचा मेथी दाण्याची पावडर हे एका अंड्याच्या फक्त पांढऱ्या भागाबरोबर फेटून घ्यायचे.
केस धुताना या पॅकचा वापर शाम्पू सारखा करायचा.
यामुळे केस व्यवस्थित स्वच्छ होऊन केसांचा तेलकटपणा जाईल.
३. कोंड्यासाठी
मागच्या लेखात शिकेकाईचे फायदे आपण बघितले त्यात शिकेकाई कोंडा घालवायला उपयुक्त असते हे आपण बघितले.
कोंडा घालवायला शिकेकाई पावडर, कडुलिंबाच्या पाल्याची पावडर, मेथी दाण्याची पूड आणि आवळा पावडर हे समप्रमाणात घ्यायचे.
या सगळ्यामध्ये पाणी घालून ते साधारण २० मिनिटे व्यवस्थित उकळून घ्यायचे.
थंड झाल्यावर त्यातल्या गाठी हाताने मोडून घेऊन हे मिश्रण गाळून घ्यायचे.
गाळलेल्या पाण्याने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करायचा आणि अर्ध्या तासाने केस धुवून घ्यायचे.
५. स्प्लिट एन्ड्ससाठी
शिकेकाई पावडर खोबरेल तेलात मिक्स करून तेल उकळून घ्यायचे.
हवाबंद डब्यात हे तेल टिकते.
आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावल्याने केसांना योग्य ते पोषण मिळते आणि स्प्लिट एन्ड्स होत नाहीत.
६. पांढऱ्या केसांसाठी
अकाली केस पांढरे होत असतील तर त्यावर शिकेकाई हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.
अर्धा कप आंबट दह्यात शिकेकाई पावडर मिक्स करून पेस्ट करून घ्यायची.
ही पेस्ट केसांना मुळापासून लाऊन घ्यायची.
२० मिनिटांनी केस धुवून घ्यायचे.
७. रुक्ष केस तजेलदार दिसावेत यासाठी
केस कृतीम रित्या सरळ किंवा कुरळे केले, हेयर ड्रायरचा जास्त वापर केला तर केस रुक्ष दिसू लागतात.
अशा केसांना योग्य पोषणाच गरज असते.
त्यासाठी २० ग्राम शिकेकाई, २० गरम रिठा आणि १० ग्राम आवळा दीड लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायचे.
नंतर ते व्यवस्थित उकळून घ्यायचे.
उकळल्यावर बारीक आचेवर साधारण अर्धा तास ठेवावे.
थंड झाल्यावर हाताने सगळ्या शिकेकाईच्या शेंगा, रिठा आणि आवळा मॅश करून घ्यायचा.
केस धुताना याचा वापर शाम्पू सारखा केला जाऊ शकतो.
यामुळे केस तजेलदार दिसतात आणि केसांचा रुक्षपणा जाऊन ते मऊ सुद्धा होतात.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.