आजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात.
शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते.
मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास… अशी न संपणारी लिस्ट!
अशा अनेक क्लासमध्ये त्यांचा दिवस संपून जातो. त्यांना यामुळे इतर छंदांना वेळ देता येत नाही.
जो काही फ्री टाईम त्यांच्या या रुटीनमधून त्यांना मिळतो त्यात ते टीव्ही बघतात किंवा गेम खेळतात.
मुलांचे आयुष्य हे पूर्णपणे शाळा-अभ्यास-क्लास-परीक्षा याच्याभोवतीच गुंफले गेले आहे.
आजकालच्या जगात सगळीकडेच स्पर्धा वाढत आहे.
चांगले मार्क मिळाले तर चांगले शिक्षण मग चांगली नोकरी हे सगळे गणित आईबाबांच्या मनात फिक्स असते आणि मुलांना सुद्धा हेच शिकवले जाते.
यात काही चूक नाही. हल्ली सगळीकडेच स्पर्धा आहे.
त्यामुळे अगदी लहान वयापासूनच अभ्यास करून प्रगती करत राहणे आईबाबांच्या आणि मुलांच्या हातात आहे.
सुरुवातीपासून अभ्यासाची गोडी लागावी म्हणून अगदी लहान वयापासून मुलांना गुंतवून ठेवायला लागते.
पण या सगळ्यामुळे मुलांना बाहेर, मोकळ्या हवेत खेळायला वेळच मिळत नाही.
त्यांना जो वेळ मिळतो तो घरातच फार तर फार बैठे खेळ खेळण्यात जातो नाहीतर टीव्ही बघण्यात.
पण ही बाब अतिशय गंभीर आहे.
मुलांनी बाहेर, मोकळ्या हवेत खेळणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत गरजेचे असते.
अनेक पालकांना आजकाल वाटते की मुले बाहेर खेळून वेळ वाया घालवतात, त्या वेळात त्यांचा एखादा क्लास होऊ शकतो किंवा अभ्यास होऊ शकतो पण असा विचार करणे चूक आहे.
खेळणे हा मुलांसाठी फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक व्यायाम असतो. यामुळे मुलांची वाढ, विकास योग्य पद्धतीने होतो.
तुमची मुले जर बाहेर खेळत नसतील तर त्यांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे.
मुलांना सगळ्याच गोष्टी चार भिंतीच्या वर्गात बसवून शिकवता येत नाहीत.
काही गोष्टी ते त्यांचे ते शिकतात.. पण हे केव्हा शक्य होईल?
जर तुम्ही मुलांना मोकळे सोडले, खेळायला पाठवले तर!
मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना बालपणात वेगवेगळे अनुभव घेता यावेत, जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल यासाठी प्रत्येक पालकाने त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावली पाहिजे.
कारण त्याचे अनेक प्रकारे फायदा मुलांना होतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर खेळल्याने मुलांचा व्यायाम होतो.
यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होते. त्यांचे टीव्ही बघणे, गेम खेळणे कमी होते.
याव्यतिरिक्त सुद्धा बाहेर खेळण्याचे मुलांच्या मानसिक विकासासाठी अनेक फायदे आहेत.
या लेखात त्याबद्दलच माहिती दिली आहे.
१. मुलांना सामाजिक भान येते
समजा जर तुम्ही मुलांना घरीच ठेवले तर त्यांना बाहेर, चार लोकात कसे वागायचे याची समज येणार नाही.
बाहेर गेल्यावर काय करायचे, काय नाही हे त्यांना शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना बाहेर सोडणे.
लोकांशी कसे बोलायचे, आपल्याला काही आडले तर लोकांना मदत कशी मागायची याचे प्रात्यक्षिक त्यांना मिळते.
तुमची जर लहानशी फॅमिली असेल तर याचा विशेष उपयोग होईल.
परिवारात जर जास्त सदस्य नसतील तर इतरांशी मिळून-मिसळून कसे वागायचे हे मुलांना माहीत नसते.
त्यांना जर बाहेर सोडले तर ते आपणहून चार लोकांशी बोलतात.
यामुळे त्यांचा परीघ विस्तारित होतो. केवळ आपले घर, आपले आईबाबा हेच जग नाही, याची जाणीव त्यांना होते.
यामुळे ते दुसऱ्यांचा विचार करायला शिकतात, इतरांच्या भावनांना किंमत द्यायला शिकतात.
२. मुलांमध्ये ‘टिम स्पिरीट’ निर्माण होते
बाहेर न जाता घरात मुले एकटीच खेळत असतील तर त्यांना होणारा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे त्यांना मग इतर मुलांबरोबर जवून घ्यायला कठीण जाते.
त्यांचे मित्र लवकर होत नाहीत. त्यांना स्वतःपुरताच विचार करायची सवय लागते.
इतर मुलांशी खेळ किंवा खाऊ वाटणे त्यांना अवघड जाते. ती एकलकोंडी होतात.
याउलट जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच बाहेर खेळायची सवय लावली तर त्यांना इतर मित्र मैत्रिणी मिळतात.
आपल्या वस्तू वाटून घ्यायचे भान त्यांच्यात येते.
मुख्य म्हणजे चार मुलांशी मिळून-मिसळून खेळताना त्यांच्यात टीम स्पिरीट निर्माण होते.
आयुष्यात प्रगती करायची असेल तर या टिम स्पिरीटचा उपयोग होतो.
हे स्पिरीट त्यांना फक्त लहानपणीच नाही तर आयुष्यात पुढे, अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा उपयोगी पडणार असते.
३. मुलांना आयुष्याचे धडे गिरवायला मिळतात
मुलांना शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल असे विषय शाळेत शिकवता येतात पण अनुभवांचे काय?
ते काही त्यांना शिकवता येत नाहीत.
मुले जर बाहेर पडलीच नाहीत, चार मुलांबरोबर बाहेर, मैदानी खेळ खेळलीच नाहीत तर त्यांना वेगवेगळे अनुभव कसे येतील?
त्याचे जगणे बंदिस्त होऊन जाईल.
मुले प्रत्येक गोष्ट टिपत असतात. इतरांच्या वागण्याचा बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो.
यामुळे इतरांच्या मनात काय आहे हे ओळखणे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे या गोष्टी ते आपसूकच शिकतात.
४. मुलांना प्रत्यक्ष उदाहरणातून शिकायला मिळते
पुस्तकात वाचून शिकणे आणि प्रत्यक्षात अनुभव घेऊन शिकणे यात पुष्कळ फरक आहे.
मुले बाहेर पडून मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांना मातीचे प्रकार, दगडाचे प्रकार, हवामान, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले या गोष्टी प्रत्यक्ष बघून शिकता येतील.
बाहेर खेळल्याने त्यांचे कुतूहल वाढेल. यामुळे ते सुद्धा अभ्यासात जास्त लक्ष घालायला बघतील.
वर्गात शिकवलेले धडे त्यांना बाहेर मैदानात अनुभवायला मिळतील.
यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा पक्का होईल आणि त्यांची प्रगती होत राहील.
५. मुलांच्या मनावरचा ताण दूर होतो
जसे तुम्हाला अनेक चिंता असतात, स्ट्रेस असतात अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो.
त्यांच्या मानसिक विकासावर या स्ट्रेसचा परिणाम होत असतो.
असूया, असुरक्षितता, भीती यासारख्या अनेक भावना मुलांच्या आत असतात. यामुळे त्यांना स्ट्रेस येतो.
पण बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराला व्यायाम होतो आणि त्यांच्या मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते.
मुलांची कधीकधी चिडचीड होत असते, त्यांना सुद्धा राग अनावर होऊ शकतो.
अशावेळी त्यांच्यावर ओरडणे हा उपाय नसतो. तर त्यांच्या भावनांना मोकळे करून देणे हा योग्य उपाय आहे.
पण हे कधी होईल? जर त्यांच्यात असलेल्या उर्जेला योग्य वाट मिळाली तर.
बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांच्या शरीरातील उर्जा योग्य ठिकाणी खर्च होते त्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होतो.
आईबाबांनो, मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी चांगले मार्क मिळवून चांगले शिक्षण घेणे जसे गरजेचे आहे तितकेच गरजेचे आहे वेगवेगळे अनुभव घेऊन अनुभव संपन्न होणे.
जर मुलांना चार चौघात मिसळता येत नसेल, टीम बरोबर काम करताना अडचणी येत असतील तर त्यांची प्रगती कशी होईल?
मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाइतकाच मानसिक विकास सुद्धा महत्वाचा आहे हे हा लेख वाचून तुम्हाला लक्षात आले असेल.
म्हणूनच मुलांच्या संगोपनात अभ्यासाइतकेच प्राधान्य खेळण्याला सुद्धा दिले पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.